शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

अंधाराशी मैत्री

आताशा मला अंधार आवडू लागला आहे. किती छान असतो ना तो? त्याच्या लेखी सगळ्यांना सारखी वागणूक. कोणी लहान नाही, मोठा नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, विद्वान नाही, अज्ञानी नाही, चांगला नाही, वाईट नाही, सुंदर नाही, कुरूप नाही. सगळे सारखे. अंधारात थोडीशी निष्क्रियता असते. उजेडासारखी सक्रियता नसते. पण उजेडातल्यासारखे हेवेदावे, गळेकापूपणा, स्वार्थ हेदेखील नसतात. विचार करून पाहा- नेहमी केवळ अंधारच अंधार राहिला, काय होईल? काहीही होणार नाही. कधी कधी वाटतं, खरा तो अंधारच. त्याला दुसरा कसलाही आधार लागत नाही. स्वत:चं अस्तित्वही त्याला सिद्ध करावं लागत नाही. उजेडासाठी कसं सूर्याला उगवावं लागतं. दिवा लावावा लागतो. काही नाही तर, चकमक तरी घासावी लागते. त्याशिवाय उजेडाचं अस्तित्व नाही. अंधार मात्र स्वयंभू. काही असलं काय नि नसलं काय, अंधार मात्र असतोच. उजेडाला मर्यादाही असतेच. छोटी पणती असेल तर त्यातलं तेल संपेपर्यंतच उजेड. तोही दोन-चार मीटर परिसरातच. तेल संपल्यावर आणि दोन-चार मीटरच्या पलीकडे अंधारच. सूर्य असला तरीही, काही तासांनंतर पुन्हा अंधारच. सगळ्या प्रकारच्या उजेडाचा शेवटही अंधारच. सगळ्या प्रकारचे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, मातृत्व, चांगलं- वाईट, प्रेम- द्वेष, साऱ्यासाऱ्याचा शेवट शून्य, अंधार. केवढा मानवाचा इतिहास? पण सगळा अंधारच. कोणी एक गोष्ट सिद्ध करतो, कोणी बरोब्बर ती खोडून काढतो. काय सत्य? भविष्याबद्दल तर सारेच अंधारात. आपण काही तरी करायचं. यश आलं तर म्हणायचं- भविष्य उज्वल असतं. अपयश आलं तर- अंधारच. अन यशाचा तरी शेवट अंधारच ना? आणि गंमत माहिताय? अंधारात सारं संपून जातं, मिटून जातं, शून्य होतं, पण आपलं अस्तित्व मात्र कायम असतं. आपलं `मी'पण संपत नाही. अंधार आणि मी यातलं हे साम्य आहे. त्यांचं अस्तित्व स्वयंभू असतं आणि अविनाशीही. म्हणूनच वाटतं, खरा मित्र अंधारच.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३ एप्रिल २०१५

बुधवार, १ एप्रिल, २०१५

`मी नावडूही शकतो ना?'

आमच्या वस्तीत एक-दीड वर्ष एक कार्यक्रम चालला होता. दर रविवारी सकाळी कोणाच्या तरी घरी जमायचे. अर्थात ठरवून, कारण तशी सूचना द्यावी लागत असे ना. तिथे गप्पागोष्टी, वस्तीतील काही त्रास, समस्या वगैरे असतील तर त्या मांडायच्या. पण समस्या सोडवणे यासाठी काही ते जमणे नसे. सहज अनौपचारिक रीतीने जमायचे. गप्पाटप्पा करायच्या. चहा प्यायचा अन परत. परस्परात सहज, अनौपचारिक संबंध, ओळख वाढावी हा त्याचा उद्देश. चांगले चाळीसेक लोक येत असत. कोणी नियमित, कोणी अनियमित. खरं तर बैठक वगैरे अशी ती कल्पनाच नव्हती, अड्डा अशी ती कल्पना. सुरुवातीला उत्साह होता. मग संख्या रोडावू लागली. एक-दीड वर्ष चालून हळूहळू हा उपक्रम बंद पडला. यावर आज विचार मनात येतो तेव्हा लक्षात येते की, आपण तोंडाने काहीही म्हटले तरीही आपलं जगणं, वागणं, विचार करणं, औपचारिकच असतं आणि असावं लागतं. `सहज' या शब्दाचा आशय आणि अर्थच्छटा आपल्याला फारशा समजत नाहीत, रुचत नाहीत आणि पचतही नाहीत.

या उपक्रमातीलच एका अतिशय छोट्या गोष्टीचे उदाहरण घेता येईल. विषय होता- भ्रमणध्वनी क्रमांक. एकमेकांजवळ एकमेकांचे नंबर्स असावेत. निरोप देण्यापासून, शुभेच्छा देणे असो वा एखादी इमर्जन्सी... नंबर हवेत. मग त्यावर चर्चा. आपल्या सामाजिक वृत्ती आणि स्वभावाला धरूनच सगळे झाले. यादी करा, त्याच्या कॉपीज करा आणि वाटा... वगैरे. दोन-तीनदा नुसत्या चर्चा झाल्या. कारण करा म्हणणे ठीक, करायचे कोणी? अखेर मी असा प्रस्ताव ठेवला की, ही यादी करणे वगैरे बाजूला ठेवा. त्याची गरजही नाही. आपण दर रविवारी भेटतो. गप्पाटप्पा करता करता, चहा पिता पिता एकमेकांचे नंबर द्यायला घ्यायला काय लागतं. भ्रमणध्वनी हातातच असतो. सेव्ह करून घ्यायचे नंबर. किमान जे लोक कधीच आपसात बोलले नाहीत. ते या निमित्ताने बोलतील तरी. सांगणे न लगे की, माझी सूचना हवेत विरली.

भूतकाळात गेला की माणूस असा भटकतो. म्हणजे- काही वर्षांपूर्वीच्या या उपक्रमाची आठवण आली वेगळ्या कारणाने अन लिहू लागलो तर सांगत बसलो वेगळंच. तर सांगायची आहे वेगळी गंमत. झाले असे की, अशाच एका रविवारी सगळे जमले असताना एका उत्साही व्यक्तीने कल्पना ठेवली सहलीची. सहल म्हटले की उत्साह येणारच. पण असे अनेक उपक्रम अगदी लहानपणापासून केल्याने गाठीशी अनुभव साचलेला आहे. लोक उत्साहाने बोलतील पण मग प्रत्यक्षात जातील ४० पैकी चार. ३६ जणांचे काय होते ती वेगळी कथा. पण होते मात्र असेच. मग सहल झाल्यावर सुरु होते त्याचे कवित्व. आरोप-प्रत्यारोप वगैरे. यासाठी मी सूचना केली की, कल्पना तर फार छान आहे. मात्र प्रस्तावित सहल आपल्या या उपक्रमाचा भाग असू नये. त्याची तयारी वगैरे स्वतंत्रपणे करावी. ही सहल रविवारी सकाळी एकत्र येणाऱ्यांसाठी बंधनकारक वगैरे असू नये किंवा या उपक्रमाचा तो भाग असू नये. कारण प्रत्येकाचे वेगवेगळ्या कारणांनी सहलीला येणे जमेलच असे नाही. आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक अशी कोणतीही कारणे असू शकतील. अगदी मानसिक कारणही असू शकेल. अन मी सहज बोलून गेलो- `एखाद्याला वाटू शकेल की बुवा, श्रीपादसोबत थोड्याशा गप्पागोष्टी, चहापाणी इथपर्यंत ठीक आहे. पण दिवसभर याच्यासोबत राहणे किती बोअर !!! किती कंटाळवाणे !!! प्रत्येकाला, प्रत्येक कंपनी, प्रत्येक ठिकाणी आवडेलच असे नाही ना? कोणाला मी नावडूही शकतोच की.' यावर बहुतेक सगळे खूप हसले. आपण कोणाला नावडू शकतो, हे असं सहज, सरळ सांगणं त्यांना गमतीचं वाटलं. त्यातही बऱ्यापैकी लोकप्रिय असलेल्या, ४० लोकांना दर रविवारी एकत्र आणण्याच्या पाठीशी असणाऱ्या एखाद्याने असं बोलणं त्यांनी अपेक्षितच केलं नसेल ना? त्यामुळे ते हसले.

मुद्दा असा की, आपण असा विचार करायला तयारच नसतो बहुतेक वेळा. स्वत:बद्दल असा तटस्थ अन त्रयस्थ विचार करण्याची सवय आणि संस्कार आपल्याला मिळतच नाहीत. त्यामुळे आपण स्वत:बद्दल अवास्तव कल्पना करू लागतो. माझं म्हणणं एखाद्याला पटत नाही हे कसं? मी एखाद्याला आवडत नाही हे कसं? मी चुकू शकतो हे कसं? मला एखादी गोष्ट जमत नाही हे कसं? या `जमत नाही'ची गंमत तर मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. एक परिचयातली व्यक्ती. एकदा कविता विषयावर चर्चा झाली. आता प्रत्येक जण काही कवी नसतो ना? त्याच्या मनाने घेतलं, आपल्याला कविता जमत नाही म्हणजे काय? अन लागले महाशय कविता करायला. अरारारारा... एक दोन नाही तब्बल दोनशे कविता केल्या पठ्ठ्याने. त्याही दीडेक वर्षात. अन मग त्याच्या परिचितांचे जे काही हाल झाले की विचारता सोय नाही.

अर्थात स्वत:बद्दल वास्तव विचार करणे याचा लंबक दुसऱ्या टोकाला जाऊन न्यूनगंड येऊ शकतो किंवा त्यातून आत्मविश्वासाचा अभाव, आत्मवंचना, आत्मपीडा, गोंधळलेपण, आपल्याला काहीच समजत नाही किंवा आपण कुचकामी आहोत, अशीही मानसिकता तयार होऊ शकते. स्वत:बद्दल योग्य, वास्तव, संतुलित विचार आवश्यक आहे हे मात्र खरं. ही कला आहे की शास्त्र? असा संतुलित विचार करणं शिकवता येतं का? की हळूहळू आयुष्यातूनच ते शिकायचं असतं?

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २ एप्रिल २०१५

आम्ही हे स्वीकारू?

तंबाखू उत्पादने हा अलीकडे पुन्हा चर्चेत आलेला विषय. त्या सवयीने असे होते, तसे होते, इतके मरतात वगैरे सुरु असते. काल कोणते तरी सर्वेक्षण आले की, सिगारेट पिण्याने कर्करोग होतो हे खोटे आहे. खरं खोटं काय असेल ते असो. पण कधी कधी मनात प्रश्न येतो या सगळ्याशी सरकारचा काय संबंध? जागृती, प्रचार-प्रसार, नुकसानभरपाई, कज्जेदलाली; यासारख्या गोष्टींवर सरकारे किती वेळ, पैसा, मनुष्यबळ, साधने वगैरे वाया घालवतात. हे सगळे थांबायला नको? समाजाची, प्रत्येक व्यक्तीची काही जबाबदारी असते की नाही? तंबाखू सारखे प्रश्न त्यांचे त्यांनी पाहून घ्यावेत. सरकारने सरळ सांगून टाकायला हवं की, याच्याशी आमचे देणेघेणे नाही. कोणी तंबाखू खाऊन किंवा ओढून मेला तर त्याची जबाबदारी त्याची वा संबंधितांची. सगळ्यांच्या सगळ्या सवयी, वागणे, बोलणे, चालणे, खाणे, पिणे; अन त्या साऱ्याचे परिणाम यांच्याशी सरकारचा काय संबंध? अशा अनेक गोष्टींची यादी करता येईल, नव्हे तशी ती करून सरकारने हे जाहीर करावे की, याच्याशी आमचा संबंध नाही. हेल्मेट हा असाच एक विषय. हेल्मेट नावाची एक वस्तू आहे. ज्याला वाटेल तो वापरेल, ज्याला नाही वापरावेसे वाटणार तो नाही वापरणार. मरेल तर मरेल. हां, सुव्यवस्थेसाठी गाड्यांचे वेग नियंत्रण, वाहने कुठल्या बाजूने चालवावी, कशी कुठे थांबवावी वगैरे गोष्टी ठरवाव्या आणि त्यात कोणी चुकला वा जाणूनबुजून कोणी त्यात हयगय केली तर नियमानुसार त्याला शासन करावे. पण हेल्मेटसक्ती सुव्यवस्थेत बसत नाही. पण सरकार इतके स्पष्ट ठेमेठोकपणे काम करील का? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बावळटपणा, बेजबाबदारपणा यात आघाडीवर असणारा आणि सतत कुणावर वा कशावर अवलंबून राहण्याची सवय असलेला समाज हे स्वीकारेल का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १ एप्रिल २०१५

शनिवार, २७ डिसेंबर, २०१४

जय कलियुग, जय जय कलियुग


सगळी गंमत आहे. देवाधर्माचे धडे अभिनेते आणि चित्रपट देत आहेत. लोक त्यालाच धार्मिक शिक्षण समजत आहेत. रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद-उपनिषदे, स्मृती, आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, कबीर, नानक, दादू, मीरा, तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, विवेकानंद, चिन्मयानंद, दयानंद, गोरखपूर प्रेसची प्रकाशने, अलवार संत, तिरुवल्लुवर; असली सगळी नावेही धर्मशिक्षण देणाऱ्या अभिनेत्यांनी किंवा त्यांच्याकडून ते घेणाऱ्या लोकांनी ऐकली नसतील. सांख्य, योग, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वैशेषिक ही षडदर्शने आहेत हे कधी त्यांच्या कानावरून गेले नसेल. हजारो वर्षात होऊन गेलेल्या हजारो ऋषी मुनी संत यांनी केलेले प्रबोधन किती प्रचंड आहे याची यांना कल्पनाही नसेल. या विषयावर अधिकारवाणीने खंडन वा मंडन करण्यासाठी लागणारे सायास, अभ्यास वा साधना यांनी केली असण्याची शक्यताच नाही. तरीही दीडशहाणे लेखक, दिवटे अभिनेते चित्रपट काढून शिकवणार आणि गल्ला किती जमा झाला यावरच नजर ठेवून तयार केलेले चित्रपट पाहून आपण सर्वज्ञानी होणार !!! जय कलियुग, जय जय कलियुग.

रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

शेतीबद्दलची कृतघ्नता


दोन वाक्ये अनेकदा कानी पडतात.
१) आपला देश शेतीप्रधान आहे, तरीही शेतीकडे दुर्लक्ष केले जाते.
२) शेतीवरील भार कमी करायला हवा.
प्रश्न असे निर्माण होतात की-
१) देश शेतीप्रधान आहे म्हणून शेतीकडे लक्ष द्यायला हवे का?
२) शेतीवरील भार कमी करायचा म्हणजे शेती कमी करायची का?
३) शेतीकडे केवळ रोजगार निर्मितीची क्षमता याच दृष्टीने पाहणे योग्य आहे का?
४) सेवा आणि उत्पादन क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करून शेतीवरील सगळा रोजगार त्यात सामावून घेतला तर ते किती योग्य ठरेल?
५) मुळात शेतीकडे पाहण्याची दृष्टी काय असावी?

खरे तर देश शेतीप्रधान असो की नसो, माणसांना खायला लागणारच आणि खाण्याची व्यवस्था शेतीशिवाय होऊच शकत नाही. आज जगात डझनावारी देश असे आहेत ज्यांच्याकडे स्वत:ची शेती नाही. त्यांना पूर्णत: दुसऱ्या शेती उत्पादकांवर अवलंबून राहावे लागते. प्रगती, तंत्रज्ञान, आधुनिकीकरण कितीही झाले तरी पोट सुटत नाही आणि निसर्गावर मात करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही पोटाला लागणारी भूक संपत नाही. त्यामुळेच चंद्र-मंगळावर वसाहती वसवल्या तरी शेतीला पर्याय नाही. शेतीची ही मुलभूतता लक्षात घेऊन शेतीचा विचार व्हायला हवा. ती अन्य गोष्टींपैकी एक नाही. अन्य गोष्टी असल्या वा नसल्या तरी चालू शकणारे आहे. शेतीशिवाय चालूच शकणार नाही. आपण सगळ्यांनीच शेतीबद्दलची कृतघ्नता टाकून देण्याची गरज आहे.

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

रिकामटेकडे

आपलं conditioning किती असतं, नाही का? पाहा- एखादी व्यक्ती कामात आहे, एखाद्याला काम आहे, एखादा कोणी काम करत असतो, एखाद्याला काम हवे आहे; अशासारखी वाक्ये कानावर पडली की आपल्या मनात एक चित्र तयार होते. हातापायांची हालचाल, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, वाकणे, बसणे, उभे राहणे, बोलणे, वाचणे, खेळणे, खाणे, पिणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे; असं काही ना काही- क्रियात्मक असं चित्र. पण यातील काहीही न करता, शारीरिक हालचाल न करता, काम केल्या जाऊ शकतं किंवा कोणी तसं काही काम करत असेल ही कल्पनासुद्धा करणं कठीण असतं. मग प्रत्यक्ष तसं काम करणं ही तर दूरचीच गोष्ट. वास्तविक प्रत्येक जण कधी ना कधी, क्षण दोन क्षण का होईना असं काम करतच असतो. काळ, वेळ, स्थळ या गोष्टी महत्वाच्या नसतातच अशा कामासाठी. कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण ही कामे अशीच निष्क्रियतेच्या सदरात मोडतात. प्रत्येक जण यातील काही ना काही, कधी ना कधी करतोच. मात्र तरीही कोणी शांत, निष्क्रिय दिसला रे दिसला की आपण विचारतोच काय आराम चाललाय? एखाद्याची वृत्ती खोचक आणि उथळ असेल तर हाच प्रश्न- काय, काही काम नाही का? किंवा काय रिकामेच? अशा शब्दात व्यक्त होतो. कारण कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण; अशा गोष्टी म्हणजे काम असतं हेच आपण मानत नाही. इतक्या ढोबळ, व्यावहारिक स्तरावर ही स्थिती असते, तर प्रतिभावंत कवी, लेखक, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, चिंतक; हे सारे बिनाकामाचे वाटावेत यात नवल करण्याचे कारण नाही. मन आणि बुद्धी दिसत नाही. त्यामुळेच मन, बुद्धीच्या स्तरावर या प्रतिभावंतांचे जे प्रचंड काम सुरु असते ते सामान्य व्यक्तीला आकलन होऊच शकत नाही. त्या अमूर्त कामाचा काही प्रत्यक्ष मूर्त परिणाम पुढे आला तर हे धुके थोडे दूर होऊ शकते. परंतु पोळ्या लाटण्यापूर्वी केले जाणारे कणिक मळण्याचे काम जसे दिसते तसे मूर्त अभिव्यक्तीच्या आधीचे मन-बुद्धीचे मळणे दिसू शकत नसल्याने आणि प्रत्यक्ष ते काम करणारी व्यक्तीही त्याचे वर्णन करण्यास असमर्थ असल्याने त्यांच्याबद्दल असलेला `रिकामटेकडे' हा भाव बहुश: कायम राहतो. मन-बुद्धीच्या पलीकडील असे आणखीन एक क्षेत्र आहे जेथून प्रतिभेचा उगम होतो, त्या क्षेत्रातील निष्क्रियता, शांतता, तरंगशून्यता, विकल्पहीनता, शरीराची- मनाची- बुद्धीची- आंदोलने नसण्याची स्थिती ही जाणीवेतून आणि प्रयत्नपूर्वक येणारी स्थिती आहे. ती स्वनियंत्रित स्थिती आहे. प्रतिभावंताची सहज निष्क्रियता आणि ही स्वनियंत्रित निष्क्रियता यात थोडा भेद आहे. मात्र प्रतिभावंताला या स्वनियंत्रित निष्क्रियतेची कल्पना येऊ शकते कारण त्याने स्वत: अशा प्रकारच्या निष्क्रियतेचा अंशत: का होईना अनुभव घेतलेला असतो. सर्वसामान्य व्यक्तीसाठी मात्र या साऱ्यासाठी एकच शब्द असतो- `रिकामटेकडे'. आपलं जग आणि जगणं अशा रिकामटेकड्या लोकांच्याच उपकाराखाली दबलेलं आहे हे मात्र सत्य आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ नोव्हेंबर २०१४

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

बोलका प्रसंग- १

काही वर्षांपूर्वीचा प्रसंग. मित्राच्या वडिलांचा स्वर्गवास झाला होता. अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेलो होतो. सगळे विधी वगैरे झाले. शेवटी जराजर्जर शरीराला भस्मीभूत करणाऱ्या त्या पावन अग्नीत एकेक गोवरी टाकत सगळे परतू लागले. निघताना मृताला तिलांजली द्यायची आणि नळावर हातपाय धुवून बाहेर पडायचे अशी प्रथा आहे. काही जणांचे हातपाय धुवून झाले आणि नळाचे पाणी गेले. आता काय याची चर्चा सुरु झाली. तिथे एक हापशी होती तिकडे काही जणांनी मोर्चा वळवला. स्वाभाविक वेळ लागू लागला, जरा गर्दी झाली. त्यावेळी आमच्या कार्यालयातील एक इलेक्ट्रोनिक इंजिनिअर म्हणाला- `राहू द्या, नाही धुतले हातपाय तर नाही. घरी जाऊन आंघोळ करतोच आपण.' त्याचे म्हणणे खरेच होते. युक्तिवाद पण योग्य होता. पण तो तिथेच थांबला नाही. आपल्या म्हणण्याचा तर्क देत तो म्हणाला- `सब कुछ भगवान ही तो है. हम लोग भी फिजूल बातो मे उलझते है.' लगेच मनात घुसळण झाली. आपण कोणत्याही तत्वाचा किती सोयीस्कर अर्थ लावतो ते जाणवलं. मनातून सहज एक प्रश्न ओठांवर आला. त्याला म्हटले- `मित्रा, सगळे भगवान आहे हे ठीक. पण गेल्या महिन्यात तुम्हा इलेक्ट्रोनिक इंजिनिअरच्या पदोन्नतीचा प्रश्न आला होता तेव्हा तुला हे का नाही रे आठवले? तेव्हा का भांडलास ती पदोन्नती तुलाच मिळावी म्हणून.' स्वाभाविकच त्याने फक्त डोळे वटारून पाहिले आणि तो निघून गेला.