वारी आटोपली. वीस पंचवीस वर्षांपूर्वी सुद्धा वारी आटोपत असे. शेकडो वर्षांपासून वारी आटोपतेच. पूर्वी ते फारसे कळत नसे. आता कळते. प्रसार माध्यमे, समाज माध्यमे यातून वारीचा भरपूर जागर होतो. छायाचित्रे, अभंग गायन, दिंड्या, सजावटी, मान्यवरांचा सहभाग, वेशभूषा; अशा अनेक गोष्टीतून वारी भेटते आणि वारी आटोपली हे कळतं. छान आहे. सगळ्यातच आनंद आहे. आनंदं ब्रम्हेती ! आनंद आहे तिथे ब्रम्ह आहे. पण हा वारीचा भाव नाही. उत्सव, उत्साह, लय, ताल, गर्दी, प्रवाह, कौतुक, हौस, नावीन्य, जपणूक; हे सारं आणि यातील आनंद हे क्षणजीवी आहे. चिरंजीवी नाही. हा अनुभव आहे. अनुभूती नाही. वारीचा भाव चिरंजीवीत्वाचा भाव आहे. वारीचा भाव अनुभूतीचा भाव आहे. क्षणजीवीत्वाचा आणि अनुभवाचा तो भाव नाही. म्हणून वारी अखंड चालू आहे. शेकडो वर्ष झाली; प उच्चारला की पांडुरंग आणि आ उच्चारला की आषाढी आठवते; लाखो अनाम जीवांना. अन् क्षणजीवी सारं टाकून देऊन ते ओढले जातात चिरंजीवीकडे. आपोआप. नकळत. अन् परततात तेव्हाही मन रेंगाळत असतं चिरंजीवीमध्येच. क्षणजीवीचा विसर पडणे आणि चिरंजीवीची ओढ लागणे ही सुरुवात असते वारीची. चिरंजीवी होऊन जाणे ही तिची समाप्ती असते. क्षणजीवी जोवर मनातून गळत नाही तोवर वारी खरी नाही. टाळ, मृदंग, टिळे, माळा, फुगड्या, गजर सगळं असेल तरीही वारी खरी नाही. क्षणजीवीने चिरंजीवीची आस धरावी. खरी वारी करावी.
- श्रीपाद कोठे
३० जून २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा