सोमवार, १३ जानेवारी, २०२५

राम का गुणगान करीये

मकर संक्रांतीपासून २१ जानेवारीपर्यंत रोज 'राम का गुणगान करीये' लिहावं असं मनात आलं होतं. परंतु अन्य लिखाण, कामं, व्यस्तता, प्रकृती; अशा सगळ्या कारणांनी ते शक्य नाही हेही लक्षात आलं आणि तो विचार सोडून दिला. मात्र दोन तीन दिवस झाले आतून कोणीतरी खूप जबरदस्ती करत आहे असं वाटतंय. कदाचित हनुमानजी गदा घेऊन उभे आहेत की - 'मी तुला हे लिही म्हणतो आहे नं.' त्यामुळे हे लिहितो आहे. अर्थात फक्त एकच दिवस हे त्या आतल्यांना सांगितलं आहे. असो.

श्रीरामाच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. रावणाशी युद्ध सुरू होतं आणि रामाच्या सगळ्या कौशल्याचाही काहीच उपयोग होत नाही. आणीबाणीची परिस्थिती उद्भवते तेव्हा जांबुवंत त्यांना शक्तीची उपासना करायला सांगतात. त्यासाठी १०८ नीलकमले आणली जातात. श्रीराम अनुष्ठानाला बसतात. नीलकमलांनी मातेची आराधना सुरू होते. अन् १०७ कमले वाहिल्यावर ताटातील कमले संपून जातात. ही मां दुर्गेची चलाखी असते. एक कमळ गायब झालेले असते. आता काय करायचे? सगळं मुसळ केरात. तेव्हाच श्रीरामांना आठवतं, आपली आई आपल्या डोळ्यांना नीलकमलाची उपमा देत असे. ते तात्काळ निर्णय घेतात. कमी पडणाऱ्या नीलकमलाच्या जागी आपलं नेत्रकमल मातेला अर्पण करायचं. त्यासाठी ते आपला नेत्र काढणार तोच दुर्गा प्रकट होते आणि त्यांना इच्छित वरदान देते. श्रीरामांच्या लोकविलक्षण धैर्यशीलतेचा हा प्रसंग आहे.

धैर्य हा रामाच्या चारित्र्याचा फार महत्त्वाचा गुण आहे. बालपणी ऋषिमुनींच्या यज्ञयागाचे रक्षण करण्यासाठी जाणे असो, पित्याने वनवासात जाण्याची आज्ञा करणे असो, रावणाने सीतेचे अपहरण करणे असो, सीतेचा शोध घेणे असो, वालीशी युद्ध असो, रावणाशी युद्ध असो, भरताला समजावणे असो, सीतेचा त्याग असो, लक्ष्मणाला शरयू जवळ करायला सांगणे असो... अनेक प्रसंग कसोटीचे पण त्यांचे धैर्य खचत नाही, मोडत नाही. रावणाला परास्त करण्याचे कर्तव्य पार पाडल्यावर ते उन्मादी होऊन त्याच्या छातीवर नाचत नाहीत. सीतेचा त्याग करताना, राजकर्तव्याचा अभिनिवेश बाळगत नाहीत. चुकीचे परंतु आवश्यक असे ते कर्तव्य करताना त्याचे कोणतेही समर्थन न करता ते प्रिय सीतेला टाळून वेळ मारून नेतात. प्रत्यक्ष भरत आपल्या आईला बरेवाईट बोलला तरी राम तिला काहीही म्हणत नाहीत. श्रीराम धैर्य कधीच सोडत नाहीत. म्हणूनच ते पराक्रमी ठरतात. शौर्याला धैर्याचा आधार असतो तेव्हा तो पराक्रम होतो. शौर्याला धैर्याचा आधार नसेल तर तो राक्षसीपणा ठरतो. रावणाच्या शौर्याला धैर्याचा आधार नव्हता म्हणून तो राक्षस होता. श्रीरामाच्या शौर्याला धैर्याचा आधार होता म्हणून ते प्रभू राम आहेत.

श्रीरामाचे नाव घेताना, त्याची भक्ती करताना, त्याच्या नावाचा प्रचारप्रसार करताना; त्याचा हा गुण अंगी बाणवायला हवा. आज अनेकदा तसे होताना दिसत नाही. हे वेदनादायी आहे. का म्हणून आपण धैर्य सोडून देतो? कशासाठी आक्रस्ताळेपणा? कशासाठी उतावळेपणा? कशासाठी उथळपणा? कशासाठी मर्यादेचे उल्लंघन? आपल्याला काहीच का सहन होत नाही? योग्य अयोग्य, धर्म अधर्म, न्याय अन्याय याचे मोजमाप आपणच आपले करतो आणि स्वतःला प्रभू राम समजून अयोग्य, अन्याय्य, अधर्म यांच्यावर तुटून पडतो, तेही रामाच्या नावाला साजेसे ठरणार नाही अशा रीतीने. का आणि कशासाठी? न्याय, धर्म इत्यादीचा निकष आपल्याला वाटणे हा नसतो. तसा तो समजला जातो तेव्हा रावण जन्माला येतात. अन् कालातीत कसोट्यांवर न्यायाचा आणि धर्माचा निर्णय करणारा श्रीराम होतो. श्रीरामाचे नाव घेऊन आपण रावणाची कृती करतो आहोत का? हा प्रश्न विचारलेला आज फारसा कोणाला आवडणार नाही. परंतु श्रीरामासाठी तेवढा वाईटपणा घ्यावाच लागेल. काहीही कारण नसताना, विचार चिंतन समज बाजूला सारून; वागणे, बोलणे, प्रतिक्रिया देणे, सगळ्यांशी शत्रुवत व्यवहार; हे शोभणारे नाही. आपल्या टीचभर आयुष्यात समस्त अस्तित्व आपल्या मुठीत आलं आहे असं समजून, सारं जग टाचेखाली घेण्याचा आविर्भाव; बाकी काहीही असू शकेल पण रामनामाला साजेसा नक्कीच नाही. कुठे काही वेगळा स्वर ऐकू आला, कुठे काही वेगळे मत कानी आले, कुठे काही वेगळा व्यवहार पाहायला मिळाला की; जणू आता जगबुडी होणार अशा थाटाने वागण्या बोलण्याचे कारण नाही. हजारो वर्षे झाली; मानवी संस्कृती या पृथ्वीवर नांदते आहे. तुमच्या माझ्या हातात नसलेली ती शक्ती व्यवस्थित ते चालवते आहे. आपल्यासारखे अब्जावधी आले गेले, ती शक्ती तिचं काम चोख करते. आपल्या टीचभर आयुष्यात आपण हे जग चालवतो हा भ्रम टाकून देऊन रामगुण घेता आले तर घ्यावे. जगाचं आणि आपलंही भलं वगैरे झालं तर त्यानेच होईल. किमान रामाच्या नावाला कलंक लावण्याचं पातक तरी आपल्या हातून होऊ नये.

- श्रीपाद कोठे

रविवार, १४ जानेवारी २०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा