रामभाऊ बोंडाळे काल गेले. अकोल्याचे श्रीकांत कोंडोलीकर यांनी त्यांच्यावर लिहिलेला लेख आज वाचण्यात आला. त्यांनी रामभाऊंच्या मितव्ययतेचे फार भावपूर्ण वर्णन केले आहे. सहज काही गोष्टी आठवल्या आणि जाणवले की, रामभाऊ हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या श्रद्धांजली संदेशात पण ही बाब अधोरेखित केली आहेच. ही मितव्ययता फक्त लहान क्षेत्रातील कार्यकर्त्यांचाच गुण होता असेही नाही. श्री. यादवराव जोशी हे संघाचे एक फार मोठे अधिकारी. डॉ. हेडगेवार यांच्यासोबत काम केलेले. दक्षिण भारतात संघ रोवणारे. प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, सहसरकार्यवाह अशा मोठाल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे. त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आठवले.
१९५० च्या दशकात संघातील आर्थिक ओढगस्त फार मोठी होती. शाखा रोडावल्या होत्या. गुरुदक्षिणा कमी झाली होती. गैरसमज आणि अपप्रचार यामुळे समाजात मान्यता आणि स्थान कमी झाले होते. अशाही परिस्थितीत संघाचे काम मात्र करायचे या निश्चयाने कार्यकर्ते काम करीत असत. आर्थिक तंगी त्यात बाधा ठरत नसे. उलट या आर्थिक ओढगस्तीवर स्वतःच विनोद करून वातावरण प्रफुल्लित ठेवणे ही कलासुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी आत्मसात केली होती. श्री यादवराव जोशी हे अशा कार्यकर्त्यांपैकी एक होते. विनोदाने ते अनेकदा म्हणत असत की, 'आपल्या कार्यालयाबाहेर एक फलक लावा की; येथे विवाह, मौंजीबंधन, जन्मदिवस, श्राद्ध इत्यादींसाठी अतिथी म्हणून ब्राह्मण मिळतील.' अन् स्वतःच त्यावर हसून वातावरण निर्मळ करीत असत. एका शिबिरातील एक घटनाही त्यावेळच्या परिस्थितीवर पुरेसा प्रकाश टाकते. एका शिबिरामध्ये जेवण सुरू असताना श्री. गुरुजी ताटातील ताक पाहून म्हणाले, 'एखाद्या विहिरीत एक थेंब ताक टाकले तरीही त्याला ताकाची विहीर म्हटले जाईल.' जवळच बसलेले यादवराव त्यावर मोठ्या आवाजात म्हणाले, 'तरीही ते ताक तेवढेच रुचकर आणि पाणीदार राहील.' अशाच शिबिरात वाढल्या गेलेली शेवयाची खीर हाही एक विनोदाचा भाग झाला होता. आपल्या शेजारी बसलेले डॉक्टर आबाजी थत्ते यांना गुरुजी म्हणाले होते, 'हे पहा, हे पहा. या खिरीत शेवयांचा एक तुकडा दिसतो आहे. त्यावरून सिद्ध होते की ही खीर शेवयाचीच आहे.' यात कुठेही कटुता नव्हती. यात कुठेही त्रागा नव्हता, टीकाटिप्पणी आणि दोषदर्शन नव्हते; तर असलेल्या परिस्थितीत हसतखेळत सगळ्यांनी मिळून पुढे जाणे हाच भाव राहत असे.
बरं, यादवराव तर ठरले उमरेडच्या एका दरिद्री भिक्षुकाचे चिरंजीव. त्यांना हे जन्मजात सवयीचे. पण, १९४० च्या दशकात, घरी राहत असूनही शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये देणाऱ्या वडिलांचे चिरंजीव असलेले चौथे सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह देखील त्याच वळणाचे. ते सरकार्यवाह, सहसरकार्यवाह असताना सुद्धा आपला रोजचा खर्च, हिशेब लिहून ठेवत असत.
चार दोन कार्यकर्त्यांची, माहिती असलेली अशी चारदोन उदाहरणे. पण हे कार्यकर्ते पाच पाच, सहा सहा, सात सात दशके काम करत होते. त्यांच्या आयुष्यात असे किती प्रसंग असतील. अन् असेही हजारो हजार कार्यकर्ते ज्यांच्याबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या जीवनात असे किती क्षण असतील?
याची आणखीन एक बाजूही आहे. कोंडोलीकर यांनी त्यांच्या लेखात श्री. मधुकर कुलकर्णी यांचाही उल्लेख केलेला आहे. ती बाजूही महत्त्वाची आणि लक्षणीय आहे. एकीकडे सगळं विसरून, आपल्याला एक भव्य दिव्य कार्य करायचे आहे या धुंदीत काम करणारे लहानथोर कार्यकर्ते होते; तर दुसरीकडे एका भव्य दिव्य कार्यासाठी स्वत:च्या जीवनावर तुळशीपत्र ठेवून हे कार्य करीत आहेत याची समंजस जाणीव असणारेही अनेक होते. सीमेवर जाणाऱ्या एखाद्या सैनिकाबद्दल जी भावना असते तशीच भावना अनेकांची या प्रचारकांबद्दल होती. संघ यात आहे आणि यातून आहे. संघाचा पिळ आणि पिंड यातून घडले आहे. बाकीच्यांचे असो अनेकदा स्वयंसेवकांना देखील हे आकलन होत नाही. आजची हिंदुत्वाची सुनामी या साधनेचा परिणाम आहे. केवळ घोषणा, वाद, चर्चा, जाहिराती यांचा नाही.
याचा अर्थ तीच परिस्थिती आज राहावी किंवा तशाच प्रकारे जगावे असा होत नाही. बदल होणारच. पण मर्यादांची जाणीव महत्त्वाची. अभावांच्या मर्यादांची जाणीव ठेवून निराश होण्याचे जसे नाकारले, तसेच संपन्नतेच्या मर्यादांची जाणीव ठेवून 'जितं मया' होण्याचे नाकारले की झाले. मर्यादांची ही जाणीव असेल तोवर संघ असेल. जाणीव नसेल तर संघ नसेल. बाहेरचे कोणी काही करू शकत नाहीत. ना भले ना बुरे. हितचिंतकांना, विरोधकांना, टीकाकारांना याबद्दल चिंता वगैरे वाटू शकते पण त्याची सवंग चर्चा करण्याचा अधिकार खरंच आपल्याला आहे का?
- श्रीपाद कोठे
सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४