मंगळवार, ६ जून, २०२३

जबाबदारी मुस्लिम समुदायाची

नुपूर शर्मा यांची टिप्पणी अनावश्यकच नाही तर अयोग्य होती. स्वस्वीकृत सभ्यतेला सोडून होती. पण आता oic चे देश काय किंवा देशातील काही नेते काय; नुपूरला देण्याच्या शिक्षेबद्दल वगैरे जे बोलू लागले आहेत, मागणी करू लागले आहेत ते मर्यादा सोडणारे व आचरटपणाचे आहे. मोहम्मद साहेबांबद्दल अनुद्गार योग्य नाहीतच पण भारतात शरियतचा कायदा नाही व नसेल हे कोणीही विसरू नये. शिवाय यानिमित्ताने 'काफिर' कल्पनेला सोडचिठ्ठी देऊन, आपल्याला जी उदारता आणि आदर हवे आहेत, ती उदारता व तो आदर आपल्या वागण्यात असल्याचे मुस्लिम समुदायानेही दाखवून द्यावे.

- श्रीपाद कोठे

७ जून २०२२

सोमवार, ५ जून, २०२३

विरोध कशाला?

एका प्रामाणिक सज्जनाने विचारलं - तुला काय म्हणायचं तेच कळत नाही. तुझा विरोध कशाला असतो तेच समजत नाही. अर्थकारण असो, समाजकारण असो, राजकारण असो, चालू घडामोडी असो, निसर्ग असो, पर्यावरण असो, मनोरंजन असो... कोणताही विषय असो. लिहितो चांगला वगैरे ठीक पण कशाला विरोध? कशाला समर्थन? काहीच समजत नाही.

त्याला म्हटलं - माझा कशालाच विरोध नसतो. अन कशालाच समर्थन. माझा फक्त अविचार आणि अविवेक यांना विरोध असतो. अर्थात मला जो अविचार आणि अविवेक वाटतो त्याला.

त्याला हे समजलं का माहिती नाही. कारण यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

- श्रीपाद कोठे

६ जून २०२२

परिवर्तन

व्यक्तिगत वा सामाजिक परिवर्तन कसं होतं? आजकाल असं समजलं जातं की, खूप टीका केली, दोष दाखवले, चिकित्सा केली, चूक किंवा बरोबर हे सिद्ध केलं, प्रतिपक्षाला निरुत्तर केलं, विखारी बोललं; की परिवर्तन होऊन जातं. किमान या गोष्टींनी परिवर्तन व्हावं ही अपेक्षा असते. परंतु परिवर्तन असं होत नाही. अन सगळ्याच गोष्टींच्या टपरीछाप चर्चा करूनही परिवर्तन होत नाही. होऊ शकत नाही. अनेक गोष्टींची चर्चा पुरेशा गांभीर्याने करायची असते. टवाळकीच्या सुरात किंवा शेरेबाजी करून नाही. आजच एक सूचना फेसबुकवर वाचली की, टीव्ही चर्चा बंद कराव्या. हे कसे होईल माहिती नाही पण अतिशय सार्थ अशी ही सूचना आहे. टीव्ही चर्चांनी नुकसानच जास्त झाले आहे आणि होते. मुख्य म्हणजे विचार ही एक गंभीर बाब आहे याचा विसरच या चर्चांनी पाडलेला आहे. त्या बंद कशा होतील यावर विचार व्हायला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

६ जून २०२२

रविवार, ४ जून, २०२३

अंतरीचा उमाळा हवा

आज पर्यावरण दिवस. वृत्तपत्रे त्याबाबतच्या बातम्या, लेख यांनी भरून जातील. त्यात वावगे काही नाहीच. किमान निसर्गाची, पर्यावरणाची आठवण जागी ठेवण्याचं काम होतं. हेही नसे थोडके हे खरंच आहे, पण हेही नसे पुरेसे हे त्याहून खरं आहे. झाडे लावणे, पाणी वाचवणे, उपभोग मर्यादित करणे; हेही आवश्यक आणि योग्यच. परंतु हे होत नाही असा आपला अनुभव असतो. कोणत्याही स्थानिक वा जागतिक परिषदांनी ठेवलेले एकही लक्ष्य पूर्ण होत नाही. कारण? कारण या सगळ्याच्या मुळाशी भय आणि कोरडा बुद्धिवाद असतो. जीविचा उमाळा त्यात नसतो. पर्यावरण, निसर्ग याबद्दल हा जीविचा उमाळा उत्पन्न झाला पाहिजे. पंचमहाभूते, झाडे, माती, जीवजंतू, पशुपक्षी, माणसे या सगळ्यांबद्दल आतून प्रेम वाटले पाहिजे. आतून प्रेम वाटणे याचा अर्थ विवेकाला तिलांजली नाही. जीवन जगताना अनेक पण परंतु येतीलच. मात्र प्रेमाचा उमाळा असेल तर -

: स्वतःबद्दल थोडे कठोर होणे, permissible limits ला प्राधान्य न देता आणि त्यांची ढाल न करता त्याकडे अपरिहार्य म्हणून पाहणे, सहनशीलता वाढवणे; इत्यादी करता येईल. नाही तर बहाणेबाजी करून निसर्गाशी शत्रुत्व करणे सुरूच राहील.

: थोडासा पालापाचोळा, अंगाला लागणारी माती यांचा बाऊ न करता आणि सौंदर्याच्या अन आरोग्याच्या चकचकीत कल्पना बाजूस सारून योग्य अयोग्य असा विवेक करता येईल.

: शरीराच्या सुखलोलुपतेला मर्यादित करून शारीरिक श्रमांबद्दलची अनास्था आणि तिटकारा बाजूला सारता येईल.

: जाहिराती, प्रचार, बौद्धिक दहशत मोडीत काढून आपले स्वतःचे मापदंड आणि जीवनशैली विकसित करता येतील.

: सौंदर्यासोबतच प्रतिष्ठा, मानसन्मान, उच्च जीवन, high class यांच्या तकलादू आणि दिखाऊ कल्पना बासनात गुंडाळता येतील.

हे सारे केल्याशिवाय पर्यावरण आणि पर्यायाने आपण संतुष्ट होऊ शकणार नाही. त्यासाठी निसर्ग, पर्यावरण याविषयी आंतरिक उमाळा दाटो हीच प्रार्थना.

- श्रीपाद कोठे

५ जून २०२२

शनिवार, ३ जून, २०२३

गुरुजींच्या जीवनातील दोन प्रसंग

आज ज्येष्ठ शुद्ध पंचमी आणि उद्या ५ जून. म्हणजे आज तिथीने व उद्या तारखेने, गोळवलकर गुरुजींचा स्मृतिदिन. 'फुल होंगे शूल सारे, मित्र होंगे सब विरोधक' असं त्यांचं वर्णन करण्यात येतं. त्याचं प्रत्यंतर त्यांच्या जीवनात पाहायलाही मिळतं. बॅ. मुंजे यांच्या स्मारक समितीवर सदस्य म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि बाबू जगजीवनराम यांची संमती मिळवणं काय; किंवा मृत्यूशय्येवर असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, नंतर मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील यासारख्या लोकांनी त्यांना भेटायला डॉ. हेडगेवार भवनात येणे काय; 'मित्र होंगे सब विरोधक' याचंच प्रत्यंतर. त्यांच्या तिरोधानाला आज ४९ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गुरुजींच्या जीवनातील दोन प्रसंग. दोन वेगळ्या गुणांचं दर्शन घडवणारे.

१) विभाजनानंतर साधारण तीनेक आठवड्यांनी म्हणजे ९ सप्टेंबर १९४७ रोजी कराची शहरातल्या शिकारपूर कॉलोनीतील संघ कार्यालयात बॉम्बस्फोट झाला. त्यासाठी पाकिस्तान सरकारने १९ स्वयंसेवकांना अटक केली. खटला चालला आणि बॅ. खानचंदजी यांना आजीवन कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड, तर बाकीच्यांना प्रत्येकी दहा वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड, अशा शिक्षा ठोठावण्यात आल्या. याचा अर्थ होता, या १९ जणांना पाकिस्तानच्या कारागृहातच राम म्हणावे लागणार. संघाचे नेतृत्व यासाठी पुढे सरसावले. भारत आणि पाकिस्तानातील कैद्यांचे हस्तांतरण हाच एक उपाय होता. सरदार पटेल व केंद्रीय प्रशासनाचेही सहकार्य मिळाले आणि कैद्यांच्या हस्तांतरणावर सहमती झाली. पाकिस्तानला भारताच्या कैदेतील जिना यांचे मित्र डॉ. कुरेशी हवे होते. एका कैद्याच्या बदल्यात एक अशी भूमिका पाकिस्तानने घेतली. याचा अर्थ कुरेशीच्या बदल्यात बॅ. खानचंद परत मिळणार. पण बाकी १८ स्वयंसेवकांचे काय? श्री. गुरुजी लगेच कामाला लागले. त्यावेळचे पंजाब सरकारचे सचिव भिडे यांच्या सहकार्याने गुरुजी केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्याशी बोलले आणि कैद्यांचे हस्तांतरण व्यक्तीच्या आधारावर न होता केसच्या आधारावर व्हावे अशी भूमिका त्यांना समजावून सांगितली. काकासाहेबांनी देखील त्याला मान्यता दिली आणि फिरोजपूर येथे होणारे कैद्यांचे हस्तांतरण थांबवले. पाकिस्तानला डॉ. कुरेशी कोणत्याही स्थितीत हवा होता. त्यामुळे महिनाभरानंतर पाकिस्तानने केसच्या आधारावर हस्तांतरणास मान्यता दिली आणि सगळे १९ स्वयंसेवक भारतात परत आले. या १९ स्वयंसेवकांपैकी एक नंद बदलाणी यांना ते पाकिस्तानच्या कारागृहात असताना गुरुजींनी पाठवलेले एक गुप्त पत्रही आता उपलब्ध आहे. भारताच्या आणि संघाच्या इतिहासातील हा एक सुवर्णअध्याय आहे. कृष्णघनाची एक रुपेरी कडा आहे.

२) इ. स. १९७२ च्या संघ शिक्षा वर्गाच्या प्रवासाअंतर्गत २५ मे रोजी ते ग्वाल्हेरच्या संघ शिक्षा वर्गात पोहोचले. वर्गाचे सर्वाधिकारी रामरतन तिवारी यांनी त्यांना 'राष्ट्र रक्षा के मोर्चे पर' हे नवीनच प्रकाशित झालेले पुस्तक दिले. भारत-पाक युद्धाच्या वेळी संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेचे सचित्र वर्णन त्या पुस्तकात होते. पुस्तक पाहून गुरुजी म्हणाले, या प्रकारचे पुस्तक मी स्वीकारू शकत नाही. त्यांनी पुस्तक परत केले. सर्वाधिकाऱ्यांनी तर्क मांडला की, 'या पुस्तकातील सामुग्री भविष्यात इतिहासाचा महत्त्वाचा भाग होईल. याने संघकार्याचा प्रचारही होईल.' गुरुजींचे उत्तर होते - 'कोणी आपल्या आईची सेवा करून त्याची बातमी प्रसिद्ध करेल तर ते उचित होईल का? ते तर स्वाभाविक कर्तव्य आहे. त्यात प्रचार कसला?'

- श्रीपाद कोठे

४ जून २०२२

शुक्रवार, २ जून, २०२३

आपणच आपला जोडीदार

आपण खरंच खूप पुढे आलो आहोत. आता नवीन भगवद्गीता सांगायची वेळ आली आहे. गीता म्हणते - आपणच आपले शत्रू असतो, आपणच आपले मित्र. पण आता या इ.स. २०२२ मध्ये आपण दाखवून दिलं की, आपणच आपला नवरा (किंवा बायको) असू शकतो.

संदर्भ - एक बातमी की, एका गुजराथी मुलीने स्वतःच स्वतःशीच लग्न केले. समारंभपूर्वक. (आता अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला कोण असेल वगैरे शंका नकोत बुवा.) 😀😀

- श्रीपाद कोठे

३ जून २०२२

सत्याच्या मार्गावर

सत्याच्या मार्गावर जपून ठेवावं लागतं पाऊल. पहिल्याच पावलाला नियती उज्वल कोरडेपणा ओटीत घालते. हे अम्लान कोरडेपण वागवावं लागतं अखेरपर्यंत. एखाद्या सम्राज्ञीच्या उन्मत्त डौलाने. समर्थनाच्या चिता पेटवून समर्पणाची धुनी जागवावी लागते प्रत्येक पावलावर. नेत्रांची प्रखर दीप्तीची सवय मोडून काढावी लागते अन करावा लागतो सराव अंधुक प्रकाशातही पाऊल योग्य त्याच ठिकाणी ठेवण्याचा. असमर्थ खांद्यांनी पेलावे लागते सत्याचे जडशीळ ओझे. स्वतःच्या अस्तित्वभारासकट. मेघांची अल्लडता नाही बांधता येत पदरात. मृगजळानेच भागवावी लागते तहान अगणित काळ पिच्छा पुरवणारी. आपल्याच सावलीलाही व्हावे लागते पारखे. विश्रांतीला द्यावी लागते तिलांजली आत्मरक्तात भिजवून. गाडून टाकावी लागते समजूत, आपल्याला कंठ असण्याची. प्रश्नांचे उमाळे दाबून टाकावे लागतात स्वीकाराच्या मृण्मय मृत्तिकेने. त्यातूनच फुटतात कोंब इवलाले सत्याच्या बिजाला. अन पोळलेल्या पावलांना शीतलता देण्यासाठी वाढू लागतो त्याचा वृक्ष. तोवर धरावा लागतो दम. म्हणूनच जपून ठेवावं लागतं पाऊल सत्याच्या मार्गावर.

- श्रीपाद कोठे

३ जून २०२२