रात्री ११-१२ वाजताच्या सुमारास डीजे बंद करा म्हणून सांगायला गेलेल्या एका वृद्धाला ७-८ जणांनी मारहाण केली आणि त्याच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. नागपुरात २० मे रोजी रात्री ही घटना घडली. अशा प्रकारच्या अनेक घटना आपण आजुबाजूला पाहत असतो, वाचत असतो आणि विसरून जातो. `आवाज' या गोष्टीचं इतकं प्रचंड वेड आपल्याला का आहे समजत नाही. अगदी चढाओढ सुरू असते कोण किती मोठ्या आवाजात गाणी लावू शकतो याची. आमच्याकडे काही सण-समारंभ आहे, आनंदाचा प्रसंग आहे हे इतक्या कर्कश्शपणे जगाला सांगितलेच पाहिजे का? आणि कशासाठी? आपला आनंद आपण साजरा करा ना! शक्य झाले तर आजुबाजूच्यांना त्यात सहभागी करून घेता आले तर पाहा. पण सगळ्यांच्या (आणि स्वत:च्याही) कानांचे पडदे फाडण्याचा हा अट्टाहास कशासाठी? एवढीच हौस असेल तर कानाला इअर फोन लावून वाजवा ना कितीही मोठ्याने गाणी. स्वत:च्या कानाचे पडदे फाडा. विद्यार्थ्यांचा अभ्यास, रुग्णांच्या तब्येती, वृद्धांचा निवांतपणा हे सारे हिरावून घेण्याचा आम्हाला काय अधिकार? यात धार्मिक आयोजनेही मागे नसतात. वास्तविक धार्मिक आयोजनांनी दुसर्यांचा विचार, समाजाचा विचार प्रथम करायला हवा. ही आयोजने व्यक्तीच्या अंत:करणापर्यंत पोहोचायला हवीत. पण कर्णकर्कश्श आवाजाच्या हट्टापायी ती माणसांच्या अंत:करणापासून दूरच जातात याचेही भान आयोजकांना नसते. अनेकदा तर या आवाजामुळे घरातील व्यवहारही नीट होऊ शकत नाहीत. टीव्ही, रेडिओ वा आपल्याला हवे ते ऐकणे किंवा एकमेकांशी बोलणे सुद्धा दुरापास्त होते. घराघरातील आवाजाचे वेडही काही कमी नाही. प्रमाण नावाची गोष्टच आम्ही विसरलो आहोत. ध्वनीप्रदूषणाबाबत कायदे आहेत, नियम आहेत. पण या सार्याकडे स्वत:हून लक्ष द्यायला पोलिस व अन्य यंत्रणांना वेड थोडेच लागले आहे? बरे या विचारशून्य, विवेकशून्य वृत्तीवर स्पष्टपणे आणि वारंवार बोलून अशा वृत्तींवर एक सामाजिक नियंत्रण आणले जाऊ शकते. पण इथे वेळ कुणाला आहे आणि मुख्य म्हणजे वाईटपणा कोण घेईल? त्यापेक्षा त्रास सहन करावा. नाहीतरी आपली परंपराच आहे ना सहिष्णुतेची? नाशिक शहरात बैंडबाजा, डीजे, वराती यावर बंदी घातली आहे अशी बातमी गेल्या आठवड्यात पाहिली. पण बंदी काय उठवलीही जाऊ शकते. नाही का? महान राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहणारी आम्ही लहान माणसे विचारी अन् संवेदनशील होणार आहोत का?
-श्रीपाद कोठे
शनिवार, २१ मे २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा