सोमवार, ३० मे, २०११

सौदेबाजीची सीमारेषा

गौतम गंभीरने आपल्या खांद्याची दुखापत लपवली आणि देश मोठा की आयपीएल मोठे ही चर्चा सुरू झाली. `वेडपटपणाचा कळस' या दोन शब्दात त्याचे वर्णन करता येईल. ही चर्चा उत्पन्नच कशी होऊ शकते? निर्विवादपणे देश मोठा असेच त्याचे उत्तर राहायला हवे. दुर्दैवाने इतके स्पष्ट व निर्विवाद उत्तर आता मिळत नाही. आपलं क्रिकेटवेड हे आता विकृतीपर्यंत पोहोचलं आहे. जगभरातील १५०-२०० देशांपैकी ८-१० देशात खेळल्या जाणार्या क्रिकेटला आम्ही जागतिक वगैरे बनवलं आहेच. ज्या युरोपात त्याचा जन्म झाला तेथे इंग्लंडशिवाय कोणीही तो खेळत नाही. त्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या गुलामगिरीत राहिलेले देश तो खेळतात. त्या गुलामीतून आम्ही बाहेर आलेलोच नाही. बरे एक खेळ म्हणून जरी विचार केला तरी समाजाचा वेळ, पैसा, विचारशक्ती, संकल्पना, व्यवहार, कामकाज, संसाधने या सार्यावर त्याचे जे विपरीत परिणाम होत आहेत त्याचे काय? अगदी आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यातही स्वदेश भावना जगात कुठेही लोप पावलेली नाही. हां कुठे कुठे ती क्षीण झाल्यासारखी दिसते. पण जिथे ती क्षीण झाल्यासारखी दिसते तिथे स्वार्थ प्रबळ आहे हेच दिसून येईल. आयपीएल बाबतही तेच खरे आहे. सारेच लोक सुखासाठी धडपडत असतात. क्रिकेटपटुही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. सारेच काही गांधी, सुभाष, सावरकर नसतात. हे अगदी १०० टक्के खरे आहे. गांधी, सुभाष, सावरकर शतकांमधून कधी तरी जन्माला येत असतात. पण सुखासाठी धडपडतानाही त्याची काही मर्यादा असायला हवी की नको? सुख या गोष्टीचं इतकं हपापलेपण माणसामध्ये निर्माण झालं आहे की, आपण त्याबाबतीत मुक्या प्राण्यांनाही केव्हाच मागे टाकलं आहे. क्षणभर ते बाजूला ठेवू. परंतु तथाकथित सुखासाठी जी सौदेबाजी आज सगळीकडे सुरू आहे तिला मर्यादा असलीच पाहिजे. असं म्हणतात की, दुसर्याचे नाक सुरू होते तिथे तुमच्या स्वातंत्र्याची मर्यादा संपते. देशाचा विचार, समाजाचा विचार जेथे येतो तेथे सुखाच्या सौदेबाजीची सीमारेषा असलीच पाहिजे आणि ती सीमारेषा ओलांडण्याची सूट कुणालाही असता कामा नये. कोणीही कितीही मोठा पैसेवाला, कोणीही कितीही मोठा उद्योगपती, कोणीही कितीही मोठा राजकारणी, कोणीही कितीही मोठा खेळाडू, कोणीही कितीही मोठा विचारवंत असो त्याला हे ठणकावून सांगायलाच हवे. पण हे ठणकावून सांगणार कोण? या महान राष्ट्रातील लहान माणसांनीच हे सांगायला हवे. अगदी अलीकडे जंतरमंतरवर थोड्या प्रमाणात या लहान माणसांनी हे सांगितले. हे मोठ्या प्रमाणावर आणि वारंवार घडायला हवे. मधेमधे येणारे सगळे अडथळे पार करण्याच्या जिद्दीसह.
-श्रीपाद कोठे
सोमवार, ३० मे २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा