शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

अ वेड्यांसाठी

बरं झालं भिडे गुरुजी बोलले. मरगळलेल्या समाज माध्यमात जान आली. अन् समाज माध्यमातील नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणेच लगेच दोन पाटांनी धारा वाहू लागल्या. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही का? नक्कीच करता येईल. पण म्हातारी मेल्याचं दुःख नसलं तरी काळ सोकावतो. मुख्य म्हणजे भिडेंची असलेली हिंदुत्ववादी प्रतिमा आणि महिला विषयक चर्चा या दोन मुद्यांमुळे काळाला सोकावू देणे इष्ट ठरत नाही. त्यासाठीच हे लिखाण.

एक प्रवाह हिरीरीने कुंकू लावण्याच्या बाजूने खिंड लढवत आहे तर कुंकू लावणे म्हणजे स्त्रीला गुलाम करणे यासारख्या पुरोगामी म्हणवणाऱ्या कविताही प्रसवल्या जात आहेत. दोन्हीही वेडपटपणा. कारण कुंकू न लावल्याने जसे आभाळ कोसळत नाही तसेच कुंकू लावल्याने आभाळ फाटतही नाही. महिलांनी कुंकू लावावं की लावू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांना कुंकू लावणे खूप महत्त्वाचे वाटते आणि त्यामागे काही विज्ञान आणि तत्वज्ञान आहे असे वाटते त्यांनी त्याचा प्रचार करणे यातही गैर काहीच नाही. त्याचवेळी कोणी कुंकू लावत नसेल वा कोणाला कुंकू लावायचे नसेल वा कधी लावायचे असेल आणि कधी लावायचे नसेल तर तेही करता यायला हवे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, आम्ही स्व पलीकडे जाऊन किती अन् काय सामावून घेऊ शकतो. दुष्टता, आततायीपणा, अश्लीलता, असभ्यता सोडून अन्य गोष्टींसाठी दुराग्रही असणे अयोग्यच ठरते. भिडे गुरुजी सामाजिक व्यक्तिमत्व आहे, पत्रकारिता सामाजिक व्यवसाय आहे, घडलेली घटना सार्वजनिक ठिकाणी घडली आहे; त्यामुळेच भिडे गुरुजींचा आग्रह अनाठायी ठरतो. रोज सोवळे नेसून पूजा अर्चा करणाऱ्यांच्या घरातही कुंकू न लावता मुली, बाया राहतात. ते न आवडणे समजू शकते पण त्यासाठी किती, कुठे अन् कसे ताणायचे याचे तारतम्य हवे.

भिडे गुरुजींची प्रतिमा हिंदुत्ववादी असल्याने त्यांच्या मताचा संबंध जाणता अजाणता हिंदुत्वाशी जोडला जातो. ते स्वाभाविक आहे. अन् म्हणूनच ते व्यापक हिंदुत्वासाठी घातक आहे. व्यक्तिगत मत हे हिंदुत्वाचे मत ठरत असेल तर त्याची काळजी हिंदुत्वाची चिंता वाहणाऱ्या लोकांनी करायची की नाही करायची? देशभरातल्या अनेक जाती, उपजाती, जनजाती, आदिवासी, वनवासी कुंकू लावत नाहीत. त्यांना अहिंदू ठरवणार का? विधवा वगैरे उल्लेखही त्यांच्या बोलण्यात आहे. त्यांच्या बोलण्यामुळे हिंदुत्वाचा विचार विधवांबद्दल अनुदार आहे असे चित्र निर्माण होते. जे हिंदुत्वाच्या मूळ गाभ्याला अगदीच छेद देणारे आहे. ज्या शिवरायांचे ते भक्त आहेत त्या शिवरायांच्या मातोश्री प्रणम्य आणि प्रात:स्मरणीय जिजाऊ मा साहेब विधवा होत्याच ना? श्री रामकृष्ण यांच्या पत्नी सारदा माता विधवा असूनही लाखो लोकांकडून जगन्माता म्हणून पूजल्या जातातच ना? भिडे गुरुजींना हे चालणार की नाही? वेश्येच्याही मुलाला ऋषीचा दर्जा देणारे हिंदुत्व किती चिल्लर पातळीवर आणायचे याचा गंभीर विचार हिंदुत्वाच्या धारकऱ्यांनी करायला हवा. प्रतिकांना अवास्तव महत्त्व देण्यातून काहीही साध्य होत नाही याचे भान सुटायला नकोच. मनाला, बुद्धीला व्यापक करणे हेच ईश्र्वरी प्रतिमेसह सगळ्या प्रतिमा आणि प्रतिकांचे उद्दीष्ट. तसे होत नसेल तर त्यांना अर्थ उरत नाही.

एखाद्या शाळेने बिंदी लावायला विरोध करणे आणि बिंदी लावल्याशिवाय भिडे गुरुजींनी बोलायला नकार देणे दोन्ही सारखेच. लोकसंख्या असंतुलन, दहशतवाद, हिंदूंवर आघात; अशी कारणे पुढे करून चुकीच्या गोष्टी करणे आणि त्याच्या समर्थनात हिरीरीने उतरणे; अखेरीस आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे ठरते. इतिहासात भय आणि प्रलोभन यामुळे अनेकांनी हिंदुत्व सोडले; आज वेगळ्या संदर्भात पुन्हा भय आणि प्रलोभन यांच्यासाठी हिंदुत्व सोडणे सुरू आहे. दुर्दैवाने हिंदुत्वाच्या नावानेच हिंदुत्वाचा त्याग केला जातो आहे. जगातील सातशे कोटी लोकांनी हिंदू नाव लावले तरीही हिंदुत्व जिवंत राहिले असे म्हणता येणार नाही. कारण त्यातील तत्व इस्लामी वा अन्य असेल. वर्तमान आव्हानांचा मुकाबला करतानाही हिंदुत्वाचा मूळ गाभा लुप्त होणार नाही ही तारेवरची कसरत केल्याविना हिंदूंना पर्याय नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

एकाच वेळी अनेक उपासना पद्धती, एकाच वेळी विविध स्मृती, एकाच कुटुंबात निरनिराळे आचार; हे सगळे हिंदुत्वात आधीही होते, आजही आहेत. अन् असे राहिले तरच भविष्यात हिंदुत्व राहील. अन्यथा नाही. हा वाद महाराष्ट्रापुरता आहे. कशाला वाढवता? या प्रश्नाचे साधे उत्तर आहे - तुम्हाला महाराष्ट्रातील हिंदू व्यापक हवा की संकुचित? ज्यांना डबक्यात राहायचे त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीच हशील नाही.

भिडे गुरुजींचे कार्य वगैरे मुद्देही पुढे केले जातात. एक आठवण ठेवली पाहिजे की, प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र सुद्धा आपल्या स्थानापासून ढळू शकतात हे न लपवणे आणि स्वीकार करणे हेच हिंदुत्वाचे लखलखीतपण आहे. बाकी राजकीय बाह्या सरसावणारे आणि त्यातही मोदी पंतप्रधान झाल्यावर आणि असेपर्यंत हिंदुत्वाचा आवेश असणारे यांचे भले होवो.

भक्तीने ज्ञानाचा हात सोडला किंवा भावनांनी विचारांना तिलांजली दिली की बोलण्यासारखं फार काही उरत नाहीच. ज्यांनी हे केलेलं नाही; हे लिखाण त्यांच्यासाठीच आहे.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ३ नोव्हेंबर २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा