शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

वेगळे घर आणि कलह

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया येथील प्रकरणांवर चर्चा सुरु असताना एकाने मुद्दा मांडला की, अफजल गुरूच्या संबंधात काश्मीरच्या पीडीपी पक्षाची भूमिकाही वेगळी (म्हणजे त्याची फाशी अयोग्य आहे अशी) आहे. भाजपा त्यांच्यासोबत सत्तेत राहू शकते, अन जेएनयु व प्रेस ट्रस्ट मधील लोकांवर मात्र आक्षेप; हे कसे? प्रश्न खरंच छान आहे. वरवर पाहता बिनतोड सुद्धा. पण हा युक्तिवाद ऐकला आणि खुदकन हसायला आलं. आईनस्टाईनची एक गोष्ट सांगतात. त्याने मांजर आणि तिच्या पिल्लासाठी दोन वेगळी दारे केली होती. मांजरीच्या मोठ्या दारातून लहान पिल्लू जाऊ शकेल हे सापेक्षतेचा सिद्धांत मांडणाऱ्या आईनस्टाईनच्या लक्षातच आलं नाही. बहुधा आजचे सगळे विद्वान आईनस्टाईनच्या मार्गावरच असावेत. अन्यथा वरील बिनतोड युक्तिवाद सुचलाच नसता. कुटुंबातल्या घटकांनी गरजेपोटी, सोयीसाठी वेगळे राहणे आणि कलहातून कुटुंब विभक्त होणे याचा फरक कळणे इतके दुरापास्त का व्हावे? अफजल गुरुबद्दल वेगळे मत वा सहानुभूती असणे आणि ज्या व्यवस्थेने याबाबत निर्णय घेतला त्याबद्दल शत्रुत्व असणे, देशाच्या शत्रूबद्दल प्रेम असणे, मनात केवळ सूड आणि द्वेष असणे; यातील फरक समजत नाही की समजून न समजल्यासारखे करायचे आहे? देशभरात अगदी दिल्ली ते गल्ली असे लोक आहेत. विचारस्वातंत्र्य अन अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्या नावाखाली त्यांना सूड, द्वेष आणि शत्रुता करायची आहे. एका घराची दोन, तीन, चार घरे होणे क्लेशदायक नसते. क्लेशदायक असतो कलह. कलह कधीच समर्थनीय होऊ शकत नाही. डार्विनचा सिद्धांत, समाजवाद, पाश्चात्य लोकशाही, इंग्रजांची सत्ताभिलाशी धूर्तता; यांनी या देशात संघर्ष आणि संघर्षाच्या chain reaction ची बीजे पेरली. येथील असलेल्या व नसलेल्या देखील त्रुटींचा, कमजोरींचा, येथील वेगळ्या जीवनशैलीचा आणि जीवनदृष्टीचा उपयोग त्यांनी यासाठी करून घेतला. काळाचा महिमा आणि सत्ता व संपत्तीची जादू यांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. समस्यांचा वा प्रश्नांचा विचार विश्लेषणात्मक पद्धतीने करावयाचा असतो आणि त्यावरील उपायांचा विचार संश्लेषणात्मक पद्धतीने करायचा असतो. सगळे पाश्चात्य विचार, सिद्धांत वा शास्त्रे मात्र; समस्या आणि त्याचे उपाय दोन्हीचा विचार विश्लेषणात्मक पद्धतीनेच करतात. उदा.- बोटाला काही झाले तर त्याची चिकित्सा बोट म्हणूनच करावी लागेल. पण त्याला पट्टी बांधताना किंवा प्लास्टर घालताना किंवा औषधयोजना करताना हाताचा वा संपूर्ण शरीराचा विचार अपरिहार्य ठरतो. पट्टी बांधताना वा प्लास्टर घालताना बाकीच्या हाताची सोय, गैरसोय पाहावी लागतेच. किंवा द्यावयाच्या औषधाचा अन्य काही परिणाम होत नाही ना हेही पहावे लागते. कारण त्रास बोटाला असला तरीही बोट हे हाताचे वा शरीराचे अंग आहे हे नजरेआड करून चालत नाही. यालाच म्हणतात एकात्म दृष्टी. holistic approach तो हाच. मात्र गेली अनेक वर्ष शिक्षण, प्रबोधन, बौद्धिक चळवळी आदी माध्यमातून आमची दृष्टी इतकी विकृत करून टाकली आहे की हे समजण्याची शक्तीही आम्ही गमावतो आहोत की काय असे वाटते. महात्मा गांधी ज्यावेळी म्हणत की, don't throw baby with bathwater, तेव्हा त्यांना हेच अभिप्रेत होते. चुकीच्या रस्त्याने आम्ही खूप दूर आलो आहोत. मागे फिरून पुन्हा योग्य मार्ग धरावा लागेल. त्याला इलाज नाही. काश्मीर काय, फुटीरतावाद काय, इसीस काय किंवा विचार वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काय... योग्य रस्ता धरण्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०१६

बुधवार, १७ जून, २०१५

भत्त्याचे महाभारत

शेजारच्या दुकानात गेलो होतो. मालक लहानपणापासूनचा मित्र. शेजारी राहणारे. स्टेशनरी सामान, झेरॉक्स, इंटरनेट कॅफे, विविध ऑनलाईन कामे असा त्याचा व्याप. तिथे एक त्याच्या ओळखीचे गृहस्थ आले होते. त्यांचे काम तो करत होता. ते सगळे काम सुरु होते इंडियन अॉईलच्या वेबसाईटवर. ते गेल्यावर सहज गप्पा झाल्या. मित्राने त्या गृहस्थांचे जे काम केले त्याबद्दल सांगितले. ते गृहस्थ इंडियन अॉईलमधून फोरमन म्हणून सेवानिवृत्त झालेले. मासिक ३५-४० हजार रुपये पेन्शन. याशिवाय दर सहा महिन्याला १० हजार रुपये, म्हणजे वर्षाचे २० हजार रुपये त्यांना मिळतात. बोनस म्हणून. तसेच इंडियन अॉईलने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दोन पर्याय ठेवले आहेत- १) दर सहा महिन्यांनी ४० हजार रुपये घ्या किंवा २) दर तीन महिन्यांनी तुमचा जेवढा खर्च होईल तो पूर्ण खर्च घ्या. वैद्यकीय भत्ता म्हणून. क्लेम करायचा आणि पैसे घ्यायचे. त्यात `किरकोळ' अशा पर्यायाखाली काही गोष्टींची यादी आहे. त्यात चष्मा असाही पर्याय आहे. या गृहस्थांनी एकदा चष्म्यासाठी क्लेम केला. किती? १० हजार रुपये अन दुसऱ्या दिवशी १० हजार रुपये जमाही झालेत. दर तीन महिन्यांनी ३०-४० हजार रुपयांचा क्लेम केला जातो आणि तेवढे पैसे त्यांना मिळतात. या सगळ्या प्रकारात बेकायदेशीर काहीही नाही. पण याला नैतिक म्हणता येईल का?

यानिमित्ताने आम्ही काही मुद्यांची चर्चा केली.
१) हा सगळा प्रकार कायदेशीर असेल, पण नैतिक आहे का?
२) ३५-४० हजार रुपये पेन्शन असताना एवढे प्रचंड भत्ते कशासाठी?
३) चांगला खातापिता, चालता फिरता माणूस इतका आजारी असतो का?
४) वैद्यकीय भत्ता नियमितपणे देण्याला काय अर्थ आहे? माणूस सतत काय दवाखान्यातच राहतो का? नेहमीच आजारी असतो का?
५) साध्या फोरमनला किमान लाखभर रुपये दरवर्षाला विनाकारण वाटले जातात. असे खालच्या पदापासून उच्च पदापर्यंत हजारो लोक असतील, ज्यांना ही खैरात वाटली जाते.
६) हाच खर्च कंपनीच्या ताळेबंदात दाखवला जातो आणि कंपनीच्या उत्पादनांचे भाव त्यानुसार ठरवले जातात. म्हणजेच पेट्रोल, डिझेलच्या दरात या खैरातीचा वाटाही असतो.
७) अशा तेल क्षेत्रातील सगळ्या कंपन्या विचारात घेतल्या तर हा घोळ कितीतरी वाढेल.
८) तेलाशिवाय कितीतरी क्षेत्रातील वेगवेगळ्या सरकारी कंपन्या आहेत. त्यांच्यात सुद्धा असा काही ना काही प्रकार असेलच.
९) खाजगी क्षेत्रात तर हा सगळा प्रकार कितीतरी अधिक प्रमाणात आहे.
१०) खतांच्या किंवा औषधांच्या कंपन्या तर आपल्या किरकोळ विक्रेत्यांना सहकुटुंब विदेश वारीवर वगैरे पाठवतात.
११) या सगळ्याचा भुर्दंड जनतेवर पडत नाही का? तो योग्य आहे का? जनतेने तो का सहन करायचा?
१२) महागाई, चलन फुगवटा, तुटवडा, भांडवली समस्या; यासारखी अर्थकारणाची अरिष्टे यापोटीच जन्म घेत नाहीत का?
१३) यासंबंधात सामाजिक चर्चा, प्रबोधन, स्पष्ट भूमिका, नियोजन, निर्णय; हे सारे व्हायला हवे की नाही?
१४) नुसता राजकीय चिंधी बाजार मांडून यातून मार्ग निघेल का?
१५) किमती ठरवण्याचा योग्य मार्ग निवडून त्याची अंमलबजावणी झाल्यास जो पैसा हाती येईल त्यातून अनेक कामे होऊ शकतील, अनेक कुटुंब चालू शकतील.

एका व्यक्तीवर एक लाख रुपये हा अगदी हात राखून अंदाज केला तरीही, या एक लाखात एक सामान्य घर चालू शकेल. अशी लाखो घरे चालू शकतील. अशा लाखो लोकांना चांगल्या, उत्पादक कामात सहभागी करून घेता येऊ शकेल. सामाजिक कार्य असा वेगळा विभाग करून हे करता येईल. आज पैशाची खूप अपेक्षा न ठेवता, गरज पूर्ण होईल इतपत पैसा मिळाल्यास; कामात झोकून देणारे हजारो स्त्री पुरुष आहेत. स्व. नानाजी देशमुख यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या अंतर्गत असेच प्रयोग केले आहेत. एकल विद्यालये हा असाच प्रयोग आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे असेच प्रयोग आहेत. अन्यही आहेत. यातून शिक्षण, आरोग्य, सेवा, संस्कार, स्वच्छता, प्रबोधन, सामाजिक स्वास्थ्य, कला; अशा अनेक क्षेत्रात खूप भरीव असे काम होऊ शकेल.

पण स्व. नानाजींचा आदर्श आम्ही ठेवू का? राज्यकर्त्यांचे बाजूला ठेवा, समाजाला तो हवा आहे का?

गुरुवार, ११ जून, २०१५

प्रामाणिक विचार करताना

स्कील डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया आणि एकूण आर्थिक इतिहास याविषयी विचार करताना सहज एक कल्पना चमकून गेली की, आमच्या येथील जुन्या जातिव्यवस्थेबद्दल प्रचंड घृणा, अनेक विपरीत अर्थ, गैरसमज वगैरे इंग्रजी शासनकर्त्यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक तर नसतील पसरवले? उत्पादन, वितरण, उपभोग, तंत्रज्ञान, कौशल्य, कच्चा माल, पक्का माल, साठवणुकीच्या सोयी, गुंतवणूक, मनुष्यबळ वगैरे गोष्टींवरच अर्थकारण अवलंबून असते. जगात कुठेही गेले तरी. गेली अनेक वर्षे जगात सगळे देश, सगळे समाज याच गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या जाती व्यवस्थेत या गोष्टींचा अन शिवाय सामाजिक स्थिरता, मूल्य, व्यक्तिमत्व विकास यांचा अपूर्व संगम होता. अर्थात सगळ्या व्यवस्थांप्रमाणे त्याचेही गुणदोष होते. त्याची चिकित्सा होतही होती आणि व्हायलाही हवी. पण आज जातीव्यवस्था हा शब्द उच्चारायची सुद्धा सोय राहिलेली नाही. तो शब्द उच्चारताच अंगावर पाल पडल्यासारखी प्रतिक्रिया उमटते. हा जो नकारात्मक, घृणेचा, पापाचा आणि ओशाळलेपणाचा भाव आहे, तो निर्माण करून इंग्रजांनी आपले इप्सित तर साध्य केले नसेल? अन्यथा, उण्यापुऱ्या २०० वर्षांपूर्वी ज्या देशात भिकारी नव्हता (खुद्द ब्रिटीश संसदेत १८३५ साली हे अधिकृतपणे सांगण्यात आले.) त्या देशाची आज ही स्थिती का झाली असावी? यावर सखोल, प्रामाणिक चिंतन व्हायला हवे.

बुधवार, ३ जून, २०१५

महातहान

बहुतेक हिंदी मराठी वाहिन्यांवर काल वटसावित्री होती. फेसबुकसुद्धा त्यात सामील होते. खूप गमती जमती पाहायला ऐकायला मिळाल्या. आज काळ बदलला आहे. त्याला धरूनच त्या होत्या. त्याला हरकत पण नाही. त्याच भावनेने त्यांचा आनंद घ्यायला सुद्धा कां कू करण्याची गरज नाही. `बाभळी अमावास्या', `रिन्युवल करार' वगैरे छान होते. गमती जमती करण्यात पुरुष होते तशाच बायाही होत्या. पारंपरिक रूढी आणि भावना जपणारे आणि शुभेच्छा देणारेही प्रकार होते. पर्यावरण हा तर `हॉट केक'. त्यामुळे तो होताच. वृक्ष लावा, वटवृक्ष लावा, त्याचे महत्व, शास्त्रीय कारणे; असे सगळे होते. मृत्युशय्येवर पडलेल्या बायकोसाठी वडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालणारा पुरुष पण होता. सगळेच आपापल्या ठिकाणी योग्य होते. मात्र दोन गोष्टी हरवल्यासारख्या वाटल्या आणि त्या मुळापर्यंत घेऊन जाणाऱ्या आहेत. एक म्हणजे- आपल्याला प्रतीत होणाऱ्या सत्यासाठी जीवनाची बाजी लावण्याची सावित्रीची श्रेष्ठता. दुसरे म्हणजे- सत्यवान सावित्री रूपक कथेचा अन्वयार्थ.

वरच्या आवरणात रमणे आणि त्यातच आशय शोधणे ही मानवी मनाची प्रकृतीच आहे. त्यामुळे एखादी कथा ऐकल्यावर त्यातील पात्र, प्रसंग, परिस्थिती यात आपण गुंतून जातो. गाभ्यापर्यंत जाण्याची तसदी घेत नाही. `सत्यवान-सावित्री'च्या महाभारतातील आख्यानाचे सुद्धा असेच होते. या आख्यानाचा उपयोग करून कोणी तरी कधीतरी एक सामाजिक उपक्रम म्हणून वटसावित्री व्रत सुरु केले असावे. असे सामाजिक उपक्रम, त्यांना आलेले व्रताचे स्वरूप, त्यांच्या झालेल्या रूढी; या सगळ्याला वेगळी समाजशास्त्रीय बैठक असते. त्यांचा फार मोठा उपयोग पण असतो. परंतु प्रदीर्घ काळानंतर त्याचे वरचे आवरण तेवढे उरते. अन हळूहळू तेही गळून पडू लागते. आज या प्रथेचे तसेच होत असल्याचे दिसते. याचा अर्थ जे होते वा आहे ते सारेच निरर्थक, थट्टेवारी नेण्यासारखे आहे असे नाही. मुळात थट्टा करताना आणि आवरण गळून पडताना त्याचा गाभा काय आहे, आशय काय आहे याकडे लक्ष दिले तर त्याचा उपयोग करता येऊ शकतो. आवश्यकता वाटल्यास त्या आशयाभोवती नवीन आवरण उभे करता येऊ शकते.

`सत्यवान-सावित्री' कथेचा व्यावहारिक आशय आहे पतीसाठी प्राणांची बाजी लावण्याचे धैर्य आणि निग्रह. या ठिकाणी तर पती सुद्धा लाक्षणिक आहे. पती म्हणजे कोण तर ज्याच्याशी आयुष्याची गाठ बांधली आहे तो. ही गाठ सुद्धा समजून घ्यायला हवी. आपण व्यवहारात सुद्धा बोलतो की, `नोकरी किंवा व्यवसाय हीच एखाद्याची पहिली बायको आहे' किंवा `नोकरी, व्यवसाय एखादीची सवत आहे' वगैरे. याचा अर्थच लग्नगाठ म्हणजे commitment. ही commitment महत्वाची. अशी commitment तेव्हाच असू शकते ज्यावेळी एखाद्याला वा एखादीला कुठेतरी सत्याची प्रतीती येते. त्यातून विश्वास, प्रेम इत्यादी निर्माण होते. ती व्यक्ती, ती वस्तू, तो विचार, ती संघटना, ते कार्य, ते व्रत म्हणजेच आयुष्य अशी धारणा जन्माला येते आणि मग त्या सत्यासाठी स्वत:च्या प्राणांची सुद्धा बाजी लावायला मागेपुढे पाहत नाही, ती सावित्री. आपल्या प्राणांची आहुती देऊनसुद्धा प्रतीत होणारं सत्य जपलं पाहिजे, जिवंत ठेवलं पाहिजे यासाठी लढणारी, ती सावित्री. `हाच पती लाभो, त्याच्याकडे गाडीघोडा, नोकरचाकर, बंगला, पैसाअडका अमाप राहो. अन त्याचा भोग आम्हाला मिळो' हे सावित्रीचं विडंबन आहे एवढच म्हणता येईल. प्रसिद्ध मराठी कवी म. म. देशपांडे आपल्या `तहान' या कवितेत म्हणतात- `सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण'. आम्हाला अशी सत्याची, न्यायाची, नीतीची, प्रेमाची `महातहान' लागते का? ही `महातहान' लागते तेव्हा सावित्री, राधा, मीरा, बाजीप्रभू, तानाजी, सावरकर, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, सौरव कालिया असे जन्माला येतात. म्हणून `सावित्री' हे व्रत आहे सत्याच्या शोधाचं, सत्याशी बांधिलकीचं. सत्यवानाच्या माध्यमातून सत्याचा शोध, सत्याशी बांधिलकी हा त्याचा व्यावहारिक आशय आहे. खूप साधा असा पर्यावरणाचा विषय घेतला तरीही आमची त्या विषयाशी बांधिलकी आहे का?

या कथेचा एक आध्यात्मिक आशयही आहे. वटवृक्ष हे त्याचं प्रतीक आहे. वटवृक्ष अक्षय असतो. एका पारंबीतून दुसरी शाखा. आमचं अस्तित्वही असंच आहे. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं. त्याला अंत नाही आणि आदीही नाही. अस्तित्व नव्हतं अशी वेळ कधीच नव्हती आणि अस्तित्व नसेल अशीही वेळ कधीच राहणार नाही. हां, अस्तित्वाचं रुप सतत बदलत राहील, पण अस्तित्वहीनता अशक्य आहे. आम्ही `अक्षय' आहोत. आम्हाला क्षय नाही. जन्म मृत्यू ही वरवरची लक्षणं आहेत, याविषयी आश्वस्त करणारी ही रूपक कथा आहे. व्यावहारिक आकलनाच्या कक्षेतील म्हणून वटवृक्षाचे उदाहरण आहे. ही अक्षयता प्राप्त होण्यासाठी सत्याच्या मार्गावर चालावे लागते आणि या मार्गावर चालताना पंचप्राणही पणाला लावण्याची तयारी ठेवावी लागते. `सत्यवान-सावित्रीच्या' आख्यानाचं मला प्रतीत झालेलं हे सत्य आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ३ जून २०१५

रविवार, ३१ मे, २०१५

झाडे आख्यान

- खूप झाडे लावली पाहिजेत.
- झाडे लावा झाडे.
- ही जागा रिकामीच आहे ना, इथे झाड लावून टाका.
- रिकाम्या जागा झाडांनी भरा.
- काय तुम्ही झाडांचे शत्रू...
- किती रखरखीत आहे इथे, झाडे का लावत नाही.
- झाडांशिवाय जगणं हे पाप आहे.
- जितकी माणसे तितकी झाडे.
- घराचं सौंदर्य महत्वाचं आहे, पण झाडे त्याहून जास्त महत्वाची आहेत.
- झाडांशी शत्रुत्व करून इमारतींचं सौंदर्य वाढवलं तर, आपलं आणि जगाचं सौंदर्य कोमेजून जाईल.
- झाडांसाठी एखाद्याशी भांडण करायलाही हरकत नाही.
- सगळ्यांशी गोड बोलावेच, पण झाडांच्या शत्रूंशी तिखट आणि कडू बोलायला हरकत नाही.
- आपसात खूप काही निरर्थक बोलण्यापेक्षा थोडे झाडांशीही बोलावे.
- आपला स्वार्थ म्हणून तरी झाडे लावा, जगवा, वाढवा, जोपासा.
- झाडांशी शत्रुत्व म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे.
- झाडांचे महत्व न कळणाऱ्याला स्वार्थसुद्धा कळत नाही, असेच म्हणावे लागेल.

ही आणि यासारखी वाक्ये आपल्या रोजच्या बोलण्यात, व्यवहारात यायला हवीत. त्यातून एक सकारात्मक वातावरण नक्कीच तयार होईल. अन्य टिवल्या बावल्या फक्त १% कमी करून तो वेळ, ती उर्जा, तो उत्साह, ती सक्रियता झाडे (वृक्ष या अर्थाने. बाल्कनीत एखाद्या छोट्याशा कुंडीत लावलेलं दुर्लक्षित तुळशीचं रोपटं या अर्थाने नव्हे.) या विषयाकडे लावली तरी परिस्थितीत खूप फरक पडेल. सुरुवातीला कंटाळवाणं वाटू शकेल. पण हा सगळा सवयीचा भाग असतो. चित्रपट आणि क्रिकेट सारख्या कंटाळवाण्या गोष्टी आपण आवडीने चघळतोच ना !!!

शांघाय शहराची चर्चा आपल्या येथे जुनी आहे. पंतप्रधान मोदी तेथे गेल्याने तिला पुन्हा उजाळा मिळाला. तेथील वर्णनात्मक माहितीपट पाहताना जाणवला तो तेथील झाडांचा अभाव. आम्हाला अशी शहरे नको, असे मोदींना सांगण्याची ताकद सुद्धा आपण ठेवली पाहिजे. मोदींमुळे स्वच्छता या विषयालाही चांगले दिवस आले आहेत आणि ते चांगलेच आहे. पण स्वच्छता ही निसर्ग, झाडे, माती, पशू पक्षी यांच्याशी विरोधी स्वरुपात पाहिली व आचरली जाऊ नये.

झाडांचे प्रेम आम्हालाही आहे, पण त्यासाठी जंगले वाढवा. झाडांची ब्याद शहरात, घरांजवळ आणि आपल्या रोजच्या जगण्यात नको; ही भूमिकाही टाकून द्यायला हवी. झाडांची, निसर्गाची, मातीची, पशू पक्ष्यांची जवळीक वाढली तर माणसातली पशू वृत्ती, स्वार्थी वृत्ती हळूहळू आपोआप कमी होते हेही लक्षात ठेवायला हवे. प्रदूषण दूर करण्यासोबतच माणसाला माणूसपण मिळवून देण्यात निसर्गाचा वाटा असतो. त्याकडे डोळेझाक नको.

अनोखे कोकणची सोनल

आज अचानक आठवली सोनल. `अनोखे कोकण'मधील सोनल. `अनोखे कोकण' हे एक प्रदर्शन आहे गणपती पुळेचं. गणपती पुळे या कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रसिद्ध ठिकाणी असलेलं. जुन्या कोकणातील गाव कसा होता. त्याचे व्यवहार कसे चालत वगैरे या ठिकाणी शिल्पांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन पाहायला गेलो तेव्हा ते दाखवण्यासाठी आणि समजवण्यासाठी जी मुलगी माझ्यासोबत मार्गदर्शक म्हणून होती ती सोनल. अशा आजूबाजूच्या खेड्यातील काही मुली तिथे काम करतात. त्यांना तयारही छान केले आहे. त्या सारे समजावून सांगतात. हे `अनोखे कोकण' दाखवताना आम्ही एका शिल्पासमोर उभे राहिलो. सोनल सांगू लागली- `हा कासार. हा मुलींना, बायांना बांगड्या भरून देतो. लहान मुलींना बांगड्या भरून देण्याचे तो पैसे घेत नाही. दहाव्या बाराव्या वर्षी मुलीचे लग्न होत असे. तेव्हाही हा बांगड्या भरून देत असे. तेव्हा त्याला मुलीचे वडील एक सोन्याचा तुकडा देत असत. तो त्याला पुरे. दुसऱ्या एखाद्या मुलीचं लग्न होईल तेव्हा पुन्हा दुसरा सोन्याचा तुकडा. एक प्रकारे आजच्या भाषेत सांगायचं तर, तो दहा वर्षांचं क्रेडीट देत असे.' त्या शिडशिडीत बांध्याच्या काळ्यासावळ्या कोकणी खेड्यातील सोनलच्या तोंडून क्रेडीट शब्द आला तेव्हा छान वाटलं. तिला त्याचा अर्थ फार समजत असावा किंवा नसावा. ती शिकवल्याप्रमाणे सांगत होती. पण नकळत माझ्यासारख्या शहरी माणसाला आपल्या समाज जीवनात मुरलेल्या विश्वास आणि मानवतेचं दर्शन मात्र त्यामुळे घडलं होतं. आजच्या अर्थकारणात लोप पावलेल्या आणि पारंपरिक अर्थकारणाचा जणू आधारच असलेल्या विश्वास आणि मानवता, या दोहोंची रुजवणूक पुन्हा कशी होऊ शकेल? सगळ्यांनी विचार करावा असाच प्रश्न आहे, नाही का?

ओवैसीच्या युक्तिवादाच्या निमित्ताने

गोहत्या बंदीला विरोध करताना खा. असदुद्दिन ओवैसी अनेक मुद्दे मांडत होते. त्यातला एक मुद्दा होता- आमच्या खाण्याच्या सवयी आणि आवडीनिवडी आम्ही का बदलाव्यात? वरवर बिनतोड वाटणारा हा बुद्धिवादी युक्तिवाद तद्दन तकलादू आहे. खाण्यापिण्याच्याच नव्हे तर अनेक सवयी, आवडीनिवडी जगभरातील मनुष्यप्राणी सतत बदलत आला आहे. गायीचेच कशाला नरमांसभक्षण करणारेही अनेक जण पूर्वी होते. आजही थोडेच का होईना आहेत. ती सवय माणसाने बदललीच ना? पूर्वीचा मानव मृगयाजीवी होता. आज अनेक देशांमध्ये अनेक गोष्टींच्या शिकारीवर बंदी आहे. मृगयाजीवीतून उत्क्रांत होत आजचा मानव आकाराला आला आहे. चोरी हाच पिढीजात व्यवसाय असलेले लोक होते. म्हणून चोरीचे समर्थन करून ती अधिकृत व्यवसायाच्या यादीत टाकायची का? पूर्वी माणूस कपडे घालत नव्हता, आताही तसेच करावे का? खाणे, पिणे, राहणे, वागणे, बोलणे, चालणे, अशा अनेक सवयी आणि आवडीनिवडी सतत बदलत असतात. गरजा, उपलब्धता, संवेदनशीलता, आदर, प्रेम, सहअस्तित्वाची गरज, जाणिवांचा स्तर उंचावणे अशा अनेक कारणांनी हे होत असते. असे बदल करण्यास हट्टाने नकार देणे हीच कट्टरवादाची सुरुवात असते. आज संपूर्ण जगात मुसलमानांची किंवा इस्लाम मानणाऱ्या लोकांची जी प्रतिमा तयार झाली आहे, त्यामागे इष्ट बदल न करण्याची त्यांची वृत्तीच कारणीभूत आहे. खा. ओवैसी त्यांचेच प्रतिनिधित्व करतात असे म्हणावे लागेल. अन प्रसार माध्यमे अशा वृत्तीला जाणीवपूर्वक किंवा अजाणता खतपाणी घालत असतात असाही निष्कर्ष काढावा लागेल. अन्यथा, शेकडो गायींच्या गोशाळा चालवणाऱ्या मुसलमानांच्या मुलाखती प्रसार माध्यमांनी दाखवल्या नसत्या का? मुलाखती जाऊ द्या, त्यांच्या कामाची माहिती एक बातमी म्हणून तरी कधी या प्रसार माध्यमांनी दाखवली आहे का? गोंधळ माजवून बुद्धिभ्रम उत्पन्न करण्याच्या सध्याच्या शर्यतीत तारतम्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी सामान्य माणसाचीच अधिक आहे.