बुधवार, २४ जानेवारी, २०२४

कचरा ! कचरा !!

पंतप्रधान मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने स्वच्छता हा विषय सामाजिक विषयांच्या मुख्य प्रवाहात आला. त्यानंतर त्यावर विचारही सुरू झाला. त्यातूनच ओला कचरा, कोरडा कचरा, ई कचरा; या कल्पनाही विकसित झाल्या. मात्र तेवढेच पुरेसे नाही. त्यावर प्रत्यक्ष काम होण्याची जेवढी गरज आहे, तेवढीच स्वच्छता, कचरा या गोष्टींबाबत विचार होणे आणि वैचारिक प्रबोधन याचीही गरज आहे. त्यात कचऱ्याचे प्रकार, कचऱ्याची विल्हेवाट यासोबतच मानसिकता, दृष्टी, सवयी यांचाही समावेश आवश्यक आहे.

ओला, कोरडा आणि ई कचरा; या तीन प्रकारांसोबतच नैसर्गिक कचरा आणि मानवनिर्मित कचरा असेही वर्गीकरण करायला हवे. सोबतच नैसर्गिक आणि मानवनिर्मित यांचे मिश्रण असाही एक प्रकार करावा लागेल. जसे - झाडांचा पालापाचोळा, झाडांची गळून पडणारी फुले, फळे; मोडणाऱ्या फांद्या; पक्ष्यांची गळणारी पिसे इत्यादी निसर्गनिर्मित कचरा होय. तो होणारच. शिवाय तो टाळता येणे शक्य नाही आणि टाळूही नये. निसर्गनिर्मित कचरा होतो म्हणून झाडे तोडून टाका, झाडे लावू नका, पक्षी येऊ नयेत म्हणून उपाय करा; असा विचार करणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. झाडे, जैवविविधता टिकवणे, वाढवणे, त्यांचे संरक्षण हे मानवी स्वार्थ म्हणून सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे नैसर्गिक कचऱ्याला फार तर necessary evil म्हणता येईल. ती एक आवश्यक आणि अपरिहार्य अशी अडचण म्हणावी लागेल.

दुसरा प्रकार आहे मानवनिर्मित. तो मात्र अजिबात आवश्यक नाही आणि अपरिहार्यही नाही. माणूस ज्या ज्या गोष्टींचा वापर करतो त्या त्या गोष्टींपासून होणाऱ्या कचऱ्याची; जसे वेष्टन, उरलेला भाग, अनुपयुक्त भाग इत्यादी; जबाबदारी संबंधित माणसांनी घ्यायला हवी. प्लास्टिक, लोखंड, अन्न, साली देठे, कपडे, कागद इत्यादी इत्यादी आपले आपण जमा करणे आणि कचरागाडी किंवा त्यासाठीच्या सार्वजनिक व्यवस्थेत टाकण्याचे काम प्रत्येकाने करावे. पण असे होतेच असे म्हणता येत नाही. एक तर बेजबाबदारपणामुळे असा कचरा लोक कुठेही आणि कसाही टाकतात. विशेषत: झाडाचा पालापाचोळा असेल तिथे टाकून देतात. याच सवयीसाठी नैसर्गिक कचरा आणि मानवनिर्मित कचरा हा फरक समजून घ्यायला हवा. नैसर्गिक कचरा आपण थांबवू शकत नाही, मानवनिर्मित कचरा आपण थांबवू शकतो हा त्या दोनमधील मुख्य फरक आहे. शिवाय पालापाचोळा सडत नाही. तो सहजपणे फार परिश्रम न करता गोळाही करता येतो. पण त्यात मानवनिर्मित कचरा टाकला तर तो सडतो. शिवाय तो घाण होतो आणि गोळा करणे त्रासाचे होते. त्यामुळे मानवनिर्मित कचरा आणि नैसर्गिक कचरा यांना एक समजणे टाळले पाहिजे.

सावली, पाणी, मातीची धारणक्षमता, प्राणवायू, प्रदूषण नियंत्रण यासाठी नैसर्गिक कचरा आपल्याला सहन केलाच पाहिजे. अर्थात तो साफ करत राहणे आवश्यक. पण दहा वीस पाने पडली म्हणून आकाशपाताळ एक करणे वा फार अस्वस्थ होणे याला अर्थ नाही. स्वच्छतेच्या कथित आधुनिक कल्पना डोक्यात ठेवून झाडे आणि थोडा पालापाचोळा यांचा द्वेष करता कामा नये. या नैसर्गिक कचऱ्याबाबत आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, निसर्ग माणसाइतका वाईट आणि क्षुद्र मनाचा नसल्यामुळे; तो आपला परका असा भेद करत नाही. सावली, फुले, फळे वा प्राणवायू देताना झाडे माणसामाणसात जसा भेद करत नाहीत, तसेच गळणारी पाने उडवणारा वाराही माणसामाणसात भेद करत नाही. त्यामुळे आजूबाजूची झाडे आपली नसली, आपण लावलेली नसली तरीही त्यांचा पाचोळा आपल्या हद्दीत येतो वा येऊ शकतो. तो वाहतुकीच्या, जाण्यायेण्याच्या मार्गात येणार नाही असा बाजूला जमा करून ठेवता येतो किंवा सरळ सरळ आपल्या हद्दीतील पाचोळा गोळा करून आपल्या कचरापेटीत जमा करून येणाऱ्या गाडीत टाकता येतो. परंतु त्यासाठी मन थोडे मोठे केले पाहिजे. थोडासा पालापाचोळा गोळा करणे आणि टाकणे हे फार कष्टाचे काम नाही आणि त्यात मान अपमान आणण्याचे कारण नाही; हे स्वतः स्वतःला समजावले पाहिजे.

मानवनिर्मित कचरा ही मात्र प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी असते. ही जबाबदारी घेताना आपल्या सवयींचा सुद्धा विचार करायला हवा. त्या बदलायला हव्या. मानसिकता नीटनेटकी करायला हवी. जसे - उरणारे अन्न वा भाज्यांचा कचरा इत्यादी गायी कुत्रे यांच्यासाठी बाहेर रस्त्यावर टाकण्याची सवय आणि मानसिकता सोडून द्यावी लागेल. त्यात भूतदया असली तरीही आता काळ बदललेला आहे हे लक्षात घ्यावे लागेल. एकीकडे महानगरे उभी होत आहेत. या महानगरीय जीवनाचा उदोउदो आपण करत आहोत, ते जीवन हपापल्यासारखे अधिकाधिक स्वीकारत आहोत आणि ग्राम संस्कृतीतल्या सवयी सुद्धा आपल्याला घट्ट धरून ठेवायच्या आहेत, हे बरोबर नाही. गायी आणि कुत्री त्यांचे त्यांचे पाहून घेतील किंवा त्यांना द्यायचेच असेल तर त्यासाठी वेगळी व्यवस्था तयार करावी; पण भूतदायेच्या नावाने रस्ते आणि सार्वजनिक जागा घाण करू नयेत. अन्न कचऱ्यात टाकणे बरे वाटत नाही, हाही एक पैलू आहे. तो बरोबरच आहे. पण जे अन्न कचऱ्यात टाकताना आपल्या मनात अपराध वा पापाची जाणीव असते; ते अन्न उघड्यावर टाकताना ती अपराध वा पापाची जाणीव आपल्याला का होत नाही? असे अन्न विटते, त्याची घाण येते, ते खाणारे प्राणी आजूबाजूला घाण करून ठेवतात; हे सगळे आपल्याला का चालते? आपण आपल्याला कठोरपणे तपासायला हवे. मुळात कोणाला राग आला तरी चालेल, पण एक प्रश्न विचारायला हवा की, आपण बेताचे अन्न का शिजवू शकत नाही? याही बाबतीत - बेताचे अन्न शिजवणे म्हणजे कंजूषपणा किंवा आपण शिजवलेल्या अन्नात आणखी चार दोन जेवणारे सामावले पाहिजेत; असे ग्राम संस्कृतीतील समज आता टाकून दिलेच पाहिजेत. याउपर समजा कधी काही उरलेच तर ते खाऊन संपविण्याची सवय लावून घेतली पाहिजे. शिळे खाऊ नये इत्यादी आरोग्यशास्त्र सांगताना, शिळे उरणारच नाही याची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. सोबत हेही समजून घ्यावे की, लाखो लोक शिळे वगैरे खातात पण ते मरत वगैरे नाहीत किंवा सगळेच काही असाध्य रोगाने पीडित होत नाहीत. अन् शिळे खाऊ नये हे सांगताना; केक. पिझ्झा, ब्रेड वगैरे आपण फ्रीजमध्ये ठेवून खात राहतो हेही विसरून नये. एखादा आरोग्य विषयक सिद्धांत सुद्धा किती ताणायचा याचा विवेक करता यायला हवा.

कुत्र्यांना फिरायला नेणे आणि बाहेर घाण करून ठेवणे हे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा संयुक्त कचऱ्याचे उदाहरण आहे. कुत्र्याने घाण करणे निसर्गनिर्मित असले आणि कुत्र्याला त्याची जाण नसणे स्वाभाविक असले तरीही कुत्रा पाळणाऱ्यांचा त्यात सहभाग हा मानवनिर्मित आहे. त्यामुळे कुत्र्यांनी केलेल्या घाणीची जबाबदारी त्यांच्या मालकाचीच असते. याची जाणीव मालकांना असायला हवी.

माणूस हा विचारी प्राणी आहे असं समजून हे लिहिलं आहे. तसे आपण आहोत की नाही हे ज्याचे त्याने पहावे, ठरवावे.

- श्रीपाद कोठे

बुधवार, २५ जानेवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा