गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

दान

राज्य सरकार शिरडी संस्थानकडून ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेणार आणि फ्रान्समधील हिंसाचार आणि अस्वस्थता; या आर्थिक क्षेत्रातल्या दोन महत्वाच्या ताज्या बातम्या. महागाई किंवा पेट्रोलियम पदार्थांच्या भाववाढीचे जे समर्थन भाजप समर्थनाच्या नावाखाली केले जात होते ते चुकीचे होते हे फ्रान्समधील घटनांचा विचार केल्यावर तरी लक्षात यायला हरकत नसावी. आता देशातील पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत हे खरे आहे. अन भाव वाढल्यावर ओरडणारे आता कुठे गेलेत अशी विचारणा करणारे राजकीय युक्तिवाद सुरु होऊन मागेही पडत आहेत. परंतु यात राजकीय तू तू मी मी याशिवाय अधिक काही नाही. आता खाली आलेले भावसुद्धा जागतिक बाजारात जी घसरण झाली त्या तुलनेत कमीच खाली आले आहेत. अन मुळातच महागाईची अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणारीच असते हे वास्तव नेहमीच ध्यानात ठेवायला हवे. कर्ज, महागाई, कररचना, उत्पादन, वितरण, उपभोग, क्रयशक्ती, उपलब्धता; अन अशा अनेक बाबी एकमेकींशी बांधलेल्या असतात. त्यामुळे शिरडी संस्थानकडून घेतले जाणारे कर्ज आणि फ्रान्सच्या घटना या एकाच मूळ वृक्षाच्या फांद्या आहेत हे समजून घेतले पाहिजे. एकंदरच आर्थिक सुव्यवस्थेसाठी काही मूलभूत गोष्टी करायला हव्यात.
१) `दान' या घटकाचा अर्थकारणातील एक महत्वाचा घटक म्हणून विचार व्हायला हवा. तो केवळ नैतिक आचार एवढाच विषय न राहता अर्थचिंतनाच्या मुख्य धारेत यायला हवा.
उदा. - एखाद्या देवस्थानाकडून कर्ज घेण्याऐवजी प्राथमिक शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, स्वच्छतागृहे, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, ग्रंथालये, विचार-संस्कार, भूकमुक्ती; यासारखे विषय देवस्थानांवर कसे सोपवता येतील याचा विचार व्हावा. त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नये. पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितलीच पाहिजे, आमचा माणूस व्यवस्थापनात असलाच पाहिजे, नियमांच्या अगम्य आणि गुंतागुंतीच्या चौकटी; हे सगळे बाजूला ठेवून चांगुलपणाला आवाहन करून, वाव देऊन, विश्वास ठेवून हे करू द्यावे. सगळे तयार होतील असे नाही. जे तयार आहेत त्यांच्यापासून, त्यांच्या शक्तीनुसार सुरुवात करावी. हा प्रवाह वाढत राहील. त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करावी आणि मदत करण्याची वृत्ती जोपासावी. नियंत्रित करण्याची किंवा त्याचा वापर करण्याची खोड टाकावी लागेल. त्याने सरकारवरील बोजा कमी होईल आणि चांगले वातावरणही तयार होईल. जीवन आणि अर्थकारण अधिक सुटसुटीत अन परिणामकारक होईल.
२) सगळ्या गोष्टी सरकारने करायच्या या मूळ गृहीतकातून सुटका झाल्यावर आणि त्याला पर्याय तयार झाल्यावरच कररचना इत्यादी मुळातून बदलता येतील. तोवर ते कठीणच.
३) त्यासाठी `मोठ्या आकाराचे' आकर्षण टाकावे लागेल. उदा. - अनेक गोष्टी सरकारच्या हातून कमी झाल्याने, कर कमी गोळा होतील, अर्थ व्यवस्थेचा आकार लहान दिसेल. पण तरीही अर्थकारणाचे उद्देश मात्र पूर्ण होतील. छोटे छोटे व्यवसाय, व्याप, उद्योग अधिक संख्येत तयार होतील. ते दिसायला लहान पण सगळ्यांना सामावून घेणारे असतील. अधिकाधिक गरजा अधिक सुखद रीतीने पूर्ण करणारे ठरतील.
४) व्यक्तीची, समाजाची, लोकांची अर्थ नजर नीट करण्यासाठी अति श्रीमंतांच्या याद्या तयार अन प्रसिद्ध करायला बंदी घालावी. पैसा आणि प्रतिष्ठा यांचा संबंध तोडण्याचा हा एक प्रयत्न राहील. अन्य कोणी करतात म्हणून आम्ही ते चालू देणे किंवा आम्ही odd man out ठरू ही भीती, दोन्ही सोडावे लागेल.

या काही गोष्टी फक्त विचारांसाठी आणि उदाहरण म्हणून.

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

निवेदिता प्रसंग

आदिशक्तीच्या जागरणाच्या नऊ रात्री. त्यानिमित्त अभिवादन- शक्तीस्वरूपा सारदा मां आणि शक्तीस्वरूपा भगिनी निवेदिता. योगायोगाने आज भगिनी निवेदिता यांचा स्मृतिदिन. अन्य अनेक थोरांप्रमाणे त्याही अवघ्या ४३ व्या वर्षी हे जग सोडून गेल्या. दूर कुठल्या आयर्लंडची ही कन्या, भारतमातेची ललामभूत सुपुत्री ठरली. ज्ञान, अध्ययन, लेखन, शिक्षण, सेवा, क्रांतिकार्य यात विलक्षण योगदान देऊन त्या गेल्या.

त्यांच्या जीवनातील छोटासा प्रसंग- एकदा रात्रीच्या वेळी एक क्रांतिकारक त्यांना भेटायला येतो. त्या त्याच्याशी बोलतात, विचारपूस करतात आणि जेवण झालं का विचारतात. तो म्हणतो, दोन दिवसांपूर्वी झालं होतं. त्या त्याला जेवायला बसवतात. त्याच्यासमोर ताट ठेवतात. तो जेवतो आणि झोपी जातो. त्यांना सोबत करायला असलेली मुलगी त्यांना विचारते- तुम्ही स्वत: चार दिवस जेवलेल्या नाहीत. मग त्याला का दिलंत तुमचं ताट? त्या फक्त एकच वाक्य उच्चारतात- मी या सगळ्यांची आई आहे.

आई आणि बाई यातला महान भेद किती सहजतेने सांगितला निवेदितांनी. सृजन म्हणजे फक्त जन्माला घालणे नव्हे. या विश्वातील नवनवोन्मेशशाली कोट्यवधी सृजनासाठी गाडून घेणारं प्रत्येक तत्व म्हणजे आई. जन्माला घालणं, संगोपन आणि लालन पालन करणं अन तेच भंगून टाकून त्या द्रव्यातून पुन्हा नवीन सृजन करणं; साराच त्या आदिशक्तीचा विलास. त्या आदिशक्तीने स्वत:ला गाडून घेतलं म्हणून हे विश्व आकारास आलं. सृजनाचा हा पिसारा दिसतो पण त्यासाठी गाडून घेतल्यामुळे आई दिसत नाही. अन युगानुयुगे हे जग, या विश्वातील कणनकण शोधतो आहे आपल्या आईला.

हेच आईपण जगणाऱ्या, भोगणाऱ्या अन समजावून सांगणाऱ्या निवेदितांनी आजच्याच दिवशी दार्जीलिंग येथे शेवटला श्वास घेतला.

या नवरात्रीतील आदिशक्तीचे जागरण या विश्वातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषातील, प्रत्येक सजीव आणि निर्जीवातील, प्रत्येक सचेतन आणि अचेतनातील, प्रत्येक अणुरेणूतील `आई' जागवो असा जोगवा मागतो. जोगी आणखीन काय करू शकतो?

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

व्यक्तिवाद

भारतीय चिंतन हे मूलतः व्यक्तिवादी चिंतन आहे. व्यक्तिवाद भारताला नवीन नाही. किंबहुना भारतीय विचार प्रचलित व्यक्तिवादाहून अधिक व्यक्तिवादी आहे. परंतु या दोन व्यक्तिवादात दोन फरक आहेत.
१) प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे भौतिकता, ऐहिकता, जडवाद, भोगवाद, वर्चस्ववाद हे भारतीय व्यक्तिवादाचे आधार नाहीत.
२) भारतीय व्यक्तिवादाने त्याची जबाबदारी व्यक्तीवर टाकलेली आहे. प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे समाजावर नाही. आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगता आले पाहिजे हे दोघांनाही मान्य असले तरीही; त्यातील यश, अपयश, त्रास, संघर्ष, मान्यता, अमान्यता, कौतुक, हेटाळणी यांची जबाबदारी समाजाची; असे प्रचलित व्यक्तिवाद म्हणतो. आम्हाला काय वाटावे किंवा आम्ही काय करावे यात समाजाला say असता कामा नये, पण परिणामांची जबाबदारी आणि आपल्या मतानुसार वागण्यासाठी अनुकूल स्थिती देण्याची जबाबदारी मात्र समाजाची; हा प्रचलित व्यक्तिवादी विचार आहे. तो समाजाला व्यक्तीचा नोकर अशा स्वरूपात पाहतो. तो समाजाला गृहित धरतो. याउलट भारतीय व्यक्तिवाद पूर्ण स्वातंत्र्यासोबत पूर्ण जबाबदारी घ्यायला सांगतो आणि समाज आणि व्यक्तीचे संबंध mutual आहेत असे मानतो.

जोगवा

नेहमीप्रमाणे आजही, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती आली. तिचे नाव गाव माहिती नाही. पण चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र अशा दोन्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती येते. जोगवा मागायला. बरीच वर्षे झाली. नेम चुकलेला नाही. आई येथे असताना त्या दोघींच्या गप्पाही होत. आई येथे नसल्याला तीन वर्षे झाली. तरीही ती येते. कारण ती जोगवा मागायला आल्यानंतर तिला शिधा, दक्षिणा देण्याचे मी सुरूच ठेवले आहे. आजही ती येऊन गेली. शिधा, दक्षिणा घेऊन गेली. हा काही तिचा व्यवसाय नाही. अन दोन नवरात्रीत जोगवा मागून वर्षभर उदरनिर्वाह चालतही नाही. हे तिचे व्रत आहे आणि ती ते निष्ठेने करते आहे. भारतीय समाजजीवनाचा एक चिवट धागा मला यात दिसतो. दान मागणे आणि दान देणे या दोन्हीत चुकीचे आणि ओशाळवाणे काही नाही. भारतात तसे कधी समजले गेले नाही. आज तसे समजले जाते याचे कारण आपण भारतीय ethos चा त्याग केलेला आहे. भारतीय संदर्भात `भिक्षा' ही खूप वेगळी कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीचे महत्व, मूल्य, किंमत, उपलब्धता सारखी असू शकत नाही; प्रत्येक व्यक्तीची क्षमता, कल आणि गुण समान असू शकत नाही; तरीही प्रत्येकाला चांगले जगण्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाच्या वेगळेपणाची समाजाला व सृष्टीला गरज आहे; या सगळ्याचा मेळ घालणे; आणि या प्रयत्नातून मानवी जीवन अंतरंगसमृद्ध करणे; याचं जे एक web designing भारताने केलेलं आहे ते लक्षणीय आहे. त्यामुळेच बारकाईने पाहिलं तर `दान' हा व्यक्तीजीवनाचा, समाजजीवनाचा, विश्वजीवनाचा, धार्मिक जीवनाचा, आध्यात्मिक जीवनाचा पाया आणि आधार आहे. वर्तमान आर्थिक, सामाजिक समस्यांच्या दाहक वास्तवाचा विचार करताना वास्तविक भारताच्या या पैलूचा अधिक आणि सर्वंकष विचार व्हायला हवा, समोर मांडला जायला हवा. मात्र, कालमहिमा असा आहे की आमच्यावर भारतेतर विचार, भावभावना वरचढ आहेत आणि `मी' हा कमालीचा मोठा झाला आहे. अर्थात काळ कूस पालटत असतो, हेही खरे.

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

approach


सध्या कुस्तीस्पर्धांची एक जाहिरात सुरु आहे. एक तरुण मांडीवर थाप मारून एका तरुणीला आव्हान देतो आणि ती तरुणी न घाबरता तशीच मांडीवर थाप देते आणि न बोलता पुढे जाते. तरुण खजील होऊन खाली मान घालतो. जाहिरातीतून जो संदेश दिला तो स्पृहणीय आहेच.
कालच राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या जीवनावर एक बोलपट लोकसभा टीव्हीवर पाहिला. काही गोष्टींची उजळणी झाली. सध्या सुरु असणाऱ्या कुस्ती स्पर्धांच्या जाहिरातीतून जो संदेश देण्यात येत आहे तोच संदेश घेऊन मावशी १९३६ साली उभ्या राहिल्या. पतीच्या निधनानंतर आणि नऊवारी पातळ नेसून. सगळ्या भारतभर तो संदेश पोहोचवला आणि त्यानुसार वागणाऱ्या, दंड खांद्यावर घेऊन थाटात संचलन करणाऱ्या हजारो सेविका देशाच्या कानाकोपऱ्यात उभ्या केल्या.
आमच्या घरासमोरच काही मोकळे प्लॉट होते. त्या मैदानावर समितीची शाखा लागत असे. माझ्या बहिणी इतर सेविकांसह ती शाखा सांभाळत. त्यावेळच्या नागपूरच्या काँग्रेस खासदाराच्या ताफ्यातील एक `दादा' आमच्या पलीकडील वस्तीत राहत असे. तो अनेकदा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन उभा राहत असे. सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वीची ही कहाणी. त्यावेळी नागपूर सुद्धा आजच्या सारखे नव्हते. आमची वस्ती नवीनच होती. रिक्षावाले अंधार पडला की यायला घाबरत. वस्तीच्या मुख्य चौकात रात्री एकटेदुकटे जाणे कठीण होते. तलवारी वगैरे केव्हा निघतील नेम नसे. रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहणारा `दादा' तर मोठंच प्रस्थ होतं. पण समितीची शाखा. त्या सगळ्या मुलींची हिंमत, संघाची तगडी शाखा (आमची शाखा शंभरी शाखा होती), संघाची म्हणून जी खास कुटुंब होती त्यांचे परस्पर संबंध, या सगळ्यामुळे निर्माण झालेले वस्तीतील वातावरण यामुळे, कोपऱ्यावर उभे राहण्यापलीकडे त्या `दादाने'` काहीही केले नाही. तो करू शकला नाही.
हे सांगण्याचे कारण म्हणजे मावशी केळकर यांनी सांगितलेला approach.
जाहिरातीतील संदेश आणि मावशी केळकर यांनी दिलेला संदेश एकच आहे. पण दोन्हीचा approach मात्र फार वेगळा आहे. तो फार समजावून सांगण्याची गरज नाही. दोन्ही approach चे परिणाम गुणवत्ता म्हणूनही खूप वेगळे. दोन्हीची उदाहरणे आज मोठ्या प्रमाणात आजूबाजूला सहज दिसणारी. शेवटी कोणाचाही कोणताही approach हा प्रेरणा आणि प्रयोजन यांनी आकार घेतो. मावशी केळकर यांचा approach आणि जाहिरातीचा approach यात हा फरक आहे. संदेश एक असला तरीही. समाजासमोर दोन्ही आहे. काय स्वीकारायचं हा समाजाचा प्रश्न आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ८ ऑक्टोबर २०१८

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

काल्पनिक संवाद

काल्पनिक संवाद, वास्तवाशी सांगड घालण्यासाठी.
.........१.........
- तुम्ही महालक्ष्मी नाही मांडल्या का?
- नाही.
- का?
- आमच्याकडे महालक्ष्मीचा सण नाही.
- पण खूप जण करतात महालक्ष्मी.
- हो. पण आमच्याकडे नाही.
- पण तुम्ही का करत नाही?
🤣🤣🤣
.........२.........
- वांग्याची भाजी का केली?
- तीच होती घरात.
- मला वांगी नाही आवडत.
- ओके. पण मला माहित नव्हतं. तू जेवणार आहेस का?
- नाही. मी जेवूनच आलोय.
- मग?
- काही नाही असंच विचारलं. पण मला नाही आवडलं वांग्याची भाजी करणं. अन पटलंही नाही.
- बरं. आता बाजारातून भाजी आणली की दुसरी भाजी करीन.
- ते ठीक. पण आत्ताचं काय?
😄😄😄

हसावंसं वाटलं तर भरपूर हसा. किंवा नका हसू. पण कालपासून जाती वगैरेबाबत जी चर्चा, मतमतांतरे सुरु आहेत ती पाहून हेच संवाद सुचले. मला काय म्हणायचे आहे ते ज्यांना लक्षात येईल त्यांचेही भले होवो, ज्यांना येणार नाही त्यांचेही भले होवो.

जात

ज्यांना खरंच विचार करायचा आहे त्यांच्याचसाठी केवळ.
१) जात म्हणजे काय?
२) किती सुतार आज लाकूडकाम करतात?
३) किती सोनार दागिने घडवतात?
४) किती यादव दुधदुभत्याचा व्यवसाय करतात?
५) किती कुंभार मडकी बनवतात?
(लांबलचक यादी करता येईल.)
६) goldsmith म्हणजे काय?
७) blacksmith म्हणजे काय?
८) bootmaker म्हणजे काय?
९) oilman म्हणजे काय?
१०) carpenter म्हणजे काय?
११) scavenger म्हणजे काय?
१२) fisherman म्हणजे काय?
(लांबलचक यादी करता येईल.)
मानवाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक गरजांमधून जगभर विविध पद्धतीने जातींचा विकास होतो. आजही होतो आहे. पुढेही होत राहील. कोणीही ही प्रक्रिया थांबवू शकत नाही. भारतात त्याचे योजनापूर्वक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी ओशाळवाणे वाटण्याचे काहीही कारण नाही. अगदी रोटी बेटी व्यवहार सुद्धा (अयोग्य असले तरीही) मोठ्या प्रमाणात गरजेपोटी जन्माला आले. आज जातीव्यवस्था अस्तित्वातच नाही. राज्यघटनेने ती मोडीत काढली आहे आणि व्यवहारात सुद्धा ती अस्तित्वात नाही.

तरीही एवढी चर्चा का होते?
- सत्ता वा संपत्ती यासाठी.
- सूडभावना.
- राजकारण.
- मनातील किल्मिष आणि अविश्वास.
- मनाचा, वृत्तीचा कोतेपणा.
याशिवाय अन्य काहीही आज जुनी जात म्हणून अस्तित्वात नाही. वरील पाच कारणे दूर करणे हे घोषणांचे, कायद्यांचे काम नाही. मी काय करतो हा विचार प्रत्येकाने करणे हा एकच उपाय आहे.
जात हाच घटक लक्षात घेऊन घडणाऱ्या घटनांची चर्चा करतानाही, suffering and sufferer एवढ्याच मर्यादेत करण्याची मर्यादा आणि दक्षता घेणे हे सुबुद्ध माणसांचे कर्तव्य आहे. समोर दिसत असूनही, त्याला खतपाणी न घालता, सत्याचा वगैरे अतिरेकी आवेश न आणता, त्याकडे दुर्लक्ष करून त्यातील हवा काढून टाकण्याची शहाणीव दाखवायला हवी. प्रामाणिक कळकळीच्या लोकांची ही जबाबदारी आहे. आपल्याला काय वाटते किंवा आपण स्वत:चे वर्चस्व कसे सिद्ध केले किंवा दुसऱ्याला कसे कोंडीत पकडले याचा विचार करणे आणि समाजाच्या कल्याणाच्या प्रक्रियेकडे लक्ष न देणे; हे शोभणारे ठरत नाही. असा विचार न करता, वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या महात्मा गांधींचा अनुयायी म्हणवणारी व्यक्ती जेव्हा तर्कशून्य शेरेबाजी करताना दिसते तेव्हा फक्त एकच शब्द तोंडी येतो - अरेरे !!

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

उज्जैन


मध्यंतरी दोन दिवस उज्जैनला होतो. काही निरीक्षणे.
- शहर छान आहे.
- क्षीप्रा नदी मोठी, वाहती, स्वच्छ, देखणी आहे.
- क्षीप्रा नदीत मासोळ्या भरपूर आहेत. मुरमुरे, कणिकगोळे टाकले की झुंडी धावत येतात. त्यांच्याशी खेळणे हा निरागस आनंद.
- श्री महाकाल मंदिर मोठे, विस्तीर्ण आहे. व्यवस्था चांगल्या आहेत. धक्काबुक्की नाही. पंडे नाहीत.
- शिवलिंगाचे स्पष्ट दर्शन होईल अशी व्यवस्था.
- महाकाल मंदिर क्षीप्रा नदीपासून थोडे दूर आहे. रुद्रसागर तलावाकाठी.
- महाकाल मंदिराच्या जवळच देखणे, शांत, पवित्र `भारत माता मंदिर' आहे.
- खाणे पिणे, रिक्षा आदी महाराष्ट्रापेक्षा थोडे स्वस्त.
- डास नाहीत.
- श्री भैरवनाथ ही वेगळी स्वतंत्र देवता. श्री भैरवनाथ म्हणजे श्री महाकालाचे सेनापती.
- त्यांचे मंदिर शहरापासून लांब जंगलात आहे.
- मदिरा जेथे अर्पण केली जाते ते मंदिर श्री भैरवनाथाचे. तेथे अनेक भक्त, मुली, महिला सुद्धा फुलांच्या टोपलीसोबत मदिरेची बाटली पुजाऱ्याच्या हाती देतात. त्याची जबरदस्ती नाही. दारू चढवलीच पाहिजे असे नाही.
- मदिरापान न करणारेही बाटली अर्पण करतात आणि परत मिळणारी अर्धी बाटली तिथल्याच रिक्षावाला किंवा अन्य कोणाला देऊन टाकतात.
- मदिरा अर्पण करण्याची पद्धत असूनही श्री भैरवनाथ मंदिरातील वातावरण मात्र अन्य मंदिरांप्रमाणेच सामान्य. कुठेही असभ्यता, अश्लीलता, तमाशे नाहीत.
- शहराच्या जवळच जंगलात नीतिशतक कर्ते श्री. भर्तृहरी यांची गुहा आहे. नाथ संप्रदायाचे हे एक महत्वाचे स्थान आहे. या जागेला तपश्चर्येचा सुगंध आहे.
- श्री. भर्तृहरी हे सम्राट विक्रमादित्य याचे बंधू. एक बंधू सम्राट आणि एक बंधू नाथजोगी फकीर.
- बाजारात मलाईदार दूध, रबडी, भांग आदी भरपूर उपलब्ध.

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

नीती आयोगाचा इशारा

इ.स. २०३० नंतर म्हणजे फक्त १२ वर्षांनी पाण्यासाठी संघर्ष सुरु होतील असा इशारा खुद्द नीती आयोगाने दिला आहे. १९९६ साली केलेल्या सूचना अद्याप अमलात आलेल्या नाहीत आणि सरकारचे अजूनही याकडे लक्ष नाही, अशा दोन टिप्पण्याही आयोगाने केल्या आहेत. थोडक्यात म्हणजे संकट दार ठोठावते आहे. किंबहुना दारावर धडका मारते आहे. दार कधी मोडेल सांगता येत नाही. आपल्याला याचं गांभीर्य समजतं आहे का? पाण्याचा प्रश्न केवळ साठवणूक वाढवून आणि बचत करून सुटणारा नाही. जमिनीतील पाणी वाढणे, झरे निर्माण होणे, वाहते होणे महत्वाचे आहे. आपण, आपली जीवनपद्धती, आपली अनास्था अमानुष आणि राक्षसी आहे; हे मान्य करण्याचं धाडस आणि समंजसपणा दाखवण्याला पर्याय नाही. वाईट वाटो, राग येवो, अपमान वाटो; पण घरातले पाण्याचे भांडे घेऊन रस्त्यावर उतरणे आणि मारामारी करणे यापेक्षा आजच अपमानाचा घोट गिळणे चांगले. गाड्या, सिमेंट-कोन्क्रीटचे प्रेम, मातीचा द्वेष, अमाप सुखसाधनांचा हव्यास, महानगरांचे वेड; हे सारे कठोरपणे आणि क्रूरपणे सोडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. केवळ झाडे लावा झाडे लावा हे नाटक पुरेसे नाही. झाडे पाउस पाडतील कदाचित पण माती नसेल आणि त्यात पाणी झिरपणार नसेल तर त्याचा काय उपयोग? उलट असले नसलेले पाणी झाडे शोषून घेतील. ते माणसाने पाणी देण्याची वाट पाहत नाहीत. झाडे उपकार करतात तसेच स्वत:च्या अस्तित्वासाठी माणसाला बाजूलाही सारतील. आज खनिज तेलाने आमच्या नाकी नऊ आणले आहेत. उद्या आमच्या उन्मत्त दांभिकतेने आणि मानवी कर्तृत्वाच्या आत्यंतिक उन्मादाने माणूसच माणसाचा भस्मासुर होऊ नये. आम्ही वाट्टेल ते करत राहू अन त्यावर उपाय शोधणे म्हणजेच पुरुषार्थ हे आत्मफसवेपण नालायकांचे उद्योग म्हणूनच शोभू शकतात. नाक, कान, डोळे, हृदय, मेंदू, सगळे कमकुवत होत असल्याच्या बातम्या पाहायच्या. सर्वेक्षणे करायची, अन दुसऱ्याच क्षणी पुरुषार्थाचा अविचारी ढोंगी टेंभा पाजळायचा हे चुकीचे आहे. केवळ आणि केवळ मन आणि इच्छा यांची गुलामी हे माणसाचे लांच्छन आहे. सरकारने देखील लोकानुरंजन बाजूला ठेवून धोरणे आणि अंमलबजावणी याकडे पाहिले पाहिजे. अन अंमलबजावणी म्हणजे केवळ कायद्याचे कठोर पालन, कठोर शिक्षा इत्यादी नसते हेही लक्षात घेतले पाहिजे. जसे व्यक्तीने व समाजाने तसेच सरकारनेही स्वत:च्या संदर्भात कठोर व्हायला पाहिजे. नीती आयोग म्हणजे एक प्रकारे सरकारच. खुद्द पंतप्रधान त्याचे अध्यक्ष. त्यामुळे सरकार आता याबाबत काही करते का हे पाहावे लागेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ४ सप्टेंबर २०१८