शनिवार, २७ जुलै, २०२४

आनंद

कधी कधी आनंद कसा अवचित भेटायला येतो. दुकानात जाऊन परत येत होतो. एका गल्लीत एक १०-१२ वर्षाचा मुलगा शाळेत जाण्याच्या तयारीत त्याच्या फाटकासमोर उभा होता. सहज नजर जातेच. नजरानजर होताच तो हसला. मीही हसलो. पण मनात म्हटलं आपण याला ओळखत तर नाही. मग विचार केला की असं होतं कधी कधी. पण चार पावलं पुढे गेल्यावर लक्षात आलं तो मुलगा माझ्या सोबत चालत होता. मी पुन्हा मान वळवून पाहिलं. पुन्हा दोघे हसलो. आता लक्षात आलं होतं की, तो आपली नक्कल करतो आहे. आपल्यासारखं सरळ रेषेत झपझप चालतो आहे. चार पावलांनंतर पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्याकडे पाहतच होता. आता दोघांनाही माहिती होतं काय प्रकरण आहे ते. दोघेही 'माहिती आहे' या अर्थाचं हसलो. आणखीन चार पावलं चाललो आणि दोघांचीही वळणं आली. दोघांनीही हसत हसत हात हलवले. ते काही क्षण दोघांवरही आनंदाची सत्ता होती. निरपेक्ष, निर्भेळ, निखळ.

- श्रीपाद कोठे

२८ जुलै २०२३

मंगळवार, २३ जुलै, २०२४

आक्रमकता

हिंदुत्ववादी सध्या आक्रमक झाले आहेत का? हो. ते स्वाभाविक आहे आणि काही प्रमाणात समर्थनीय. त्यामुळे एखाद्या घटनेवर मूग गिळून न बसता प्रतिक्रिया देणे, पोलीस तक्रार, प्रती उत्तर इत्यादी बाबींना काही हरकत नाही. पण शिवराळपणा, असभ्यता, अश्लीलता, मानहानी, खोडसाळपणा इत्यादी मात्र टाळलेच पाहिजे. एक लक्षात ठेवायला हवे की, शून्यापासून आजवरचा प्रवास हा समजूतदारपणा, समन्वय, स्नेह यांचा परिणाम आहे. हा प्रवास संपलेला नाही आणि संपायलाही नको. कारण त्याचं लक्ष्य संपूर्ण मानवजात आहे. निवडणूक जिंकण्याएवढी डोकी हे त्याचे लक्ष्य नाही.

- श्रीपाद कोठे 

२२ जुलै २०२३

रविवार, २१ जुलै, २०२४

शांत मनासाठी

आपलं मन खरंच शांत आहे का? हे पाहायचं असेल तर एक छोटासा उपाय करायचा. थोडा वेळ नामस्मरण करायचं. हे नामस्मरण ओठ न उघडता किंवा आतल्या आत जिभेची, स्नायूंची काहीही हालचाल न करता; शब्दश: मनातल्या मनात जर होऊ शकलं तर आपलं मन शांत आहे हे निश्चित. पण नामस्मरण करताना ओठ उघडावे लागले किंवा थोडीफार हालचाल करावी लागली तरी समजायचं आपलं मन शांत नाही. मनात काही तरी हालचाल सुरू आहे. हे नामस्मरण ईश्वराचेच असले पाहिजे असे नाही. आपल्या प्रिय व्यक्तीचे सुद्धा असू शकते. अर्थात त्यामुळे फक्त मनाची शांती level कळू शकेल. ईश्वराचे असेल तर शांतीसोबत मनाची उन्नती पण होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे 

२२ जुलै २०२३

शनिवार, २० जुलै, २०२४

विचारयान

हे जरा तात्विक वाटेल. हो, हे तात्विकच आहे आणि प्रत्येकाने थोडं अधिक तात्विक व्हावं या इच्छेनेच आहे...

मानवी समाजासाठी राज्य/ सत्ता/ शासन/ सरकार या बाबी आवश्यकच असतात. पण, मानवी समस्या सोडवणे, मानवी मनांचे उन्नयन, मानवी संवेदना आणि जाणिवा व्यापक करणे; थोडक्यात मानवी सुखासाठी आवश्यक घटक हे राज्याच्या कार्यकक्षेत येत नाहीत. राज्य श्रीरामांचे असो, श्रीकृष्णाचे असो, शिवाजीचे असो, काँग्रेसचे असो, कम्युनिस्टांचे असो, भाजपचे असो, रिपब्लिकन पक्षाचे असो, हिटलरचे असो, अब्राहम लिंकनचे असो, एलिझाबेथचे असो, लोकशाही असो, राजेशाही असो, हुकूमशाही असो; हेच सत्य आहे. मानवी समस्या सोडवणे, मानवी मनांचे उन्नयन, मानवी संवेदना आणि जाणिवा व्यापक करणे; थोडक्यात मानवी सुखासाठी आवश्यक घटक यांच्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करावा लागतो. ती एक मनोबौद्धिक उत्क्रांतीची प्रक्रिया असते. त्यासाठी सत्ता/ राज्य/ राजकारण यांच्याशी बांधून न घेतलेला समाज हवा. कारण राज्याशी बांधलेले मानवी मन मनोबौद्धिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेला प्रतिसाद देण्यापासून दूर जाते. परिणामी मानवी जीवन सुख शांतीपासून दूर जाते. गेल्या काही शतकातल्या मानवी समाजाच्या राजकीयीकरणाने आणि त्यासाठी आधारभूत विचारांनी मानवाची सत्ताकांक्षा खूप जागवली परंतु त्याची मनोबौद्धिक उत्क्रांती खुडून टाकली. आता होणारे मानवी सुखशांतीचे प्रामाणिक प्रयत्नदेखील याच विषवर्तुळात घोटाळत असून फक्त क्रिया प्रतिक्रिया एवढाच खेळ सुरू असतो. मानवाचे अराजकीयीकरण ही खूप आवश्यक बाब आहे. विचारांचे सध्याचे orbit तोडून मानवी विचारांना पुढील कक्षेत घेऊन जाण्याएवढ्या शक्तीच्या विचारयानाची मानवाला गरज आहे.

#श्रीपाद कोठे

२१ जुलै २०२३

मंगळवार, ९ जुलै, २०२४

रोबोटची पत्रकार परिषद

जिनिव्हा येथे नुकतीच रोबोटची एक पत्रकार परिषद झाल्याची बातमी आहे. या पत्रकार परिषदेत रोबोटनी विश्वास व्यक्त केला की, आम्ही हे जग माणसांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे चालवू शकू. कारण आम्हाला भावना नसल्याने आम्ही फक्त सत्याच्या आधारे जग चालवू. स्वाभाविकच काही प्रश्न मनात आले. कदाचित प्राथमिक स्वरूपाचे. (प्राथमिक शिक्षण हेच सगळ्यात महत्त्वाचं आणि पायाभूत असतं. नाही का?)

- माणसांपेक्षा चांगलं जग चालवू म्हणताना, हे जग माणसं चालवतात असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. ते कितपत बरोबर आहे? पर्यावरण, अन्नधान्याचे कमी उत्पादन किंवा टीव्ही पाहू दिला नाही म्हणून आत्महत्या; यासारख्या असंख्य गोष्टींमध्ये असलेला मानवेतर घटक रोबोटना आकलन झालेला आहे का?

- रोबोटना जे सत्य वाटते किंवा वाटेल ते कोणते वा कोणाचे सत्य असेल? त्यांना जेवू घातलेल्या (feed केलेल्या) पेक्षा अधिक काही त्यांच्या सत्य कल्पनेत आहे का? असेल का? म्हणजेच त्यांचे सत्य हे सापेक्ष सत्यच राहणार.

- रोबोटना जेवू घालणाऱ्याने त्यांना काय जेवू घालावे हे कोण ठरवणार? हे जर त्यांना जन्माला घालणारा माणूसच ठरवणार असेल तर; आम्ही जग चालवू आणि ते चांगले चालवू; या म्हणण्याला किती अर्थ राहतो?

- याच पत्रकार परिषदेत रोबोटना कृत्रिम बुद्धिमत्ता (ai : artificial intelligence) बद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर एका रोबोटने सावध राहण्याचे व पुढे धोके असल्याचे मत व्यक्त केले; तर अन्य एका रोबोटने भविष्यातील संभाव्य धोक्यांची शक्यता फेटाळून लावली.

- माणसांप्रमाणेच एकाच मुद्यावर वेगळी मते असणारे रोबोट जग चालवताना असंख्य गोष्टींवर एक कसे होणार आणि हे जग अधिक चांगल्या प्रकारे कसे चालवणार? मतांतरावरून त्यांच्यात संघर्ष होईल का? किंवा मतांतर असताना ते नेमका निर्णय कसा घेणार?

- माणसांचे काय होणार? रोबोटना माणसांची गरज राहील वा नाही? आज माणसे आज्ञा देऊन रोबोटकडून कामे करवून घेतात. भविष्यात रोबोट माणसांना असेच आपल्या आज्ञांवर कामे करायला लावेल का? इत्यादी इत्यादी इत्यादी.

- पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या ५१ रोबोटकडे याची उत्तरे होती की नाही? माहिती नाही.

- श्रीपाद कोठे 

१० जुलै २०२३

मंगळवार, २ जुलै, २०२४

चांगल्या समाजासाठी

कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी gst. आता gst घोटाळा करणाऱ्या साडेबारा हजार कंपन्या आढळल्या.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते मोठे, उड्डाण पूल, मेट्रो इत्यादी. दिल्ली, मुंबई, पुणे सर्वत्र वाहतूक कोंडीने लोक त्रस्त.

पेट्रोल साठी परकीय चलन द्यावं लागतं म्हणून वीजेवर चालणारी वाहने. वाहनांना वीज लागते म्हणून अधिक वीजेचे उत्पादन. विजेचे अधिक उत्पादन करण्यासाठी कोळशाची आयात. कोळसा आयातीसाठी परकीय चलन.

पक्षांतर बंदी कायदा असून पक्ष फुटणे थांबत नाही.

यादी पुष्कळ होईल. भाजप काळातली होईल अन् बाकीच्यांच्या काळातील पण होईल. कायदे, व्यवस्था, सत्ता यासाठी अहमहमिकेने भांडणाऱ्यांना हे लक्षात येतं नसेल का?

टीप : ही पोस्ट टाईमपास करणाऱ्या विद्वान, अभ्यासक, कार्यकर्ते, पाठीराखे यांच्यासाठी नाही. चांगल्या समाजासाठी ज्यांची झोप एक दिवस तरी उडाली, ज्यांच्या डोळ्यातून एकदा तरी पाणी आले; त्यांच्यासाठी आहे. अन् पुन्हा सांगतो; चांगल्या समाजासाठी. एखादी घटना किंवा एखादा प्रसंग किंवा आपले या शब्दात येणाऱ्या गोष्टींसाठी नाही. चांगल्या समाजासाठी.

- श्रीपाद कोठे 

३ जुलै २०२३