गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

सुख आणि रिस्क

उत्तराखंड येथे बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले ही मोठीच आनंदवार्ता आहे. हे सगळे मजूर फिट होऊन पुन्हा आपापल्या कामाला लागोत. पण दोन गोष्टी मनात येतात.

१) प्रत्येक मजुराला एक लाख रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मजुरांच्या दृष्टीने एक लाख ही मोठी रक्कम आहे पण पैशाच्या स्वरूपात नुकसान भरपाई देताना असा विचार करावा का? खेळाडूंना सरकारे, उद्योग कोट्यवधी रुपये देतात. चित्रपट, मनोरंजन, क्रीडा, राजकारण, समाजसेवा या क्षेत्राकडे जो पैशाचा पूर वाहतो तो संतुलित व्हायला हवा. या क्षेत्रांमधील पैशाचा पूर कमी होऊन अन्य क्षेत्राकडे तो वळावा. मजुरांनी जे सहन केलं आणि ज्या धैर्य व साहासाचे दर्शन घडवले त्यांची एक लाखात बोळवण व्हायला नको.

२) सगळ्या गोष्टी सोप्या, सुविधाजनक, सुखद करताना त्याची काही मर्यादा असावी की नसावी? कुठेतरी थांबण्याचा विचार त्याज्य, मागासलेला किंवा वाईट ठरवू नये. केवळ २६ किमी अंतर कमी करण्यासाठी असली धाडसे करावीत का? आपल्या धावण्याची समीक्षाही हवी.

#श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०२२

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

मोठेपणा आणि मनमानी

मोठेपणा आणि मनमानी असं एक समीकरणच तयार झालं आहे. मनमानी करणाऱ्याला वाटतं आपण फार मोठे आणि विशेष आहोत अन् बाकीच्यांनाही वाटतं की, मनमानी करणारा माणूस मोठा. मी पैशाने मोठा आहे कर मनमानी. मी  मोठ्या पदावर आहे कर मनमानी. मी अमुक कोणी आहे कर मनमानी. काहीच नसेल तर माझे अमक्यातमक्याशी संबंध आहेत कर मनमानी. अन् कोणतीही जात, कोणतीही भाषा, कोणताही व्यवसाय, कोणतीही नोकरी, कोणतीही सेवा, कोणत्याही क्षेत्रात काम करणारा याला अपवाद नाही. अन् आपण विश्वगुरू होणार? कोणीही आपल्याला विश्वगुरू करू शकणार नाही. विश्वगुरू काय अभिमान आणि गौरव वाटावा असा समाज म्हणूनही आपली नोंद होऊ शकणार नाही. ना भाजप, ना संघ, ना काँग्रेस, ना कम्युनिस्ट, ना रिपब्लिकन, ना समाजवादी, ना हिंदुत्ववादी, ना विज्ञानवादी, ना बुद्धिवादी, ना पुरोगामी, ना स्त्रीवादी, ना आणखीन कोणी. अन् खरं तर असा समाज जगला काय किंवा संपला काय? असंख्य माणसे, असंख्य प्राणी येतात अन् जातात. तसंच समाजाचं. आला अन् गेला. कशासाठी धडपड करायची अन् कशासाठी मनाला लावून घ्यायचं?

#श्रीपाद कोठे

२८ नोव्हेंबर २०२३

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

पर्यावरण आणि हिंदुत्व

पर्यावरणवाद्यांनी फटाक्यांना विरोध केला, न्यायालयीन आदेश मिळवले. परंपरावाद्यांनी आदेशाकडे पाठ फिरवून फटाके फोडले. विरोधक, समर्थक, तटस्थ सगळ्यांवरच व्हायचे ते परिणाम होतील. पण या साऱ्यात भाजप प्रवक्त्यांनी टीव्ही चर्चेत अधिकृतपणे फटाक्यांची पाठराखण करणे योग्य वाटत नाही. हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा यांना राजकारणाच्या दावणीला बांधून केविलवाणे आणि दुबळे करू नका. योग्य अयोग्य विवेक हे हिंदूंचे सर्वोच्च बलस्थान आहे. त्याला पोरकट पातळीला आणू नका. तुमचं राजकारण नाही साधलं तरी हरकत नाही.

@ श्रीपाद कोठे

१४ नोव्हेंबर २०२३

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

सार्वजनिक आणि खाजगी

१) देव- कोणीही केव्हाही दर्शन घेऊ शकतो. कोणीही केव्हाही त्याच्याशी बोलू शकतो.

२) धर्म- कोणीही केव्हाही करू शकतो. भुकेल्याला खाऊ घालणे, तहानलेल्याला पाणी पाजणे, रुग्णाची सेवा करणे, अशिक्षिताला शिक्षण देणे; कोणीही केव्हाही करू शकतो.

३) चुंबन- कोणीही, केव्हाही, कोणाचंही घेऊ शकत नाही. कोणाला वाटलं कोणाचं चुंबन घ्यावं आणि त्याने ते घेतलं तर मार खायचीच वेळ.

४) तात्पर्य- देव, धर्म सार्वजनिक आहेत/ असू शकतात. चुंबन ही खाजगी गोष्ट आहे.

५) तरीही- सार्वजनिक गोष्टी घरापुरत्या असाव्यात आणि खाजगी गोष्टी जगजाहीर असाव्यात.

६) निष्कर्ष- वरील क्र. (५) म्हणजे आधुनिकता/ म्हणजे धर्मनिरपेक्षता/ म्हणजे पुरोगामित्व.

#श्रीपाद कोठे

९ नोव्हेंबर २०१४

संपत्तीचे तत्त्वज्ञान

१ डिसेंबर पासून भारत g-20 गटाचा अध्यक्ष होणार आहे. याचा उपयोग करून भारताने philosophy of wealth (संपत्तीचे तत्वज्ञान) हा विषय जगभरात चर्चा आणि विचार प्रक्रियेत आणावा. अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर सुद्धा तो सुरू राहील अशी व्यवस्था करावी. पुस्तिका, माहिती पत्रके, व्याख्याने, परिसंवाद, लेख; अशा विविध माध्यमातून हा विषय लावून धरावा. बाकी सगळं चऱ्हाट सुरू राहीलच. त्याचा फार उपयोग होत नसतो. पण जगाच्या विचारात एखादी गोष्ट रुजली की त्यातून स्थायी बदल होतो. त्यासाठी philosophy of wealth (संपत्तीचे तत्वज्ञान) हा विषय भारताने पुढे आणावा.

#श्रीपाद कोठे

९ नोव्हेंबर २०२२

जाती व्यवस्था आणि प्रवाहीपण

आर्थिक आरक्षणा वरील चर्चेनंतर एक मुद्दा आला आहे - caste system was dynamic or static? जाती व्यवस्था स्थिर होती की प्रवाही? म्हणजे जात, वर्ण बदलले जात असत की नाही? ही व्यवस्था प्रवाही होती. बदल होत असत असं अनेकांनी म्हटलं आहे. त्याचे काही पुरावे वगैरेही आहेत. याच संदर्भात एक माहिती कानावर आली की, इंग्रजांनी जातीवर आधारित जनगणना सुरू केली होती आणि १९४१ साली ती बंद केली. त्याचे कारणही जाती व्यवस्थेचे हे प्रवाहीपण होते. गंभीरपणे विचार करण्यासारखा विषय आहे.

- श्रीपाद कोठे

९ नोव्हेंबर २०२२

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

अल्पसंख्य हिंदू?

हिंदूंना अल्पसंख्य ठरवण्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. सरकारने त्यात मत मांडण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. पुढे काय होईल ते कळेलच. परंतु हिंदूंना अल्पसंख्य घोषित करण्याचे हे प्रयत्न अत्यंत चुकीचे आहेत. मागे यावर लिहिलं होतं. ते सापडलं तर पुन्हा पोस्ट करीन. तूर्त एक मुद्दा.

हिंदूंना अल्पसंख्य घोषित करायचं म्हणजे हिंदू या शब्दाची चौकटबद्ध व्याख्या करावी लागेल. एकदा का चौकट तयार झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या व्याख्येला मान्यता दिली आणि मोहोर उमटवली की, हिंदू शब्दाची आणि हिंदू या संकल्पनेची प्रसरणशीलता संपून जाणार. व्याख्येपेक्षा थोडाही फरक पडला की, ती व्यक्ती अहिंदू होईल. लाभहानीची गणिते मांडून त्यासाठी दावेही केले जातील. कुरघोडी किंवा काही लाभहानी एवढा संकुचित विचार करून हिंदूंना अल्पसंख्य घोषित करण्यासाठी प्रयत्न ही फार घातक गोष्ट ठरेल. एवढेच नाही तर it will open a pandoras box. सगळ्या गोष्टी व्याख्येत बसवण्याचा इंग्रजांनी आपल्या बुद्धीला दिलेला संस्कार लवकरात लवकर टाकून द्यायला हवा.

#श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०२२

आंधळे आणि हत्ती

लिळा चरित्रातील हत्ती आणि सात आंधळे यांची गोष्ट प्रसिद्ध आहे. बहुतेकांच्या कानावरून ती गेलेली असतेच. पण आता वाटतं की, विचारांच्या क्षेत्रात तो प्राथमिक शाळेतला धडा आहे. कारण डोळस माणसाला हत्ती कसा दिसतो हे सत्याचं प्रमाण निश्चित करून ती गोष्ट रचली आहे. डोळस माणसाला हत्ती जसा दिसतो ते त्याने कितीही समजावून सांगितलं तरीही अंध व्यक्तींसाठी ते निरर्थक राहील आणि त्यांना जे जाणवतं वा लक्षात येतं तेच त्यांच्यासाठी सत्य राहील. त्या सात आंधळ्यांचं सत्य वेगळंच राहणार. दुसरं म्हणजे - आंधळ्यांना हत्ती कसा समजतो किंवा डोळस माणसाला हत्ती कसा समजतो; याचं प्रत्यक्ष हत्तीच्या दृष्टीत काहीच महत्त्व नाही. हत्तीच्या दृष्टीने हत्ती काय असेल हे हत्ती सोडून कोणालाही कळणार नाही अन् हत्ती कोणाला सांगू शकणार नाही. अन् त्याने सांगितलं तरीही त्याचा काही उपयोग नसणार.

सत्य ही अशीच गंमत आहे.

#श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०२२

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

पक्ष आणि निवडणुका

ग्रापंचायतींच्या निवडणुका पक्षीय आधारावर नसतात तरीही सगळेच पक्ष आपापले दावे करतात. मग पक्षीय आधारावरच निवडणूक का घेऊ नये? एक तर सरळ सरळ पक्ष आधारित निवडणूक घ्यावी किंवा त्यापासून पक्षीय राजकारण पूर्णपणे वेगळे ठेवावे. पण आत्यंतिक ढोंगी असलेला आपला समाज असे करेल का? शक्यता कमीच वाटते. समाज म्हणून आपण दुतोंडी आणि ढोंगी आहोत. मुळात आपण एक चांगला समाज असायला हवं असं ७०-८० टक्के लोकांना वाटतच नाही. त्यामुळे अनेक चर्चा फक्त वांझ चर्चा असतात. त्यांना फारसा अर्थ नसतोच.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०२३

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

अ वेड्यांसाठी

बरं झालं भिडे गुरुजी बोलले. मरगळलेल्या समाज माध्यमात जान आली. अन् समाज माध्यमातील नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणेच लगेच दोन पाटांनी धारा वाहू लागल्या. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही का? नक्कीच करता येईल. पण म्हातारी मेल्याचं दुःख नसलं तरी काळ सोकावतो. मुख्य म्हणजे भिडेंची असलेली हिंदुत्ववादी प्रतिमा आणि महिला विषयक चर्चा या दोन मुद्यांमुळे काळाला सोकावू देणे इष्ट ठरत नाही. त्यासाठीच हे लिखाण.

एक प्रवाह हिरीरीने कुंकू लावण्याच्या बाजूने खिंड लढवत आहे तर कुंकू लावणे म्हणजे स्त्रीला गुलाम करणे यासारख्या पुरोगामी म्हणवणाऱ्या कविताही प्रसवल्या जात आहेत. दोन्हीही वेडपटपणा. कारण कुंकू न लावल्याने जसे आभाळ कोसळत नाही तसेच कुंकू लावल्याने आभाळ फाटतही नाही. महिलांनी कुंकू लावावं की लावू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांना कुंकू लावणे खूप महत्त्वाचे वाटते आणि त्यामागे काही विज्ञान आणि तत्वज्ञान आहे असे वाटते त्यांनी त्याचा प्रचार करणे यातही गैर काहीच नाही. त्याचवेळी कोणी कुंकू लावत नसेल वा कोणाला कुंकू लावायचे नसेल वा कधी लावायचे असेल आणि कधी लावायचे नसेल तर तेही करता यायला हवे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, आम्ही स्व पलीकडे जाऊन किती अन् काय सामावून घेऊ शकतो. दुष्टता, आततायीपणा, अश्लीलता, असभ्यता सोडून अन्य गोष्टींसाठी दुराग्रही असणे अयोग्यच ठरते. भिडे गुरुजी सामाजिक व्यक्तिमत्व आहे, पत्रकारिता सामाजिक व्यवसाय आहे, घडलेली घटना सार्वजनिक ठिकाणी घडली आहे; त्यामुळेच भिडे गुरुजींचा आग्रह अनाठायी ठरतो. रोज सोवळे नेसून पूजा अर्चा करणाऱ्यांच्या घरातही कुंकू न लावता मुली, बाया राहतात. ते न आवडणे समजू शकते पण त्यासाठी किती, कुठे अन् कसे ताणायचे याचे तारतम्य हवे.

भिडे गुरुजींची प्रतिमा हिंदुत्ववादी असल्याने त्यांच्या मताचा संबंध जाणता अजाणता हिंदुत्वाशी जोडला जातो. ते स्वाभाविक आहे. अन् म्हणूनच ते व्यापक हिंदुत्वासाठी घातक आहे. व्यक्तिगत मत हे हिंदुत्वाचे मत ठरत असेल तर त्याची काळजी हिंदुत्वाची चिंता वाहणाऱ्या लोकांनी करायची की नाही करायची? देशभरातल्या अनेक जाती, उपजाती, जनजाती, आदिवासी, वनवासी कुंकू लावत नाहीत. त्यांना अहिंदू ठरवणार का? विधवा वगैरे उल्लेखही त्यांच्या बोलण्यात आहे. त्यांच्या बोलण्यामुळे हिंदुत्वाचा विचार विधवांबद्दल अनुदार आहे असे चित्र निर्माण होते. जे हिंदुत्वाच्या मूळ गाभ्याला अगदीच छेद देणारे आहे. ज्या शिवरायांचे ते भक्त आहेत त्या शिवरायांच्या मातोश्री प्रणम्य आणि प्रात:स्मरणीय जिजाऊ मा साहेब विधवा होत्याच ना? श्री रामकृष्ण यांच्या पत्नी सारदा माता विधवा असूनही लाखो लोकांकडून जगन्माता म्हणून पूजल्या जातातच ना? भिडे गुरुजींना हे चालणार की नाही? वेश्येच्याही मुलाला ऋषीचा दर्जा देणारे हिंदुत्व किती चिल्लर पातळीवर आणायचे याचा गंभीर विचार हिंदुत्वाच्या धारकऱ्यांनी करायला हवा. प्रतिकांना अवास्तव महत्त्व देण्यातून काहीही साध्य होत नाही याचे भान सुटायला नकोच. मनाला, बुद्धीला व्यापक करणे हेच ईश्र्वरी प्रतिमेसह सगळ्या प्रतिमा आणि प्रतिकांचे उद्दीष्ट. तसे होत नसेल तर त्यांना अर्थ उरत नाही.

एखाद्या शाळेने बिंदी लावायला विरोध करणे आणि बिंदी लावल्याशिवाय भिडे गुरुजींनी बोलायला नकार देणे दोन्ही सारखेच. लोकसंख्या असंतुलन, दहशतवाद, हिंदूंवर आघात; अशी कारणे पुढे करून चुकीच्या गोष्टी करणे आणि त्याच्या समर्थनात हिरीरीने उतरणे; अखेरीस आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे ठरते. इतिहासात भय आणि प्रलोभन यामुळे अनेकांनी हिंदुत्व सोडले; आज वेगळ्या संदर्भात पुन्हा भय आणि प्रलोभन यांच्यासाठी हिंदुत्व सोडणे सुरू आहे. दुर्दैवाने हिंदुत्वाच्या नावानेच हिंदुत्वाचा त्याग केला जातो आहे. जगातील सातशे कोटी लोकांनी हिंदू नाव लावले तरीही हिंदुत्व जिवंत राहिले असे म्हणता येणार नाही. कारण त्यातील तत्व इस्लामी वा अन्य असेल. वर्तमान आव्हानांचा मुकाबला करतानाही हिंदुत्वाचा मूळ गाभा लुप्त होणार नाही ही तारेवरची कसरत केल्याविना हिंदूंना पर्याय नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

एकाच वेळी अनेक उपासना पद्धती, एकाच वेळी विविध स्मृती, एकाच कुटुंबात निरनिराळे आचार; हे सगळे हिंदुत्वात आधीही होते, आजही आहेत. अन् असे राहिले तरच भविष्यात हिंदुत्व राहील. अन्यथा नाही. हा वाद महाराष्ट्रापुरता आहे. कशाला वाढवता? या प्रश्नाचे साधे उत्तर आहे - तुम्हाला महाराष्ट्रातील हिंदू व्यापक हवा की संकुचित? ज्यांना डबक्यात राहायचे त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीच हशील नाही.

भिडे गुरुजींचे कार्य वगैरे मुद्देही पुढे केले जातात. एक आठवण ठेवली पाहिजे की, प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र सुद्धा आपल्या स्थानापासून ढळू शकतात हे न लपवणे आणि स्वीकार करणे हेच हिंदुत्वाचे लखलखीतपण आहे. बाकी राजकीय बाह्या सरसावणारे आणि त्यातही मोदी पंतप्रधान झाल्यावर आणि असेपर्यंत हिंदुत्वाचा आवेश असणारे यांचे भले होवो.

भक्तीने ज्ञानाचा हात सोडला किंवा भावनांनी विचारांना तिलांजली दिली की बोलण्यासारखं फार काही उरत नाहीच. ज्यांनी हे केलेलं नाही; हे लिखाण त्यांच्यासाठीच आहे.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ३ नोव्हेंबर २०२२