बुधवार, २४ जानेवारी, २०२४

कचरा ! कचरा !!

पंतप्रधान मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने स्वच्छता हा विषय सामाजिक विषयांच्या मुख्य प्रवाहात आला. त्यानंतर त्यावर विचारही सुरू झाला. त्यातूनच ओला कचरा, कोरडा कचरा, ई कचरा; या कल्पनाही विकसित झाल्या. मात्र तेवढेच पुरेसे नाही. त्यावर प्रत्यक्ष काम होण्याची जेवढी गरज आहे, तेवढीच स्वच्छता, कचरा या गोष्टींबाबत विचार होणे आणि वैचारिक प्रबोधन याचीही गरज आहे. त्यात कचऱ्याचे प्रकार, कचऱ्याची विल्हेवाट यासोबतच मानसिकता, दृष्टी, सवयी यांचाही समावेश आवश्यक आहे.

ओला, कोरडा आणि ई कचरा; या तीन प्रकारांसोबतच नैसर्गिक कचरा आणि मानवनिर्मित कचरा असेही वर्गीकरण करायला हवे. सोबतच नैसर्गिक आणि मानवनिर्मित यांचे मिश्रण असाही एक प्रकार करावा लागेल. जसे - झाडांचा पालापाचोळा, झाडांची गळून पडणारी फुले, फळे; मोडणाऱ्या फांद्या; पक्ष्यांची गळणारी पिसे इत्यादी निसर्गनिर्मित कचरा होय. तो होणारच. शिवाय तो टाळता येणे शक्य नाही आणि टाळूही नये. निसर्गनिर्मित कचरा होतो म्हणून झाडे तोडून टाका, झाडे लावू नका, पक्षी येऊ नयेत म्हणून उपाय करा; असा विचार करणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. झाडे, जैवविविधता टिकवणे, वाढवणे, त्यांचे संरक्षण हे मानवी स्वार्थ म्हणून सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे नैसर्गिक कचऱ्याला फार तर necessary evil म्हणता येईल. ती एक आवश्यक आणि अपरिहार्य अशी अडचण म्हणावी लागेल.

दुसरा प्रकार आहे मानवनिर्मित. तो मात्र अजिबात आवश्यक नाही आणि अपरिहार्यही नाही. माणूस ज्या ज्या गोष्टींचा वापर करतो त्या त्या गोष्टींपासून होणाऱ्या कचऱ्याची; जसे वेष्टन, उरलेला भाग, अनुपयुक्त भाग इत्यादी; जबाबदारी संबंधित माणसांनी घ्यायला हवी. प्लास्टिक, लोखंड, अन्न, साली देठे, कपडे, कागद इत्यादी इत्यादी आपले आपण जमा करणे आणि कचरागाडी किंवा त्यासाठीच्या सार्वजनिक व्यवस्थेत टाकण्याचे काम प्रत्येकाने करावे. पण असे होतेच असे म्हणता येत नाही. एक तर बेजबाबदारपणामुळे असा कचरा लोक कुठेही आणि कसाही टाकतात. विशेषत: झाडाचा पालापाचोळा असेल तिथे टाकून देतात. याच सवयीसाठी नैसर्गिक कचरा आणि मानवनिर्मित कचरा हा फरक समजून घ्यायला हवा. नैसर्गिक कचरा आपण थांबवू शकत नाही, मानवनिर्मित कचरा आपण थांबवू शकतो हा त्या दोनमधील मुख्य फरक आहे. शिवाय पालापाचोळा सडत नाही. तो सहजपणे फार परिश्रम न करता गोळाही करता येतो. पण त्यात मानवनिर्मित कचरा टाकला तर तो सडतो. शिवाय तो घाण होतो आणि गोळा करणे त्रासाचे होते. त्यामुळे मानवनिर्मित कचरा आणि नैसर्गिक कचरा यांना एक समजणे टाळले पाहिजे.

सावली, पाणी, मातीची धारणक्षमता, प्राणवायू, प्रदूषण नियंत्रण यासाठी नैसर्गिक कचरा आपल्याला सहन केलाच पाहिजे. अर्थात तो साफ करत राहणे आवश्यक. पण दहा वीस पाने पडली म्हणून आकाशपाताळ एक करणे वा फार अस्वस्थ होणे याला अर्थ नाही. स्वच्छतेच्या कथित आधुनिक कल्पना डोक्यात ठेवून झाडे आणि थोडा पालापाचोळा यांचा द्वेष करता कामा नये. या नैसर्गिक कचऱ्याबाबत आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, निसर्ग माणसाइतका वाईट आणि क्षुद्र मनाचा नसल्यामुळे; तो आपला परका असा भेद करत नाही. सावली, फुले, फळे वा प्राणवायू देताना झाडे माणसामाणसात जसा भेद करत नाहीत, तसेच गळणारी पाने उडवणारा वाराही माणसामाणसात भेद करत नाही. त्यामुळे आजूबाजूची झाडे आपली नसली, आपण लावलेली नसली तरीही त्यांचा पाचोळा आपल्या हद्दीत येतो वा येऊ शकतो. तो वाहतुकीच्या, जाण्यायेण्याच्या मार्गात येणार नाही असा बाजूला जमा करून ठेवता येतो किंवा सरळ सरळ आपल्या हद्दीतील पाचोळा गोळा करून आपल्या कचरापेटीत जमा करून येणाऱ्या गाडीत टाकता येतो. परंतु त्यासाठी मन थोडे मोठे केले पाहिजे. थोडासा पालापाचोळा गोळा करणे आणि टाकणे हे फार कष्टाचे काम नाही आणि त्यात मान अपमान आणण्याचे कारण नाही; हे स्वतः स्वतःला समजावले पाहिजे.

मानवनिर्मित कचरा ही मात्र प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी असते. ही जबाबदारी घेताना आपल्या सवयींचा सुद्धा विचार करायला हवा. त्या बदलायला हव्या. मानसिकता नीटनेटकी करायला हवी. जसे - उरणारे अन्न वा भाज्यांचा कचरा इत्यादी गायी कुत्रे यांच्यासाठी बाहेर रस्त्यावर टाकण्याची सवय आणि मानसिकता सोडून द्यावी लागेल. त्यात भूतदया असली तरीही आता काळ बदललेला आहे हे लक्षात घ्यावे लागेल. एकीकडे महानगरे उभी होत आहेत. या महानगरीय जीवनाचा उदोउदो आपण करत आहोत, ते जीवन हपापल्यासारखे अधिकाधिक स्वीकारत आहोत आणि ग्राम संस्कृतीतल्या सवयी सुद्धा आपल्याला घट्ट धरून ठेवायच्या आहेत, हे बरोबर नाही. गायी आणि कुत्री त्यांचे त्यांचे पाहून घेतील किंवा त्यांना द्यायचेच असेल तर त्यासाठी वेगळी व्यवस्था तयार करावी; पण भूतदायेच्या नावाने रस्ते आणि सार्वजनिक जागा घाण करू नयेत. अन्न कचऱ्यात टाकणे बरे वाटत नाही, हाही एक पैलू आहे. तो बरोबरच आहे. पण जे अन्न कचऱ्यात टाकताना आपल्या मनात अपराध वा पापाची जाणीव असते; ते अन्न उघड्यावर टाकताना ती अपराध वा पापाची जाणीव आपल्याला का होत नाही? असे अन्न विटते, त्याची घाण येते, ते खाणारे प्राणी आजूबाजूला घाण करून ठेवतात; हे सगळे आपल्याला का चालते? आपण आपल्याला कठोरपणे तपासायला हवे. मुळात कोणाला राग आला तरी चालेल, पण एक प्रश्न विचारायला हवा की, आपण बेताचे अन्न का शिजवू शकत नाही? याही बाबतीत - बेताचे अन्न शिजवणे म्हणजे कंजूषपणा किंवा आपण शिजवलेल्या अन्नात आणखी चार दोन जेवणारे सामावले पाहिजेत; असे ग्राम संस्कृतीतील समज आता टाकून दिलेच पाहिजेत. याउपर समजा कधी काही उरलेच तर ते खाऊन संपविण्याची सवय लावून घेतली पाहिजे. शिळे खाऊ नये इत्यादी आरोग्यशास्त्र सांगताना, शिळे उरणारच नाही याची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. सोबत हेही समजून घ्यावे की, लाखो लोक शिळे वगैरे खातात पण ते मरत वगैरे नाहीत किंवा सगळेच काही असाध्य रोगाने पीडित होत नाहीत. अन् शिळे खाऊ नये हे सांगताना; केक. पिझ्झा, ब्रेड वगैरे आपण फ्रीजमध्ये ठेवून खात राहतो हेही विसरून नये. एखादा आरोग्य विषयक सिद्धांत सुद्धा किती ताणायचा याचा विवेक करता यायला हवा.

कुत्र्यांना फिरायला नेणे आणि बाहेर घाण करून ठेवणे हे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा संयुक्त कचऱ्याचे उदाहरण आहे. कुत्र्याने घाण करणे निसर्गनिर्मित असले आणि कुत्र्याला त्याची जाण नसणे स्वाभाविक असले तरीही कुत्रा पाळणाऱ्यांचा त्यात सहभाग हा मानवनिर्मित आहे. त्यामुळे कुत्र्यांनी केलेल्या घाणीची जबाबदारी त्यांच्या मालकाचीच असते. याची जाणीव मालकांना असायला हवी.

माणूस हा विचारी प्राणी आहे असं समजून हे लिहिलं आहे. तसे आपण आहोत की नाही हे ज्याचे त्याने पहावे, ठरवावे.

- श्रीपाद कोठे

बुधवार, २५ जानेवारी २०२३

रविवार, २१ जानेवारी, २०२४

अनोखा रंग

एक बातमी वाचली. थोडी वाह्यात आहे पण एक समाजशास्त्रीय वास्तव म्हणून महत्त्वाची. इंग्लंडमध्ये एका नवीन प्रकारच्या रंगाने घराच्या कुंपणभिंती रंगवणार आहेत. यात विशेष काय? विशेष हे की, जो कोणी या रंगाने रंगवलेल्या भिंतीवर सू करेल त्याच्यावरच ही सू उलटून येईल आणि त्याला त्याच्याच सूने आंघोळ घालेल. समाजशास्त्रीय वास्तव हे की, भिंतीवर सू करणे ही गोष्ट फक्त मागासलेल्या भारतातच आहे असे नाही, तर पुढारलेल्या, विकसित, अत्याधुनिक अशा इंग्लंडमध्ये सुद्धा आहे. 😀😎😭

- श्रीपाद कोठे

२२ जानेवारी २०२३

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

संपत्तीचा प्रश्न

देशातील २१ अब्जाधीश (२१ लाख, २१ हजार किंवा २१ शे सुद्धा नव्हे; फक्त २१) लोकांकडे; ७० कोटी लोकांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचा एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. संपत्तीचे केंद्रीकरण आणि संपत्ती संचय, असे दोन विषय यात अंतर्भूत आहेत. हिंदुत्वाच्या अर्थविचाराला हे दोन्ही अमान्य आहे. हिंदुत्वाच्या सामाजिक व राजकीय अंगांची जेवढी चर्चा होते, त्या संबंधात जेवढे विषय आणि मुद्दे पुढे येतात; तेवढी तर सोडाच पण त्याच्या पासंगाला पुरेल एवढीही चर्चा हिंदुत्वाच्या आर्थिक अंगांची होत नाही. उलट, सामाजिक व राजकीय अंगाने हिंदुत्वाचे जोरदार समर्थन करणारे असंख्य लोक, आर्थिक बाबतीत हिंदुत्वाला उभा आडवा छेद देणाऱ्या भूमिकाच घेतात. अगदी ताज्या अहवालाचेच उदाहरण घेतले तरी; २१ अब्जाधीश लोक ७० कोटी लोकांहून अधिक संपत्ती बाळगतात यात त्यांना काहीही वावगे वाटत नाही आणि हे कसे होते वा होऊ शकते हे प्रश्नही त्यांना पडत नाहीत. उलट यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही असेच त्यांचे मत असते. दुसरीकडे सगळ्या आर्थिक प्रश्नांसाठी अभावग्रस्त वा गरीब लोकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती, त्यांच्यासाठी असलेल्या योजना; या गोष्टीच जबाबदार असल्याची त्यांची अतूट श्रद्धा असते. अब्जाधीशांना मिळणाऱ्या सवलती, धनदांडग्यांकडून होणारा अपहार, आर्थिक फसवणूक, शोषण, त्यांचे कर्जबुडवेपण; आदींचा अशा लोकांना गंधही नसतो. शिवाय या प्रक्रियेत आपण हळूहळू मानवीय आणि आध्यात्मिक दृष्टीने कंगाल होतो याची जाणीव होणे तर दूरच. परिस्थिती फार भीषण आहे. योग्य चर्चा आणि दिशा कशी मिळेल हा मोठाच प्रश्न आहे. समस्या सोडवण्याचा पुरुषार्थ करण्याच्या वल्गना करणाऱ्यांपेक्षा, यच्चयावत प्रत्येक भूतमात्राच्या सुख व कल्याणाच्या भावनेने/ विचाराने डोळ्यांच्या कडा ओलावणारे लोक खूप अधिक प्रमाणात असणं हेच त्याचं उत्तर असू शकेल.

- श्रीपाद कोठे

१८ जानेवारी २०२३

रविवार, ७ जानेवारी, २०२४

science congress

नागपूरला नुकतीच science congress झाली. या भव्य आयोजनात अनेक विषयांचा समावेश होता. त्यातील एका कार्यक्रमाचं वृत्त वाचताना मात्र थोडं खटकलं. त्या कार्यक्रमात मुख्य विषय मांडणाऱ्या व्यक्तीने मत मांडलं की, आपल्याला सिंड्रेला नको, सायबेरेला हवी. विज्ञान आणि महिला/ मुली असा विषय होता. खटकलं हे की, सिंड्रेला का नको? सायबेरेला हवी हे ठीक आहे पण सिंड्रेला का नको? मानवी भावविश्व, स्वप्नविश्व, कल्पनाविश्व, परीविश्व, हळूवारपणा, कोमलता, ऋजुता, सौंदर्य; या गोष्टी नाकारून आपण मनुष्य जीवन/ स्त्री जीवन एकांगी आणि साचेबद्ध का करावं? विज्ञान, बुद्धिवाद, तर्क इत्यादींचे जसे जीवनात स्थान आहे; तसेच अन्य गोष्टींचेही आहे. मानवी जीवन कोरडे, रखरखीत बनवणारी विज्ञानाची मांडणी योग्य वाटत नाही. विज्ञान पक्षाच्या लोकांनी एकांगी असू नये, जीवनाकडे समग्रतेने पहावे.

- श्रीपाद कोठे

८ जानेवारी २०२३

त्यांनी नवा सिंड्रेला सिनेमा पाहिला नसेल. नवी सिंड्रेला नुसती तारणहार राजपुत्राची वाट पाहत नाही, स्वतःची स्वप्न स्वतः खरी करते. ती स्त्रीचे मूलभूत आणि नैसर्गिक गुण न सोडताही आधुनिक आहे, स्त्रीवादी नसूनही मुक्त आहे. (मोहिनी मोडक)

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

सुबुद्ध करणारे पक्ष हवेत

काही संतांनी अयोध्येत शाहरुख खानची तेरवी करणे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्यावरून भाजपने काँग्रेसवर टीका करणे; या दोन्ही गोष्टी अजिबात न पटणाऱ्या. समाजाला फक्त भांडखोर आणि निर्बुद्ध करणारे पक्ष, संस्था आणि लोक काय कामाचे? राजकारण, समाजकारण, धर्मकारण करतानाच समाज सुबुद्ध व्हावा; याची काळजी घेणारे पक्ष, संस्था, लोक हवेत.

**********

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सी ई ओ चंदा कोचर यांच्यानंतर व्हिडिओकॉन चे वेणुगोपाल धुत यांनाही अटक झाली आहे. शिवाय कॅग ने सादर केलेल्या ताज्या अहवालाची बातमीही आज आहे. विविध संस्थांनी अनधिकृतपणे २१ हजार कोटी रुपयांची करचोरी केल्याचा. त्यात गुजरात आणि उत्तरप्रदेश सह देशभरातील संस्थांचा समावेश आहे. आणखीनही बऱ्याच गोष्टी समोर येत असतात. ही बौद्धिक गुन्हेगारी म्हणता येईल. गुन्हेगारीचे वेगवेगळे विश्लेषण होते. त्यात बौद्धिक गुन्हेगारी असं विश्लेषण आणि अभ्यास माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण हा खूप मोठा विषय आहे. कोणाला अभ्यास करायचा असेल तर मी मार्गदर्शन आणि मदत करू शकेन. अर्थात मला गुरुदक्षिणा देणाऱ्यांना.

- श्रीपाद कोठे

२७ डिसेंबर २०२२

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

मोफत धान्य वाटप

चीन, अमेरिकेतील कोरोना उद्रेक पाहता; गरीबांना मोफत धान्य देण्याची योजना सरकारने एक वर्ष वाढवली आहे. ८० कोटी लोकांना त्याचा लाभ होणार आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही आणि ते सरकारचे कर्तव्यही आहे. परंतु या निर्णयाचा अर्थ हा होतो की, १३५ कोटी देशवासीयांपैकी ८० कोटी लोक असे आहेत जे धान्य विकत घेऊ शकत नाहीत. हे वास्तव मात्र भूषणावह नाही. जागतिकीकरण, तेल, युद्ध इत्यादी चर्चा आणि तर्क पुष्कळ होऊन गेले आहेत. काँग्रेस आणि भाजपशिवायच्या पक्षांची सरकारे याचाही चोथा झालेला आहे. भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याला साडेआठ वर्षे झालेली आहेत. दीड वर्षाने पुन्हा अशीच एकहाती सत्ता मिळेल असे चित्र आहे. त्यामुळे ८० कोटी लोक स्वतः धान्य खरेदी करू शकत नाहीत ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारीही भाजपची आहे. भाजप समर्थकांनाही ही परिस्थिती कशी बदलेल याची चर्चा करण्याकडे लक्ष वळवले पाहिजे. 

८० कोटी हा धान्य खरेदी करू न शकणाऱ्या लोकांचा आकडा आहे. जे अस्सल, कम अस्सल धान्य खरेदी करतात पण बाकी आर्थिक परिस्थिती यथातथा आहे असे गरीब, निम्न मध्यवर्गीय, मध्यम मध्यावर्गीय असेही कोट्यवधी लोक आहेत. थोडक्यात : समाधानकारक आर्थिक स्थितीत नसलेले शंभर कोटीहून जास्त लोक आहेत. विकास, संपन्नता मोजक्या लोकांकडे आहे. देश व समाज म्हणून हा चिंतेचा विषय व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

२४ डिसेंबर २०२२

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

वानरे

सध्या अयोध्येत असलेल्या एका कार्यकर्त्यांशी आज गप्पा झाल्या. त्यांनी एक गंमत सांगितली. अयोध्येत माकडे खूप आहेत. ती लाल तोंडाची आहेत. एकदम इबलिस. केव्हा काय करतील भरवसा नाही. त्यामुळे राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले तेव्हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता. त्यांना कोणीतरी एक जालीम उपाय सांगितला आणि तो यशस्वी पण झाला. लाल तोंडाची ही माकडे काळ्या तोंडाच्या माकडांना घाबरतात. मग पोलिसांनी काळ्या तोंडाचे हुप्पे आणले अन् त्यांना अयोध्येत फिरवले. कार्यक्रमाच्या दोन चार दिवस आधी या काळ्या तोंडाच्या वानारांना पोलिसांनी फिरवले. अन् लाल तोंडाची ही इबलीस माकडे पंधरा दिवस अयोध्येतून गायब होती.

#अयोध्या

- श्रीपाद कोठे

२१ डिसेंबर २०२२