काही वर्षांपूर्वीचा प्रसंग. मित्राच्या वडिलांचा स्वर्गवास झाला होता. अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेलो होतो. सगळे विधी वगैरे झाले. शेवटी जराजर्जर शरीराला भस्मीभूत करणाऱ्या त्या पावन अग्नीत एकेक गोवरी टाकत सगळे परतू लागले. निघताना मृताला तिलांजली द्यायची आणि नळावर हातपाय धुवून बाहेर पडायचे अशी प्रथा आहे. काही जणांचे हातपाय धुवून झाले आणि नळाचे पाणी गेले. आता काय याची चर्चा सुरु झाली. तिथे एक हापशी होती तिकडे काही जणांनी मोर्चा वळवला. स्वाभाविक वेळ लागू लागला, जरा गर्दी झाली. त्यावेळी आमच्या कार्यालयातील एक इलेक्ट्रोनिक इंजिनिअर म्हणाला- `राहू द्या, नाही धुतले हातपाय तर नाही. घरी जाऊन आंघोळ करतोच आपण.' त्याचे म्हणणे खरेच होते. युक्तिवाद पण योग्य होता. पण तो तिथेच थांबला नाही. आपल्या म्हणण्याचा तर्क देत तो म्हणाला- `सब कुछ भगवान ही तो है. हम लोग भी फिजूल बातो मे उलझते है.' लगेच मनात घुसळण झाली. आपण कोणत्याही तत्वाचा किती सोयीस्कर अर्थ लावतो ते जाणवलं. मनातून सहज एक प्रश्न ओठांवर आला. त्याला म्हटले- `मित्रा, सगळे भगवान आहे हे ठीक. पण गेल्या महिन्यात तुम्हा इलेक्ट्रोनिक इंजिनिअरच्या पदोन्नतीचा प्रश्न आला होता तेव्हा तुला हे का नाही रे आठवले? तेव्हा का भांडलास ती पदोन्नती तुलाच मिळावी म्हणून.' स्वाभाविकच त्याने फक्त डोळे वटारून पाहिले आणि तो निघून गेला.