राज्यात सुरक्षा रक्षक अपुरे आहेत, अशी बातमी वाचली आणि डोळ्यासमोर एक गरीब बिचारं चित्र उभं राहिलं. कुठे तरी कोपर्यात उभा किंवा टाकून दिलेल्या खुर्चीवर बसलेला, अंगावर विशिष्ट असा एखादा गणवेष, गणवेशातील hat एखादेवेळी घातलेली, बहुतेक वेळी काढून हातात घेतलेली किंवा गुडघ्यावर ठेवलेली, चेहर्यावर शून्य भाव, एखादी विशिष्ट व्यक्ती आली तर लगेच सावरून, hat घालून salute मारणारी, दुपारी १-२ च्या सुमारास कुठेतरी जागा पाहून डब्बा खात बसलेली, आजुबाजूला काय चाल्लय, काय काय आहे याची काहीही माहिती नसणारी अशी एक मूर्ति डोळ्यासमोर उभी राहिली. हे चित्र माझ्याच नव्हे सगळ्यांच्याच नित्य पाहण्यातील आहे. असा हा सुरक्षा रक्षक खरंच आपली, एखाद्या दुकानाची, गृहसंकुलाची, कारखान्याची, बँकेची सुरक्षा करू शकेल का, की कोणी त्याची मानगुट पकडली तर आपल्यालाच त्याची सुरक्षा करावी लागेल असा प्रश्न त्यांना पाहताना पडतो. तो सुरक्षा रक्षक आहे याचा अर्थच त्याच्याकडे सामान्य माणसापेक्षा थोड़ी अधिक ताकद असायला हवी. तो थोडासा हट्टाकट्टा, चपळ हालचाली करणारा, धारदार नजरेचा आणि व्यक्तिमत्वाचा, चौकस, चांगली निरीक्षण शक्ती असणारा, आजुबाजूच्या घटना, हालचाली यांचे अर्थ कळू शकणारा, स्वत:हून निर्णय घेण्याची क्षमता असणारा असा असायला हवा ना! त्याची अधिक शक्ती त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वातून, वागण्या बोलण्यातून, वावरण्यातून झळकायला हवी. पण असे क्वचित कुठे पाहायला मिळते. कधी कधी तर त्याच्या खांद्याला बंदूक असते आणि ती इतकी केविलवाणी दिसते की विचारू नका. सुरक्षा या महत्वाच्या व गंभीर विषयाकडे आपण किती सहजतेने पाहतो आणि त्याची उपेक्षा करतो!! सुरक्षा रक्षाकाचा धाक वाटला पाहिजे. त्याच्यावर मोठी जबाबदारी असते, ती तो योग्य प्रकारे पार पाडू शकला पाहिजे, याचा विचार कोणी कधी करीत असेल असे वाटत नाही. या सुरक्षा एजन्सिजही समाजातील बड्या व्यक्तिन्शी संबंधितच असतात. त्यांना विचार वगैरे करणे मागासलेपणाचेच वाटते. जिथे कुठे काम मिळेल तिथे मालकाला वा साहेबाला सलाम करता आला आणि केला म्हणजे झालं. सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवायला तेवढाच निकष पुरेसा आहे. मध्यंतरी `अजब प्रेम की गजब कहानी' असा एक चित्रपट आला होता. आपल्याही देशाचे चित्र `अजब देश की गजब कहानी' असेच आहे.
-श्रीपाद कोठे
सोमवार, २३ मे २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा