दोन मुंग्या समोरासमोर येतात ते आपण नेहमीच पाहतो. अन् दोन वाहने समोरासमोर येतात तेही पाहतो. मुंग्या काहीतरी कुजबुज करतात आणि समजूतदारपणे एक मुंगी बाजूला होऊन निघून जाते. वाहने समोर आल्यावर मात्र ही समजुतदारी का दिसत नाही? पहिला प्रश्न असतो, `दिखता नहीं क्या?' किंवा `दिसत नाही का भाऊ?' खरं तर हा प्रश्न गैर नाहीच. पण हाच प्रश्न त्या विचारणार्यालाही लागू होतोच ना? नंतर मग फुलत जातो एक आनंदसंवाद. म्हणजे आजूबाजुच्यांना आनंद देणारा संवाद. मुळात रस्त्याने वाहन चालवताना माणसे एकमेकांच्या समोर येतातच कशी? आणि समजा कधी चुकून समोरासमोर आलीच तर समजुतदारपणे पुढे का जात नाहीत. अशा वेळी चूक कोणाची आहे हे दोघांनाही माहीत असते, पण ज्याची चूक आहे तो स्वत:हून माफी मागताना दिसत नाही. गुंड लोक सोडले तर कोणी मुद्दाम असे एखाद्याच्या गाडीला आडवे येत नाही. चुकूनच असे होते. पण आपली चूक मान्य करण्यात मात्र आपल्याला एवढा कमीपणा वाटतो की बास!! खरा प्रश्न तर हा आहे की रस्त्यावर आपण डोळे मिटून चालतो का? मग असे प्रसंग येतातच का? वाहतुकीचे नियम पाळणे किंवा समंजसपणे गाडी चालवणे यात कमीपणा वाटण्यासारखे काय आहे? किंवा वाहतुकीचे नियम मोडणे वा कशीही वाहने चालविणे यात पुरुषार्थ तरी कोणता? अशी कोणती घाई लोकांना असते कळत नाही. अन् तरीही वेळेवर न पोहोचणे हेच आम्हा भारतीयांचे वैशिष्ट्य ठरले आहे. वाहतूक पोलिस रस्त्यावर नाही आणि तरीही वाहतूक सुरळीत सुरू आहे हे स्वप्नही पाहण्याची आमची कुवत नाही. खरे तर अशा बेशिस्त वाहतुकीमुळे प्रवासाला वेळ जास्तच लागतो. शिस्तशीर वाहतूक असेल तर प्रवास लवकर होतो. ही साधी गोष्टही आमच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडील असावी? अन् या वागण्याबद्दल आम्हाला ना खंत ना खेद. लहानपणी एक विनोद ऐकल्याचे आठवते. तो खरा की खोटा ठाऊक नाही पण मार्मिक जरुर आहे. रशियाचे एक नेते दिल्लीत आले होते. भारतीय समाज समजून घ्यायचा म्हणून ते रस्त्यावरून फिरायला निघाले. दिल्लीचा फेरफटका मारून ते परत आले. त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर ते म्हणाले, `मी कम्युनिस्ट रशियातून आलो आहे. कम्युनिझमचा देवावर विश्वास नाही, तसाच माझाही देवावर विश्वास नाही. पण आज दिल्लीतील वाहतूक पाहून मात्र मला वाटू लागले आहे की, देव नक्कीच असला पाहिजे. नाही तर आज मी सुखरूप परत येणे अशक्य होते.' यातील आपल्या वाहतुकीवरची टिप्पणी खूप काही सांगून जाते. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आपण वाहतुकीसाठी समाज तयार करू शकलेलो नाही. अशा वाहतुकीने राष्ट्र कसे महान होणार कोणास ठाऊक?
-श्रीपाद कोठे
२७ मे २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा