शनिवार, २७ डिसेंबर, २०१४

जय कलियुग, जय जय कलियुग


सगळी गंमत आहे. देवाधर्माचे धडे अभिनेते आणि चित्रपट देत आहेत. लोक त्यालाच धार्मिक शिक्षण समजत आहेत. रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद-उपनिषदे, स्मृती, आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, कबीर, नानक, दादू, मीरा, तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, विवेकानंद, चिन्मयानंद, दयानंद, गोरखपूर प्रेसची प्रकाशने, अलवार संत, तिरुवल्लुवर; असली सगळी नावेही धर्मशिक्षण देणाऱ्या अभिनेत्यांनी किंवा त्यांच्याकडून ते घेणाऱ्या लोकांनी ऐकली नसतील. सांख्य, योग, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वैशेषिक ही षडदर्शने आहेत हे कधी त्यांच्या कानावरून गेले नसेल. हजारो वर्षात होऊन गेलेल्या हजारो ऋषी मुनी संत यांनी केलेले प्रबोधन किती प्रचंड आहे याची यांना कल्पनाही नसेल. या विषयावर अधिकारवाणीने खंडन वा मंडन करण्यासाठी लागणारे सायास, अभ्यास वा साधना यांनी केली असण्याची शक्यताच नाही. तरीही दीडशहाणे लेखक, दिवटे अभिनेते चित्रपट काढून शिकवणार आणि गल्ला किती जमा झाला यावरच नजर ठेवून तयार केलेले चित्रपट पाहून आपण सर्वज्ञानी होणार !!! जय कलियुग, जय जय कलियुग.

रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

शेतीबद्दलची कृतघ्नता


दोन वाक्ये अनेकदा कानी पडतात.
१) आपला देश शेतीप्रधान आहे, तरीही शेतीकडे दुर्लक्ष केले जाते.
२) शेतीवरील भार कमी करायला हवा.
प्रश्न असे निर्माण होतात की-
१) देश शेतीप्रधान आहे म्हणून शेतीकडे लक्ष द्यायला हवे का?
२) शेतीवरील भार कमी करायचा म्हणजे शेती कमी करायची का?
३) शेतीकडे केवळ रोजगार निर्मितीची क्षमता याच दृष्टीने पाहणे योग्य आहे का?
४) सेवा आणि उत्पादन क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करून शेतीवरील सगळा रोजगार त्यात सामावून घेतला तर ते किती योग्य ठरेल?
५) मुळात शेतीकडे पाहण्याची दृष्टी काय असावी?

खरे तर देश शेतीप्रधान असो की नसो, माणसांना खायला लागणारच आणि खाण्याची व्यवस्था शेतीशिवाय होऊच शकत नाही. आज जगात डझनावारी देश असे आहेत ज्यांच्याकडे स्वत:ची शेती नाही. त्यांना पूर्णत: दुसऱ्या शेती उत्पादकांवर अवलंबून राहावे लागते. प्रगती, तंत्रज्ञान, आधुनिकीकरण कितीही झाले तरी पोट सुटत नाही आणि निसर्गावर मात करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही पोटाला लागणारी भूक संपत नाही. त्यामुळेच चंद्र-मंगळावर वसाहती वसवल्या तरी शेतीला पर्याय नाही. शेतीची ही मुलभूतता लक्षात घेऊन शेतीचा विचार व्हायला हवा. ती अन्य गोष्टींपैकी एक नाही. अन्य गोष्टी असल्या वा नसल्या तरी चालू शकणारे आहे. शेतीशिवाय चालूच शकणार नाही. आपण सगळ्यांनीच शेतीबद्दलची कृतघ्नता टाकून देण्याची गरज आहे.

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

रिकामटेकडे

आपलं conditioning किती असतं, नाही का? पाहा- एखादी व्यक्ती कामात आहे, एखाद्याला काम आहे, एखादा कोणी काम करत असतो, एखाद्याला काम हवे आहे; अशासारखी वाक्ये कानावर पडली की आपल्या मनात एक चित्र तयार होते. हातापायांची हालचाल, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, वाकणे, बसणे, उभे राहणे, बोलणे, वाचणे, खेळणे, खाणे, पिणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे; असं काही ना काही- क्रियात्मक असं चित्र. पण यातील काहीही न करता, शारीरिक हालचाल न करता, काम केल्या जाऊ शकतं किंवा कोणी तसं काही काम करत असेल ही कल्पनासुद्धा करणं कठीण असतं. मग प्रत्यक्ष तसं काम करणं ही तर दूरचीच गोष्ट. वास्तविक प्रत्येक जण कधी ना कधी, क्षण दोन क्षण का होईना असं काम करतच असतो. काळ, वेळ, स्थळ या गोष्टी महत्वाच्या नसतातच अशा कामासाठी. कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण ही कामे अशीच निष्क्रियतेच्या सदरात मोडतात. प्रत्येक जण यातील काही ना काही, कधी ना कधी करतोच. मात्र तरीही कोणी शांत, निष्क्रिय दिसला रे दिसला की आपण विचारतोच काय आराम चाललाय? एखाद्याची वृत्ती खोचक आणि उथळ असेल तर हाच प्रश्न- काय, काही काम नाही का? किंवा काय रिकामेच? अशा शब्दात व्यक्त होतो. कारण कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण; अशा गोष्टी म्हणजे काम असतं हेच आपण मानत नाही. इतक्या ढोबळ, व्यावहारिक स्तरावर ही स्थिती असते, तर प्रतिभावंत कवी, लेखक, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, चिंतक; हे सारे बिनाकामाचे वाटावेत यात नवल करण्याचे कारण नाही. मन आणि बुद्धी दिसत नाही. त्यामुळेच मन, बुद्धीच्या स्तरावर या प्रतिभावंतांचे जे प्रचंड काम सुरु असते ते सामान्य व्यक्तीला आकलन होऊच शकत नाही. त्या अमूर्त कामाचा काही प्रत्यक्ष मूर्त परिणाम पुढे आला तर हे धुके थोडे दूर होऊ शकते. परंतु पोळ्या लाटण्यापूर्वी केले जाणारे कणिक मळण्याचे काम जसे दिसते तसे मूर्त अभिव्यक्तीच्या आधीचे मन-बुद्धीचे मळणे दिसू शकत नसल्याने आणि प्रत्यक्ष ते काम करणारी व्यक्तीही त्याचे वर्णन करण्यास असमर्थ असल्याने त्यांच्याबद्दल असलेला `रिकामटेकडे' हा भाव बहुश: कायम राहतो. मन-बुद्धीच्या पलीकडील असे आणखीन एक क्षेत्र आहे जेथून प्रतिभेचा उगम होतो, त्या क्षेत्रातील निष्क्रियता, शांतता, तरंगशून्यता, विकल्पहीनता, शरीराची- मनाची- बुद्धीची- आंदोलने नसण्याची स्थिती ही जाणीवेतून आणि प्रयत्नपूर्वक येणारी स्थिती आहे. ती स्वनियंत्रित स्थिती आहे. प्रतिभावंताची सहज निष्क्रियता आणि ही स्वनियंत्रित निष्क्रियता यात थोडा भेद आहे. मात्र प्रतिभावंताला या स्वनियंत्रित निष्क्रियतेची कल्पना येऊ शकते कारण त्याने स्वत: अशा प्रकारच्या निष्क्रियतेचा अंशत: का होईना अनुभव घेतलेला असतो. सर्वसामान्य व्यक्तीसाठी मात्र या साऱ्यासाठी एकच शब्द असतो- `रिकामटेकडे'. आपलं जग आणि जगणं अशा रिकामटेकड्या लोकांच्याच उपकाराखाली दबलेलं आहे हे मात्र सत्य आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ नोव्हेंबर २०१४

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

बोलका प्रसंग- १

काही वर्षांपूर्वीचा प्रसंग. मित्राच्या वडिलांचा स्वर्गवास झाला होता. अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेलो होतो. सगळे विधी वगैरे झाले. शेवटी जराजर्जर शरीराला भस्मीभूत करणाऱ्या त्या पावन अग्नीत एकेक गोवरी टाकत सगळे परतू लागले. निघताना मृताला तिलांजली द्यायची आणि नळावर हातपाय धुवून बाहेर पडायचे अशी प्रथा आहे. काही जणांचे हातपाय धुवून झाले आणि नळाचे पाणी गेले. आता काय याची चर्चा सुरु झाली. तिथे एक हापशी होती तिकडे काही जणांनी मोर्चा वळवला. स्वाभाविक वेळ लागू लागला, जरा गर्दी झाली. त्यावेळी आमच्या कार्यालयातील एक इलेक्ट्रोनिक इंजिनिअर म्हणाला- `राहू द्या, नाही धुतले हातपाय तर नाही. घरी जाऊन आंघोळ करतोच आपण.' त्याचे म्हणणे खरेच होते. युक्तिवाद पण योग्य होता. पण तो तिथेच थांबला नाही. आपल्या म्हणण्याचा तर्क देत तो म्हणाला- `सब कुछ भगवान ही तो है. हम लोग भी फिजूल बातो मे उलझते है.' लगेच मनात घुसळण झाली. आपण कोणत्याही तत्वाचा किती सोयीस्कर अर्थ लावतो ते जाणवलं. मनातून सहज एक प्रश्न ओठांवर आला. त्याला म्हटले- `मित्रा, सगळे भगवान आहे हे ठीक. पण गेल्या महिन्यात तुम्हा इलेक्ट्रोनिक इंजिनिअरच्या पदोन्नतीचा प्रश्न आला होता तेव्हा तुला हे का नाही रे आठवले? तेव्हा का भांडलास ती पदोन्नती तुलाच मिळावी म्हणून.' स्वाभाविकच त्याने फक्त डोळे वटारून पाहिले आणि तो निघून गेला.

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४

`आपने पेढा खाया है?'

नवरात्रीनिमित्त देवीची विविध ठिकाणी पाहिलेली रूपं मनात तरळून गेली. का कोणास ठाऊक, मन रेंगाळलं आई त्रिपुरेश्वरीजवळ. मिझोराम आणि त्रिपुरा यांच्या सीमेवर राहणाऱ्या रियांग जमातीच्या पलायनाचा आणि शिरकाणाचा आढावा घेण्यासाठी तीन दिवस कंचनपूरला मुक्काम करून त्रिपुराची राजधानी आगरताळाला आलो होतो. तिथे दोन दिवस मुक्काम करून परतीचा प्रवास करायचा होता. आगरताळाच्या मुक्कामात माझा सोबती आणि मार्गदर्शक होता- राजू. १५-१६ वर्षांचा, बिहारचा राहणारा राजू तिथे शिक्षण घेत होता. पहिल्या दिवशी संध्याकाळी शहर फिरताना राजूने प्रस्ताव दिला- उद्या सकाळी आपण त्रिपुरेश्वरीला जाऊ. प्रस्तावात नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिपुरेश्वरीला गेलो. तिथे गेल्यावर लक्षात आलं राजूने तिथे का नेलं ते. त्या दिवशी काहीतरी विशेष दिवस होता. नक्की लक्षात नाही, पण पौर्णिमा, अमावास्या, मंगळवार किंवा असाच कोणता तरी. अन तो त्या मंदिरातील बळी देण्याचा दिवस होता. आम्ही बसमधून उतरलो आणि डोंगर चढू लागलो. दोन-चार मिनिटे झाली आणि राजू म्हणाला, लवकर चला. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यातून त्याला लक्षात आलं होतं की, थोड्याच वेळापूर्वी गडावर रेडा नेण्यात आला आहे. याचा अर्थ रेड्याचा बळी दिला जाईल. तो पाहायला मिळावा यासाठी लोकांची धावपळ सुरु होती. गर्दी तर तुफान होतीच. वाट काढत काढत आम्ही वर पोहोचलो. मंदिराचं आवार मोठ्ठं होतं. मंदिरासमोर लोखंडी कठडे लावून मोकळी जागा केलेली होती. ती बळी देण्याची खास जागा. लोक नवस बोलतात आणि मग बोललेल्या नवसाप्रमाणे कोंबडी, बकरे, रेडे वगैरे घेवून येतात. देवीची पूजा करून, ज्याचा बळी द्यायचा त्याची पूजा करून मंदिरापुढील आवारात आणले जाते अन तेथील पुजारी बळीच्या मानेवर सुरी चालवतात. पूर्णत: अघोरी. पण लोकांच्या आस्थेचा आणि आवडीचा विषय. कदाचित मांसाहारावर ताव मारायला मिळावा यासाठीची एक पद्धत. राजूची धावपळ सुरु होती. मी मात्र आग्रह केला, पहिले देवीचे दर्शन घेऊ. आम्ही मंदिरात गेलो, पण राजू धड मंदिराच्या पायऱ्याही चढला नाही आणि गर्दीत दिसेनासा झाला. मी गाभाऱ्यात गेलो. हात जोडले. हात जोडले की; काही सांगणं, मागणं, विचारणं नसतंच. हात जोडणं हे खऱ्या अर्थाने नमन (न-मन) व्हावे हाच प्रयत्न असतो. बाहेर आलो. बळी वगैरेत मला काहीही स्वारस्य नव्हते. पण राजूला शोधणे आवश्यक होते. फार शोधावे लागले नाही. तो लगेच सापडला. कठड्याजवळ त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. तो हळहळत सांगत होता- `आपल्याला उशीर झाला. रेड्याचा बळी होऊन गेला होता. आपल्याला तो पाहता आला नाही.' मनात म्हटलं, माझं सुदैव तुझं दुर्दैव. त्याच्या इच्छेखातर १०-१५ मिनिटं थांबलो. गड उतरताना मात्र गेल्या तासाभरातली एकही गोष्ट मनात नव्हती. मनात फक्त त्यापूर्वी राजूने विचारलेला एकच प्रश्न घुमत होता. आम्ही बसमधून उतरलो आणि देवीच्या दर्शनाला जायचे म्हणून पूजेचे सामान, प्रसाद घ्यावा म्हणून दुकानात गेलो. तेव्हा राजूने विचारले होते- `आपने पेढा खाया है? यहां का पेढा बहुत अच्छा होता है.' मी काहीच बोललो नव्हतो. पेढे खाऊन कंटाळलेल्या वर्गाच्या एका प्रतिनिधीला आपलाच एक तरुण देशबांधव विचारत होता- पेढा खाया है क्या? आपल्या अवतीभवतीच्या अभावाचा एक विषण्ण करणारा चलचित्रपट डोळ्यापुढे सरकून गेला होता. पेढा खाणे ही राजूसाठी नव्हाळीयुक्त आनंदाची बाब होती. मुक्कामावर येईपर्यंत त्या उत्साही मुलाची बडबड सुरूच होती. मुक्कामावर आलो अन जवळचा पेढ्याचा पुडा काढून त्याच्या हातावर ठेवला. म्हटलं- घे तुझ्यासाठी. बरीच वर्षं झाली. शिक्षण वगैरे संपवून तो पुन्हा त्याच्या गावाला गेला असेल किंवा अन्यत्र कुठे चांगलं जीवन जगत असेल. आज अचानक आईचं ते रूप आठवलं, राजू आठवला, त्याचा प्रश्न आठवला आणि मनोमन हात जोडताना फक्त इतकंच पुटपुटलो- `दरिद्री देवो भव.'

- श्रीपाद कोठे
३० सप्टेंबर २०१४

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

प्रवाहपतीत होऊ नये

हिंदुत्व एका संस्कृतीचं नाव आहे. ती एक जीवनशैली आहे. भारतीयत्वाचा पर्यायी शब्द आहे. त्याची सांगड एखाद्या पक्षाशी घालणं अनुचित आहे. भारतीयत्व आणि हिंदुत्व एक आहे असं म्हटलं जातं, तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की- राजकीय व्यवस्था म्हणून अनेक पक्ष राहणारच. समाज आहे तोवर राजकीय आकांक्षा बाळगणारे अनेक जण राहणारच. हिंदुत्वात सगळ्याच विचारांचा समावेश होणार असेल तर, टोकाच्या डाव्यांपासून टोकाच्या उजव्यांपर्यंत सारे हिंदुत्वाच्या कक्षेत येतील, यायला हवेत. सगळा देश हिंदुत्वाने भारला जाईल तेव्हा काय एकच पक्ष राहील की काय? असे होणार नाही/ होऊ नये. राजकीय विचार, राजकीय भूमिका, राजकीय इच्छा/ आकांक्षा या राहणारच. तेव्हा पक्षही अनेक राहणारच. हिंदुत्व अतिप्रचंड आहे. त्याला पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न त्याचे विरोधक जाणीवपूर्वक करतात. मात्र हिंदुत्व समर्थकांनी तेच केल्यास त्याने हिंदुत्वाची शक्ती वाढण्यापेक्षा हिंदुत्वाचे खच्चीकरणच होईल. शिवसेनेकडे फक्त हिंदुत्वाचे स्टीकर होते बाकी काहीही नाही. त्यामुळे एवढ्या विचाराची, दूरवर पाहण्याची वगैरे तिच्याकडून अपेक्षाच करता येत नाही. परंतु हिंदुत्वाचा गांभीर्याने विचार करणाऱ्यांनी मात्र प्रवाहपतीत होऊ नये.

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

माणूस-२

माणूस-२

तिहार कारागृहावर एक कार्यक्रम पाहिला. तेथील अव्यवस्था, कारागृहातील गुंडगिरी, त्या कारागृहाचा इतिहास, किरण बेदी यांनी त्या तिहारच्या अधिकारी असताना सुरु केलेले कैद्यांच्या सुधारणेचे प्रयत्न इत्यादी. मन सहज १०-१२ वर्षापूर्वीच्या प्रसंगात पोहोचलं. १०-१२ वर्षांपूर्वी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. मुळात कारागृहात जाण्याची (कार्यक्रमाला का होईना !!) पहिलीच वेळ. त्याआधी एकदा एका लेखासंबंधी कारागृह अधीक्षकांना भेटायला कारागृहात त्यांच्या ऑफिसमध्ये जाणं झालं होतं. शिवाय अगदी शाळेत असताना इंदिरा गांधींच्या कृपेने लावण्यात आलेल्या आणीबाणीत कारागृहात असलेल्या मामांना भेटायला आईसोबत गेलो होतो. पण गुन्हेगार कैद्यांची भेट, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे; याची पहिलीच वेळ होती. शिवाय त्यांच्यासमोर भाषण काय करायचे असाही मनात प्रश्न होता. परंतु कार्यक्रम छान झाला. समोर बसलेल्या कैद्यांच्या डोक्यावरील टोप्या आणि त्यांचे वेश बदलून त्यांना सर्वसामान्य कपडे दिले असते तर समोर कैदी बसले आहेत असेही जाणवले नसते. समोर नीट रांगेत बसलेले कैदी, मंचावर अन्य कार्यक्रमांप्रमाणेच व्यवस्था, सुरुवातीला पूजन, दीपप्रज्वलन वगैरे रीतसर. नंतर भाषण. आभार प्रदर्शन. सगळा कार्यक्रम पार पडला. पुष्पगुच्छ देणे, आभार प्रदर्शन ही कामे कैद्यांनीच केली. आभार प्रदर्शन ऐकताना मात्र सगळेच चाट पडले होते. भाषा, शुद्ध उच्चार,  मंचावरून बोलण्याचा सराव, आत्मविश्वास त्यात वापरलेल्या ओळी आणि मुद्देही; कोणालाही आश्चर्यात टाकतील असेच. स्वाभाविकच कार्यक्रमानंतर विचारपूस केली. तेव्हा कानावर विश्वासच बसेना. ज्या व्यक्तीने आभार प्रदर्शन केले होते ती व्यक्ती आळंदीची होती. ज्ञानेश्वरीवर प्रवचने देत होती आणि एका खुनाच्या आरोपाखाली नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होती. फार तपशील कळला नाही. पण हेही कळले की, कारागृहात असे काही कार्यक्रम असले की आभार प्रदर्शन वगैरे त्याच्याकडेच राहत असे. अतिशय मनमिळावू आणि समंजस. छोट्या छोट्या गोष्टीत अन्य कैद्यांचा मार्गदर्शक. समेट घडवून आणणे वगैरे त्याचेच काम. त्याने खरंच खून केला असेल? केला असेल तर का? ज्ञानेश्वरीचा उपासक एवढा तोल गमावू शकतो? अशी काय परिस्थिती असेल? माणूस आणि गुन्हेगार यात काय फरक असतो? माणसाचा गुन्हेगार का होतो? कोणाचा आणि किती दोष? या गोष्टी अपरिहार्य आहेत?

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

manus-1

मध्यंतरी कोल्हापूरला जाणं झालं. तिथे अभियांत्रिकीला शिकणाऱ्या भाच्याच्या खोलीवर एक दिवस मुक्काम केला. चार-पाच मित्र मिळून दोन खोल्या घेतल्या आहेत. वरच्या मजल्यावर. मोठ्ठं घर, मोठ्ठं आवार. आंगण, झाडं वगैरे. घरमालक निवृत्त बँक कर्मचारी. साधे, मितभाषी, मनमिळावू. दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो तेव्हा एक छान गोष्ट पाहता, अनुभवता आली. उठून, फ्रेश होऊन बाल्कनीत येउन उभा राहिलो. भूरभूर पाऊस पडून गेला होता. आकाश ढगाळलेलं होतं. शांत, प्रसन्न वातावरण. फाटकाजवळ प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला. तेवढ्यात वृत्तपत्र टाकणारा माणूस आला. त्याने आवाज दिला- पेपर. आत ऐकू गेलं नसावं. दोन-तीन मिनिटे वाट पाहून त्याने पुन्हा आवाज दिला- पेपर. तरीही कोणी बाहेर आलं नाही. तेव्हा त्याने आपली सायकल पुढे घेऊन स्टँडवर लावली. पेपर काढले, त्याची नीट घडी घातली आणि पडणार नाही, भिजणार नाही अशा बेताने फाटकात खोचून ठेवले. मला घरी पेपर टाकणारा पोरगा आठवला. पेपर भिजतात का, उडून जातात का, वगैरे कशाचाही विचार न करता, आवाज वगैरे देण्याच्या भानगडीत न पडता भिरकावून देणारा. कोल्हापूरचा तो पेपरवाला तिथल्या पेपरवाल्यांचा प्रतिनिधी होता की नाही हे नाही सांगता येणार. पण तो लक्षात राहणारा आणि अनुकरणीय मात्र नक्कीच होता. त्याचं तसं वागणं फुललेल्या पारिजातकाचा परिणाम होता, लहान शहराचा स्वभाव होता की त्या व्यक्तीचा पिंड? कोणास ठाऊक.