शनिवार, २५ मे, २०२४

खासदार आणि वृक्ष

परवा नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. तिथली वैशिष्ट्ये काय वगैरे चर्चा सुरू आहे. त्यात तिथल्या हिरवळीचा उल्लेख आहे. सोबत एक सुचवावेसे वाटते - दोन्ही सभागृह मिळून जेवढे खासदार आहेत तेवढे वृक्ष (वड, पिंपळ, कडुलिंब, औदुंबर असे) या परिसरात लावावे. चकचकीतपणा ही पाश्चात्य विकासाची कल्पना आहे. वनातील आश्रम इत्यादी भारतीय कल्पना आहे. (उदा. शांतिनिकेतन) बदललेल्या काळातील संसद सुद्धा वनात असायला (भरपूर दाट झाडीत असायला) काय हरकत आहे? अन् सध्यातरी भारताला शहाणपण शिकवण्याची कोणाची शक्ती, इच्छा अन् तयारी नाही. भारत म्हणेल, करेल त्याला जग बऱ्यापैकी मान डोलावतं. पंतप्रधानांना वाकून नमस्कार पण करायला लागलं आहे जग. तेव्हा खासदारांच्या संख्येएवढे वृक्ष सेंट्रल व्हिस्टा परिसरात लावावे.

- श्रीपाद कोठे

२६ मे २०२३

बुधवार, १५ मे, २०२४

माझे उत्तर माझ्याकडे हवे

- केरला स्टोरीवर अजून चर्चा सुरू आहेच पण सुरुवातीचा धुरळा थोडा खाली बसला आहे. त्यामुळे काही मुद्दे.

- अशा प्रकरणांची संख्या किती? ३२ हजार, ३२ शे, ३२, ३, २??

- हे एकच प्रकरण असेल तरीही ते गंभीरच आहे. अन् एखाद्याच प्रकरणावर चित्रपट निघाले आहेत आणि त्यावर समाज ढवळून टाकणारी चर्चाही झाली आहे.

- या समस्येचे स्वरूप हिंदू मुस्लिम असले तरीही ते त्याचे एकमेव रूप नाही. त्याला अन्यही कोन आहेत. सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार हवा.

- माणसांची ओळख पुसून टाकणारी अवाढव्य शहरांची संस्कृती. यात कोणी कोणाचं नसतं हे तर खरंच पण कोण येतं, कोण जातं, कोण नाहीसं होतं इत्यादी गोष्टी माहिती सुद्धा होत नाहीत. त्याबद्दल संवेदना असणं दूरच. शहरांच्या या बेगुमान वाढीवर नियंत्रण आणण्याचा मुद्दा या निमित्ताने पुढे यायला हवा.

- आजच्या असंख्य समस्या या व्यक्तीवादाच्या समस्या आहेत. यात व्यक्तीचं स्वातंत्र्यदेखील अध्याहृत आहे. त्यावर आगपाखड केल्याने काही होणार नाही. ओरडणारे ओरडत राहतील आणि काळाचा प्रवाह वाहत राहील. बाह्य नियंत्रणाची सगळीच व्यवस्था हळूहळू खिळखिळी होत आहे. यात कुटुंब हा घटक सुद्धा येतो.


- याला उत्तर देण्यासाठी आत्मनियंत्रण महत्त्वाचे ठरते. परंतु ते साध्य कसे होणार? त्यासाठी माझे उत्तर माझ्याकडे हवे. माझे उत्तर दुसऱ्या कोणाकडे किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीत/ पुस्तकात/ शास्त्रात असून चालणार नाही. माझे मला मी समाधानकारक उत्तर देऊ शकलो तर आत्मनियंत्रण शक्य होईल.

- त्यासाठी भारतीय आध्यात्मची तात्विक बाजू अधिक जोरकसपणे पुढे यायला हवी. त्यावर सतत चर्चा होत राहायला हवी. ते माणसांच्या मनात रुजत जायला हवे.

- दुर्दैवाने आज हिंदू समाज अधिक कर्मकांडी होऊ लागला आहे. त्याचे जोरकस समर्थनही केले जाते. कर्मकांड हे अधिक अमूर्त गोष्टी जीवनात रुजवण्यासाठी आहे याचा विसर पडतो आहे. त्यामुळे हे कर्मकांड काय किंवा दुसरं कोणतं कर्मकांड काय, असा विचार कोणी केला तर त्याला काहीही उत्तर नाही.

- जीवनातील श्रेयस रुजवण्याची किंवा समजावण्याची शक्ती तात्विक विचारात असते. कर्मकांडात नसते.

- जीवनाचे भय, अरे ला कारे करणे; या गोष्टींची मर्यादा असते. त्याहून अधिक ठोस आधार कसा देता येईल यावरही मंथन हवे. सारासार विचार करण्याची सर्वत्रिक शक्ती वाढायला हवी.

- याच केरळात सगळ्यात श्रीमंत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. त्याची तिजोरी उघडायची की नाही इथपासून सुरुवात होते. बहुसंख्य हिंदू समाज अनिष्ट अशीच भूमिका घेतो. देशभरातील मंदिरांच्या या संपत्तीचा उपयोग; हिंदू समाज अंतर्बाह्य, लौकिक, वैचारिक, भावनिक, आध्यात्मिक दृष्टीने बलवान करण्यासाठीचे प्रयत्न तोकडे का असावेत?

- शेगावच्या गजानन महाराज मंदिरात वाढणाऱ्या गर्दीने कसे प्रश्न निर्माण होत आहेत यावर तीन लेख नुकतेच वाचले. हिंदू समाजासाठी हे चिंतनाचे विषय व्हायला हवे.

- सद्भावांची शक्ती वाढायला हवी. सद्भावनांच्या पताका खांद्यावर घेणाऱ्या झुंडीची नव्हे.

- स्वामी विवेकानंद म्हणत असत : ज्याला जग हिंदूंचा दुबळेपणा म्हणतं तीच हिंदूंची शक्ती आहे. हिंदू भाव/ विचार हा दवबिंदूप्रमाणे परिवर्तन घडवून आणतो.

- हिंदूंच्या या पद्धतीच्या विरुद्ध वागणारे जगातून संपून गेले. हिंदूंनी नुकसान सहन केले असले तरीही ते संपले नाहीत.

- सर्वंकष विचार होत राहायला हवा.

- श्रीपाद कोठे

१६ मे २०२३

शुक्रवार, १० मे, २०२४

संवाद

- तुमचं पुस्तक प्रकाशित झालं आहे नं.

- हो.

- ते विकायचंही असेल.

- अर्थात.

- पण तुमचा तो व्यवसाय नाही नं.

- नाही हो. कुठला व्यवसाय? मी साधा लिहिणारा माणूस आहे. व्यवसाय वगैरे काही कळत नाही.

- तेच म्हणतोय. तुम्ही विक्रेते नाही पण तुम्हाला विकायचं आहे. त्यासाठी माझ्याकडे उपाय आहेत बरेच. मी मार्केटिंगचे वर्कशॉप्स घेतो. तीन तासांचा वर्कशॉप आहे. अमुक फी आहे.

- अहो पण मी काय करू त्याचं? मी लिहिणारा आहे. माझं पुढच्या पुस्तकाचं, आगामी दिवाळी अंकांचं, अन्य प्रासंगिक लिखाण सुरू आहे. लिहिणे या विषयात मला काही शिकायचं नाही. शिकण्यासारखं असू शकेल पण आता नाही. आहे ते पुरेसं आहे.

- लिखाणाचं नाही हो. पुस्तकं विकण्याचे म्हणतोय. त्यासाठी वर्कशॉप्स करा.

- नको. विकली जातील तशी जातील. माझ्या डोक्यात फक्त लिखाण असतं. अन् वर्कशॉप करून मला कुठे नेहमी काही विकत बसायचं आहे? अन् सांगू का विक्री करायला वर्कशॉप कशाला हवं हो? आजकाल तर लोक ओ का ठो माहीत नसताना ऑनलाईन विक्री करून हजारो रुपये कमावतात.

- वेगळेच आहात तुम्ही.

- कदाचित...

- श्रीपाद कोठे 

११ मे २०२३

गुरुवार, ९ मे, २०२४

सोबत असणे आणि जोडलेलं असणे

सोबत असणे आणि जोडलेलं असणे या दोन वेगळ्या गोष्टी असतात. अनेक जण आपल्या सोबत असतात पण ते आपल्याशी जोडलेले असतात असं नाही. अनेक जण आपल्या सोबत नसतात पण ते जोडलेले मात्र असतात. अगदी आपल्या शरीराचं उदाहरण घेतलं तरीही, हात आणि पाय सोबत नसतात पण जोडलेले असतात. मेंदू आणि हृदय सोबत नसतात पण जोडलेले असतात. नाती, भावना, विचार, समूह, संघटना, मानव समाज, सृष्टी, अस्तित्व अशा सगळ्या गोष्टींना हे लागू होतं. ते लावून पाहता येतं. सोबत असणे आणि जोडलेले असणे यातला फरक अधिकाधिक कळणे म्हणजे अधिकाधिक प्रगल्भता. हा फरक समजून न घेणे म्हणजे अधिकाधिक संकुचितता.

- श्रीपाद कोठे

१० मे २०२३

बुधवार, ८ मे, २०२४

ऋणानुबंध

ऋणानुबंध हा शब्द आपण पुष्कळदा वापरतो. मनाच्या आतून वापरतो. चांगल्या भावनेने वापरतो. पण त्या शब्दाचा अर्थ काय होतो? ऋणाचा अनुबंध म्हणजेच कर्जाचा संबंध. कर्जाचा काही हिशेब राहिला आहे तो पूर्ण करणे. त्यासाठी आलेला संबंध. एक जण देणं लागतो आणि एक जण घेणं लागतो. वास्तविक अशी कर्जाची थकबाकी ही काही चांगली गोष्ट मानली जात नाही. मुळात कर्ज घेणे ही काही भूषणावह गोष्ट समजली जात नाही. (नसे म्हणायला हवे. कारण सध्याच्या युगात कर्ज घेणे आणि न फेडणे हाच युगधर्म समजला जातो. असो.) ते न फेडले जाणे हे तर अयोग्यच. अन् कर्ज देणे आणि त्यावरील व्याज खाणे म्हणजे सावकारी तीही चूकच. तर दोन्ही बाजूने फारसा सुखावह नसलेला हा अर्थ. पण का कुणास ठाऊक तो शब्द छान वाटतो आपल्याला आणि आपला काहीतरी ऋणानुबंध असेल असं कोणी म्हटलं की मन सुखावतं. असो. कोणाचंही ऋण घ्यायचं किंवा द्यायचं ठेवू नको रे बाबा भगवंता.

किंवा ऋणानुबंध शब्दा ऐवजी स्नेहानुबंध, प्रेमानुबंध असा काहीतरी नवीन शब्द प्रयोगात आणायला हवा.

- श्रीपाद कोठे 

९ मे २०२३

मंगळवार, ७ मे, २०२४

No comments

 - लंडनच्या एका सर्वेक्षणाची बातमी आहे की, ज्या जोडप्यांचे संयुक्त बँक खाते असते ती जोडपी आनंदित असतात. ज्यांचे वेगळे खाते असते ती आनंदित नसतात. आपल्या एका उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी पती व पत्नीने atm पासवर्ड एकमेकांना सांगू नये असा आदेश दिला होता.

: अतिरेकी आणि विकृत व्यक्तीवाद ही चिंता करण्यासारखीच गोष्ट आहे.

@@@@@@@@@

- ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या राज्याभिषेकावर एक हजार कोटीहून अधिक खर्च झाला. त्याला तिथल्या लोकांनी विरोध केला. एवढेच नाही तर लोक not our king असे फलक घेऊन रस्त्यावर उभे राहिले.

: राजेशाही आणि भांडवलशाही यांच्या शवपेटीवरचा पहिला खिळा म्हणायला काय हरकत आहे?

@@@@@@@@@

नागपूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक फिरते कॅमेरे, cctv शेकडोंच्या संख्येने असूनही; वर्षभरात साडेसहा कोटींच्या चोऱ्या झाल्या.

: तंत्रज्ञान म्हणजे सगळ्या गोष्टींवरील रामबाण उपाय हा समज अजूनही बाळगावा का?

@@@@@@@@@

गुजरात राज्यात पाच वर्षात चाळीस हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत.

: चांगले सरकार असणे, आपल्या हाती सरकार असणे; सुखी व सुव्यवस्थित समाजासाठी पुरेसे असते का? आज भाजप सरकार असल्याने हा प्रश्न भाजपसाठी नाही. त्यापूर्वी अनेक पक्षांची सरकारे देशभर अनेक वर्षे होतीच. समस्या सुटल्या का? मुद्दा फक्त महिला बेपत्ता होण्याचा नसून असंख्य समस्यांचा आहे. अन् मूळ मुद्दा आहे सरकार ही चांगल्या आणि सुखी समाजाची गॅरंटी असते का?

@@@@@@@@@

- अमेरिकेत २०२१ मध्ये ४९ हजार लोकांनी गोळीबाराच्या घटनात जीव गमावला.

: No comments.

#श्रीपादचीलेखणी

(८ मे २०२३)

कृतज्ञता

आपण एखादा लेख लिहितो. मग पूर्णपणे विसरून जातो. इतकं की, कोणी विचारलं तरी आपल्याला सांगता येत नाही की अमुक विषयावर अमुक काही अमुक ठिकाणी लिहिलं आहे. पण कोणीतरी तो जपून ठेवतो किंवा शोधून काढतो. त्या लेखाचा त्याला त्याच्या संशोधन कार्यात काहीतरी थोडाबहुत उपयोग होतो. आपला संशोधन अभ्यास तो प्रकाशित करतो आणि आठवण ठेवून त्या अभ्यासाचा प्रकाशित ग्रंथ आपल्याला धन्यवादासह पाठवतो. हा सगळाच आनंदाचा भाग असतो. रामटेकचे डॉ. मिलिंद चोपकर यांनी आज हा आनंद माझ्या झोळीत टाकला. 'मराठी वनसाहित्य : आस्वादाची अक्षरे' असं त्यांच्या ग्रंथाचं भारदस्त नाव आहे. मराठीतील पाच मान्यवर लेखकांच्या वनविषयक ललितबंधांचा अभ्यास त्यांनी या ग्रंथात मांडला आहे. नागपूरच्या विजय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुमारे ४५० पृष्ठांच्या या ग्रंथात काय आहे हे वाचल्यावरच कळेल, पण ग्रंथाच्या शेवटी दिलेली संदर्भसूची आणि आधार ग्रंथांची सूची चार पानांची आहे यात काय ते समजावे. डॉ. मिलिंद चोपकार यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.

(८ मे २०२३)

शनिवार, ४ मे, २०२४

सामाजिक पाप

स्थानिक प्रशासनाचे लोक अनेकदा वेगवेगळी माहिती विचारायला घरोघरी जातात. पाणी साचलं आहे का? कुलर लागले आहेत का? घरात कोणी आजारी आहेत का? अशी वेगवेगळी माहिती. एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना योग्य ती माहिती देणं आपलं कर्तव्य असतं. पण बहुसंख्य लोक त्यांना फुटवण्यात धन्यता मानतात. हा फक्त व्यक्तिगत अवगुण नाही म्हणता येणार. हे एक प्रकारे सामाजिक पाप म्हटलं पाहिजे.

- श्रीपाद कोठे 

५ मे २०२३