नेहमीप्रमाणे आजही, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती आली. तिचे नाव गाव
माहिती नाही. पण चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र अशा दोन्ही नवरात्रीच्या
पहिल्या दिवशी ती येते. जोगवा मागायला. बरीच वर्षे झाली. नेम चुकलेला
नाही. आई येथे असताना त्या दोघींच्या गप्पाही होत. आई येथे नसल्याला तीन
वर्षे झाली. तरीही ती येते. कारण ती जोगवा मागायला आल्यानंतर तिला शिधा,
दक्षिणा देण्याचे मी सुरूच ठेवले आहे. आजही ती येऊन गेली. शिधा, दक्षिणा
घेऊन गेली. हा काही तिचा व्यवसाय नाही. अन दोन नवरात्रीत जोगवा मागून
वर्षभर उदरनिर्वाह चालतही नाही. हे तिचे व्रत आहे आणि ती ते निष्ठेने करते
आहे. भारतीय समाजजीवनाचा एक चिवट धागा मला यात दिसतो. दान मागणे आणि दान
देणे या दोन्हीत चुकीचे आणि ओशाळवाणे काही नाही. भारतात तसे कधी समजले गेले
नाही. आज तसे समजले जाते याचे कारण आपण भारतीय ethos चा त्याग केलेला आहे.
भारतीय संदर्भात `भिक्षा' ही खूप वेगळी कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीचे
महत्व, मूल्य, किंमत, उपलब्धता सारखी असू शकत नाही; प्रत्येक व्यक्तीची
क्षमता, कल आणि गुण समान असू शकत नाही; तरीही प्रत्येकाला चांगले जगण्याचा
हक्क आहे आणि प्रत्येकाच्या वेगळेपणाची समाजाला व सृष्टीला गरज आहे; या
सगळ्याचा मेळ घालणे; आणि या प्रयत्नातून मानवी जीवन अंतरंगसमृद्ध करणे;
याचं जे एक web designing भारताने केलेलं आहे ते लक्षणीय आहे. त्यामुळेच
बारकाईने पाहिलं तर `दान' हा व्यक्तीजीवनाचा, समाजजीवनाचा, विश्वजीवनाचा,
धार्मिक जीवनाचा, आध्यात्मिक जीवनाचा पाया आणि आधार आहे. वर्तमान आर्थिक,
सामाजिक समस्यांच्या दाहक वास्तवाचा विचार करताना वास्तविक भारताच्या या
पैलूचा अधिक आणि सर्वंकष विचार व्हायला हवा, समोर मांडला जायला हवा. मात्र,
कालमहिमा असा आहे की आमच्यावर भारतेतर विचार, भावभावना वरचढ आहेत आणि `मी'
हा कमालीचा मोठा झाला आहे. अर्थात काळ कूस पालटत असतो, हेही खरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा