गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

पाप आणि गुन्हा

पाप आणि गुन्हा या दोन्ही कल्पनात व्यक्तीची चूक ही मूळ गोष्ट आहे. खरं तर प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तसंच जगत, वागत असते. परिस्थितीच्या दबावामुळे त्यात बदल होतो वा करावा लागतो. परिस्थितीचा दबाव कधी जोरजबरदस्तीचा मामला असतो, तर कधी राजीखुशीचा. त्यानुसार त्याला वेगवेगळी नावेही दिली जातात. जोरजबरदस्तीचा भाग असेल तर त्याला; तडजोड, किंमत चुकवणे, अपरिहार्यता यासारखे रंग लाभतात. राजीखुशीचा मामला असेल तर त्याला प्रेम, त्याग, सेवा असे रंग लाभतात. पण मुळात परिस्थितीचा हा दबाव आपण स्वीकारतोच का? त्याचे साधे, सरळ उत्तर आहे जगण्यासाठी. आजुबाजूला माणसे, निसर्ग, वातावरण काहीही नाही आणि जगतोय ही कल्पनाही करणे शक्य नाही आणि तसे जगणेही शक्य नाही. असे जगताना स्वाभाविकच काही मर्यादा येतात आणि त्यातून सर्वसाधारण शहाणपणातून काही नियमांचा जन्म होतो. सुरळीत (सुखी, समाधानी किंवा सार्थक वगैरे नाही) जगण्यासाठी हे नियम पाळण्याला सगळे मान्य करतात. हे नियम न पाळणे म्हणजे चूक. चूक या गोष्टीला त्याहून फार अर्थ नाही. तसे पाहिले तर चूक नावाची काही गोष्टच नाही. नियम न पाळणे हाच त्याचा अर्थ. आणि चूक केली की दिली जाते ती सजा. सजा देण्यासाठी चूक सिद्ध करावी लागते. त्यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात गुन्हा आणि धार्मिक नीतीच्या भाषेत म्हणतात पाप. परंतु या दोनमध्ये बाकी काही फरक नसला तरीही एक सूक्ष्म भेद आहे आणि तो सूक्ष्म असला तरीही तसा मोठा आणि महत्वाचा आहे. जेव्हा एखाद्या चुकीकडे गुन्हा म्हणून पाहिले जाते तेव्हा त्याचा निर्णय चूक करणारी व्यक्ती सोडून बाकीचे करतात. काय शिक्षा द्यायची तेदेखील अन्य लोक ठरवतात. अन शिक्षा भोगून संपली की त्या चुकीतून सुटका होते. मात्र, एखाद्या चुकीकडे पाप म्हणून पाहिले की, त्याचा अंतिम निर्णय चूक करणाऱ्याच्या मनातून व्हावा लागतो. त्यासाठी प्रायश्चित्त त्याच्याच मनाने घ्यावे लागते. प्रायश्चित्त घेऊनही सुटका नसते, तर उपरती होऊन पुन्हा चूक होऊ नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे पाप कल्पनेत संबंधिताच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन असते. त्यातून व्यक्तीच्या आंतरिक विकासाच्या शक्यता विस्तारतात. गुन्हा म्हटल्यावर सदसद्विवेकबुद्धीला आवाहन असलेच पाहिजे असे नाही. त्यामुळेच आंतरिक विकासाच्या शक्यताही धूसर होतात. सामुहिक जीवनातील चूक आणि त्याला सजा एवढेच त्याचे स्वरूप असते. आज पाप ही कल्पना सोडून दिल्यासारखी दिसते. त्यामुळे penance, प्रायश्चित्त (चित्त महत्वाचे), तपस्या या गोष्टी कालबाह्य ठरत आहेत. म्हणूनच आंतरिक विकासाचा अभाव जाणवतो. या आंतरिक विकासासाठी जगात जे काही प्रयत्न आजवर झालेत त्यातील `पाप-पुण्य' संकल्पना हाही एक महत्वाचा प्रयत्न आहे. कायदा सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य यांच्यासाठी `गुन्हा' ही बाब योग्य असली तरीही, त्याला `पाप-पुण्य' याचीही जोड देता येईल का? या दोन्ही कल्पनांचा समन्वय अधिक पूर्णतेकडे नेईल का? विचार व्हायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २४ एप्रिल २०१५

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

`सत्वा'वर लक्ष केंद्रित असणारे हनुमंत

आज हनुमान जयंती. मनापेक्षाही वेगवान, इंद्रियांवर ताबा असलेला, बुद्धिमतां वरिष्ठम, वायूचा आत्मज, वानर युवकांचा प्रमुख, श्रीरामदूत; अशा हनुमंताला नमस्कार असो. भारतीय परंपरेतील आदर्श व्यक्तिरेखेतील एक !! आज या महावीराला प्रणाम करताना मनात येतो आहे, त्याने केलेला लंकादहनाचा पराक्रम. सीता हे मानवी सत्वाचं व्यक्तीरूप आहे. तिला डांबून ठेवणारा रावण ब्रम्हज्ञ, बलसंपन्न, कुबेराला लाजवेल अशा संपन्नतेचा स्वामी आहे. मारुतीरायाचं लक्ष मात्र फक्त आणि फक्त `सत्वा'वर, सीतेवर, सात्विकतेवर आहे. त्याला तिची सुटका करायची आहे. अन `सत्व'विरोधकांना कापरं भरवायचं आहे. शारीरिक बळ, बौद्धिक बळ, आर्थिक बळ या कशापुढेही झुकायला ते तयार नाहीत. त्यांची शेपटी वाढतच वाढत जाते. कुठलीच गोष्ट त्यांना घाबरवू शकत नाही अन दीपवूही शकत नाही. सत्वावर लक्ष केंद्रित असणारा, कशानेही प्रभावित न होणारा, शक्ती-बुद्धी-युक्तीने परिपूर्ण महारुद्र हाच आज आदर्श व्हायला हवा.

हे म्हणत असताना आपली दृष्टी जगभर फिरते पण आपल्यावर जात नाही. हे टाळता यायला हवे. गजांत लक्ष्मीचा मोह न धरता लंका उद्ध्वस्त करण्याची प्रेरणा आणि हिंमत आमच्यात किती आहे. झुप्कन येणाऱ्या मोटारीतून उतरणाऱ्या स्त्री वा पुरुषाचा आमच्यावर विपरीत प्रभाव नसतो? अशा व्यक्तीपुढे तोंड उघडायला तरी आपण तयार असतो? पहिल्या पगाराचा आनंद साजरा करण्यासाठी मळलेली शाल पांघरून जाणाऱ्या आई-लेकीला अडवणाऱ्या, गरीब मुलाला हॉटेलच्या आतही आणण्यास मज्जाव करणाऱ्या किंवा महिन्याची कमाई नसणाऱ्या डॉक्टरला व्हिसा नाकारणाऱ्या पंचतारांकित संस्कृतीचा आमच्या मनावरील प्रभाव आणि पगडा हनुमंत भक्तीला शोभणारा म्हणावा काय? याच संस्कृतीत क्रिकेट आणि चित्रपट नायक, नायिकांचा समावेश करावा लागेल.

हनुमानाने लंकेची संपत्ती, महाल, हवेल्या यांची तर वाट लावलीच; पण तेथील जंगलही जाळून टाकले. स्वत: वनवासी असूनही जंगल खाक केले. कारण त्यात डांबलेल्या सत्वाची त्याला मुक्तता करायची होती. आज पूर्व- पश्चिम- उत्तर- दक्षिण- जंगलात डांबलेल्या सत्वाची सुटका करण्यासाठी बलभिमासारखे कठोर होण्याची गरज आहे. चहा कंपन्यांच्या मालकांपासून कामगारांपर्यंत कोणालाही पळवण्याच्या रूपाने असो, नक्षलवाद्यांच्या रूपाने असो, तस्करांच्या रूपाने असो, की जमीन माफियांच्या रूपाने असो; जंगलात कोंडलेल्या सत्वाच्या मुक्तीसाठी बजरंग पराक्रमाची गरज आहे.

रामराज्याची मूल्य, त्यांचे व्यावहारिक संदर्भ, संकल्पना या साऱ्याचं दर्शन घडवणारे हे व्यक्तित्व आहे. हनुमान चिरंजीव या अर्थाने आहेत. त्यांची शक्तीमत्ता, बुद्धिमत्ता, गुणवत्ता मनामनात जनाजनात जागो यासाठी प्रार्थना करूया.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ४ एप्रिल २०१५

अंधाराशी मैत्री

आताशा मला अंधार आवडू लागला आहे. किती छान असतो ना तो? त्याच्या लेखी सगळ्यांना सारखी वागणूक. कोणी लहान नाही, मोठा नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, विद्वान नाही, अज्ञानी नाही, चांगला नाही, वाईट नाही, सुंदर नाही, कुरूप नाही. सगळे सारखे. अंधारात थोडीशी निष्क्रियता असते. उजेडासारखी सक्रियता नसते. पण उजेडातल्यासारखे हेवेदावे, गळेकापूपणा, स्वार्थ हेदेखील नसतात. विचार करून पाहा- नेहमी केवळ अंधारच अंधार राहिला, काय होईल? काहीही होणार नाही. कधी कधी वाटतं, खरा तो अंधारच. त्याला दुसरा कसलाही आधार लागत नाही. स्वत:चं अस्तित्वही त्याला सिद्ध करावं लागत नाही. उजेडासाठी कसं सूर्याला उगवावं लागतं. दिवा लावावा लागतो. काही नाही तर, चकमक तरी घासावी लागते. त्याशिवाय उजेडाचं अस्तित्व नाही. अंधार मात्र स्वयंभू. काही असलं काय नि नसलं काय, अंधार मात्र असतोच. उजेडाला मर्यादाही असतेच. छोटी पणती असेल तर त्यातलं तेल संपेपर्यंतच उजेड. तोही दोन-चार मीटर परिसरातच. तेल संपल्यावर आणि दोन-चार मीटरच्या पलीकडे अंधारच. सूर्य असला तरीही, काही तासांनंतर पुन्हा अंधारच. सगळ्या प्रकारच्या उजेडाचा शेवटही अंधारच. सगळ्या प्रकारचे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, मातृत्व, चांगलं- वाईट, प्रेम- द्वेष, साऱ्यासाऱ्याचा शेवट शून्य, अंधार. केवढा मानवाचा इतिहास? पण सगळा अंधारच. कोणी एक गोष्ट सिद्ध करतो, कोणी बरोब्बर ती खोडून काढतो. काय सत्य? भविष्याबद्दल तर सारेच अंधारात. आपण काही तरी करायचं. यश आलं तर म्हणायचं- भविष्य उज्वल असतं. अपयश आलं तर- अंधारच. अन यशाचा तरी शेवट अंधारच ना? आणि गंमत माहिताय? अंधारात सारं संपून जातं, मिटून जातं, शून्य होतं, पण आपलं अस्तित्व मात्र कायम असतं. आपलं `मी'पण संपत नाही. अंधार आणि मी यातलं हे साम्य आहे. त्यांचं अस्तित्व स्वयंभू असतं आणि अविनाशीही. म्हणूनच वाटतं, खरा मित्र अंधारच.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३ एप्रिल २०१५

बुधवार, १ एप्रिल, २०१५

`मी नावडूही शकतो ना?'

आमच्या वस्तीत एक-दीड वर्ष एक कार्यक्रम चालला होता. दर रविवारी सकाळी कोणाच्या तरी घरी जमायचे. अर्थात ठरवून, कारण तशी सूचना द्यावी लागत असे ना. तिथे गप्पागोष्टी, वस्तीतील काही त्रास, समस्या वगैरे असतील तर त्या मांडायच्या. पण समस्या सोडवणे यासाठी काही ते जमणे नसे. सहज अनौपचारिक रीतीने जमायचे. गप्पाटप्पा करायच्या. चहा प्यायचा अन परत. परस्परात सहज, अनौपचारिक संबंध, ओळख वाढावी हा त्याचा उद्देश. चांगले चाळीसेक लोक येत असत. कोणी नियमित, कोणी अनियमित. खरं तर बैठक वगैरे अशी ती कल्पनाच नव्हती, अड्डा अशी ती कल्पना. सुरुवातीला उत्साह होता. मग संख्या रोडावू लागली. एक-दीड वर्ष चालून हळूहळू हा उपक्रम बंद पडला. यावर आज विचार मनात येतो तेव्हा लक्षात येते की, आपण तोंडाने काहीही म्हटले तरीही आपलं जगणं, वागणं, विचार करणं, औपचारिकच असतं आणि असावं लागतं. `सहज' या शब्दाचा आशय आणि अर्थच्छटा आपल्याला फारशा समजत नाहीत, रुचत नाहीत आणि पचतही नाहीत.

या उपक्रमातीलच एका अतिशय छोट्या गोष्टीचे उदाहरण घेता येईल. विषय होता- भ्रमणध्वनी क्रमांक. एकमेकांजवळ एकमेकांचे नंबर्स असावेत. निरोप देण्यापासून, शुभेच्छा देणे असो वा एखादी इमर्जन्सी... नंबर हवेत. मग त्यावर चर्चा. आपल्या सामाजिक वृत्ती आणि स्वभावाला धरूनच सगळे झाले. यादी करा, त्याच्या कॉपीज करा आणि वाटा... वगैरे. दोन-तीनदा नुसत्या चर्चा झाल्या. कारण करा म्हणणे ठीक, करायचे कोणी? अखेर मी असा प्रस्ताव ठेवला की, ही यादी करणे वगैरे बाजूला ठेवा. त्याची गरजही नाही. आपण दर रविवारी भेटतो. गप्पाटप्पा करता करता, चहा पिता पिता एकमेकांचे नंबर द्यायला घ्यायला काय लागतं. भ्रमणध्वनी हातातच असतो. सेव्ह करून घ्यायचे नंबर. किमान जे लोक कधीच आपसात बोलले नाहीत. ते या निमित्ताने बोलतील तरी. सांगणे न लगे की, माझी सूचना हवेत विरली.

भूतकाळात गेला की माणूस असा भटकतो. म्हणजे- काही वर्षांपूर्वीच्या या उपक्रमाची आठवण आली वेगळ्या कारणाने अन लिहू लागलो तर सांगत बसलो वेगळंच. तर सांगायची आहे वेगळी गंमत. झाले असे की, अशाच एका रविवारी सगळे जमले असताना एका उत्साही व्यक्तीने कल्पना ठेवली सहलीची. सहल म्हटले की उत्साह येणारच. पण असे अनेक उपक्रम अगदी लहानपणापासून केल्याने गाठीशी अनुभव साचलेला आहे. लोक उत्साहाने बोलतील पण मग प्रत्यक्षात जातील ४० पैकी चार. ३६ जणांचे काय होते ती वेगळी कथा. पण होते मात्र असेच. मग सहल झाल्यावर सुरु होते त्याचे कवित्व. आरोप-प्रत्यारोप वगैरे. यासाठी मी सूचना केली की, कल्पना तर फार छान आहे. मात्र प्रस्तावित सहल आपल्या या उपक्रमाचा भाग असू नये. त्याची तयारी वगैरे स्वतंत्रपणे करावी. ही सहल रविवारी सकाळी एकत्र येणाऱ्यांसाठी बंधनकारक वगैरे असू नये किंवा या उपक्रमाचा तो भाग असू नये. कारण प्रत्येकाचे वेगवेगळ्या कारणांनी सहलीला येणे जमेलच असे नाही. आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक अशी कोणतीही कारणे असू शकतील. अगदी मानसिक कारणही असू शकेल. अन मी सहज बोलून गेलो- `एखाद्याला वाटू शकेल की बुवा, श्रीपादसोबत थोड्याशा गप्पागोष्टी, चहापाणी इथपर्यंत ठीक आहे. पण दिवसभर याच्यासोबत राहणे किती बोअर !!! किती कंटाळवाणे !!! प्रत्येकाला, प्रत्येक कंपनी, प्रत्येक ठिकाणी आवडेलच असे नाही ना? कोणाला मी नावडूही शकतोच की.' यावर बहुतेक सगळे खूप हसले. आपण कोणाला नावडू शकतो, हे असं सहज, सरळ सांगणं त्यांना गमतीचं वाटलं. त्यातही बऱ्यापैकी लोकप्रिय असलेल्या, ४० लोकांना दर रविवारी एकत्र आणण्याच्या पाठीशी असणाऱ्या एखाद्याने असं बोलणं त्यांनी अपेक्षितच केलं नसेल ना? त्यामुळे ते हसले.

मुद्दा असा की, आपण असा विचार करायला तयारच नसतो बहुतेक वेळा. स्वत:बद्दल असा तटस्थ अन त्रयस्थ विचार करण्याची सवय आणि संस्कार आपल्याला मिळतच नाहीत. त्यामुळे आपण स्वत:बद्दल अवास्तव कल्पना करू लागतो. माझं म्हणणं एखाद्याला पटत नाही हे कसं? मी एखाद्याला आवडत नाही हे कसं? मी चुकू शकतो हे कसं? मला एखादी गोष्ट जमत नाही हे कसं? या `जमत नाही'ची गंमत तर मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. एक परिचयातली व्यक्ती. एकदा कविता विषयावर चर्चा झाली. आता प्रत्येक जण काही कवी नसतो ना? त्याच्या मनाने घेतलं, आपल्याला कविता जमत नाही म्हणजे काय? अन लागले महाशय कविता करायला. अरारारारा... एक दोन नाही तब्बल दोनशे कविता केल्या पठ्ठ्याने. त्याही दीडेक वर्षात. अन मग त्याच्या परिचितांचे जे काही हाल झाले की विचारता सोय नाही.

अर्थात स्वत:बद्दल वास्तव विचार करणे याचा लंबक दुसऱ्या टोकाला जाऊन न्यूनगंड येऊ शकतो किंवा त्यातून आत्मविश्वासाचा अभाव, आत्मवंचना, आत्मपीडा, गोंधळलेपण, आपल्याला काहीच समजत नाही किंवा आपण कुचकामी आहोत, अशीही मानसिकता तयार होऊ शकते. स्वत:बद्दल योग्य, वास्तव, संतुलित विचार आवश्यक आहे हे मात्र खरं. ही कला आहे की शास्त्र? असा संतुलित विचार करणं शिकवता येतं का? की हळूहळू आयुष्यातूनच ते शिकायचं असतं?

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २ एप्रिल २०१५

आम्ही हे स्वीकारू?

तंबाखू उत्पादने हा अलीकडे पुन्हा चर्चेत आलेला विषय. त्या सवयीने असे होते, तसे होते, इतके मरतात वगैरे सुरु असते. काल कोणते तरी सर्वेक्षण आले की, सिगारेट पिण्याने कर्करोग होतो हे खोटे आहे. खरं खोटं काय असेल ते असो. पण कधी कधी मनात प्रश्न येतो या सगळ्याशी सरकारचा काय संबंध? जागृती, प्रचार-प्रसार, नुकसानभरपाई, कज्जेदलाली; यासारख्या गोष्टींवर सरकारे किती वेळ, पैसा, मनुष्यबळ, साधने वगैरे वाया घालवतात. हे सगळे थांबायला नको? समाजाची, प्रत्येक व्यक्तीची काही जबाबदारी असते की नाही? तंबाखू सारखे प्रश्न त्यांचे त्यांनी पाहून घ्यावेत. सरकारने सरळ सांगून टाकायला हवं की, याच्याशी आमचे देणेघेणे नाही. कोणी तंबाखू खाऊन किंवा ओढून मेला तर त्याची जबाबदारी त्याची वा संबंधितांची. सगळ्यांच्या सगळ्या सवयी, वागणे, बोलणे, चालणे, खाणे, पिणे; अन त्या साऱ्याचे परिणाम यांच्याशी सरकारचा काय संबंध? अशा अनेक गोष्टींची यादी करता येईल, नव्हे तशी ती करून सरकारने हे जाहीर करावे की, याच्याशी आमचा संबंध नाही. हेल्मेट हा असाच एक विषय. हेल्मेट नावाची एक वस्तू आहे. ज्याला वाटेल तो वापरेल, ज्याला नाही वापरावेसे वाटणार तो नाही वापरणार. मरेल तर मरेल. हां, सुव्यवस्थेसाठी गाड्यांचे वेग नियंत्रण, वाहने कुठल्या बाजूने चालवावी, कशी कुठे थांबवावी वगैरे गोष्टी ठरवाव्या आणि त्यात कोणी चुकला वा जाणूनबुजून कोणी त्यात हयगय केली तर नियमानुसार त्याला शासन करावे. पण हेल्मेटसक्ती सुव्यवस्थेत बसत नाही. पण सरकार इतके स्पष्ट ठेमेठोकपणे काम करील का? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बावळटपणा, बेजबाबदारपणा यात आघाडीवर असणारा आणि सतत कुणावर वा कशावर अवलंबून राहण्याची सवय असलेला समाज हे स्वीकारेल का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १ एप्रिल २०१५