सोमवार, ३० जानेवारी, २०२३

अर्थकारण आणि मानव्य

उद्या अर्थसंकल्प. बरीच चर्चा झाली, आणखीन खूप होईल. त्यात खूप सारं तथ्य, खूप सारा उरबडवेपणा. खरंच सगळ्यांच्या कल्याणाची अर्थव्यवस्था, अर्थरचना हवी आहे आपल्याला? मी तसं समजतो. परंतु ती साध्य होईल असे वाटत नाही. अन त्यासाठी काँग्रेस, कम्युनिस्ट, भाजपा कोणीही जबाबदार नसून तुम्ही आम्ही जबाबदार आहोत, असे मला वाटते. सर्वकल्याणी अर्थकारणासाठी सगळ्यात पहिली, मूळ गरज कोणती? संवेदनशील, चिंतनशील, प्रामाणिक समाज. आज तसे चित्र दिसत नाही. संवेदनशील असणारे चिंतनशील असतीलच असे नाही, चिंतनशील हे संवेदनशील असतीलच असे नाही, अन प्रामाणिकपणावर न बोललेलेच बरे. तरीही सगळ्यांच्या विचारासाठी-

सर्वकल्याणी अर्थकारणासाठी दोन गोष्टी आवश्यक...

१) विकेंद्रीकरण,

२) पैसा, मालकी, तंत्रज्ञान, साधने, उपभोग, उद्योग, आकार, वेग... या साऱ्याच गोष्टींना वरची मर्यादा (upper limit).

ही वरची मर्यादा जोवर येत नाही तोवर कशाचाही काहीही उपयोग नाही. अन ही वरची मर्यादा अर्थशास्त्राचा विषय नसून, मानव्यशास्त्राचा विषय आहे. आज सगळ्याच शास्त्रांची मृत्युघंटा वाजली आहे. अगदी विज्ञान आणि धर्म यांच्या शास्त्रांची सुद्धा. त्याला अर्थशास्त्र सुद्धा अपवाद नाही. सगळी शास्त्रे saturation ला पोहोचली आहेत आणि त्या त्या क्षेत्राचे प्रश्न सोडवून त्या त्या क्षेत्राला पूर्णता प्रदान करण्यात अपयशी ठरले आहेत, ठरत आहेत. सगळ्याच शास्त्रांचे समग्र जीवनाच्या संदर्भात एकीकरण आवश्यक आहे. अर्थकारण हेही त्यात आलेच. प्रत्यक्ष व्यवहारात याचा अर्थ काय होतो यासाठी केवळ एक उदाहरण विचारासाठी...

automobile हे एक महत्वाचे क्षेत्र आहे. रोज येणाऱ्या गाड्या, मोठाल्या गाड्या यांचा संबंध कशाशी आहे? तो ना विज्ञानाशी आहे, ना गरजांशी आहे, ना अर्थकारणाशी आहे. तो आहे मानवी मनातल्या `प्रतिष्ठा भावनेशी'. या प्रतिष्ठा भावनेवर उत्तर शोधायचे असेल तर ते विज्ञानातून मिळू शकत नाही, अन अर्थशास्त्रातून मिळू शकत नाही. मुख्य म्हणजे त्याला उत्तर शोधल्याशिवाय सर्वकल्याणी अर्थकारण अशक्य आहे. भारतासमोर आणि जगासमोर आज असलेल्या पेचप्रसंगाचे हे स्वरूप आहे.

त्यातून मार्ग काढायचा असेल तर संवेदनशील, चिंतनशील आणि किंमत चुकती करण्याएवढा प्रामाणिकपणा असलेला समाज आवश्यक. आज कोणताही रंग या तिन्ही कसोट्यांवर उतरत नाही. अन त्यासाठीही रंगहीन असलेला `समाज' नावाचा प्राणी जबाबदार आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ३१ जानेवारी २०१८

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

समाजाचा सरकारवर प्रभाव असावा

मोठ्या किराणा दुकानांमधून वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यावर स्वाभाविक चर्चा सुरू आहे. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. परवानगी म्हणजे सक्ती नाही. त्यामुळे सरकारला काय करायचे ते करू द्यावे, पण सुजाण किराणा विक्रेत्यांनी वाईन विकू नये. 'आम्ही वाईन विकणार नाही' अशी किराणा व्यापाऱ्यांनी, 'आपण वाईन विकू नये' अशी बाकीच्या समाज घटकांनी मोहीम चालवावी. पैसे कमावणे वाईट नाही पण त्याला नैतिकतेचा बांध असावा, असा विचार समाजव्यापी होईल असा प्रयत्न करावा. फक्त सरकार सरकार करण्याची सवय टाकून द्यावी. सरकारचा समाजावर प्रभाव नसावा, समाजाचा सरकारवर प्रभाव राहील; याकडे वाटचाल करावी.

- श्रीपाद कोठे

२८ जानेवारी २०२२

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

अशोकचक्र

काल तिरंगा राष्ट्रध्वज पाहताना एक विचार मनात चमकून गेला- अरे, या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी असलेलं अशोकचक्र आपण विसरलो की काय? कोण होता सम्राट अशोक? कलिंगच्या लढाईत लाखो लोकांना यमसदनी पाठवून आपल्या पूर्वजांना न जमलेला कलिंग देश (आजचा ओरिसा) जिंकण्याचा आणि विशाल भारतीय साम्राज्य निर्माण करण्याचा पराक्रम केलेला महान चक्रवर्ती सम्राट. पण या भीषण नरसंहारानंतर व्यथित होऊन त्याने आपला मार्गच बदलून टाकला. अन बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्याने शांतीचा संदेश प्रसारित केला. मनात आले, याची ही दोन रूपे. लाखो लोकांच्या संहारासाठी त्याच्यावर रोष धरता आला असता. पण शेकडो वर्षे भारताने आणि १९५० रोजी स्वीकारलेल्या घटनेच्या निर्मात्यांनी तसे केले नाही. उलट त्याने दिलेला शांतीचा संदेश उचलून धरला. त्यासाठी त्याची आठवण ठेवली. अन चक्क राष्ट्रध्वजात त्याच्या चक्राला स्थानही दिले. मुळातच चक्र ही खूप मार्मिक बाब आहे भारतीय मानसात. हे विश्वच चक्रीय आहे असं इथलं तत्वज्ञान सांगतं. आपल्या प्रत्ययाला येणाऱ्या सगळ्या बाबी या विकासाच्या अवस्था असतात. सम्राट अशोकाच्या बाबतीत तेच तत्व पाळण्यात आलं आहे. `ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ' विचारू नये ही लोकोक्तीसुद्धा काहीशी याच अंगाने जाणारी.

आज मात्र... जाऊ द्या ते उल्लेख. किमान दहा बाबी या क्षणी डोक्यात आहेत, ज्यात जुन्या गोष्टींचा निष्कारण काथ्याकूट काढला जात असतो. त्यातील एखादाही उल्लेख वादंग माजवायला पुरेसा आहे. पुढे जाणे, पुढे पाहणे, पुढे चालणे आम्ही विसरूनच गेलो आहोत की काय? `झाले गेले गंगेला मिळाले' असा विचार करून, `तू नाही तुझ्या बापाने पाणी गढूळ केलं असेल' अशी पंचतंत्रातील कोल्हेकुई न करता; तारतम्य ठेवून, आवश्यक तेवढेच मागे रेंगाळून पुढे चालणे; हा मला अशोकचक्राचा संदेश वाटला. नकोशा, अडचणीच्या गोष्टी असतातच- व्यक्तीजीवनात, सामाजिक जीवनात, राष्ट्रीय जीवनात; सर्वत्र. त्यांचा चोथा किती चिवडायचा असतो? आम्ही अशोकचक्रही आवर्जून लक्षात ठेवायला हवं.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २७ जानेवारी २०१६

बुधवार, २५ जानेवारी, २०२३

पैसा कशासाठी?

आज भारतीय राज्यघटनेचा सण आहे. त्यानिमित्त एक नोंद.

राज्यसभा वाहिनीवर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवरील मालिका दाखवतात. घटना समितीतील चर्चाही त्यात असतात. देशातील जमीनदारी नष्ट करण्याच्या विषयावर चर्चा सुरु होती. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी याबद्दलचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला विरोधही जबर होता. त्या चर्चेत श्री. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हेदेखील सहभागी झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले- `साधारणपणे मी पंतप्रधान नेहरू यांच्याशी सहमत होत नाही. पण या प्रस्तावाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.' पुढे थोडे विवेचन करून ते म्हणाले- `आपण विचार करायला हवा की शेवटी पैसा कशासाठी? पैसा हा धर्मासाठी, हे त्याचे उत्तर आहे. पैसा धर्मासाठी असतो.' संपूर्ण घटना समितीने हे शांतपणे ऐकले. त्यावर कोणीही आक्षेप इत्यादी घेतले नाही. गदारोळ झाला नाही. दुर्दैवाने त्यानंतर आमचे राजकीय नेते, कथित सुधारक, कथित विचारवंत, कथित मार्गदर्शक, कथित बुद्धीजीवी यांनी `धर्म' ही फक्त आणि फक्त गोंधळ अन गदारोळ माजवण्याची गोष्ट मानली. `धर्म' ही बाब आपल्या कुवतीनुसार आणि बुद्धीनुसार मापण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि भारतीय गणराज्याचे अतोनात नुकसान करून ठेवले. अजूनही करीत आहेत. स्वत:च्या कुवतीचा अन बुद्धीचा दंभ सोडून ती अधिक व्यापक, सखोल अन परिपक्व करण्याचा विचार जरी या लोकांनी केला तरी गणतंत्र दिनाचे सार्थक होईल. अन्यथा कुळाचार सुरूच असतात.

- श्रीपाद कोठे

२६ जानेवारी २०१६

मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

सारे जहां हे अच्छा

२६ जानेवारीच्या लष्करी संचलनात वाजवली जाणारी धून बदलण्याची चर्चा सुरू आहे. मोडीत निघणारी abide with me ही प्रार्थना गांधीजींची आवडती प्रार्थना होती अशीही चर्चा आहे. यात गांधीजी कुठून आले कळायला मार्ग नाही. गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग', 'हिंद स्वराज' किंवा गांधी जन्मशताब्दीनिमित्त गांधी स्मारक निधीने प्रकाशित केलेले त्यांच्या साहित्याचे भाग, gandhi : his life and thought हे आचार्य कृपलानी (आचार्य कृपलानी गांधीवादी होते, गांधीजींचे निकटचे सहकारी होते, अनेक वर्षे काँग्रेसचे सरचिटणीस होते, भारत स्वतंत्र होण्याच्या काळात काँग्रेसचे अध्यक्ष होते) यांनी लिहिलेले चरित्र, लुई फिशरने लिहिलेले गांधी चरित्र, जवाहरलाल नेहरू यांची आत्मकथा, सरदार पटेल यांचं चरित्र, विनोबांनी लिहिलेले गांधीजी; यात कुठेही abide with me याचा उल्लेखही नाही. नरसी मेहता यांचे 'वैष्णव जन तो तेणे कहीयेजे' आणि 'रघुपती राघव राजाराम' हे मात्र गांधीजींचे आवडते भजन होते हे जगजाहीर आहे. तसा स्पष्ट उल्लेखही आहे. 'रघुपती राघव राजाराम'च्या जागी abide with me ची घुसखोरी ही एक गंमतच म्हटली पाहिजे.

(नवीन वाजवली जाणारी 'सारे जहाँ से अच्छा' ही धून पण फार कौतुक करावं अशी नाही हा भाग वेगळा. एक तर हे गीत लिहिणारे इकबाल हे नंतर पाकिस्तानचे मोठे समर्थक झाले होते, हे एक कारण. पण ते कारण छोटं आहे. त्याहून महत्वाचं कारण म्हणजे, आम्ही या देशाचे 'बुलबुले' नाही आहोत अन हा देश आमचा 'गुलसीता' नाही. या सगळ्या कल्पनाच अभारतीय, अहिंदू, खुज्या आहेत. असो.)

- श्रीपाद कोठे

२५ जानेवारी २०२२

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

संक्रमण

आज संक्रांती. संक्रमण. संक्रमण म्हणजे केवळ परिवर्तन नाही. मार्गाचं परिवर्तन. दिशाबदल. परिवर्तन तर नित्य होतच असतं. पण जीवनाची गरज लक्षात घेऊन, जीवनाला पोषक असं परिवर्तन म्हणजे संक्रांती. निसर्गाचं पोषण करण्यासाठी होणारं सूर्याचं संक्रमण. मानवी जीवनाचा विचार केला तर त्यासाठीही संक्रमण आवश्यकच. मात्र हे संक्रमण केवळ 'बदल' यापुरतं नसावं. त्या दृष्टीने पाहिलं तर आज गरज आहे ते विचारांच्या संक्रमणाची. अन या संक्रमणातील कळीचा प्रश्न, मूलभूत प्रश्न, गाभ्याला हात घालणारा प्रश्न आहे तो म्हणजे - संक्रमणाची दिशा काय असेल? 'सर्वेपि सुखीन: सन्तु' की 'survival of the fittest'. मुख्य म्हणजे आता हा प्रश्न केवळ व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. कारण वर्तमान राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, मानसिक, तात्त्विक, सैद्धांतिक अशा सगळ्या गोष्टींचा आधार कळत वा नकळत survival of the fittest हा झालेला आहे. याचे चटके सगळ्यांनाच बसत आहेत. फक्त एवढेच की जात्याच्या खुंट्या जवळ असणारे भरडले जातात आणि कडेला असणारे उसळत राहतात. सामान्य आणि विचारी दोन्ही प्रकारच्या माणसांना परिस्थितीच्या रेट्यानुसार चालावे लागतेच. पण अवांछनीय स्थिती बदलण्यासाठी दिशा दाखवण्याचे काम विचारी लोकांचे असते. त्यांनी धाडसाने ते केले पाहिजे. विपरीत परिस्थितीत तिळगुळाचा स्नेह आणि गोडवा पुरेसा नसतो. किंवा त्यातून निर्माण होणारी करुणा पुरेशी नसते. स्नेह आणि गोडवा किंवा करुणा यांचा काही एक उपयोग होतोच. त्रास सहन करणं किंचित सुसह्य होतं. पण तेवढंच पुरेसं आणि योग्य नसतं. त्यासाठी हवं असतं संक्रमण. आज माझ्या समस्या फक्त माझ्या नाहीत. माझ्या गावच्या समस्या फक्त माझ्या गावाच्या नाहीत. माझ्या देशाच्या समस्या फक्त माझ्या देशाच्या नाहीत. आज समस्यांची गुंतागुंत एवढी झाली आहे की वरवर, तात्पुरतं काही करून भागणार नाही. एक तर सगळं मानवी अस्तित्वच टाकून द्यावं लागेल किंवा अगदी आत, खोल जाऊन गुंता सोडवावा लागेल. त्यासाठी महान वैचारिक संक्रांतीची गरज आहे. आजचे संक्रमण पर्व विचारांच्या या संक्रमणाला चालना देवो.

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, १४ जानेवारी २०२२

चित्रपट आणि अभिव्यक्ती

महेश मांजरेकरच्या एका चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. त्या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळून चित्रपट प्रदर्शित करावा, अशीही एक मागणी आहे. ही मागणी चुकीची आहे. शिवाय या चित्रपटाचा व्यावसायिक पराभव करून धडा शिकवावा असाही एक सूर आहे. तोही पुरेसा नाही. या चित्रपटावर पूर्ण कायमची बंदी घालावी. या चित्रपटाची रील डब्यातच खराब व्हायला हवी. नुकसानीचा मुद्दा येऊ शकतो. पण त्याकडे लक्ष देण्याचेही कारण नाही. एवढ्या नुकसानाने मांजरेकर रस्त्यावर येणार नाही. अन समजा रस्त्यावर आलेच तर आले. प्रकरण न्यायालयात पण जाऊ शकेल. मात्र मा. न्यायालयांनाही विनंती करावीशी वाटते की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल त्यांनी, कायद्यातील शब्दांच्या पलीकडे जाऊन अधिक सयुक्तिक भूमिका घ्यावी. कोणालाही काहीही आणि केव्हाही ओकण्याचे स्वातंत्र्य असूच शकते, पण कोणावर वा कुठेही ओकण्याचे स्वातंत्र्य असू शकत नाही. शिवाय विचार, मत वा भावना यांच्या अभिव्यक्तीसाठी माध्यमांचे तौलनिक विश्लेषणही करावे. मुद्रित माध्यमे, श्राव्य माध्यमे, दृक्श्राव्य माध्यमे, सार्वजनिक माध्यमे, व्यक्तिगत माध्यमे; अशा विविध माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रभावाचाही विचार व्हायला हवा. सगळ्याच गोष्टींसाठी सगळीच माध्यमे वापरू देणाऱ्या समतेचीही चिकित्सा करावी. असे केल्याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील बुजबुजाट कमी होणार नाही.

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, १४ जानेवारी २०२२

सोमवार, २ जानेवारी, २०२३

समाजजीवन भारून टाकू

मारुंजीचा `शिवशक्ती संगम' पाहत होतो. वैयक्तिक गीत सुरु झालं. कानावर शब्द आले- `समाजजीवन भारून टाकू, चैतन्याने मानाने... वैभवशाली भवितव्याला नटवू नीज कर्तृत्वाने...' अन अनेक बिंदू क्षणार्धात जोडले गेले. १९८६ साली नाशिकला पश्चिम क्षेत्राचा द्वितीय वर्षाचा संघ शिक्षा वर्ग झाला होता. त्याच्या समारोपाला गायलं गेलेलं हे गीत. नागपूरच्या शिक्षार्थी स्वयंसेवकांचा गट घेऊन तिघे जण गेलो होतो. श्याम पत्तरकिने, विजय खळतकर आणि मी. त्याच वर्षीच्या नागपूरच्या हिवाळी शिबिराची गोष्ट. शिबीर सुरु झालं त्याच दिवशीची. बौद्धिक कार्यक्रमासाठी संपत झालं. अन कर्ण्यातून आवाज आला- `महेशजी कोठे (म्हणजे आम्हीच- खाजगीत लोक महेश म्हणून ओळखतात. अन संघात माझ्यासारखाही सहज `जी' होतो.) त्वरित मा. मोहनजींना भेटतील. गेलो. भेटलो. मा. मोहनजी म्हणाले- नाशिकला झालेलं `समाजजीवन भारून टाकू' आपण मकर संक्रांतीसाठी शाखांना देणार आहोत. एकदा मला म्हणून दाखवायचं आणि शिबिरात सगळ्यांचा अभ्यास घ्यायचा. अस्मादिकांनी म्हणून दाखवलं. अन मग शिबीर संपेस्तोवर प्रत्येक बौद्धिक कार्यक्रमापूर्वी `समाजजीवन...'चा अभ्यास झाला. आज मा. मोहनजी प.पू. सरसंघचालक आहेत. त्यांच्यासमोर १९८६ च्या शिबिरात मी गीत म्हटलं तेव्हा तिसरं कोणीच नव्हतं. आज त्यांच्यासमोर तेच गीत गायलं गेलं तेव्हा दीड लाखाहून जास्त स्वयंसेवक पूर्ण गणवेशात होते.

काय वाटलं सांगता येत नाही.

- श्रीपाद कोठे

३ जानेवारी २०१६

प्रामाणिक चव

मला वाटतं कडू. कारण गोड खाल्लं की तोंड आंबट होतं. तिखट खाल्लं की तोंडात जाळ होतो. चव राहते बाजूलाच. खारट खाल्लं की हळूहळू पुन्हा सामान्य होते जीभ. आंबट तात्पुरती चटकदार. पण कडू मात्र तसं काहीही नाही. कडू म्हणजे कडूच. अन टिकतेही बराच वेळ. त्याच्यावर दुसऱ्या चवीचं काही चालतही नाही.

- श्रीपाद कोठे

३ जानेवारी २०२२

@@@

'आज नगद, कल उधार'

'उधार मांग कर शर्मीन्दा ना करे'

'उधारी बंद'

अशा पाट्या सगळीकडे असतात. पण आज जाताजाता रस्त्यात एका ठिकाणी

'उधारी चालू आहे'

अशी पाटी पाहिली. कसलं दुकान होतं माहिती नाही. तेवढं नाही पाहता आलं. 😃😃

@@@

चहाचं आधण गॅसवर ठेवून; झाडांना पाणी टाकणे, कचरा काढणे, कचरा टाकणे, रोजचा व्यायाम; यातली एकदोन कामं करीपर्यंत चहा नीट उकळतो. पण चहा आळून जाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा चहाचं आधण गॅसवर ठेवून; फेसबुक व्हाट्स ऍप हाती घेतलं जातं. 😃😃

@@@

प्रश्न- तुम्ही ईश्वर मानता का?

उत्तर- नाही.

हजारो प्रश्नार्थक चिन्ह ल्यायलेला चेहरा.

प्रश्न- मग नेहमी त्याबद्दल, त्या संदर्भात बोलता; त्याला प्रार्थना इत्यादी करता; हे कसे?

उत्तर- मी देव मानत नाही.

पुन्हा प्रश्नार्थक चेहरा.

उत्तर- प्रभू आहे हे मला माहीत आहे.

@@@

माणूस काय शोधत असतो?

कशासाठी धडपडत असतो?

मला वाटतं - 'रमणे' हे त्याचं उत्तर आहे. माणसाला रमायचं असतं. अगदी क्षुल्लक वा महान, चांगली वा वाईट, उपकारक वा अपकारक; कोणतीही धडपड असते ती रमण्यासाठी. कोणाला आणखीन काही वाटू शकेल. आपल्याला काय वाटते ते सांगायला हरकत नाही.

@@@