रविवार, २२ मे, २०११

म्हातारा न इतुका...

दोन दिवस झाले कनिमोझी हे नाव सर्वत्र चर्चेत आहे. अनेक वर्षे तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद भूषविलेले एम्. करूणानिधी यांची ही कन्या. आजवरचा सर्वात मोठा समजला जाणारा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा. त्यातील कनिमोझीचा सहभाग. त्याचे अर्थकारण, अनर्थकारण, राजकारण वगैरे वगैरे चर्चा सार्यांना ठाऊक आहेत. माझ्या मनात मात्र एकच गोष्ट पिंगा घालते आहे. ती म्हणजे करूणानिधी आणि त्यांचं वय. आज या राजकारणपटुचं वय आहे ८७ वर्षे. त्यांना चालता येत नाही. चाकाच्या खुर्चीवरून फिरावं लागतं. या वयात, अशा स्थितीत निवडणुका, राजकारण हे सावरता सावरता आता मुलीच्या अटकेचंही सारं पाहावं लागणार. केवढी ही दगदग, त्रास. हा त्रास त्यांना कोण देतंय? ते स्वत:च. कारण? कारण एकच, खुर्ची सुटत नाही. आपल्या देशात ही कथा काही नवीन नाही. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू, मोरारजी देसाई, हरकिशन सिंह सुरजित, के. करुणाकरन, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी... राजकारणाची पाने चाळून यादी वाढवता येईल. खुर्ची मात्र सुटता सुटत नाही. अन् वाजपेयी यांच्यासारख्या एखाद्याने म्हटले की, आपल्याला राजकारण सोडायचे आहे तर सारी प्रसार माध्यमे केवढा गदारोळ उडवून देतात. एका वयानंतर बाजूला व्हायलाच हवं याचं भान संबंधित व्यक्तीला तर कमीच असतं, पण समाजाचीही त्याला तयारी नसते. योगायोगाने आजच एका वृत्तवाहिनीचे सर्वेक्षण पाहण्यात आले. केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तचे सर्वेक्षण. पंतप्रधान पदासाठी सगळ्यात लायक कोण? या प्रश्नावर लोकांनी डॉ. मनमोहन सिंग यांनाच पहिली पसंती दिली आहे. त्यांनी देशाला अगदी शिखरावर वगैरे नेऊन ठेवले आहे का? आणि त्यांचे वय? तेही ८० च्या घरात आहेतच. पण आपल्याला तेच हवेत. काय आपल्याकडे माणसे नाहीत? आणि समजा नसतील, तरीही संबंधित व्यक्ती आणखी किती काळ पुरणार आहे याचा विचार वगैरे करण्याच्या फंदात आपण पडत नसतोच. नवीन, कमी वयाच्या व्यक्तीने नेतृत्व करावे याला आपण मनाने स्वीकारतच नाही. नवीन व्यक्ती चुकेल कदाचित, पण त्यातूनच तयार होईल आणि भविष्यात नेतृत्व करेल हा विचार आम्हाला शिवतच नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वा ब्रिटनचे पंतप्रधान आपला कार्यकाळ संपल्यावर कुठे असतात, कुठे राहतात, काय करतात हे जाणून घेण्याची सुद्धा आम्ही तसदी घेत नाही. महान राष्ट्राची स्वप्ने पाहणारे आम्ही आमची सरंजामदारी वृत्ती मात्र बदलू शकत नाही.
-श्रीपाद कोठे
रविवार, २२ मे २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा