बुधवार, १७ जून, २०१५

भत्त्याचे महाभारत

शेजारच्या दुकानात गेलो होतो. मालक लहानपणापासूनचा मित्र. शेजारी राहणारे. स्टेशनरी सामान, झेरॉक्स, इंटरनेट कॅफे, विविध ऑनलाईन कामे असा त्याचा व्याप. तिथे एक त्याच्या ओळखीचे गृहस्थ आले होते. त्यांचे काम तो करत होता. ते सगळे काम सुरु होते इंडियन अॉईलच्या वेबसाईटवर. ते गेल्यावर सहज गप्पा झाल्या. मित्राने त्या गृहस्थांचे जे काम केले त्याबद्दल सांगितले. ते गृहस्थ इंडियन अॉईलमधून फोरमन म्हणून सेवानिवृत्त झालेले. मासिक ३५-४० हजार रुपये पेन्शन. याशिवाय दर सहा महिन्याला १० हजार रुपये, म्हणजे वर्षाचे २० हजार रुपये त्यांना मिळतात. बोनस म्हणून. तसेच इंडियन अॉईलने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दोन पर्याय ठेवले आहेत- १) दर सहा महिन्यांनी ४० हजार रुपये घ्या किंवा २) दर तीन महिन्यांनी तुमचा जेवढा खर्च होईल तो पूर्ण खर्च घ्या. वैद्यकीय भत्ता म्हणून. क्लेम करायचा आणि पैसे घ्यायचे. त्यात `किरकोळ' अशा पर्यायाखाली काही गोष्टींची यादी आहे. त्यात चष्मा असाही पर्याय आहे. या गृहस्थांनी एकदा चष्म्यासाठी क्लेम केला. किती? १० हजार रुपये अन दुसऱ्या दिवशी १० हजार रुपये जमाही झालेत. दर तीन महिन्यांनी ३०-४० हजार रुपयांचा क्लेम केला जातो आणि तेवढे पैसे त्यांना मिळतात. या सगळ्या प्रकारात बेकायदेशीर काहीही नाही. पण याला नैतिक म्हणता येईल का?

यानिमित्ताने आम्ही काही मुद्यांची चर्चा केली.
१) हा सगळा प्रकार कायदेशीर असेल, पण नैतिक आहे का?
२) ३५-४० हजार रुपये पेन्शन असताना एवढे प्रचंड भत्ते कशासाठी?
३) चांगला खातापिता, चालता फिरता माणूस इतका आजारी असतो का?
४) वैद्यकीय भत्ता नियमितपणे देण्याला काय अर्थ आहे? माणूस सतत काय दवाखान्यातच राहतो का? नेहमीच आजारी असतो का?
५) साध्या फोरमनला किमान लाखभर रुपये दरवर्षाला विनाकारण वाटले जातात. असे खालच्या पदापासून उच्च पदापर्यंत हजारो लोक असतील, ज्यांना ही खैरात वाटली जाते.
६) हाच खर्च कंपनीच्या ताळेबंदात दाखवला जातो आणि कंपनीच्या उत्पादनांचे भाव त्यानुसार ठरवले जातात. म्हणजेच पेट्रोल, डिझेलच्या दरात या खैरातीचा वाटाही असतो.
७) अशा तेल क्षेत्रातील सगळ्या कंपन्या विचारात घेतल्या तर हा घोळ कितीतरी वाढेल.
८) तेलाशिवाय कितीतरी क्षेत्रातील वेगवेगळ्या सरकारी कंपन्या आहेत. त्यांच्यात सुद्धा असा काही ना काही प्रकार असेलच.
९) खाजगी क्षेत्रात तर हा सगळा प्रकार कितीतरी अधिक प्रमाणात आहे.
१०) खतांच्या किंवा औषधांच्या कंपन्या तर आपल्या किरकोळ विक्रेत्यांना सहकुटुंब विदेश वारीवर वगैरे पाठवतात.
११) या सगळ्याचा भुर्दंड जनतेवर पडत नाही का? तो योग्य आहे का? जनतेने तो का सहन करायचा?
१२) महागाई, चलन फुगवटा, तुटवडा, भांडवली समस्या; यासारखी अर्थकारणाची अरिष्टे यापोटीच जन्म घेत नाहीत का?
१३) यासंबंधात सामाजिक चर्चा, प्रबोधन, स्पष्ट भूमिका, नियोजन, निर्णय; हे सारे व्हायला हवे की नाही?
१४) नुसता राजकीय चिंधी बाजार मांडून यातून मार्ग निघेल का?
१५) किमती ठरवण्याचा योग्य मार्ग निवडून त्याची अंमलबजावणी झाल्यास जो पैसा हाती येईल त्यातून अनेक कामे होऊ शकतील, अनेक कुटुंब चालू शकतील.

एका व्यक्तीवर एक लाख रुपये हा अगदी हात राखून अंदाज केला तरीही, या एक लाखात एक सामान्य घर चालू शकेल. अशी लाखो घरे चालू शकतील. अशा लाखो लोकांना चांगल्या, उत्पादक कामात सहभागी करून घेता येऊ शकेल. सामाजिक कार्य असा वेगळा विभाग करून हे करता येईल. आज पैशाची खूप अपेक्षा न ठेवता, गरज पूर्ण होईल इतपत पैसा मिळाल्यास; कामात झोकून देणारे हजारो स्त्री पुरुष आहेत. स्व. नानाजी देशमुख यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या अंतर्गत असेच प्रयोग केले आहेत. एकल विद्यालये हा असाच प्रयोग आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे असेच प्रयोग आहेत. अन्यही आहेत. यातून शिक्षण, आरोग्य, सेवा, संस्कार, स्वच्छता, प्रबोधन, सामाजिक स्वास्थ्य, कला; अशा अनेक क्षेत्रात खूप भरीव असे काम होऊ शकेल.

पण स्व. नानाजींचा आदर्श आम्ही ठेवू का? राज्यकर्त्यांचे बाजूला ठेवा, समाजाला तो हवा आहे का?

गुरुवार, ११ जून, २०१५

प्रामाणिक विचार करताना

स्कील डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया आणि एकूण आर्थिक इतिहास याविषयी विचार करताना सहज एक कल्पना चमकून गेली की, आमच्या येथील जुन्या जातिव्यवस्थेबद्दल प्रचंड घृणा, अनेक विपरीत अर्थ, गैरसमज वगैरे इंग्रजी शासनकर्त्यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक तर नसतील पसरवले? उत्पादन, वितरण, उपभोग, तंत्रज्ञान, कौशल्य, कच्चा माल, पक्का माल, साठवणुकीच्या सोयी, गुंतवणूक, मनुष्यबळ वगैरे गोष्टींवरच अर्थकारण अवलंबून असते. जगात कुठेही गेले तरी. गेली अनेक वर्षे जगात सगळे देश, सगळे समाज याच गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या जाती व्यवस्थेत या गोष्टींचा अन शिवाय सामाजिक स्थिरता, मूल्य, व्यक्तिमत्व विकास यांचा अपूर्व संगम होता. अर्थात सगळ्या व्यवस्थांप्रमाणे त्याचेही गुणदोष होते. त्याची चिकित्सा होतही होती आणि व्हायलाही हवी. पण आज जातीव्यवस्था हा शब्द उच्चारायची सुद्धा सोय राहिलेली नाही. तो शब्द उच्चारताच अंगावर पाल पडल्यासारखी प्रतिक्रिया उमटते. हा जो नकारात्मक, घृणेचा, पापाचा आणि ओशाळलेपणाचा भाव आहे, तो निर्माण करून इंग्रजांनी आपले इप्सित तर साध्य केले नसेल? अन्यथा, उण्यापुऱ्या २०० वर्षांपूर्वी ज्या देशात भिकारी नव्हता (खुद्द ब्रिटीश संसदेत १८३५ साली हे अधिकृतपणे सांगण्यात आले.) त्या देशाची आज ही स्थिती का झाली असावी? यावर सखोल, प्रामाणिक चिंतन व्हायला हवे.

बुधवार, ३ जून, २०१५

महातहान

बहुतेक हिंदी मराठी वाहिन्यांवर काल वटसावित्री होती. फेसबुकसुद्धा त्यात सामील होते. खूप गमती जमती पाहायला ऐकायला मिळाल्या. आज काळ बदलला आहे. त्याला धरूनच त्या होत्या. त्याला हरकत पण नाही. त्याच भावनेने त्यांचा आनंद घ्यायला सुद्धा कां कू करण्याची गरज नाही. `बाभळी अमावास्या', `रिन्युवल करार' वगैरे छान होते. गमती जमती करण्यात पुरुष होते तशाच बायाही होत्या. पारंपरिक रूढी आणि भावना जपणारे आणि शुभेच्छा देणारेही प्रकार होते. पर्यावरण हा तर `हॉट केक'. त्यामुळे तो होताच. वृक्ष लावा, वटवृक्ष लावा, त्याचे महत्व, शास्त्रीय कारणे; असे सगळे होते. मृत्युशय्येवर पडलेल्या बायकोसाठी वडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालणारा पुरुष पण होता. सगळेच आपापल्या ठिकाणी योग्य होते. मात्र दोन गोष्टी हरवल्यासारख्या वाटल्या आणि त्या मुळापर्यंत घेऊन जाणाऱ्या आहेत. एक म्हणजे- आपल्याला प्रतीत होणाऱ्या सत्यासाठी जीवनाची बाजी लावण्याची सावित्रीची श्रेष्ठता. दुसरे म्हणजे- सत्यवान सावित्री रूपक कथेचा अन्वयार्थ.

वरच्या आवरणात रमणे आणि त्यातच आशय शोधणे ही मानवी मनाची प्रकृतीच आहे. त्यामुळे एखादी कथा ऐकल्यावर त्यातील पात्र, प्रसंग, परिस्थिती यात आपण गुंतून जातो. गाभ्यापर्यंत जाण्याची तसदी घेत नाही. `सत्यवान-सावित्री'च्या महाभारतातील आख्यानाचे सुद्धा असेच होते. या आख्यानाचा उपयोग करून कोणी तरी कधीतरी एक सामाजिक उपक्रम म्हणून वटसावित्री व्रत सुरु केले असावे. असे सामाजिक उपक्रम, त्यांना आलेले व्रताचे स्वरूप, त्यांच्या झालेल्या रूढी; या सगळ्याला वेगळी समाजशास्त्रीय बैठक असते. त्यांचा फार मोठा उपयोग पण असतो. परंतु प्रदीर्घ काळानंतर त्याचे वरचे आवरण तेवढे उरते. अन हळूहळू तेही गळून पडू लागते. आज या प्रथेचे तसेच होत असल्याचे दिसते. याचा अर्थ जे होते वा आहे ते सारेच निरर्थक, थट्टेवारी नेण्यासारखे आहे असे नाही. मुळात थट्टा करताना आणि आवरण गळून पडताना त्याचा गाभा काय आहे, आशय काय आहे याकडे लक्ष दिले तर त्याचा उपयोग करता येऊ शकतो. आवश्यकता वाटल्यास त्या आशयाभोवती नवीन आवरण उभे करता येऊ शकते.

`सत्यवान-सावित्री' कथेचा व्यावहारिक आशय आहे पतीसाठी प्राणांची बाजी लावण्याचे धैर्य आणि निग्रह. या ठिकाणी तर पती सुद्धा लाक्षणिक आहे. पती म्हणजे कोण तर ज्याच्याशी आयुष्याची गाठ बांधली आहे तो. ही गाठ सुद्धा समजून घ्यायला हवी. आपण व्यवहारात सुद्धा बोलतो की, `नोकरी किंवा व्यवसाय हीच एखाद्याची पहिली बायको आहे' किंवा `नोकरी, व्यवसाय एखादीची सवत आहे' वगैरे. याचा अर्थच लग्नगाठ म्हणजे commitment. ही commitment महत्वाची. अशी commitment तेव्हाच असू शकते ज्यावेळी एखाद्याला वा एखादीला कुठेतरी सत्याची प्रतीती येते. त्यातून विश्वास, प्रेम इत्यादी निर्माण होते. ती व्यक्ती, ती वस्तू, तो विचार, ती संघटना, ते कार्य, ते व्रत म्हणजेच आयुष्य अशी धारणा जन्माला येते आणि मग त्या सत्यासाठी स्वत:च्या प्राणांची सुद्धा बाजी लावायला मागेपुढे पाहत नाही, ती सावित्री. आपल्या प्राणांची आहुती देऊनसुद्धा प्रतीत होणारं सत्य जपलं पाहिजे, जिवंत ठेवलं पाहिजे यासाठी लढणारी, ती सावित्री. `हाच पती लाभो, त्याच्याकडे गाडीघोडा, नोकरचाकर, बंगला, पैसाअडका अमाप राहो. अन त्याचा भोग आम्हाला मिळो' हे सावित्रीचं विडंबन आहे एवढच म्हणता येईल. प्रसिद्ध मराठी कवी म. म. देशपांडे आपल्या `तहान' या कवितेत म्हणतात- `सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण'. आम्हाला अशी सत्याची, न्यायाची, नीतीची, प्रेमाची `महातहान' लागते का? ही `महातहान' लागते तेव्हा सावित्री, राधा, मीरा, बाजीप्रभू, तानाजी, सावरकर, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, सौरव कालिया असे जन्माला येतात. म्हणून `सावित्री' हे व्रत आहे सत्याच्या शोधाचं, सत्याशी बांधिलकीचं. सत्यवानाच्या माध्यमातून सत्याचा शोध, सत्याशी बांधिलकी हा त्याचा व्यावहारिक आशय आहे. खूप साधा असा पर्यावरणाचा विषय घेतला तरीही आमची त्या विषयाशी बांधिलकी आहे का?

या कथेचा एक आध्यात्मिक आशयही आहे. वटवृक्ष हे त्याचं प्रतीक आहे. वटवृक्ष अक्षय असतो. एका पारंबीतून दुसरी शाखा. आमचं अस्तित्वही असंच आहे. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं. त्याला अंत नाही आणि आदीही नाही. अस्तित्व नव्हतं अशी वेळ कधीच नव्हती आणि अस्तित्व नसेल अशीही वेळ कधीच राहणार नाही. हां, अस्तित्वाचं रुप सतत बदलत राहील, पण अस्तित्वहीनता अशक्य आहे. आम्ही `अक्षय' आहोत. आम्हाला क्षय नाही. जन्म मृत्यू ही वरवरची लक्षणं आहेत, याविषयी आश्वस्त करणारी ही रूपक कथा आहे. व्यावहारिक आकलनाच्या कक्षेतील म्हणून वटवृक्षाचे उदाहरण आहे. ही अक्षयता प्राप्त होण्यासाठी सत्याच्या मार्गावर चालावे लागते आणि या मार्गावर चालताना पंचप्राणही पणाला लावण्याची तयारी ठेवावी लागते. `सत्यवान-सावित्रीच्या' आख्यानाचं मला प्रतीत झालेलं हे सत्य आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ३ जून २०१५