बुधवार, १ एप्रिल, २०१५

`मी नावडूही शकतो ना?'

आमच्या वस्तीत एक-दीड वर्ष एक कार्यक्रम चालला होता. दर रविवारी सकाळी कोणाच्या तरी घरी जमायचे. अर्थात ठरवून, कारण तशी सूचना द्यावी लागत असे ना. तिथे गप्पागोष्टी, वस्तीतील काही त्रास, समस्या वगैरे असतील तर त्या मांडायच्या. पण समस्या सोडवणे यासाठी काही ते जमणे नसे. सहज अनौपचारिक रीतीने जमायचे. गप्पाटप्पा करायच्या. चहा प्यायचा अन परत. परस्परात सहज, अनौपचारिक संबंध, ओळख वाढावी हा त्याचा उद्देश. चांगले चाळीसेक लोक येत असत. कोणी नियमित, कोणी अनियमित. खरं तर बैठक वगैरे अशी ती कल्पनाच नव्हती, अड्डा अशी ती कल्पना. सुरुवातीला उत्साह होता. मग संख्या रोडावू लागली. एक-दीड वर्ष चालून हळूहळू हा उपक्रम बंद पडला. यावर आज विचार मनात येतो तेव्हा लक्षात येते की, आपण तोंडाने काहीही म्हटले तरीही आपलं जगणं, वागणं, विचार करणं, औपचारिकच असतं आणि असावं लागतं. `सहज' या शब्दाचा आशय आणि अर्थच्छटा आपल्याला फारशा समजत नाहीत, रुचत नाहीत आणि पचतही नाहीत.

या उपक्रमातीलच एका अतिशय छोट्या गोष्टीचे उदाहरण घेता येईल. विषय होता- भ्रमणध्वनी क्रमांक. एकमेकांजवळ एकमेकांचे नंबर्स असावेत. निरोप देण्यापासून, शुभेच्छा देणे असो वा एखादी इमर्जन्सी... नंबर हवेत. मग त्यावर चर्चा. आपल्या सामाजिक वृत्ती आणि स्वभावाला धरूनच सगळे झाले. यादी करा, त्याच्या कॉपीज करा आणि वाटा... वगैरे. दोन-तीनदा नुसत्या चर्चा झाल्या. कारण करा म्हणणे ठीक, करायचे कोणी? अखेर मी असा प्रस्ताव ठेवला की, ही यादी करणे वगैरे बाजूला ठेवा. त्याची गरजही नाही. आपण दर रविवारी भेटतो. गप्पाटप्पा करता करता, चहा पिता पिता एकमेकांचे नंबर द्यायला घ्यायला काय लागतं. भ्रमणध्वनी हातातच असतो. सेव्ह करून घ्यायचे नंबर. किमान जे लोक कधीच आपसात बोलले नाहीत. ते या निमित्ताने बोलतील तरी. सांगणे न लगे की, माझी सूचना हवेत विरली.

भूतकाळात गेला की माणूस असा भटकतो. म्हणजे- काही वर्षांपूर्वीच्या या उपक्रमाची आठवण आली वेगळ्या कारणाने अन लिहू लागलो तर सांगत बसलो वेगळंच. तर सांगायची आहे वेगळी गंमत. झाले असे की, अशाच एका रविवारी सगळे जमले असताना एका उत्साही व्यक्तीने कल्पना ठेवली सहलीची. सहल म्हटले की उत्साह येणारच. पण असे अनेक उपक्रम अगदी लहानपणापासून केल्याने गाठीशी अनुभव साचलेला आहे. लोक उत्साहाने बोलतील पण मग प्रत्यक्षात जातील ४० पैकी चार. ३६ जणांचे काय होते ती वेगळी कथा. पण होते मात्र असेच. मग सहल झाल्यावर सुरु होते त्याचे कवित्व. आरोप-प्रत्यारोप वगैरे. यासाठी मी सूचना केली की, कल्पना तर फार छान आहे. मात्र प्रस्तावित सहल आपल्या या उपक्रमाचा भाग असू नये. त्याची तयारी वगैरे स्वतंत्रपणे करावी. ही सहल रविवारी सकाळी एकत्र येणाऱ्यांसाठी बंधनकारक वगैरे असू नये किंवा या उपक्रमाचा तो भाग असू नये. कारण प्रत्येकाचे वेगवेगळ्या कारणांनी सहलीला येणे जमेलच असे नाही. आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक अशी कोणतीही कारणे असू शकतील. अगदी मानसिक कारणही असू शकेल. अन मी सहज बोलून गेलो- `एखाद्याला वाटू शकेल की बुवा, श्रीपादसोबत थोड्याशा गप्पागोष्टी, चहापाणी इथपर्यंत ठीक आहे. पण दिवसभर याच्यासोबत राहणे किती बोअर !!! किती कंटाळवाणे !!! प्रत्येकाला, प्रत्येक कंपनी, प्रत्येक ठिकाणी आवडेलच असे नाही ना? कोणाला मी नावडूही शकतोच की.' यावर बहुतेक सगळे खूप हसले. आपण कोणाला नावडू शकतो, हे असं सहज, सरळ सांगणं त्यांना गमतीचं वाटलं. त्यातही बऱ्यापैकी लोकप्रिय असलेल्या, ४० लोकांना दर रविवारी एकत्र आणण्याच्या पाठीशी असणाऱ्या एखाद्याने असं बोलणं त्यांनी अपेक्षितच केलं नसेल ना? त्यामुळे ते हसले.

मुद्दा असा की, आपण असा विचार करायला तयारच नसतो बहुतेक वेळा. स्वत:बद्दल असा तटस्थ अन त्रयस्थ विचार करण्याची सवय आणि संस्कार आपल्याला मिळतच नाहीत. त्यामुळे आपण स्वत:बद्दल अवास्तव कल्पना करू लागतो. माझं म्हणणं एखाद्याला पटत नाही हे कसं? मी एखाद्याला आवडत नाही हे कसं? मी चुकू शकतो हे कसं? मला एखादी गोष्ट जमत नाही हे कसं? या `जमत नाही'ची गंमत तर मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. एक परिचयातली व्यक्ती. एकदा कविता विषयावर चर्चा झाली. आता प्रत्येक जण काही कवी नसतो ना? त्याच्या मनाने घेतलं, आपल्याला कविता जमत नाही म्हणजे काय? अन लागले महाशय कविता करायला. अरारारारा... एक दोन नाही तब्बल दोनशे कविता केल्या पठ्ठ्याने. त्याही दीडेक वर्षात. अन मग त्याच्या परिचितांचे जे काही हाल झाले की विचारता सोय नाही.

अर्थात स्वत:बद्दल वास्तव विचार करणे याचा लंबक दुसऱ्या टोकाला जाऊन न्यूनगंड येऊ शकतो किंवा त्यातून आत्मविश्वासाचा अभाव, आत्मवंचना, आत्मपीडा, गोंधळलेपण, आपल्याला काहीच समजत नाही किंवा आपण कुचकामी आहोत, अशीही मानसिकता तयार होऊ शकते. स्वत:बद्दल योग्य, वास्तव, संतुलित विचार आवश्यक आहे हे मात्र खरं. ही कला आहे की शास्त्र? असा संतुलित विचार करणं शिकवता येतं का? की हळूहळू आयुष्यातूनच ते शिकायचं असतं?

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा