मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

दासबोध मृत्यूनिरुपण

दशक ३ समास ९ : मृत्यनिरूपण

संसार म्हणिजे सवेंच स्वार | नाहीं मरणास

उधार | मापीं लागलें शरीर | घडीनें घडी ||१||

नित्य काळाची संगती | नकळे होणाराची गती |

कर्मासारिखे प्राणी पडती | नाना देसीं विदेसीं ||२||

सरतां संचिताचें शेष | नाहीं क्षणाचा अवकाश |

भरतां न भरतां निमिष्य | जाणें लागे ||३||

अवचितें काळाचे म्हणियारे | मारित सुटती

येकसरें | नेऊन घालिती पुढारें | मृत्यपंथे ||४||

होतां मृत्याची आटाटी | कोणी घालूं न सकती

पाठीं | सर्वत्रांस कुटाकुटी | मागेंपुढें होतसे ||५||

मृत्यकाळ काठी निकी | बैसे बळियाचे मस्तकीं |

माहाराजे बळिये लोकीं | राहों न सकती ||६||

मृत्य न म्हणे किं हा क्रूर | मृत्य न म्हणे हा जुंझार |

मृत्य न म्हणे संग्रामशूर | समरंगणीं ||७||

मृत्य न म्हणे किं हा कोपी | मृत्य न म्हणे हा

प्रतापी | मृत्य न म्हणे उग्ररूपी | माहाखळ ||८||

मृत्य न म्हणे बळाढ्य | मृत्य न म्हणे धनाढ्य |

मृत्य न म्हणे आढ्य | सर्व गुणें ||९||

मृत्य न म्हणे हा विख्यात | मृत्य न म्हणे हा

श्रीमंत | मृत्य न म्हणे हा अद्‍भूत | पराक्रमी ||१०||

मृत्य न म्हणे हा भूपती | मृत्य न म्हणे हा चक्रवती |

मृत्य न म्हणे हा करामती | कैवाड जाणे ||११||

मृत्य न म्हणे हयपती | मृत्य न म्हणे गजपती |

मृत्य न म्हणे नरपती | विख्यात राजा ||१२||

मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं | मृत्य न म्हणे राजकारणी |

मृत्य न म्हणे वेतनी | वेतनधर्ता ||१३||

मृत्य न म्हणे देसाई | मृत्य न म्हणे वेवसाई |

मृत्य न म्हणे ठाईं ठाईं | पुंडराजे ||१४||

मृत्य न म्हणे मुद्राधारी | मृत्य न म्हणे व्यापारी |

मृत्य न म्हणे परनारी | राजकन्या ||१५||

मृत्य न म्हणे कार्याकारण | मृत्य न म्हणे वर्णा-

वर्ण | मृत्य न म्हणे हा ब्राह्मण | कर्मनिष्ठ ||१६||

मृत्य न म्हणे वित्पन्न | मृत्य न म्हणे संपन्न |

मृत्य न म्हणे विद्वज्जन | समुदाई ||१७||

मृत्य न म्हणे हा धूर्त | मृत्य न म्हणे बहुश्रुत |

मृत्य न म्हणे हा पंडित | माहाभला ||१८||

मृत्य न म्हणे पुराणिक | मृत्य न म्हणे हा वैदिक |

मृत्य न म्हणे हा याज्ञिक | अथवा जोसी ||१९||

मृत्य न म्हणे अग्निहोत्री | मृत्य न म्हणे हा श्रोत्री |

मृत्य न म्हणे मंत्रयंत्री | पूर्णागमी ||२०||

मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ | मृत्य न म्हणे वेदज्ञ |

मृत्य न म्हणे सर्वज्ञ | सर्व जाणे ||२१||

मृत्य न म्हणे ब्रह्महत्या | मृत्य न म्हणे गोहत्या |

मृत्य न म्हणे नाना हत्या | स्त्रीबाळकादिक ||२२||

मृत्य न म्हणे रागज्ञानी | मृत्य न म्हणे ताळज्ञानी |

मृत्य न म्हणे तत्वज्ञानी | तत्ववेत्ता ||२३||

मृत्य न म्हणे योगाभ्यासी | मृत्य न म्हणे संन्यासी |

मृत्य न म्हणे काळासी | वंचूं जाणे ||२४||

मृत्य न म्हणे हा सावध | मृत्य न म्हणे हा सिद्ध |

मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध | पंचाक्षरी ||२५||

मृत्य न म्हणे हा गोसावी | मृत्य न म्हणे हा तपस्वी |

मृत्य न म्हणे हा मनस्वी | उदासीन ||२६||

मृत्य न म्हणे ऋषेश्वर | मृत्य न म्हणे कवेश्वर |

मृत्य न म्हणे दिगंबर | समाधिस्थ ||२७||

मृत्य न म्हणे हटयोगी | मृत्य न म्हणे राजयोगी |

मृत्य न म्हणे वीतरागी | निरंतर ||२८||

मृत्य न म्हणे ब्रह्मचारी | मृत्य न म्हणे जटाधारी |

मृत्य न म्हणे निराहारी | योगेश्वर ||२९||

मृत्य न म्हणे हा संत | मृत्य न म्हणे हा महंत |

मृत्य न म्हणे हा गुप्त | होत असे ||३०||

मृत्य न म्हणे स्वाधेन | मृत्य न म्हणे पराधेन |

सकळ जीवांस प्राशन | मृत्यचि करी ||३१||

येक मृत्यमार्गी लागले | येकीं आर्ध पंथ क्रमिले |

येक ते सेवटास गेले | वृद्धपणीं ||३२||

मृत्य न म्हणे बाळ तारुण्य | मृत्य न म्हणे सुलक्षण |

मृत्य न म्हणे विचक्षण | बहु बोलिका ||३३||

मृत्य न म्हणे हा आधारु | मृत्य न म्हणे उदारु |

मृत्य न म्हणे हा सुंदरु | चतुरांग जाणे ||३४||

मृत्य न म्हणे पुण्यपुरुष | मृत्य न म्हणे हरिदास |

मृत्य न म्हणे विशेष | सुकृती नर ||३५||

आतां असो हें बोलणें | मृत्यापासून सुटिजे कोणें |

मागेंपुढें विश्वास जाणें | मृत्यपंथें ||३६||

च्यारी खाणी च्यारी वाणी | चौऱ्यासी लक्ष जीवयोनी |

जन्मा आले तितुके प्राणी | मृत्य पावती ||३७||

मृत्याभेणें पळों जातां | तरी मृत्य सोडिना सर्वथा |

मृत्यास न ये चुकवितां | कांहीं केल्या ||३८||

मृत्य न म्हणे हा स्वदेसी | मृत्य न म्हणे हा विदेसी |

मृत्य न म्हणे हा उपवासी | निरंतर ||३९||

मृत्य न म्हणे थोर थोर | मृत्य न म्हणे हरीहर |

मृत्य न म्हणे अवतार | भगवंताचे ||४०||

श्रोतीं कोप न करावा | हा मृत्यलोक सकळांस ठावा |

उपजला प्राणी जाईल बरवा | मृत्यपंथें ||४१||

येथें न मनावा किंत | हा मृत्यलोक विख्यात |

प्रगट जाणती समस्त | लाहान थोर ||४२||

तथापी किंत मानिजेल | तरी हा मृत्यलोक नव्हेल |

याकारणें नासेल | उपजला प्राणी ||४३||

ऐसें जाणोनियां जीवें | याचें सार्थकची करावें |

जनीं मरोन उरवावें | कीर्तिरूपें ||४४||

येरवीं प्राणी लाहान थोर | मृत्य पावती हा निर्धार |

बोलिलें हें अन्यथा उत्तर | मानूंचि नये ||४५||

गेले बहुत वैभवाचे | गेले बहुत आयुष्याचे |

गेले अगाध महिमेचे | मृत्यपंथें ||४६||

गेले बहुत पराक्रमी | गेले बहुत कपटकर्मी |

गेले बहुत संग्रामी | संग्रामसौरे ||४७||

गेले बहुतां बळांचे | गेले बहुतां काळांचे |

गेले बहुतां कुळांचे | कुळवंत राजे ||४८||

गेले बहुतांचे पाळक | गेले बुद्धीचे चाळक |

गेले युक्तीचे तार्किक | तर्कवादी ||४९||

गेले विद्येचे सागर | गेले बळाचे डोंग़र |

गेले धनाचे कुबेर | मृत्यपंथे ||५०||

गेले बहुत पुरुषार्थाचे | गेले बहुत विक्रमाचे |

गेले बहुत आटोपाचे | कार्यकर्ते ||५१||

गेले बहुत शस्त्रधारी | गेले बहुत परोपकारी |

गेले बहुत नानापरी | धर्मरक्षक ||५२||

गेले बहुत प्रतापाचे | गेले बहुत सत्कीर्तीचे |

गेले बहुत नीतीचे | नीतिवंत राजे ||५३||

गेले बहुत मतवादी | गेले बहुत कार्यवादी |

गेले बहुत वेवादी | बहुतांपरीचे ||५४||

गेलीं पंडितांची थाटें | गेलीं शब्दांचीं कचाटें |

गेलीं वादकें अचाटें | नाना मतें ||५५||

गेले तापस्यांचे भार | गेले संन्यासी अपार |

गेले विचारकर्ते सार | मृत्यपंथे ||५६||

गेले बहुत संसारी | गेले बहुत वेषधारी |

गेले बहुत नानापरी | नाना छंद करूनी ||५७||

गेले ब्राह्मणसमुदाये | गेले बहुत आचार्ये |

गेले बहुत सांगों काये | किती म्हणोनी ||५८||

असो ऐसे सकळही गेले | परंतु येकचि राहिले |

जे स्वरुपाकार जाले | आत्मज्ञानी ||५९||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

मृत्यनिरूपणनाम समास नववा || ३.९ ||

#दासबोधमृत्यूनिरुपण

अर्थकारण आणि समाज

उद्या अर्थसंकल्प. बरीच चर्चा झाली, आणखीन खूप होईल. त्यात खूप सारं तथ्य, खूप सारा उरबडवेपणा. खरंच सगळ्यांच्या कल्याणाची अर्थव्यवस्था, अर्थरचना हवी आहे आपल्याला? मी तसं समजतो. परंतु ती साध्य होईल असे वाटत नाही. अन त्यासाठी काँग्रेस, कम्युनिस्ट, भाजपा कोणीही जबाबदार नसून तुम्ही आम्ही जबाबदार आहोत, असे मला वाटते. सर्वकल्याणी अर्थकारणासाठी सगळ्यात पहिली, मूळ गरज कोणती? संवेदनशील, चिंतनशील, प्रामाणिक समाज. आज तसे चित्र दिसत नाही. संवेदनशील असणारे चिंतनशील असतीलच असे नाही, चिंतनशील हे संवेदनशील असतीलच असे नाही, अन प्रामाणिकपणावर न बोललेलेच बरे. तरीही सगळ्यांच्या विचारासाठी-

सर्वकल्याणी अर्थकारणासाठी दोन गोष्टी आवश्यक...

१) विकेंद्रीकरण,

२) पैसा, मालकी, तंत्रज्ञान, साधने, उपभोग, उद्योग, आकार, वेग... या साऱ्याच गोष्टींना वरची मर्यादा (upper limit).

ही वरची मर्यादा जोवर येत नाही तोवर कशाचाही काहीही उपयोग नाही. अन ही वरची मर्यादा अर्थशास्त्राचा विषय नसून, मानव्यशास्त्राचा विषय आहे. आज सगळ्याच शास्त्रांची मृत्युघंटा वाजली आहे. अगदी विज्ञान आणि धर्म यांच्या शास्त्रांची सुद्धा. त्याला अर्थशास्त्र सुद्धा अपवाद नाही. सगळी शास्त्रे saturation ला पोहोचली आहेत आणि त्या त्या क्षेत्राचे प्रश्न सोडवून त्या त्या क्षेत्राला पूर्णता प्रदान करण्यात अपयशी ठरले आहेत, ठरत आहेत. सगळ्याच शास्त्रांचे समग्र जीवनाच्या संदर्भात एकीकरण आवश्यक आहे. अर्थकारण हेही त्यात आलेच. प्रत्यक्ष व्यवहारात याचा अर्थ काय होतो यासाठी केवळ एक उदाहरण विचारासाठी...

automobile हे एक महत्वाचे क्षेत्र आहे. रोज येणाऱ्या गाड्या, मोठाल्या गाड्या यांचा संबंध कशाशी आहे? तो ना विज्ञानाशी आहे, ना गरजांशी आहे, ना अर्थकारणाशी आहे. तो आहे मानवी मनातल्या `प्रतिष्ठा भावनेशी'. या प्रतिष्ठा भावनेवर उत्तर शोधायचे असेल तर ते विज्ञानातून मिळू शकत नाही, अन अर्थशास्त्रातून मिळू शकत नाही. मुख्य म्हणजे त्याला उत्तर शोधल्याशिवाय सर्वकल्याणी अर्थकारण अशक्य आहे. भारतासमोर आणि जगासमोर आज असलेल्या पेचप्रसंगाचे हे स्वरूप आहे.

त्यातून मार्ग काढायचा असेल तर संवेदनशील, चिंतनशील आणि किंमत चुकती करण्याएवढा प्रामाणिकपणा असलेला समाज आवश्यक. आज कोणताही रंग या तिन्ही कसोट्यांवर उतरत नाही. अन त्यासाठीही रंगहीन असलेला `समाज' नावाचा प्राणी जबाबदार आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ३१ जानेवारी २०१८

रविवार, २८ जानेवारी, २०२४

हिंदू, धर्म नव्हे समाज

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी काल वक्तव्य केले की, हिंदू ही एक भौगोलिक संकल्पना आहे. त्यांचं हे वक्तव्य पाहून खूप बरं वाटलं. ८-१० वर्षांपूर्वी समाज माध्यमावर मी मांडलेली भूमिका आज त्यांच्या सारख्या माणसाने मांडली. (मेमरीत कुठे सापडली ही पोस्ट तर repost करीनच.) हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदू ही एक भौगोलिक, सामाजिक संकल्पना आहे. त्यामुळेच हिंदू धर्म हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. हिंदू असा कुठला धर्म नाही. उपासना मार्ग या अर्थाने धर्म हा शब्द वापरायचा असेल तर हिंदूंचे अनेक धर्म असू शकतात. शीख, जैन, बौद्ध, सनातनी, वेदांती, वैष्णव, शाक्त, तंत्र; असे सगळे हिंदूंचे धर्म आहेत आणि जसजसे अभिसरण होत जाईल तसतसे; इस्लाम व ख्रिश्चन हेदेखील हिंदूंचे धर्म होतील. उपासना पंथ म्हणून न वापरता विश्वाची धारणा करणारा या अर्थाने धर्म शब्द वापरायचा असेल तर त्याला कोणतेही prefix लावताच येणार नाही. त्यामुळे हिंदू धर्म असा शब्दप्रयोग न करता हिंदू समाज असा शब्दप्रयोग केला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

२९ जानेवारी २०२३

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

कचरा ! कचरा !!

पंतप्रधान मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने स्वच्छता हा विषय सामाजिक विषयांच्या मुख्य प्रवाहात आला. त्यानंतर त्यावर विचारही सुरू झाला. त्यातूनच ओला कचरा, कोरडा कचरा, ई कचरा; या कल्पनाही विकसित झाल्या. मात्र तेवढेच पुरेसे नाही. त्यावर प्रत्यक्ष काम होण्याची जेवढी गरज आहे, तेवढीच स्वच्छता, कचरा या गोष्टींबाबत विचार होणे आणि वैचारिक प्रबोधन याचीही गरज आहे. त्यात कचऱ्याचे प्रकार, कचऱ्याची विल्हेवाट यासोबतच मानसिकता, दृष्टी, सवयी यांचाही समावेश आवश्यक आहे.

ओला, कोरडा आणि ई कचरा; या तीन प्रकारांसोबतच नैसर्गिक कचरा आणि मानवनिर्मित कचरा असेही वर्गीकरण करायला हवे. सोबतच नैसर्गिक आणि मानवनिर्मित यांचे मिश्रण असाही एक प्रकार करावा लागेल. जसे - झाडांचा पालापाचोळा, झाडांची गळून पडणारी फुले, फळे; मोडणाऱ्या फांद्या; पक्ष्यांची गळणारी पिसे इत्यादी निसर्गनिर्मित कचरा होय. तो होणारच. शिवाय तो टाळता येणे शक्य नाही आणि टाळूही नये. निसर्गनिर्मित कचरा होतो म्हणून झाडे तोडून टाका, झाडे लावू नका, पक्षी येऊ नयेत म्हणून उपाय करा; असा विचार करणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. झाडे, जैवविविधता टिकवणे, वाढवणे, त्यांचे संरक्षण हे मानवी स्वार्थ म्हणून सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे नैसर्गिक कचऱ्याला फार तर necessary evil म्हणता येईल. ती एक आवश्यक आणि अपरिहार्य अशी अडचण म्हणावी लागेल.

दुसरा प्रकार आहे मानवनिर्मित. तो मात्र अजिबात आवश्यक नाही आणि अपरिहार्यही नाही. माणूस ज्या ज्या गोष्टींचा वापर करतो त्या त्या गोष्टींपासून होणाऱ्या कचऱ्याची; जसे वेष्टन, उरलेला भाग, अनुपयुक्त भाग इत्यादी; जबाबदारी संबंधित माणसांनी घ्यायला हवी. प्लास्टिक, लोखंड, अन्न, साली देठे, कपडे, कागद इत्यादी इत्यादी आपले आपण जमा करणे आणि कचरागाडी किंवा त्यासाठीच्या सार्वजनिक व्यवस्थेत टाकण्याचे काम प्रत्येकाने करावे. पण असे होतेच असे म्हणता येत नाही. एक तर बेजबाबदारपणामुळे असा कचरा लोक कुठेही आणि कसाही टाकतात. विशेषत: झाडाचा पालापाचोळा असेल तिथे टाकून देतात. याच सवयीसाठी नैसर्गिक कचरा आणि मानवनिर्मित कचरा हा फरक समजून घ्यायला हवा. नैसर्गिक कचरा आपण थांबवू शकत नाही, मानवनिर्मित कचरा आपण थांबवू शकतो हा त्या दोनमधील मुख्य फरक आहे. शिवाय पालापाचोळा सडत नाही. तो सहजपणे फार परिश्रम न करता गोळाही करता येतो. पण त्यात मानवनिर्मित कचरा टाकला तर तो सडतो. शिवाय तो घाण होतो आणि गोळा करणे त्रासाचे होते. त्यामुळे मानवनिर्मित कचरा आणि नैसर्गिक कचरा यांना एक समजणे टाळले पाहिजे.

सावली, पाणी, मातीची धारणक्षमता, प्राणवायू, प्रदूषण नियंत्रण यासाठी नैसर्गिक कचरा आपल्याला सहन केलाच पाहिजे. अर्थात तो साफ करत राहणे आवश्यक. पण दहा वीस पाने पडली म्हणून आकाशपाताळ एक करणे वा फार अस्वस्थ होणे याला अर्थ नाही. स्वच्छतेच्या कथित आधुनिक कल्पना डोक्यात ठेवून झाडे आणि थोडा पालापाचोळा यांचा द्वेष करता कामा नये. या नैसर्गिक कचऱ्याबाबत आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, निसर्ग माणसाइतका वाईट आणि क्षुद्र मनाचा नसल्यामुळे; तो आपला परका असा भेद करत नाही. सावली, फुले, फळे वा प्राणवायू देताना झाडे माणसामाणसात जसा भेद करत नाहीत, तसेच गळणारी पाने उडवणारा वाराही माणसामाणसात भेद करत नाही. त्यामुळे आजूबाजूची झाडे आपली नसली, आपण लावलेली नसली तरीही त्यांचा पाचोळा आपल्या हद्दीत येतो वा येऊ शकतो. तो वाहतुकीच्या, जाण्यायेण्याच्या मार्गात येणार नाही असा बाजूला जमा करून ठेवता येतो किंवा सरळ सरळ आपल्या हद्दीतील पाचोळा गोळा करून आपल्या कचरापेटीत जमा करून येणाऱ्या गाडीत टाकता येतो. परंतु त्यासाठी मन थोडे मोठे केले पाहिजे. थोडासा पालापाचोळा गोळा करणे आणि टाकणे हे फार कष्टाचे काम नाही आणि त्यात मान अपमान आणण्याचे कारण नाही; हे स्वतः स्वतःला समजावले पाहिजे.

मानवनिर्मित कचरा ही मात्र प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी असते. ही जबाबदारी घेताना आपल्या सवयींचा सुद्धा विचार करायला हवा. त्या बदलायला हव्या. मानसिकता नीटनेटकी करायला हवी. जसे - उरणारे अन्न वा भाज्यांचा कचरा इत्यादी गायी कुत्रे यांच्यासाठी बाहेर रस्त्यावर टाकण्याची सवय आणि मानसिकता सोडून द्यावी लागेल. त्यात भूतदया असली तरीही आता काळ बदललेला आहे हे लक्षात घ्यावे लागेल. एकीकडे महानगरे उभी होत आहेत. या महानगरीय जीवनाचा उदोउदो आपण करत आहोत, ते जीवन हपापल्यासारखे अधिकाधिक स्वीकारत आहोत आणि ग्राम संस्कृतीतल्या सवयी सुद्धा आपल्याला घट्ट धरून ठेवायच्या आहेत, हे बरोबर नाही. गायी आणि कुत्री त्यांचे त्यांचे पाहून घेतील किंवा त्यांना द्यायचेच असेल तर त्यासाठी वेगळी व्यवस्था तयार करावी; पण भूतदायेच्या नावाने रस्ते आणि सार्वजनिक जागा घाण करू नयेत. अन्न कचऱ्यात टाकणे बरे वाटत नाही, हाही एक पैलू आहे. तो बरोबरच आहे. पण जे अन्न कचऱ्यात टाकताना आपल्या मनात अपराध वा पापाची जाणीव असते; ते अन्न उघड्यावर टाकताना ती अपराध वा पापाची जाणीव आपल्याला का होत नाही? असे अन्न विटते, त्याची घाण येते, ते खाणारे प्राणी आजूबाजूला घाण करून ठेवतात; हे सगळे आपल्याला का चालते? आपण आपल्याला कठोरपणे तपासायला हवे. मुळात कोणाला राग आला तरी चालेल, पण एक प्रश्न विचारायला हवा की, आपण बेताचे अन्न का शिजवू शकत नाही? याही बाबतीत - बेताचे अन्न शिजवणे म्हणजे कंजूषपणा किंवा आपण शिजवलेल्या अन्नात आणखी चार दोन जेवणारे सामावले पाहिजेत; असे ग्राम संस्कृतीतील समज आता टाकून दिलेच पाहिजेत. याउपर समजा कधी काही उरलेच तर ते खाऊन संपविण्याची सवय लावून घेतली पाहिजे. शिळे खाऊ नये इत्यादी आरोग्यशास्त्र सांगताना, शिळे उरणारच नाही याची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. सोबत हेही समजून घ्यावे की, लाखो लोक शिळे वगैरे खातात पण ते मरत वगैरे नाहीत किंवा सगळेच काही असाध्य रोगाने पीडित होत नाहीत. अन् शिळे खाऊ नये हे सांगताना; केक. पिझ्झा, ब्रेड वगैरे आपण फ्रीजमध्ये ठेवून खात राहतो हेही विसरून नये. एखादा आरोग्य विषयक सिद्धांत सुद्धा किती ताणायचा याचा विवेक करता यायला हवा.

कुत्र्यांना फिरायला नेणे आणि बाहेर घाण करून ठेवणे हे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा संयुक्त कचऱ्याचे उदाहरण आहे. कुत्र्याने घाण करणे निसर्गनिर्मित असले आणि कुत्र्याला त्याची जाण नसणे स्वाभाविक असले तरीही कुत्रा पाळणाऱ्यांचा त्यात सहभाग हा मानवनिर्मित आहे. त्यामुळे कुत्र्यांनी केलेल्या घाणीची जबाबदारी त्यांच्या मालकाचीच असते. याची जाणीव मालकांना असायला हवी.

माणूस हा विचारी प्राणी आहे असं समजून हे लिहिलं आहे. तसे आपण आहोत की नाही हे ज्याचे त्याने पहावे, ठरवावे.

- श्रीपाद कोठे

बुधवार, २५ जानेवारी २०२३

रविवार, २१ जानेवारी, २०२४

अनोखा रंग

एक बातमी वाचली. थोडी वाह्यात आहे पण एक समाजशास्त्रीय वास्तव म्हणून महत्त्वाची. इंग्लंडमध्ये एका नवीन प्रकारच्या रंगाने घराच्या कुंपणभिंती रंगवणार आहेत. यात विशेष काय? विशेष हे की, जो कोणी या रंगाने रंगवलेल्या भिंतीवर सू करेल त्याच्यावरच ही सू उलटून येईल आणि त्याला त्याच्याच सूने आंघोळ घालेल. समाजशास्त्रीय वास्तव हे की, भिंतीवर सू करणे ही गोष्ट फक्त मागासलेल्या भारतातच आहे असे नाही, तर पुढारलेल्या, विकसित, अत्याधुनिक अशा इंग्लंडमध्ये सुद्धा आहे. 😀😎😭

- श्रीपाद कोठे

२२ जानेवारी २०२३

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

संपत्तीचा प्रश्न

देशातील २१ अब्जाधीश (२१ लाख, २१ हजार किंवा २१ शे सुद्धा नव्हे; फक्त २१) लोकांकडे; ७० कोटी लोकांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचा एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. संपत्तीचे केंद्रीकरण आणि संपत्ती संचय, असे दोन विषय यात अंतर्भूत आहेत. हिंदुत्वाच्या अर्थविचाराला हे दोन्ही अमान्य आहे. हिंदुत्वाच्या सामाजिक व राजकीय अंगांची जेवढी चर्चा होते, त्या संबंधात जेवढे विषय आणि मुद्दे पुढे येतात; तेवढी तर सोडाच पण त्याच्या पासंगाला पुरेल एवढीही चर्चा हिंदुत्वाच्या आर्थिक अंगांची होत नाही. उलट, सामाजिक व राजकीय अंगाने हिंदुत्वाचे जोरदार समर्थन करणारे असंख्य लोक, आर्थिक बाबतीत हिंदुत्वाला उभा आडवा छेद देणाऱ्या भूमिकाच घेतात. अगदी ताज्या अहवालाचेच उदाहरण घेतले तरी; २१ अब्जाधीश लोक ७० कोटी लोकांहून अधिक संपत्ती बाळगतात यात त्यांना काहीही वावगे वाटत नाही आणि हे कसे होते वा होऊ शकते हे प्रश्नही त्यांना पडत नाहीत. उलट यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही असेच त्यांचे मत असते. दुसरीकडे सगळ्या आर्थिक प्रश्नांसाठी अभावग्रस्त वा गरीब लोकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती, त्यांच्यासाठी असलेल्या योजना; या गोष्टीच जबाबदार असल्याची त्यांची अतूट श्रद्धा असते. अब्जाधीशांना मिळणाऱ्या सवलती, धनदांडग्यांकडून होणारा अपहार, आर्थिक फसवणूक, शोषण, त्यांचे कर्जबुडवेपण; आदींचा अशा लोकांना गंधही नसतो. शिवाय या प्रक्रियेत आपण हळूहळू मानवीय आणि आध्यात्मिक दृष्टीने कंगाल होतो याची जाणीव होणे तर दूरच. परिस्थिती फार भीषण आहे. योग्य चर्चा आणि दिशा कशी मिळेल हा मोठाच प्रश्न आहे. समस्या सोडवण्याचा पुरुषार्थ करण्याच्या वल्गना करणाऱ्यांपेक्षा, यच्चयावत प्रत्येक भूतमात्राच्या सुख व कल्याणाच्या भावनेने/ विचाराने डोळ्यांच्या कडा ओलावणारे लोक खूप अधिक प्रमाणात असणं हेच त्याचं उत्तर असू शकेल.

- श्रीपाद कोठे

१८ जानेवारी २०२३

रविवार, ७ जानेवारी, २०२४

science congress

नागपूरला नुकतीच science congress झाली. या भव्य आयोजनात अनेक विषयांचा समावेश होता. त्यातील एका कार्यक्रमाचं वृत्त वाचताना मात्र थोडं खटकलं. त्या कार्यक्रमात मुख्य विषय मांडणाऱ्या व्यक्तीने मत मांडलं की, आपल्याला सिंड्रेला नको, सायबेरेला हवी. विज्ञान आणि महिला/ मुली असा विषय होता. खटकलं हे की, सिंड्रेला का नको? सायबेरेला हवी हे ठीक आहे पण सिंड्रेला का नको? मानवी भावविश्व, स्वप्नविश्व, कल्पनाविश्व, परीविश्व, हळूवारपणा, कोमलता, ऋजुता, सौंदर्य; या गोष्टी नाकारून आपण मनुष्य जीवन/ स्त्री जीवन एकांगी आणि साचेबद्ध का करावं? विज्ञान, बुद्धिवाद, तर्क इत्यादींचे जसे जीवनात स्थान आहे; तसेच अन्य गोष्टींचेही आहे. मानवी जीवन कोरडे, रखरखीत बनवणारी विज्ञानाची मांडणी योग्य वाटत नाही. विज्ञान पक्षाच्या लोकांनी एकांगी असू नये, जीवनाकडे समग्रतेने पहावे.

- श्रीपाद कोठे

८ जानेवारी २०२३

त्यांनी नवा सिंड्रेला सिनेमा पाहिला नसेल. नवी सिंड्रेला नुसती तारणहार राजपुत्राची वाट पाहत नाही, स्वतःची स्वप्न स्वतः खरी करते. ती स्त्रीचे मूलभूत आणि नैसर्गिक गुण न सोडताही आधुनिक आहे, स्त्रीवादी नसूनही मुक्त आहे. (मोहिनी मोडक)