देशातील २१ अब्जाधीश (२१ लाख, २१ हजार किंवा २१ शे सुद्धा नव्हे; फक्त २१) लोकांकडे; ७० कोटी लोकांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचा एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. संपत्तीचे केंद्रीकरण आणि संपत्ती संचय, असे दोन विषय यात अंतर्भूत आहेत. हिंदुत्वाच्या अर्थविचाराला हे दोन्ही अमान्य आहे. हिंदुत्वाच्या सामाजिक व राजकीय अंगांची जेवढी चर्चा होते, त्या संबंधात जेवढे विषय आणि मुद्दे पुढे येतात; तेवढी तर सोडाच पण त्याच्या पासंगाला पुरेल एवढीही चर्चा हिंदुत्वाच्या आर्थिक अंगांची होत नाही. उलट, सामाजिक व राजकीय अंगाने हिंदुत्वाचे जोरदार समर्थन करणारे असंख्य लोक, आर्थिक बाबतीत हिंदुत्वाला उभा आडवा छेद देणाऱ्या भूमिकाच घेतात. अगदी ताज्या अहवालाचेच उदाहरण घेतले तरी; २१ अब्जाधीश लोक ७० कोटी लोकांहून अधिक संपत्ती बाळगतात यात त्यांना काहीही वावगे वाटत नाही आणि हे कसे होते वा होऊ शकते हे प्रश्नही त्यांना पडत नाहीत. उलट यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही असेच त्यांचे मत असते. दुसरीकडे सगळ्या आर्थिक प्रश्नांसाठी अभावग्रस्त वा गरीब लोकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती, त्यांच्यासाठी असलेल्या योजना; या गोष्टीच जबाबदार असल्याची त्यांची अतूट श्रद्धा असते. अब्जाधीशांना मिळणाऱ्या सवलती, धनदांडग्यांकडून होणारा अपहार, आर्थिक फसवणूक, शोषण, त्यांचे कर्जबुडवेपण; आदींचा अशा लोकांना गंधही नसतो. शिवाय या प्रक्रियेत आपण हळूहळू मानवीय आणि आध्यात्मिक दृष्टीने कंगाल होतो याची जाणीव होणे तर दूरच. परिस्थिती फार भीषण आहे. योग्य चर्चा आणि दिशा कशी मिळेल हा मोठाच प्रश्न आहे. समस्या सोडवण्याचा पुरुषार्थ करण्याच्या वल्गना करणाऱ्यांपेक्षा, यच्चयावत प्रत्येक भूतमात्राच्या सुख व कल्याणाच्या भावनेने/ विचाराने डोळ्यांच्या कडा ओलावणारे लोक खूप अधिक प्रमाणात असणं हेच त्याचं उत्तर असू शकेल.
- श्रीपाद कोठे
१८ जानेवारी २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा