नवरात्रीनिमित्त देवीची विविध ठिकाणी पाहिलेली रूपं मनात तरळून गेली. का कोणास ठाऊक, मन रेंगाळलं आई त्रिपुरेश्वरीजवळ. मिझोराम आणि त्रिपुरा यांच्या सीमेवर राहणाऱ्या रियांग जमातीच्या पलायनाचा आणि शिरकाणाचा आढावा घेण्यासाठी तीन दिवस कंचनपूरला मुक्काम करून त्रिपुराची राजधानी आगरताळाला आलो होतो. तिथे दोन दिवस मुक्काम करून परतीचा प्रवास करायचा होता. आगरताळाच्या मुक्कामात माझा सोबती आणि मार्गदर्शक होता- राजू. १५-१६ वर्षांचा, बिहारचा राहणारा राजू तिथे शिक्षण घेत होता. पहिल्या दिवशी संध्याकाळी शहर फिरताना राजूने प्रस्ताव दिला- उद्या सकाळी आपण त्रिपुरेश्वरीला जाऊ. प्रस्तावात नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिपुरेश्वरीला गेलो. तिथे गेल्यावर लक्षात आलं राजूने तिथे का नेलं ते. त्या दिवशी काहीतरी विशेष दिवस होता. नक्की लक्षात नाही, पण पौर्णिमा, अमावास्या, मंगळवार किंवा असाच कोणता तरी. अन तो त्या मंदिरातील बळी देण्याचा दिवस होता. आम्ही बसमधून उतरलो आणि डोंगर चढू लागलो. दोन-चार मिनिटे झाली आणि राजू म्हणाला, लवकर चला. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यातून त्याला लक्षात आलं होतं की, थोड्याच वेळापूर्वी गडावर रेडा नेण्यात आला आहे. याचा अर्थ रेड्याचा बळी दिला जाईल. तो पाहायला मिळावा यासाठी लोकांची धावपळ सुरु होती. गर्दी तर तुफान होतीच. वाट काढत काढत आम्ही वर पोहोचलो. मंदिराचं आवार मोठ्ठं होतं. मंदिरासमोर लोखंडी कठडे लावून मोकळी जागा केलेली होती. ती बळी देण्याची खास जागा. लोक नवस बोलतात आणि मग बोललेल्या नवसाप्रमाणे कोंबडी, बकरे, रेडे वगैरे घेवून येतात. देवीची पूजा करून, ज्याचा बळी द्यायचा त्याची पूजा करून मंदिरापुढील आवारात आणले जाते अन तेथील पुजारी बळीच्या मानेवर सुरी चालवतात. पूर्णत: अघोरी. पण लोकांच्या आस्थेचा आणि आवडीचा विषय. कदाचित मांसाहारावर ताव मारायला मिळावा यासाठीची एक पद्धत. राजूची धावपळ सुरु होती. मी मात्र आग्रह केला, पहिले देवीचे दर्शन घेऊ. आम्ही मंदिरात गेलो, पण राजू धड मंदिराच्या पायऱ्याही चढला नाही आणि गर्दीत दिसेनासा झाला. मी गाभाऱ्यात गेलो. हात जोडले. हात जोडले की; काही सांगणं, मागणं, विचारणं नसतंच. हात जोडणं हे खऱ्या अर्थाने नमन (न-मन) व्हावे हाच प्रयत्न असतो. बाहेर आलो. बळी वगैरेत मला काहीही स्वारस्य नव्हते. पण राजूला शोधणे आवश्यक होते. फार शोधावे लागले नाही. तो लगेच सापडला. कठड्याजवळ त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. तो हळहळत सांगत होता- `आपल्याला उशीर झाला. रेड्याचा बळी होऊन गेला होता. आपल्याला तो पाहता आला नाही.' मनात म्हटलं, माझं सुदैव तुझं दुर्दैव. त्याच्या इच्छेखातर १०-१५ मिनिटं थांबलो. गड उतरताना मात्र गेल्या तासाभरातली एकही गोष्ट मनात नव्हती. मनात फक्त त्यापूर्वी राजूने विचारलेला एकच प्रश्न घुमत होता. आम्ही बसमधून उतरलो आणि देवीच्या दर्शनाला जायचे म्हणून पूजेचे सामान, प्रसाद घ्यावा म्हणून दुकानात गेलो. तेव्हा राजूने विचारले होते- `आपने पेढा खाया है? यहां का पेढा बहुत अच्छा होता है.' मी काहीच बोललो नव्हतो. पेढे खाऊन कंटाळलेल्या वर्गाच्या एका प्रतिनिधीला आपलाच एक तरुण देशबांधव विचारत होता- पेढा खाया है क्या? आपल्या अवतीभवतीच्या अभावाचा एक विषण्ण करणारा चलचित्रपट डोळ्यापुढे सरकून गेला होता. पेढा खाणे ही राजूसाठी नव्हाळीयुक्त आनंदाची बाब होती. मुक्कामावर येईपर्यंत त्या उत्साही मुलाची बडबड सुरूच होती. मुक्कामावर आलो अन जवळचा पेढ्याचा पुडा काढून त्याच्या हातावर ठेवला. म्हटलं- घे तुझ्यासाठी. बरीच वर्षं झाली. शिक्षण वगैरे संपवून तो पुन्हा त्याच्या गावाला गेला असेल किंवा अन्यत्र कुठे चांगलं जीवन जगत असेल. आज अचानक आईचं ते रूप आठवलं, राजू आठवला, त्याचा प्रश्न आठवला आणि मनोमन हात जोडताना फक्त इतकंच पुटपुटलो- `दरिद्री देवो भव.'
- श्रीपाद कोठे
३० सप्टेंबर २०१४