गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

कलशारोहण

सगळ्यांनी, म्हणजे इकडच्यांनी आणि तिकडच्यांनी पण ऐकावा असा व्हिडिओ. दोन्ही पक्षांना भांडायला बळ देईल असा. 😄 असो. मला मात्र हा व्हिडिओ ऐकताना एक जुनी आठवण जागी झाली. शंकराचार्य (हे चार पिठातील नाहीत. मग शंकराचार्य कसे? वगैरे शंकांना माझ्याकडे उत्तरे नाहीत. ती मला मिळवायची पण नाहीत.) मंदिराच्या कळसाबद्दल बोलले त्यामुळे.

२००७ असेल. एका लग्नाला गेलो होतो. गप्पा मारत उभा होतो तेवढ्यात एक मित्र एक दोन जणांना घेऊन आला आणि आमची ओळख करून दिली. त्या एक दोघांना माझ्याकडे काम होतं. म्हटलं बोला. अन् त्यांनी काम सांगताच मी उडालोच. नागपूरला हिंगणा मार्गावर एक गजानन महाराज मंदिर आहे. त्या मंदिराचे ते कार्यकर्ते होते. दुसऱ्या दिवशी त्या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम होता. मी ते कलशारोहण करावे अशी त्यांची इच्छा होती. मी त्यांची समजूत काढली की, मी तसाही कोणीच नाही. अन् एवढं मोठं काम करण्यासाठी तर अगदीच पात्र नाही. मग त्यांनी त्यांची अडचण सांगितली. कलशारोहण एखाद्या संन्यासी व्यक्तीच्या हस्ते करायचे असते. पण कामाच्या गडबडीत त्यांना ही गोष्ट कोणी सांगितली नव्हती. ती एक दिवस आधी सांगितली. एक दोन ठिकाणी विचारपूस केली पण संन्यासी कोणी मिळाले नाहीत. आणखी प्रयत्न केले तर कोणी मिळतील देखील पण वेळ कमी होता. नव्हताच म्हटलं तरी चालेल. तेव्हा त्यांना कोणीतरी अधिकारी व्यक्तीने धर्मशास्त्रात असलेला एक तोडगा सांगितला की, एखाद्या ब्रम्हचारी व्यक्तीच्या हस्ते कलशारोहण करता येईल. त्यासाठी ते माझ्याकडे आले होते. मला त्यातले काहीही त्यावेळीही कळत नव्हते अन् आताही कळत नाही. पण कोणाची अडचण आहे अन् आपण ती दूर करू शकतो. शिवाय गजानन महाराजांच्या मंदिराचे काम असल्याने फारसा विचार करण्याची गरज नव्हती. मी हो म्हटले. कलशारोहण झाले. माझे काय पाप पुण्य असेल ते गजानन दरबारी ठेवले.

आज हा व्हिडिओ ऐकताना त्याचे शास्त्र ऐकायला मिळाले की, कलशारोहण करणाऱ्या व्यक्तीचा निर्वंश होतो अशी समजूत आहे. असे असताना कोण गृहस्थ कशाला त्या भानगडीत पडेल? अन् ब्रम्हचारी असेल तरी तो का म्हणून ही रिस्क घेईल? त्यामुळे संन्यासी हवा. मला त्या लोकांनी का बोलावले त्याचा शास्त्रीय उलगडा आज झाला. अन् प्रभूची योजनाही लक्षात आली. गृहस्थ नव्हतो आणि निर्वंश वगैरेची काही भानगड नव्हती. कलशारोहणाने तशी भानगड उत्पन्न होण्याची शक्यताही प्रभूने संपवून टाकली. वंश नाही म्हणजे पुढे नाव नाही. म्हणजेच हा जन्म म्हणजे पूर्णविराम. शेवटला जन्म. पुन्हा येणेजाणे नाही. अशाच एका अवलियाने एकदा बोलता बोलता म्हटलं होतं - 'तुमचा शेवटला जन्म आहे.' तेही आठवलं. त्यामुळे छान वाटलं. सारीपाटावरील शेवटलं दान पडलेलं आहे. कलशारोहण करून सगळ्या पापपुण्याचा हिशेब होऊन गेला आहे. आनंदी आनंद.

- श्रीपाद कोठे

२४ जानेवारी २०२३

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

राम का गुणगान करीये

मकर संक्रांतीपासून २१ जानेवारीपर्यंत रोज 'राम का गुणगान करीये' लिहावं असं मनात आलं होतं. परंतु अन्य लिखाण, कामं, व्यस्तता, प्रकृती; अशा सगळ्या कारणांनी ते शक्य नाही हेही लक्षात आलं आणि तो विचार सोडून दिला. मात्र दोन तीन दिवस झाले आतून कोणीतरी खूप जबरदस्ती करत आहे असं वाटतंय. कदाचित हनुमानजी गदा घेऊन उभे आहेत की - 'मी तुला हे लिही म्हणतो आहे नं.' त्यामुळे हे लिहितो आहे. अर्थात फक्त एकच दिवस हे त्या आतल्यांना सांगितलं आहे. असो.

श्रीरामाच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. रावणाशी युद्ध सुरू होतं आणि रामाच्या सगळ्या कौशल्याचाही काहीच उपयोग होत नाही. आणीबाणीची परिस्थिती उद्भवते तेव्हा जांबुवंत त्यांना शक्तीची उपासना करायला सांगतात. त्यासाठी १०८ नीलकमले आणली जातात. श्रीराम अनुष्ठानाला बसतात. नीलकमलांनी मातेची आराधना सुरू होते. अन् १०७ कमले वाहिल्यावर ताटातील कमले संपून जातात. ही मां दुर्गेची चलाखी असते. एक कमळ गायब झालेले असते. आता काय करायचे? सगळं मुसळ केरात. तेव्हाच श्रीरामांना आठवतं, आपली आई आपल्या डोळ्यांना नीलकमलाची उपमा देत असे. ते तात्काळ निर्णय घेतात. कमी पडणाऱ्या नीलकमलाच्या जागी आपलं नेत्रकमल मातेला अर्पण करायचं. त्यासाठी ते आपला नेत्र काढणार तोच दुर्गा प्रकट होते आणि त्यांना इच्छित वरदान देते. श्रीरामांच्या लोकविलक्षण धैर्यशीलतेचा हा प्रसंग आहे.

धैर्य हा रामाच्या चारित्र्याचा फार महत्त्वाचा गुण आहे. बालपणी ऋषिमुनींच्या यज्ञयागाचे रक्षण करण्यासाठी जाणे असो, पित्याने वनवासात जाण्याची आज्ञा करणे असो, रावणाने सीतेचे अपहरण करणे असो, सीतेचा शोध घेणे असो, वालीशी युद्ध असो, रावणाशी युद्ध असो, भरताला समजावणे असो, सीतेचा त्याग असो, लक्ष्मणाला शरयू जवळ करायला सांगणे असो... अनेक प्रसंग कसोटीचे पण त्यांचे धैर्य खचत नाही, मोडत नाही. रावणाला परास्त करण्याचे कर्तव्य पार पाडल्यावर ते उन्मादी होऊन त्याच्या छातीवर नाचत नाहीत. सीतेचा त्याग करताना, राजकर्तव्याचा अभिनिवेश बाळगत नाहीत. चुकीचे परंतु आवश्यक असे ते कर्तव्य करताना त्याचे कोणतेही समर्थन न करता ते प्रिय सीतेला टाळून वेळ मारून नेतात. प्रत्यक्ष भरत आपल्या आईला बरेवाईट बोलला तरी राम तिला काहीही म्हणत नाहीत. श्रीराम धैर्य कधीच सोडत नाहीत. म्हणूनच ते पराक्रमी ठरतात. शौर्याला धैर्याचा आधार असतो तेव्हा तो पराक्रम होतो. शौर्याला धैर्याचा आधार नसेल तर तो राक्षसीपणा ठरतो. रावणाच्या शौर्याला धैर्याचा आधार नव्हता म्हणून तो राक्षस होता. श्रीरामाच्या शौर्याला धैर्याचा आधार होता म्हणून ते प्रभू राम आहेत.

श्रीरामाचे नाव घेताना, त्याची भक्ती करताना, त्याच्या नावाचा प्रचारप्रसार करताना; त्याचा हा गुण अंगी बाणवायला हवा. आज अनेकदा तसे होताना दिसत नाही. हे वेदनादायी आहे. का म्हणून आपण धैर्य सोडून देतो? कशासाठी आक्रस्ताळेपणा? कशासाठी उतावळेपणा? कशासाठी उथळपणा? कशासाठी मर्यादेचे उल्लंघन? आपल्याला काहीच का सहन होत नाही? योग्य अयोग्य, धर्म अधर्म, न्याय अन्याय याचे मोजमाप आपणच आपले करतो आणि स्वतःला प्रभू राम समजून अयोग्य, अन्याय्य, अधर्म यांच्यावर तुटून पडतो, तेही रामाच्या नावाला साजेसे ठरणार नाही अशा रीतीने. का आणि कशासाठी? न्याय, धर्म इत्यादीचा निकष आपल्याला वाटणे हा नसतो. तसा तो समजला जातो तेव्हा रावण जन्माला येतात. अन् कालातीत कसोट्यांवर न्यायाचा आणि धर्माचा निर्णय करणारा श्रीराम होतो. श्रीरामाचे नाव घेऊन आपण रावणाची कृती करतो आहोत का? हा प्रश्न विचारलेला आज फारसा कोणाला आवडणार नाही. परंतु श्रीरामासाठी तेवढा वाईटपणा घ्यावाच लागेल. काहीही कारण नसताना, विचार चिंतन समज बाजूला सारून; वागणे, बोलणे, प्रतिक्रिया देणे, सगळ्यांशी शत्रुवत व्यवहार; हे शोभणारे नाही. आपल्या टीचभर आयुष्यात समस्त अस्तित्व आपल्या मुठीत आलं आहे असं समजून, सारं जग टाचेखाली घेण्याचा आविर्भाव; बाकी काहीही असू शकेल पण रामनामाला साजेसा नक्कीच नाही. कुठे काही वेगळा स्वर ऐकू आला, कुठे काही वेगळे मत कानी आले, कुठे काही वेगळा व्यवहार पाहायला मिळाला की; जणू आता जगबुडी होणार अशा थाटाने वागण्या बोलण्याचे कारण नाही. हजारो वर्षे झाली; मानवी संस्कृती या पृथ्वीवर नांदते आहे. तुमच्या माझ्या हातात नसलेली ती शक्ती व्यवस्थित ते चालवते आहे. आपल्यासारखे अब्जावधी आले गेले, ती शक्ती तिचं काम चोख करते. आपल्या टीचभर आयुष्यात आपण हे जग चालवतो हा भ्रम टाकून देऊन रामगुण घेता आले तर घ्यावे. जगाचं आणि आपलंही भलं वगैरे झालं तर त्यानेच होईल. किमान रामाच्या नावाला कलंक लावण्याचं पातक तरी आपल्या हातून होऊ नये.

- श्रीपाद कोठे

रविवार, १४ जानेवारी २०२४

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

श्रीराम परततात तेव्हा...

१४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम अयोध्येला परतले. भरताला त्यांच्या आगमनाची वर्दी मिळताच तो आनंदाने कामाला लागला. त्याने स्वागताची तयारी सुरू केली. काय करायचे त्याचे आदेश आणि सूचना सुरू केल्या. अन् स्वागतासाठी सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी दूतांना, सेवकांना पिटाळले. हे करताना कोणाकोणाला बोलवायचे तेही अंतर्बाह्य साधू असलेले भरत महाराज सांगत होते. त्यावेळी त्यांनी गणिकांनाही बोलवा असे मुद्दाम उल्लेख करून सांगितले. (इति श्रीमद् वाल्मिकी रामायण)

(पोस्टचा उद्देश काहीच नाही. पण २२ तारखेपर्यंत राम राम चालणारच आहे. तर आपण का मागे राहा? खरं तर राम राम अखंडच चालायला हवे. अगदी शिव्या द्यायच्या असतील त्यासुद्धा त्यालाच द्याव्या. रावणाला नाही का मुक्ती मिळाली. विनासायास. तेव्हा... 😀)

- श्रीपाद कोठे 

१० जानेवारी २०२४

- आपण काय आहोत, कसे आहोत; हे आपल्यांनाच समजत नाही.

- आपण काय आहोत, कसे आहोत; हे आपल्याला तरी कुठे समजतं?

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

संघवाले नं...

 - तुम्ही संघवाले पण नं.

- का रे?

- काहीही करता आणि त्याचं समर्थन करता.

- काय झालं?

- काल त्या रणवीर, आलियाला राम मंदिराचं निमंत्रण दिलं आणि तू त्याचं केवढं समर्थन केलं.

- हा हा हा

- हसतो काय?

- तुला एक माहिती सांगतो. वीसेक वर्षांपूर्वीची. विद्यमान सरसंघचालक त्यावेळी सरकार्यवाह होते. आग्रा येथे संघाचं खूप मोठं शिबिर झालं होतं. सव्वा लाख गणवेशधारी स्वयंसेवकांचं. त्याचं निमंत्रण अनेक लोकांना देण्यात आलं होतं. त्यात श्रीमती सोनिया गांधी यापण होत्या. त्या आल्या नव्हत्याच पण बोलावलं होतं. श्रीमती गांधी यांच्यात काही बदल झाला का माहिती नाही पण वीस वर्षात राजकीय क्षेत्रात किती बदल झाला ते कोणीच कोणाला सांगण्याची गरज नाही. २०-२५ वर्षांनी चित्रपट सृष्टी बदललेली दिसली तर आश्चर्य नको वाटायला.

- ... ... ...

- आणखीन एक सांगतो. खूप जुनं. १९४८ च्या बंदीच्या वेळी ज्या लोकांनी डॉ. हेडगेवार यांच्या समाधीची तोडफोड केली होती ते नंतर संघाचे समर्थक झाले. अन् त्याही पूर्वी अन् त्यानंतरही शाखांवर, स्वयंसेवकांच्या घरांवर दगडफेक करणारे, शाखेत ध्वज लावतात त्याच जागेवर विष्ठा करून ठेवणारे नंतर शाखेत येऊ लागतात. त्यातले अनेक जण चांगले कार्यकर्ते सुद्धा होतात. मला ठाऊक आहे अशी उदाहरणे सगळीकडे सारखी लागू होतातच असं नाही. पण बदलही होतातच.

- श्रीपाद कोठे

९ जानेवारी २०२४

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

कुमार विश्वास

कुमार विश्वास नावाचे एक गृहस्थ आहेत. ते लोकप्रिय कविता करतात. हिंदी भाषकात मंचीय कवितांचे प्रचंड वेड आहे. त्यामुळे अनेक कवींचा तोच व्यवसाय आहे. कुमार विश्वास यांचाही. त्यातून त्यांनी भरपूर माया जमवली आहे. त्यातून मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही काळ ते राजकारणात गेले. अन् अलीकडे रामकथा करू लागले आहेत. (लोक कथा कशी काय करू लागतात आणि लोक अशा लोकांना कसे काय बोलावतात? हा गडबडगुंता मला तरी सुटलेला नाही. ते असो.) त्यामुळे धर्माचे भाष्यकार देखील समजले जाऊ लागले आहेत. तर हे महाशय सध्याच्या राममय वातावरणाचा पुरेपूर उपयोग करून घेत एका टीव्ही वाहिनीवर 'संपूर्ण अयोध्या' अशी एक मालिका करीत आहेत. त्यात त्यांनी ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेचा आढावा घेतला. त्या आढाव्याचा समारोप करताना ते म्हणाले - 'प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जगाला वंदनीय आहेत परंतु त्या दिवशी रामाच्या नावाने अडवाणी, जोशी, सिंघल, कल्याणसिंह, नरसिंह राव या सगळ्यांनी आपल्या मर्यादा पार करून काम केले.' त्यांनी ज्या लोकांची नावे घेतली त्यांचे आणि त्या पक्षाचे वकीलपत्र घेण्याचे मला कारण नाही. परंतु त्या घटनेला ३० वर्षांहून अधिक काळ झालेला असताना, त्यासंबंधात न्यायालयात सगळा काथ्याकूट झालेला असताना; एका जबाबदार समजल्या जाणाऱ्या माणसाने, तथाकथित रामभक्ताने इतके बेजबाबदारपणे बोलावे?

- श्रीपाद कोठे

५ जानेवारी २०२४