बुधवार, २७ मार्च, २०२४

सुमन कल्याणपूर

DD News वर आत्ता एक छान कार्यक्रम पाहिला. सुमन कल्याणपूर यांची मुलाखत. मुलाखत दूरदर्शन स्टुडिओत झालेली होती. म्हणजे प्रकृती उत्तम आहे. इतका वेळ सुमनजींना बोलताना पहिल्यांदाच ऐकलं. छान बोलतात. आवाजाचे चढउतार बहुधा नाहीच. एका संथ लयीत उत्तरं देत होत्या. दोन तीन गाण्यांचे मुखडे पण म्हटले प्रश्नोत्तराच्या दरम्यान. त्यात त्यांचं आवडतं एक मराठी गाणं पण होतं. केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर... बोलताना न चढणारा स्वर गाताना मात्र सहज टिपेला भिडला. या वयातही. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर... हे उडत्या लयीतल गाणंही लीलया म्हटलं. लताजींच्या संदर्भात स्वाभाविकच प्रश्न होते. एक होता - तुमचे संबंध कसे होते? त्यावर त्यांचं उत्तर होतं - आम्ही भेटत होतो. आमच्यात व्यवस्थित रॅपो होता. दुसरा प्रश्न होता - दोघींचे आवाज खूप मिळतेजुळते आहेत. तुम्हाला काय वाटतं? उत्तर होतं - आम्ही दोघी कदाचित एकाच वेळी देवाकडे आवाज मागायला गेलो असू. अन् त्याने आम्हाला तो विभागून दिला असेल.

- श्रीपाद कोठे

२८ मार्च २०२३

(पद्मभूषण मिळाल्यानंतरची)

बुधवार, १३ मार्च, २०२४

काय म्हणावे?

सध्या महिला क्रिकेट प्रीमियर लीग सुरू आहे. त्याबद्दल आज वाचण्यात आलेले...

काही खेळाडूंना काही कोटी रुपयात काही संघांनी विकत घेतले. परंतु या खेळाडूंचा खेळ अतिशय पडेल होतो आहे. एका संघाने तर अजून एकही सामना जिंकलेला नाही.

......

माझी टिप्पणी :

खेळासाठी एवढा पैसा द्यावा का हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही, किमान ज्यासाठी पैसा मिळाला आहे त्याचे रिटर्न्स द्यायला नकोत का? त्यासाठी काहीही नियम नाहीत. खेळ ही बेभरवशाची गोष्ट असते असं म्हणून दुर्लक्ष करायचं का?

- शेती ही पण बेभरवशाची गोष्ट नाही का? त्यांना खेळासारखी वागणूक का नको?

- कोणतीही जबाबदारी नसलेल्या गोष्टींवर अमाप पैसा ओतण्याचे कौतुक वाटणारे तुम्ही आम्हीच नंतर; देशाची आर्थिक स्थिती, आर्थिक विषमता, दारिद्र्य इत्यादी गोष्टींवर कथ्याकुट करतो. यापेक्षा हास्यास्पद आणि लाजिरवाणे काय असू शकते?

- श्रीपाद कोठे

१४ मार्च २०२३

अद्भूत अनुभव

संध्याकाळी सातेक वाजताच्या दरम्यान अचानक संथ, शांत स्वरात; हळू पण स्पष्ट आवाजात रामरक्षा ऐकू यायला लागली. मी म्हणत नव्हतो पण ते खूप आकर्षून घेणारं होतं. आजूबाजूला पाहिलं पण कुठेच कोणी म्हणत नव्हतं. आवाज ओळखीचा नव्हता. पूर्ण नाही ऐकू आली. मधूनच सुरू झाली होती अन् मधेच थांबली. पण माझ्या बाहेरून आणि जवळून ते स्वर येत होते एवढं नक्की. असो. प्रभूच जाणोत. 🙏

- श्रीपाद कोठे

१४ मार्च २०२३

रविवार, १० मार्च, २०२४

ते दिवस

सारदा मठाच्या पहिल्या अध्यक्ष प्रव्राजिका भारतीप्राणा यांच्याबद्दल वाचत होतो. १९१२ मध्ये त्या वृंदावनला होत्या. त्याबद्दल त्यांनी सांगितलेली माहिती आज अविश्वसनीय आणि गमतीशीर वाटेल. त्या तिघी जणी होत्या. त्या स्वयंपाक करीत नसत तर तिथल्या गोविंदजी मंदिरात विकत मिळणारा प्रसाद घेऊन येत आणि जेवत असत. प्रत्येकीचा जेवणाचा महिन्याचा खर्च तीन रुपये होता. जो प्रसाद विकत मिळत असे त्यात भात, भाज्या, दही, खीर आणि सोळा पोळ्या असत. याशिवाय नाश्ता म्हणून एक पैशाचा चना मसाला विकत घेत. तो तिघींना दोन दिवस पुरत असे. दूध सहा पैशात एक शेर मिळत असे.

- श्रीपाद कोठे

११ मार्च २०२३

शनिवार, ९ मार्च, २०२४

कृष्ण हवा

साधारण गेल्या वर्षभरापासून भारत रशियाकडून कच्चे तेल कमी किमतीत आयात करतो आहे आणि शुद्ध करून अमेरिका आणि अन्य देशांना निर्यात करून फायदा कमावतो आहे; अशा आशयाचा एक युक्तिवाद सध्या फिरतो आहे. चांगलंच आहे. पण -

: निर्यातीतून पैसा कमावणे महत्त्वाचे आहेच पण आपल्याच नागरिकांचा बोजा कमी करणे; किमानपक्षी नागरिकांवर बोजा न वाढवणे महत्त्वाचे नाही का? स्वयंपाकाचा गॅस वा अन्य पेट्रोलियम पदार्थांची वाढ का थांबू नये? गोकुळातील दूध, दही बाहेर जाणे थांबवणारा एखादा कृष्ण हवा आहे का?

- श्रीपाद कोठे

१० मार्च २०२३

गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

शेतीमालाचे भाव

सध्या कांद्यावरून वाद सुरू आहे. शेतकऱ्यांना क्विंटलसाठी एक रुपयाही मिळत नसताना, ग्राहकांना मात्र २५-३०-४० रुपये किलोने कांदे घ्यावे लागतात. असे का होते? दुसरे - ज्यावेळी ग्राहक याहून दुप्पट भावात कांदे खरेदी करतात तेव्हा शेतकऱ्याला त्यातील किती पैसा मिळतो? दोन्हीची सरासरी काढली तर शेतकऱ्याने समाधानी का असू नये? ग्राहक अधिक भावाने कांदा विकत घेतात तेव्हा जर शेतकऱ्याला योग्य पैसा मिळत नसेल तर तो जातो कुठे? म्हणजेच कांदा चढ्या भावाने विकला गेला तरीही आणि मातीमोल भावाने विकला गेला तरीही शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही वर्गांना फटका बसतो. मग पैसा जातो कुठे? यावर सरकार नावाची यंत्रणा आजवर काहीही का करू शकलेली नाही. अन् एकूणच कांद्यासह सगळ्याच गोष्टींच्या किमतीच्या स्थिरतेचा विचार करावा हे १९४७ पासून २०२३ पर्यंत कोणत्याही सरकारला, कोणत्याही पक्षाला का वाटत नाही? औद्योगिक उत्पादने, सेवा अथवा अन्य निसर्गनिर्मित गोष्टी यांचे भाव अधेमधे एकदम वाढतात. नंतर ओरड झाली की किंचित कमी होतात. उदा. भाव एकदम दहा टक्के वाढतात. मग ओरड होते. मग दोन टक्के कमी होतात. किमतीवर नियंत्रण मिळवलं म्हणून सरकारे पाठ थोपटून घेतात. उरलेल्या आठ टक्के महागाईची लोकांना सवय होते. पुन्हा काही काळाने भाव वाढतात. पुन्हा सगळे तसेच. शेतीमालाच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. खूप पाऊस पडला तरी पाण्याच्या किमती कमी होत नाहीत पण खूप उत्पादन झाले म्हणून शेतमालाच्या किमती गडगडतात. बरे आता शेतकऱ्याला कुठेही आपला माल घेऊन जाण्याची आणि विकण्याची मुभा आहे. तरीही स्थिती सुधारत नाही. देशभर रस्ते, वाहतूक आणि दळणवळण सुधारत असूनही त्याचा शेती आणि शेतकऱ्यांना फायदा नाही. कुठेतरी काहीतरी मूलभूत गडबड आहे. कोणाकडे त्यावर विचार करायला फुरसत आहे का?

- श्रीपाद कोठे

१ मार्च २०२३

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

मराठीसाठी संकल्प

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करता येणारे संकल्प -

- लहान मुलांना शिकवताना हा dog, ही cat; याऐवजी कुत्रा, मांजर किंवा अगदी भू भू म्यांव हे सांगीन.

- फ्लॉवर कसा दिलाऐवजी फुलकोबी कशी दिली/ काय भाव; असे बोलीन.

- मला bore होण्याऐवजी कंटाळा येईल.

- लंच, डिनर वा ब्रेकफास्ट याऐवजी जेवण आणि नाश्ता करीन.

- माझं बुक स्टोर ऐवजी पुस्तकालय असेल.

- मला नेबर नसतील शेजारी असतील.

- मी व्यवस्थित कमवीत असल्यास वर्षाला हजार रुपयांची मराठी पुस्तके विकत घेईन.

- शुभेच्छा आणि धन्यवाद या शब्दांचा वापर करीन.

- जन्मदिवस वा सणवार वा अन्य प्रसंगी मराठीतून शुभेच्छा देईन.

- मराठी बोलताना, मराठीचा वापर करताना मला ओशाळल्यासारखं वाटणार नाही. त्यात कमीपणा वाटणार नाही.

- चारचौघात असताना मराठीबद्दल बाकीच्यांना काय वाटतं याचं दडपण मी घेणार नाही.

- रोजच्या वापरातल्या वस्तू, रोजचे घरातले वा बाहेरचे संवाद आग्रहाने मराठीत करीन. शब्द अडल्यास तो शोधेन आणि त्याचा वापर करत जाईन.

- मराठीचा वापर ही टिंगलटवाळी करण्याची, हसण्यावारी नेण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाही हे स्वतःला कठोरपणे समजावेन.

- मराठीचा आग्रह धरताना टेबलला काय शब्द वापरायचा किंवा रेल्वे हेच वापरणं कसं योग्य इत्यादी प्रकारचे फाटे फोडून आशय भरकटवणार नाही.

- शक्य नसेल त्याचा नंतर विचार करेन आणि शक्य आहे त्याचा व्यवहार लगेच सुरू करेन.

- श्रीपाद कोठे

२७ फेब्रुवारी २०२३

राजभाषा दिनाच्या निमित्ताने प्रमाण भाषा व बोलीभाषा यांचा वादही होतो आहे. त्यावरील एका धाग्यावर व्यक्त केलेले माझे मत -

बोली भाषेतील अनेक शब्द प्रमाण भाषेत आहेत असे म्हणता आणि त्याचवेळी पुणेरी भाषा प्रमाण भाषा ठरवण्यात आली असा निष्कर्षही काढता. असे कसे? शिवाय सगळ्यांचा समावेश करायचा म्हणजे प्रत्येकातील काही स्वीकारले जाणार आणि काही वगळले जाणार. त्यामुळे न वा ण असा वाद करण्यात अर्थ नाही. शब्द जसा लिहिला जातो तसा उच्चार करावा हे तत्त्व स्वीकारलं जावं. बाकी वादावादी आणि वर्चस्व वगैरेत फारसा अर्थ नाही. आम्ही श्रेष्ठ किंवा आम्ही अन्यायग्रस्त हे दोन्ही टाकून दिलेलेच बरे.