शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

संक्रमण

आज संक्रांती. संक्रमण. संक्रमण म्हणजे केवळ परिवर्तन नाही. मार्गाचं परिवर्तन. दिशाबदल. परिवर्तन तर नित्य होतच असतं. पण जीवनाची गरज लक्षात घेऊन, जीवनाला पोषक असं परिवर्तन म्हणजे संक्रांती. निसर्गाचं पोषण करण्यासाठी होणारं सूर्याचं संक्रमण. मानवी जीवनाचा विचार केला तर त्यासाठीही संक्रमण आवश्यकच. मात्र हे संक्रमण केवळ 'बदल' यापुरतं नसावं. त्या दृष्टीने पाहिलं तर आज गरज आहे ते विचारांच्या संक्रमणाची. अन या संक्रमणातील कळीचा प्रश्न, मूलभूत प्रश्न, गाभ्याला हात घालणारा प्रश्न आहे तो म्हणजे - संक्रमणाची दिशा काय असेल? 'सर्वेपि सुखीन: सन्तु' की 'survival of the fittest'. मुख्य म्हणजे आता हा प्रश्न केवळ व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. कारण वर्तमान राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, मानसिक, तात्त्विक, सैद्धांतिक अशा सगळ्या गोष्टींचा आधार कळत वा नकळत survival of the fittest हा झालेला आहे. याचे चटके सगळ्यांनाच बसत आहेत. फक्त एवढेच की जात्याच्या खुंट्या जवळ असणारे भरडले जातात आणि कडेला असणारे उसळत राहतात. सामान्य आणि विचारी दोन्ही प्रकारच्या माणसांना परिस्थितीच्या रेट्यानुसार चालावे लागतेच. पण अवांछनीय स्थिती बदलण्यासाठी दिशा दाखवण्याचे काम विचारी लोकांचे असते. त्यांनी धाडसाने ते केले पाहिजे. विपरीत परिस्थितीत तिळगुळाचा स्नेह आणि गोडवा पुरेसा नसतो. किंवा त्यातून निर्माण होणारी करुणा पुरेशी नसते. स्नेह आणि गोडवा किंवा करुणा यांचा काही एक उपयोग होतोच. त्रास सहन करणं किंचित सुसह्य होतं. पण तेवढंच पुरेसं आणि योग्य नसतं. त्यासाठी हवं असतं संक्रमण. आज माझ्या समस्या फक्त माझ्या नाहीत. माझ्या गावच्या समस्या फक्त माझ्या गावाच्या नाहीत. माझ्या देशाच्या समस्या फक्त माझ्या देशाच्या नाहीत. आज समस्यांची गुंतागुंत एवढी झाली आहे की वरवर, तात्पुरतं काही करून भागणार नाही. एक तर सगळं मानवी अस्तित्वच टाकून द्यावं लागेल किंवा अगदी आत, खोल जाऊन गुंता सोडवावा लागेल. त्यासाठी महान वैचारिक संक्रांतीची गरज आहे. आजचे संक्रमण पर्व विचारांच्या या संक्रमणाला चालना देवो.

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, १४ जानेवारी २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा