शुक्रवार, १६ मे, २०२५

संघ, संघटना, संघटित समाज

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा, हा हिंदू नववर्षाचा प्रारंभदिन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा हा जन्मदिन. संघात हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस म्हणूनच साजरा केला जातो, डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस म्हणून नव्हे. अर्थात डॉ. हेडगेवार यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचे संघात सतत स्मरण, चिंतन होत असते. त्यामुळे या प्रसंगी ते प्रमुखतेने होणे स्वाभाविकच ठरते. डॉ. हेडगेवार यांनी आपल्या १५ वर्षांच्या संघकामात अनेक मुलभूत गोष्टींची पायाभरणी केली होती. त्यावरच मग संघाचे विशाल कार्य उभे झाले. त्यातीलच एका मुलभूत विचाराचे या वर्ष प्रतिपदेनिमित्त प्रकट चिंतन.

डॉ. हेडगेवार नेहमी म्हणत असत, की आपल्याला संघाची ज्युबिली साजरी करायची नाही. अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे. ५० वर्षे, ६० वर्षे, ७५ वर्षे, ८० वर्षे, १०० वर्षे... अशी वर्षांची उतरंड वाढवीत जायचे आणि आपली संस्था इतकी जुनी आहे वगैरेचे गोडवे गात, किती वर्षे संस्था चालली त्यावरून तिची थोरवी ठरवावी; हे संघाच्या संदर्भात त्यांना अभिप्रेत नव्हते. संघ खूप काळ चालत राहावा वगैरे त्यांची कल्पना नव्हती, हे स्पष्टच आहे. परंतु मग प्रश्न निर्माण होतो की, मग संघ काढला कशाला? आणि तो चालवायचा तरी कुठवर? या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही गोष्टी थोड्या नीट समजून घेण्याची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, संघ हिंदूंचे संघटन करतो. कशासाठी हे संघटन करतो? हिंदू समाज सुसंघटीत करण्यासाठी. सारख्या भासणाऱ्या पण अतिशय वेगळ्या असणाऱ्या या दोन गोष्टी आहेत. इंग्रजीतील शब्दाचा उपयोग करून ही फोड करता येईल. संघ काय करतो, hindu organisation करतो. कशासाठी करतो? organised hindu society साठी करतो. organisation आणि state of being organised या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संघाला हिंदू समाजाअंतर्गत एखादे संघटन उभे करायचे नाही, असे म्हटले जाते त्याचाही हाच अर्थ आहे. संघाला हिंदूंचे एखादे संघटन तर उभे करायचे नाहीच, पण संपूर्ण समाजाचेही संघटन करायचे नाही. संघाला संघटीत हिंदू समाज उभा करायचा आहे.

एखादी व्यक्ती खूप organised आहे असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ हा होतो की, ती व्यक्ती गडबड गोंधळ करीत नाही. साऱ्या गोष्टी वेळच्या वेळी करते. रुमाल राहिला, पाकीट विसरलो, बिल भरायचं राहिलं अशा गोष्टी त्या व्यक्तीच्या बाबतीत संभवत नाहीत. एखादी अडचण उभी राहिली तर ती व्यक्ती हातपाय गाळत नाही. त्या व्यक्तीचे वेळेचे, पैशाचे नियोजन पक्के असते. ती आपत्तींना घाबरत नाही, केव्हा काय करायला हवे हे त्या व्यक्तीला नेमके कळते. कोण आपला, कोण परका हे त्याचे आडाखे योग्य असतात. आपण बनवले जात नाही याची ती व्यक्ती पूर्ण काळजी घेते. ही व्यक्ती विचारी, समजूतदार, विवेकी, निर्णयक्षम, समन्वय आणि संघर्ष दोन्हीची क्षमता असणारी अशी असते. थोडक्यात म्हणजे जीवन जगताना सुखी, सुरक्षित आणि सहज जीवन जगणारी व्यक्ती organised आहे असे आपण म्हणतो. हे सारे त्या व्यक्तीला कोणी सांगावे लागत नाही. प्रत्येक वेळी त्यासाठी त्याला प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. तो त्याचा पिंड असतो, स्वभाव असतो. त्याचं अस्तित्वच त्या सगळ्या गुणांचा समुच्चय असतं.

समाजाच्याही बाबतीत असंच आहे. कोणतेही अभाव नसणारा, अभाव उत्पन्न झाले तर ते सहज दूर करणारा, भौतिक सुखसोयींनी समृद्ध, संपूर्ण समाज एक आहे या भावनेने ओतप्रोत, स्वत:सोबतच समाजाचा- सृष्टीचा- अन्य समाजाचा विचार करणारा, शत्रू आणि मित्र यांची पारख असलेला, कोणत्याही आपत्तीला समर्थपणे तोंड देऊ शकणारा; अशा समाजाला organised society म्हणता येईल. याच्या अभावी तो समाज विस्कळीत समाज आहे, असेच म्हटले जाईल. आपला समाज, म्हणजेच येथील राष्ट्रीय समाज असलेला हिंदू समाज, असाच विस्कळीत समाज आहे. तो सुव्यवस्थित झाल्याविना हा देश, हे राष्ट्र पुन्हा ताठ मानेने उभे राहू शकणार नाही, असे डॉ. हेडगेवार यांचे विश्लेषण होते. त्या दृष्टीने संघटीत समाज उभा करण्याचा संकल्प त्यांनी केला.

परंतु असा समाज उभा होण्यासाठी आणि हे सारे सहज, स्वाभाविक, उत्स्फूर्तपणे होण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचा विशिष्ट स्तर आवश्यक आहे. या समाजाच्या विचारांना, विचार करण्याच्या पद्धतीला तसा घाट द्यावा लागेल, त्याच्या सवयी बदलाव्या लागतील, स्वभाव बदलावा लागेल. प्रदीर्घ काळ यासाठी प्रयत्न केल्यानंतर समाजाचा विशिष्ट पिंड तयार होईल, समाजाची वृत्ती तयार होईल. हे घडवून आणण्यासाठी एखादी यंत्रणा हवी. ही यंत्रणा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. डॉ. हेडगेवार यांची ही दृष्टी नीट समजून घ्यायला हवी.

एखादी संघटना उभारायची आणि त्या संघटनेच्या भरवशावर समाजासाठी काम करीत राहायचे, अशी त्यांची दृष्टी नव्हती. समाजाला अशा बाह्य आधाराची गरज लागू नये, प्रत्येक गोष्टीला योग्य-अयोग्य असा प्रतिसाद देण्यासाठी समाज सक्षम असावा; अशी त्यांची स्पष्ट धारणा होती. संघ संघटना म्हणून सगळ्या समाजाचे नियमन आणि नियंत्रण करील, अशी त्यांची कल्पना नव्हती. म्हणूनच ज्यावेळी डॉक्टरांना कोणी विचारले की, आमच्या वस्तीत काही गडबड झाली तर तुम्ही संघाचे स्वयंसेवक पाठवाल का? त्यावर ते गमतीने म्हणालेही, `मी माझ्या स्वयंसेवकांना पांघरूण घेऊन झोपायला सांगेन. तुम्ही जर वस्तीसाठी सज्ज होऊन उभे राहणार असाल तर तुमच्या मदतीसाठी मी त्यांना पाठवीन.' संघ काहीही करणार नाही; स्वयंसेवक सारे काही करतील, असेही ते म्हणत त्याचाही तोच अर्थ आहे.

अर्थात अशा आदर्श समाजाची उभारणी होईपर्यंत त्याला नीट सवयी लावण्यासाठी संघालाही, संघ म्हणून पुढे होऊन अनेकदा कामे करावी लागतील. त्यातूनच दिशादर्शन होईल, संस्कार होतील आणि सवयीही लागतील याकडे त्यांनी दुर्लक्ष केले नव्हते. त्यामुळेच, रामटेकची यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवकांचे दल पाठवणे असो किंवा नागपुरातील महालक्ष्मी दंग्याच्या वेळी मुकाबला करण्यासाठी स्वयंसेवकांचा उपयोग करून घेणे असो; या गोष्टीही त्यांनी केल्या आहेत. अर्थात `तात्कालिक' आणि `अंतिम' या दोन्ही गोष्टींचे अवधान डॉक्टरांनी नेहमीच राखले होते.

संघ हा सामाजिक काम करणारे संघटन, हे जसे त्यांना अपेक्षित नव्हते; तसेच संघ ही राजकीय संघटना हे देखील अपेक्षित नव्हते. राजकारणात पक्ष संघटन आणि सत्ता असे दोन भाग असतात. त्यात कोण वरचढ यासाठी चढाओढही असते. कम्युनिस्ट पद्धतीत संघटना श्रेष्ठ हे तत्वच आहे. काँग्रेसमध्ये यात परिस्थितीनुरूप बदल पाहायला मिळतो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान असताना सत्ता संघटनेपेक्षा श्रेष्ठ होती. काही वेळेला संघटना श्रेष्ठ असते. जसे सध्या आहे. संघाची आणि संघ संस्थापकांची ही कल्पना नव्हती. संघटना बांधून सत्ता हाती घेऊन समाजाचे भले होईल, या विचारावर मुळातच विश्वास नसल्याने तसा प्रश्नच उत्पन्न होत नाही. (संघ आणि राजकारण, तसेच जनसंघ- भाजपची उभारणी, आजची भूमिका वगैरे स्वतंत्र विषय आहे.)

डॉ. हेडगेवार यांची ही भूमिका पुढेही कायमच होती. डॉ. हेडगेवार यांच्यानंतर सरसंघचालक पदी आलेले गोळवलकर गुरुजी यांनी इंदूर चिंतन बैठकीत ७ मार्च १९६० रोजी दिलेल्या बौद्धिकात या विषयाची सखोल चर्चा केली आहे. रा. स्व. संघाचे संघाचे संघटन कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती याची चर्चा करताना `अनुशासन' या शब्दाची चर्चाही त्यांनी केली आहे. उपनिषदातील `अनुशासन' शब्दाचा अर्थ स्पष्ट करून तोच संघाला अभिप्रेत असल्याचेही ते म्हणाले. याविषयी ते म्हणाले, `विशिष्ट पद्धतीनेच वागले पाहिजे असा आदेश उपनिषदात नाही. विशिष्ट अशी नियमावली सांगितली नाही. बुद्धीचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि या स्वातंत्र्याचा मौलिक अशा सिद्धान्तांशी समन्वय जोडून त्यालाच अनुशासन म्हटले आहे. आपल्याकडे अनुशासन या शब्दात व्यक्तीचे स्वातंत्र्य, व्यक्तीचे सूत्रबद्ध जीवन आणि समष्टीत तिचे विलीनीकरण या दोहोंचा अंतर्भाव आहे. या दोहोत जो सामंजस्य निर्माण करू शकतो तोच यथार्थतेने हिंदू संघटन करू शकतो. अन्यथा जगात ज्या प्रकारे निरनिराळ्या लोकांनी काही संघटीत स्वरूप उभे केले आणि त्या आधारावर त्यांनी काही काळ शक्तीचा अनुभवही घेतला होता त्याच प्रकारे आपल्याकडेही होऊ शकेल. त्यातून एक हिंदू शक्ती उत्पन्न होईल आणि ती काही काळानंतर नष्ट होईल. अशी शक्ती अल्पजीवी राहील आणि काही काळ सफलता हाती आली तरीही ती शक्ती संपल्यावर शेकडो पटींनी अधिक हानी पोहोचेल. हे मी अत्यंत स्पष्टपणे तुमच्यासमोर सांगतो आहे.'

याचेच विवरण करताना ते पुढे म्हणतात, `आपले कार्य हिंदू समाज संघटीत करण्याचे आहे. हिंदू समाजात वेगवेगळ्या संघटीत शक्ती निर्माण करण्याचे नाही. समाजात वेगवेगळे पक्ष निर्माण करण्याचे नाही. समाज संघटीत जीवनाच्या विचारांनी ओतप्रोत असावा आणि समाजातील सर्व व्यक्ती नि:शेषपणे त्या विचारांनी परिपूर्ण असाव्यात हे आपले लक्ष्य आहे. समष्टीमध्ये आपले जीवन विलीन करून स्वत:सिद्ध अनुशासनाच्या भावनेत स्वत:ला गुंफून घेण्याचा निश्चय करून लोकांनी येथे यावे. या प्रकारच्या समाज संघटनेचा आमचा विचार आहे आणि संकल्प आहे- एक संघटीत पक्ष निर्माण करण्याचा नाही, हा विवेक करणे उचित ठरेल. यावर कोणी विचारेल की, संघ एका पक्षाप्रमाणे नाही तर मग कसा चालतो? आपण पूर्ण विचार केला तर आपल्याला हे मान्य करावे लागेल की, व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी; संपूर्ण समाजाचे संघटीत जीवन निर्माण करण्यासाठी एक मोठे देशव्यापी, निरलस, नि:स्वार्थ कार्यकर्त्यांनी मिळून बनलेले संघटनयंत्र आपल्याला उभे करावे लागेल. पण ते आपले लक्ष्य नव्हे, ते केवळ साधन आहे. समाज सुसंघटीत व्हावा यासाठी कार्यकर्ते निर्माण करणे ही केवळ पहिली पायरी आहे.'

शेक्सपिअरच्या `ज्युलियस सीझर' नाटकाचा संदर्भ देत `मास मुव्हमेंट', `क्लास मुव्हमेंट' याची चर्चाही त्यांनी केली. पुढे अतिशय नि:संदिग्ध शब्दात त्यांनी हा विचार मांडला. ते म्हणतात, `आर्य लोकात कधी दासभाव राहू शकत नाही. दासपण त्याला कधीच चांगले वाटू शकत नाही. मग ते स्वकीयांचे असो वा परकीयांचे असो. आर्यांच्या प्रतिभेचा आणि चैतन्याचा हा असामान्य गुण आहे. आपण आपल्या जीवनात मुक्ती हेच जर सर्वश्रेष्ठ लक्ष्य मानलेले आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आणि कुठलीही बंधने नाहीत अशी अवस्था जर श्रेष्ठ मानली आहे तर मग ऐहिक जीवनातही दासतेचा विचार मान्य होऊच शकत नाही. जर कुणाला तो मान्य होत असेल तर आर्यत्वापासून तो ढळला. हा आपला स्वाभाविक गुण आहे आणि त्याचे पोषण करून आपल्याला तो परिपुष्ट बनवायचा आहे. कुणी जबरदस्तीने कुणाचा गुलाम बनत असेल आणि आपली प्रतिभा विकत असेल तर कोणत्याही व्यक्तीचे असे हे पतन आपल्याला सहन होण्यासारखे नाही. आपण हे मान्य करू शकत नाही.'

या बौद्धिकाच्या अखेरीस इशारा देताना गुरुजी म्हणतात, `संघटना करताना, अहिंदू आणि अनार्य संघटना विचारांचा प्रभाव आपल्यावर पडण्याचे भय राहू शकते. परिणामी आपणही एक रिजिड- नॉन इलॅस्टिक; समाजाला गुलाम बनविणारे यंत्र निर्माण करून राष्ट्राचे भोळसटपणामुळे अहित तर करून बसणार नाही, ही खबरदारी घेण्यासाठीच हे मी सांगितले. यावर विचार करणे हे आता आपले काम आहे.'

याचा अर्थ राष्ट्रजीवनात संस्था, संघटना राहणार नाहीत अथवा राहू नयेत असा नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की, कोणतीही एखादी संघटना राष्ट्रजीवनाचे निर्धारण करू शकत नाही. उलट गरजेनुसार आवश्यक त्या संघटना, संस्था उभ्या करण्याची, त्यात कालानुरूप परिवर्तन करण्याची आणि गतार्थ संस्था विलीन करण्याची शक्ती आणि विवेक राष्ट्रात सतत जागृत असायला हवा. त्यासाठी चार गोष्टींचा विचार आधारभूत मानायला हवा.

१) राष्ट्राविषयी सुयोग्य धारणा.

२) त्याच्या दृश्य स्वरूपाचे संरक्षण.

३) राष्ट्राच्या मूल्यव्यवस्थेबद्दल आस्था.

४) याविषयी बांधिलकीची भावना.

संघाचे तिसरे सरसंघचालक आणि संघात ज्यांची ओळख प्रति डॉक्टर हेडगेवार अशी आहे, त्या बाळासाहेब देवरस यांनीही यासंबंधात स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. सरसंघचालक होण्याच्या पूर्वी १९६५ साली त्यांचे सहा अतिशय महत्वपूर्ण बौद्धिक वर्ग झाले. `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- लक्ष्य व कार्य' या शीर्षकाने त्याचे संकलन प्रकाशितही झाले आहे. संघाच्या कामाविषयी अनेक मूलभुत बाबींची त्यात चर्चा आहे. बाळासाहेब देवरस यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा सारांश असा-

`ज्या समाजातील व्यक्ती स्वार्थरहित होते, त्या समाजात सहज आणि स्वाभाविक सामर्थ्य निर्माण होते. आपल्या समाजात शक्तीचा जो वास्तविक स्रोत आहे, त्या स्वाभाविक सामर्थ्यास जागृत करण्यासाठी संघाचे कार्य चालले आहे. यावच्चंद्र दिवाकरौ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात ठेवण्याची आपली कल्पना नाही. राष्ट्र पुनरुत्थानाच्या ठिणग्यांचे चिरस्थायी वन्हीमध्ये रुपांतर करण्याची आवश्यकता आहे. समाज आणि राष्ट्राचा विचार व त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी हाही चारित्र्याचा महत्वाचा भाग आहे. शक्ती निर्माण करणे हीच आमची, जे अंतिम लक्ष्य आहे त्यासंदर्भातील भूमिका आहे. ते नीट न समजून घेतल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. जर संघ नसता तर आज जेवढ्या तात्कालिक समस्या आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर झाल्या असत्या. संघ प्रश्नांचा सम्यक विचार करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वारेच सदैव समाज शक्तिशाली राहील, असा संघाचा विचार नाही. समाजात परिवर्तन घडवू इच्छिणारा संघ हा एक प्रयत्न आहे.'

अर्थात याचा अर्थ संघ लगेच विसर्जित करण्याची वेळ आली आहे असा नाही. उलट आजची परिस्थिती पाहता आणखी शे-दोनशे वर्षे संघाची गरज राहू शकते. आपल्या राष्ट्राविषयी आस्था व बांधिलकी असणारे परंपरेने चालत आलेले घटक संघाबाहेरही विद्यमान होते. आज त्यांचेही क्षरण झाले आहे. त्यामुळे संघकार्याची गरज निर्विवादपणे आहे. मात्र त्याचवेळी संघाच्या कार्याबद्दल योग्य व स्पष्ट धारणा जेवढ्या अधिक प्रमाणात निर्माण होईल, तेवढेच अंतर्गत व बाह्य- समज, गैरसमज, व्यवहारातील अडथळे, अडचणी कमी होण्यास मदत होईल आणि संघटीत हिंदू समाज उभा करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ११ एप्रिल २०१३

नागपूर

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

आप्तांशी लढाई

एका पोस्ट वरील प्रतिक्रिया -

जीवनाचं ध्येयच पैसा, अधिक पैसा, अधिक अधिक पैसा... हे झालेलं आहे. कोणताही व्यवसाय, कोणताही उद्योग, कोणतीही सेवा, कोणतीही व्यक्ती... अशा स्थितीत काय करणार कोणी? जीवनाचं ध्येय, जीवनाचा आशय बदलायला हवा आहे. त्यासाठी सशक्त आवाहन हवं आहे. त्या आवाहनाचा परिणाम होण्यासाठी किंमत चुकवणाऱ्या आयुष्यांचे तारण हवे आहे. कुठे आहे हे सगळे? आप्तांशी लढाई ही फक्त कुरुक्षेत्रावर नसते. अनेक ठिकाणी असते. ती करणारे अर्जुन आणि त्यासाठी उद्युक्त करणारे कृष्ण कुठे आहेत?

संघभाव

रामभाऊ बोंडाळे काल गेले. अकोल्याचे श्रीकांत कोंडोलीकर यांनी त्यांच्यावर लिहिलेला लेख आज वाचण्यात आला. त्यांनी रामभाऊंच्या मितव्ययतेचे फार भावपूर्ण वर्णन केले आहे. सहज काही गोष्टी आठवल्या आणि जाणवले की, रामभाऊ हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या श्रद्धांजली संदेशात पण ही बाब अधोरेखित केली आहेच. ही मितव्ययता फक्त लहान क्षेत्रातील कार्यकर्त्यांचाच गुण होता असेही नाही. श्री. यादवराव जोशी हे संघाचे एक फार मोठे अधिकारी. डॉ. हेडगेवार यांच्यासोबत काम केलेले. दक्षिण भारतात संघ रोवणारे. प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, सहसरकार्यवाह अशा मोठाल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे. त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आठवले.

१९५० च्या दशकात संघातील आर्थिक ओढगस्त फार मोठी होती. शाखा रोडावल्या होत्या. गुरुदक्षिणा कमी झाली होती. गैरसमज आणि अपप्रचार यामुळे समाजात मान्यता आणि स्थान कमी झाले होते. अशाही परिस्थितीत संघाचे काम मात्र करायचे या निश्चयाने कार्यकर्ते काम करीत असत. आर्थिक तंगी त्यात बाधा ठरत नसे. उलट या आर्थिक ओढगस्तीवर स्वतःच विनोद करून वातावरण प्रफुल्लित ठेवणे ही कलासुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी आत्मसात केली होती. श्री यादवराव जोशी हे अशा कार्यकर्त्यांपैकी एक होते. विनोदाने ते अनेकदा म्हणत असत की, 'आपल्या कार्यालयाबाहेर एक फलक लावा की; येथे विवाह, मौंजीबंधन, जन्मदिवस, श्राद्ध इत्यादींसाठी अतिथी म्हणून ब्राह्मण मिळतील.' अन् स्वतःच त्यावर हसून वातावरण निर्मळ करीत असत. एका शिबिरातील एक घटनाही त्यावेळच्या परिस्थितीवर पुरेसा प्रकाश टाकते. एका शिबिरामध्ये जेवण सुरू असताना श्री. गुरुजी ताटातील ताक पाहून म्हणाले, 'एखाद्या विहिरीत एक थेंब ताक टाकले तरीही त्याला ताकाची विहीर म्हटले जाईल.' जवळच बसलेले यादवराव त्यावर मोठ्या आवाजात म्हणाले, 'तरीही ते ताक तेवढेच रुचकर आणि पाणीदार राहील.' अशाच शिबिरात वाढल्या गेलेली शेवयाची खीर हाही एक विनोदाचा भाग झाला होता. आपल्या शेजारी बसलेले डॉक्टर आबाजी थत्ते यांना गुरुजी म्हणाले होते, 'हे पहा, हे पहा. या खिरीत शेवयांचा एक तुकडा दिसतो आहे. त्यावरून सिद्ध होते की ही खीर शेवयाचीच आहे.' यात कुठेही कटुता नव्हती. यात कुठेही त्रागा नव्हता, टीकाटिप्पणी आणि दोषदर्शन नव्हते; तर असलेल्या परिस्थितीत हसतखेळत सगळ्यांनी मिळून पुढे जाणे हाच भाव राहत असे.

बरं, यादवराव तर ठरले उमरेडच्या एका दरिद्री भिक्षुकाचे चिरंजीव. त्यांना हे जन्मजात सवयीचे. पण, १९४० च्या दशकात, घरी राहत असूनही शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये देणाऱ्या वडिलांचे चिरंजीव असलेले चौथे सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह देखील त्याच वळणाचे. ते सरकार्यवाह, सहसरकार्यवाह असताना सुद्धा आपला रोजचा खर्च, हिशेब लिहून ठेवत असत.

चार दोन कार्यकर्त्यांची, माहिती असलेली अशी चारदोन उदाहरणे. पण हे कार्यकर्ते पाच पाच, सहा सहा, सात सात दशके काम करत होते. त्यांच्या आयुष्यात असे किती प्रसंग असतील. अन् असेही हजारो हजार कार्यकर्ते ज्यांच्याबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या जीवनात असे किती क्षण असतील?

याची आणखीन एक बाजूही आहे. कोंडोलीकर यांनी त्यांच्या लेखात श्री. मधुकर कुलकर्णी यांचाही उल्लेख केलेला आहे. ती बाजूही महत्त्वाची आणि लक्षणीय आहे. एकीकडे सगळं विसरून, आपल्याला एक भव्य दिव्य कार्य करायचे आहे या धुंदीत काम करणारे लहानथोर कार्यकर्ते होते; तर दुसरीकडे एका भव्य दिव्य कार्यासाठी स्वत:च्या जीवनावर तुळशीपत्र ठेवून हे कार्य करीत आहेत याची समंजस जाणीव असणारेही अनेक होते. सीमेवर जाणाऱ्या एखाद्या सैनिकाबद्दल जी भावना असते तशीच भावना अनेकांची या प्रचारकांबद्दल होती. संघ यात आहे आणि यातून आहे. संघाचा पिळ आणि पिंड यातून घडले आहे. बाकीच्यांचे असो अनेकदा स्वयंसेवकांना देखील हे आकलन होत नाही. आजची हिंदुत्वाची सुनामी या साधनेचा परिणाम आहे. केवळ घोषणा, वाद, चर्चा, जाहिराती यांचा नाही.

याचा अर्थ तीच परिस्थिती आज राहावी किंवा तशाच प्रकारे जगावे असा होत नाही. बदल होणारच. पण मर्यादांची जाणीव महत्त्वाची. अभावांच्या मर्यादांची जाणीव ठेवून निराश होण्याचे जसे नाकारले, तसेच संपन्नतेच्या मर्यादांची जाणीव ठेवून 'जितं मया' होण्याचे नाकारले की झाले. मर्यादांची ही जाणीव असेल तोवर संघ असेल. जाणीव नसेल तर संघ नसेल. बाहेरचे कोणी काही करू शकत नाहीत. ना भले ना बुरे. हितचिंतकांना, विरोधकांना, टीकाकारांना याबद्दल चिंता वगैरे वाटू शकते पण त्याची सवंग चर्चा करण्याचा अधिकार खरंच आपल्याला आहे का?

- श्रीपाद कोठे

सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

आरक्षण, मोदी, नेहरू

मोदी समर्थकांपैकी खूप जण आरक्षण विरोधी आणि सोबतच नेहरू विरोधी आहेत. काल मोदींनी स्वतः सांगितले की, नेहरू आरक्षण विरोधी होते. आता हे आरक्षण विरोधी मोदी समर्थक नेहरूंचे समर्थक होतील का? किंवा मोदी विरोधक होतील का?

(थोडी चंमत ग हवी ना !!) 😀😀

- श्रीपाद कोठे

८ फेब्रुवारी २०२४

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

हिंदुत्व आणि समजूतदारपणा

समजूतदारपणा म्हटलं की आजकाल अनेकांच्या भुवया उंचावतात. अनेक हिंदुत्ववाद्यांच्या. जणू काही समजूतदारपणा हे पाप आहे असं त्यांचं ठाम मत असतं. अशांना एक विचारावं वाटतं की, लोक कुलुपे लावत नसत किंवा भारतात कुठेही भिकारी नव्हते; हे हिंदू समाजाचं character कसं निर्माण झालं आणि टिकलं? भारतात तर काही क्रांती वगैरे झाल्याचा इतिहास नाही. किंवा इथला माणूस सुद्धा जगातल्या इतर माणसांसारखाच आहे. मात्र इतरांपेक्षा त्याचं वेगळं character कसं निर्माण झालं? ज्याचा सगळ्यांना गौरव आणि हेवा वाटावा असं हे character समजूतदारपणा यापेक्षा अन्य कोणत्या गोष्टीने निर्माण होऊ शकलं असेल? अगदी वर्तमान उदाहरण घ्यायचं तर; ईशान्य भारतात हिंदुत्वाने जे ठामपणे पाय रोवले ते कसे? समजूतदारपणाला तीलांजली देऊन की, समजूतदारपणाच्या भरवशावर? क्रांती आणि क्रांतिकारक पृथ्वीच्या पाठीवर कुठेही कधीही यशस्वी झालेले नाहीत. क्रांती आणि मांजर आपलीच पिले खाऊन टाकतात. आजचे हिंदुत्वाचे उत्थान देखील हिंदुत्वाच्या समजूतदार प्रवाहाचा परिणाम आणि यश आहे. And to be blunt ... हिंदुत्वाचे क्रांतिवादी प्रवाह काहीही करू शकलेले नाहीत.

#श्रीपाद कोठे

६ फेब्रुवारी २०२४

- ललित कला प्रकरणावर तू काही प्रतिक्रिया नाही दिली?

- हं. नाही दिली.

- तरी...

- हे प्रकरण पुढे आलं तेव्हापासून दोन गोष्टी आठवत आहेत. १) पु. ल. देशपांडे यांचं एक वाक्य : गणपतीला बुशकोट घालणे म्हणजे आधुनिकता नाही, आचरटपणा. २) संघाच्या एका गीताची एक ओळ : दानवता का तीमिर हटाने, तीलतील कर हम जलना सीखे...

@@@@@

दानवताका तिमिर हटाने तिल तिल जलतांना

यात कधी कधी ताडन कर हम जीना सिखे... असे होऊ शकते. गरज तिमिराचा पडदा हटवणे ही आहे.

(किशोर पौनिकर)

तीमिराचा पडदा कोणत्याही शक्तीने हटवल्याचं मी तरी कधी कुठे ऐकलं, पाहिलं नाही. तिमिर हटवण्याचा मला माहिती असलेला एकमेव मार्ग म्हणजे दिवा उजळणे. पेटत्या दिव्यांची संख्या वाढवणे. अन्य मार्ग असेल तरी मला ठाऊक नाही.

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

कलशारोहण

सगळ्यांनी, म्हणजे इकडच्यांनी आणि तिकडच्यांनी पण ऐकावा असा व्हिडिओ. दोन्ही पक्षांना भांडायला बळ देईल असा. 😄 असो. मला मात्र हा व्हिडिओ ऐकताना एक जुनी आठवण जागी झाली. शंकराचार्य (हे चार पिठातील नाहीत. मग शंकराचार्य कसे? वगैरे शंकांना माझ्याकडे उत्तरे नाहीत. ती मला मिळवायची पण नाहीत.) मंदिराच्या कळसाबद्दल बोलले त्यामुळे.

२००७ असेल. एका लग्नाला गेलो होतो. गप्पा मारत उभा होतो तेवढ्यात एक मित्र एक दोन जणांना घेऊन आला आणि आमची ओळख करून दिली. त्या एक दोघांना माझ्याकडे काम होतं. म्हटलं बोला. अन् त्यांनी काम सांगताच मी उडालोच. नागपूरला हिंगणा मार्गावर एक गजानन महाराज मंदिर आहे. त्या मंदिराचे ते कार्यकर्ते होते. दुसऱ्या दिवशी त्या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम होता. मी ते कलशारोहण करावे अशी त्यांची इच्छा होती. मी त्यांची समजूत काढली की, मी तसाही कोणीच नाही. अन् एवढं मोठं काम करण्यासाठी तर अगदीच पात्र नाही. मग त्यांनी त्यांची अडचण सांगितली. कलशारोहण एखाद्या संन्यासी व्यक्तीच्या हस्ते करायचे असते. पण कामाच्या गडबडीत त्यांना ही गोष्ट कोणी सांगितली नव्हती. ती एक दिवस आधी सांगितली. एक दोन ठिकाणी विचारपूस केली पण संन्यासी कोणी मिळाले नाहीत. आणखी प्रयत्न केले तर कोणी मिळतील देखील पण वेळ कमी होता. नव्हताच म्हटलं तरी चालेल. तेव्हा त्यांना कोणीतरी अधिकारी व्यक्तीने धर्मशास्त्रात असलेला एक तोडगा सांगितला की, एखाद्या ब्रम्हचारी व्यक्तीच्या हस्ते कलशारोहण करता येईल. त्यासाठी ते माझ्याकडे आले होते. मला त्यातले काहीही त्यावेळीही कळत नव्हते अन् आताही कळत नाही. पण कोणाची अडचण आहे अन् आपण ती दूर करू शकतो. शिवाय गजानन महाराजांच्या मंदिराचे काम असल्याने फारसा विचार करण्याची गरज नव्हती. मी हो म्हटले. कलशारोहण झाले. माझे काय पाप पुण्य असेल ते गजानन दरबारी ठेवले.

आज हा व्हिडिओ ऐकताना त्याचे शास्त्र ऐकायला मिळाले की, कलशारोहण करणाऱ्या व्यक्तीचा निर्वंश होतो अशी समजूत आहे. असे असताना कोण गृहस्थ कशाला त्या भानगडीत पडेल? अन् ब्रम्हचारी असेल तरी तो का म्हणून ही रिस्क घेईल? त्यामुळे संन्यासी हवा. मला त्या लोकांनी का बोलावले त्याचा शास्त्रीय उलगडा आज झाला. अन् प्रभूची योजनाही लक्षात आली. गृहस्थ नव्हतो आणि निर्वंश वगैरेची काही भानगड नव्हती. कलशारोहणाने तशी भानगड उत्पन्न होण्याची शक्यताही प्रभूने संपवून टाकली. वंश नाही म्हणजे पुढे नाव नाही. म्हणजेच हा जन्म म्हणजे पूर्णविराम. शेवटला जन्म. पुन्हा येणेजाणे नाही. अशाच एका अवलियाने एकदा बोलता बोलता म्हटलं होतं - 'तुमचा शेवटला जन्म आहे.' तेही आठवलं. त्यामुळे छान वाटलं. सारीपाटावरील शेवटलं दान पडलेलं आहे. कलशारोहण करून सगळ्या पापपुण्याचा हिशेब होऊन गेला आहे. आनंदी आनंद.

- श्रीपाद कोठे

२४ जानेवारी २०२३

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

राम का गुणगान करीये

मकर संक्रांतीपासून २१ जानेवारीपर्यंत रोज 'राम का गुणगान करीये' लिहावं असं मनात आलं होतं. परंतु अन्य लिखाण, कामं, व्यस्तता, प्रकृती; अशा सगळ्या कारणांनी ते शक्य नाही हेही लक्षात आलं आणि तो विचार सोडून दिला. मात्र दोन तीन दिवस झाले आतून कोणीतरी खूप जबरदस्ती करत आहे असं वाटतंय. कदाचित हनुमानजी गदा घेऊन उभे आहेत की - 'मी तुला हे लिही म्हणतो आहे नं.' त्यामुळे हे लिहितो आहे. अर्थात फक्त एकच दिवस हे त्या आतल्यांना सांगितलं आहे. असो.

श्रीरामाच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. रावणाशी युद्ध सुरू होतं आणि रामाच्या सगळ्या कौशल्याचाही काहीच उपयोग होत नाही. आणीबाणीची परिस्थिती उद्भवते तेव्हा जांबुवंत त्यांना शक्तीची उपासना करायला सांगतात. त्यासाठी १०८ नीलकमले आणली जातात. श्रीराम अनुष्ठानाला बसतात. नीलकमलांनी मातेची आराधना सुरू होते. अन् १०७ कमले वाहिल्यावर ताटातील कमले संपून जातात. ही मां दुर्गेची चलाखी असते. एक कमळ गायब झालेले असते. आता काय करायचे? सगळं मुसळ केरात. तेव्हाच श्रीरामांना आठवतं, आपली आई आपल्या डोळ्यांना नीलकमलाची उपमा देत असे. ते तात्काळ निर्णय घेतात. कमी पडणाऱ्या नीलकमलाच्या जागी आपलं नेत्रकमल मातेला अर्पण करायचं. त्यासाठी ते आपला नेत्र काढणार तोच दुर्गा प्रकट होते आणि त्यांना इच्छित वरदान देते. श्रीरामांच्या लोकविलक्षण धैर्यशीलतेचा हा प्रसंग आहे.

धैर्य हा रामाच्या चारित्र्याचा फार महत्त्वाचा गुण आहे. बालपणी ऋषिमुनींच्या यज्ञयागाचे रक्षण करण्यासाठी जाणे असो, पित्याने वनवासात जाण्याची आज्ञा करणे असो, रावणाने सीतेचे अपहरण करणे असो, सीतेचा शोध घेणे असो, वालीशी युद्ध असो, रावणाशी युद्ध असो, भरताला समजावणे असो, सीतेचा त्याग असो, लक्ष्मणाला शरयू जवळ करायला सांगणे असो... अनेक प्रसंग कसोटीचे पण त्यांचे धैर्य खचत नाही, मोडत नाही. रावणाला परास्त करण्याचे कर्तव्य पार पाडल्यावर ते उन्मादी होऊन त्याच्या छातीवर नाचत नाहीत. सीतेचा त्याग करताना, राजकर्तव्याचा अभिनिवेश बाळगत नाहीत. चुकीचे परंतु आवश्यक असे ते कर्तव्य करताना त्याचे कोणतेही समर्थन न करता ते प्रिय सीतेला टाळून वेळ मारून नेतात. प्रत्यक्ष भरत आपल्या आईला बरेवाईट बोलला तरी राम तिला काहीही म्हणत नाहीत. श्रीराम धैर्य कधीच सोडत नाहीत. म्हणूनच ते पराक्रमी ठरतात. शौर्याला धैर्याचा आधार असतो तेव्हा तो पराक्रम होतो. शौर्याला धैर्याचा आधार नसेल तर तो राक्षसीपणा ठरतो. रावणाच्या शौर्याला धैर्याचा आधार नव्हता म्हणून तो राक्षस होता. श्रीरामाच्या शौर्याला धैर्याचा आधार होता म्हणून ते प्रभू राम आहेत.

श्रीरामाचे नाव घेताना, त्याची भक्ती करताना, त्याच्या नावाचा प्रचारप्रसार करताना; त्याचा हा गुण अंगी बाणवायला हवा. आज अनेकदा तसे होताना दिसत नाही. हे वेदनादायी आहे. का म्हणून आपण धैर्य सोडून देतो? कशासाठी आक्रस्ताळेपणा? कशासाठी उतावळेपणा? कशासाठी उथळपणा? कशासाठी मर्यादेचे उल्लंघन? आपल्याला काहीच का सहन होत नाही? योग्य अयोग्य, धर्म अधर्म, न्याय अन्याय याचे मोजमाप आपणच आपले करतो आणि स्वतःला प्रभू राम समजून अयोग्य, अन्याय्य, अधर्म यांच्यावर तुटून पडतो, तेही रामाच्या नावाला साजेसे ठरणार नाही अशा रीतीने. का आणि कशासाठी? न्याय, धर्म इत्यादीचा निकष आपल्याला वाटणे हा नसतो. तसा तो समजला जातो तेव्हा रावण जन्माला येतात. अन् कालातीत कसोट्यांवर न्यायाचा आणि धर्माचा निर्णय करणारा श्रीराम होतो. श्रीरामाचे नाव घेऊन आपण रावणाची कृती करतो आहोत का? हा प्रश्न विचारलेला आज फारसा कोणाला आवडणार नाही. परंतु श्रीरामासाठी तेवढा वाईटपणा घ्यावाच लागेल. काहीही कारण नसताना, विचार चिंतन समज बाजूला सारून; वागणे, बोलणे, प्रतिक्रिया देणे, सगळ्यांशी शत्रुवत व्यवहार; हे शोभणारे नाही. आपल्या टीचभर आयुष्यात समस्त अस्तित्व आपल्या मुठीत आलं आहे असं समजून, सारं जग टाचेखाली घेण्याचा आविर्भाव; बाकी काहीही असू शकेल पण रामनामाला साजेसा नक्कीच नाही. कुठे काही वेगळा स्वर ऐकू आला, कुठे काही वेगळे मत कानी आले, कुठे काही वेगळा व्यवहार पाहायला मिळाला की; जणू आता जगबुडी होणार अशा थाटाने वागण्या बोलण्याचे कारण नाही. हजारो वर्षे झाली; मानवी संस्कृती या पृथ्वीवर नांदते आहे. तुमच्या माझ्या हातात नसलेली ती शक्ती व्यवस्थित ते चालवते आहे. आपल्यासारखे अब्जावधी आले गेले, ती शक्ती तिचं काम चोख करते. आपल्या टीचभर आयुष्यात आपण हे जग चालवतो हा भ्रम टाकून देऊन रामगुण घेता आले तर घ्यावे. जगाचं आणि आपलंही भलं वगैरे झालं तर त्यानेच होईल. किमान रामाच्या नावाला कलंक लावण्याचं पातक तरी आपल्या हातून होऊ नये.

- श्रीपाद कोठे

रविवार, १४ जानेवारी २०२४