बुधवार, १७ मे, २०२३

हिंदुत्वाच्या कक्षा आणि पैशाचे चलनवलन

एका संघगीतातील एक ओळ आहे - 'हिंदुत्वाच्या असीम कक्षा, संघशक्तीने तेज लुटावे'. आज ही ओळ आठवण्याचे कारण आहे - गहू निर्यातबंदीचा विषय. सध्या जगभरातच अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवतो आहे. त्यात गहू देखील आहे. पोटाशी संबंधित आणि रोज लागणारी गोष्ट. त्यामुळे त्याची चर्चा होणारच. जगाची गरज लक्षात घेऊन भारताने गहू निर्यात मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण स्वीकारले. पण त्याचा परिणाम होऊन भारतात भाव भडकले. मग सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. पूर्वी नोंदणी केलेल्यांना सूट देऊन. त्यामुळे निर्यातदार नाराज झाले. स्वाभाविकच आहे. निर्यातदारांना पैसा हवा. कोणी उपाशी राहू नये, सगळ्यांना भाव परवडावे हे त्यांना का वाटावे? अन आठवला कृष्ण. गोकुळातल्या बालकांच्या तोंडचे दूध बाहेर जाऊ न देणारा. त्यासाठी संघर्ष करणारा. मडकी फोडणारा. पैशासाठी स्वजनांना उपाशी ठेवणं हे हिंदुत्व असू शकत नाही. त्यासाठी नाराजी पत्करावी लागली तरी चालेल. हां, एक गोष्ट मात्र आहे - कृष्णाला कसलीही अपेक्षा नव्हती. धनपिसाट व्यापाऱ्यांकडून त्याला काहीही नको होते. हिंदुत्वाच्या असीम कक्षेतील ही पण एक कक्षा आहे.

************

आर्थिक क्षेत्रातील आणखीन एक विषय सध्या चर्चेत आहे. श्रीलंकेतील परिस्थिती. त्यात घराणेशाही आणि सवलती हे दोन घटक असतात. भोळेभाबडे लोक फारसा विचार न करता मेसेज फिरवत राहतात. दोन घटकातील घराणेशाही हा राजकीय विषय आहे. तूर्त त्यावर काही म्हणायचे नाही. पण सवलती या विषयावर मात्र बोलले पाहिजे.

- जगातल्या कोणत्या देशात, कोणत्या अर्थव्यवस्थेत सवलती नाहीत?

- आर्थिक सवलती खरंच बंद करता येऊ शकतात का? बंद कराव्यात का?

- आर्थिक सवलती बंद करणे माणुसकी, न्याय आणि नीतिमत्ता यांना धरून होईल का?

- किमतीचे नियंत्रण इत्यादी कामे सरकारची नाहीत असे म्हणून सगळी अर्थव्यवस्था बाजाराधीन करताना, जनतेच्या कल्याणाची चिंता हे सरकारचे काम आहे याचा विसर का पडावा?

- अर्थव्यवस्था बाजाराने नियंत्रित केली तरीही, ती समाजाचे एकूण जगणे कठीण करत असेल तर सरकारने त्यात हस्तक्षेप करायला हवा की नको?

- सवलती बंद कराव्यात असे म्हणताना, एकूण समाजाच्या उत्पन्नाच्या parity चा विचार करायचा की नाही?

- पैसा कसा निर्माण होतो आणि मुख्य म्हणजे कसा फिरतो हे ध्यानात न घेता सवलती बंद करा म्हणणे किती शहाणपणाचे म्हणता येईल?

१) डोमेक्स घ्या किंवा घडी घ्या म्हणणाऱ्याला कोट्यवधी रुपये मिळतात अन राबराब राबणाऱ्याला दोन वेळची जुळवाजुळव करताना ओढाताण होते.

२) शिक्षण ही गोष्ट पैसा निर्माण करू शकते वा नाही याचा विचार न करता, शिक्षण क्षेत्र विना अनुदानित केले जाते. त्यातून शिकवणारे पालक कंगाल किंवा भ्रष्ट होतात आणि शिक्षण सम्राट गब्बर होतात.

३) अंगावरचे कपडे उतरवले की लाखो रुपये मिळतात अन दिवसभर पाट्या टाकल्या की कोरडी भाकर मिळते.

४) कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेमके काय काम करतात हे कळत नसले तरीही त्यांचे बंगले आणि गाड्या कशा असतात? या प्रश्नाला काय उत्तर.

५) तेच तेच खेळणाऱ्या खेळाडूंच्या लाखोंच्या आणि कोटींच्या बोली लागतात. त्यांना cheer up करण्यासाठी श्रम किंवा अक्कल काहीही न वापरणाऱ्यांना लाखो रुपये मिळतात. शेतात मजुरी करणाऱ्याचे काय?

६) तीच तीच गाणी गल्लीबोळातून गणपती, दिवाळी, स्वातंत्र्यदिन यांना गाऊन हजारो, लाखो रुपये मिळतात. कवी वा लेखक तेच तेच लिहू शकतात का? अन त्यातून पैसा मिळतो का?

पैशाचं चलनवलन कसं होतं याची अक्षरशः हजारो उदाहरणे देता येतील. हे लक्षात न घेता, सवलतीच्या नावाने खापर फोडणे हे निर्बुद्धपणा शिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. सर्वसामान्य माणसाचे विचारशून्यत्व आणि झुंडीत रमण्याची वृत्ती कमी होईल तो सुदिन.

- श्रीपाद कोठे

१८ मे २०२२

शनिवार, १३ मे, २०२३

साम्यवाद आणि भांडवलशाही

- कम्युनिझम संवेदना भडकवून, माणसाला एकांगी आणि क्रूर बनवतो.

- भांडवलशाही संवेदना गोठवून, माणसाला एकांगी आणि क्रूर बनवते.

- कम्युनिझम आणि भांडवलशाही दोन्ही जडवादी आणि भोगवादी आहेत.

- कम्युनिझम आणि भांडवलशाही दोन्ही माणसाला माणूस समजत नाहीत.

- आज भारतासहित बहुतेक सर्वत्र भांडवलशाही आहे.

- भांडवलशाही म्हणजे भांडवलाची शाही, भांडवलाचे राज्य.

- साहित्य, संगीत, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, परस्पर संबंध यात भांडवलशाहीचाच बोलबाला आहे.

एक उदाहरण : एका मोठ्या नावाने लिहिलेला लेख सकाळी वाचत होतो. वाढत्या उन्हाचा आर्थिक घटकांवर होणारा परिणाम. त्यात वाढत्या उन्हावर चिंता होती, पण पुढे म्हटले होते की, 'या वाढत्या तापमानाशी जीवनव्यवहार जुळवून घेण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे.' विचार न करता वाचले तर लगेच पटून जाते हे म्हणणे. मात्र, मूळ कारण असलेले वाढते तापमान वाढू नये याचा विचार मात्र मनातही येत नाही. कारण भोगाची वखवख पेरणाऱ्या भांडवलशाहीने संवेदना गोठवून टाकलेल्या असतात. आमच्या ऐषोरामात, सुखसाधनात, उपभोगात; किंचितही कमतरता वा न्यून नको. एवढेच नाही तर ते सतत वाढत राहायला हवे. मानवी दुर्बलता exploit करण्यावरच भांडवलशाही उभी आहे. त्यामुळे माणसाचे माणूसपण रसातळाला जात आहे.

- श्रीपाद कोठे

१४ मे २०२२

भारतीय संगीत आणि मुसलमान कलाकार

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगीच्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्या छायाचित्रावर पुष्कळ पोस्ट दिसल्या. हे छायाचित्र बोलके आहेच. पण मला त्यात आश्चर्य वा नवल नाही वाटले. नागपुरात 'सप्तक' संस्थेतर्फे एक मैफिल होती रात्रभराची. भारतीय बैठक होती. मध्यरात्रीच्या सुमारास स्वाभाविकच मंडळी सुस्तावली होती. काही जण पाय लांब करून वगैरे आळसावले होते. उस्तादजी त्यावेळी मंचावर होते. त्यांनी सगळ्यांना आवाहन केले होते - 'यह माँ सरस्वती का मंदिर है. उसका अनादर ना करे. ठीक बैठे.' हे म्हणताना ते मुस्लिमच होते. ते हिंदू झाले नव्हते. पण त्यांनी हिंदुत्व स्वीकारले होते, असे म्हणता येईल.

प्रसिद्ध धृपद गायक उस्ताद फहीमुद्दीन डागर यांचाही असाच अनुभव आहे. स्पीक मॅके संस्थेने त्यांचे काही कार्यक्रम नागपुरात ठेवले होते. मी नागपुरातल्या त्यांच्या मुक्कामी त्यांना भेटायला गेलो. त्याही वेळी त्यांच्याभोवती अनेक विद्यार्थ्यांचा आणि रसिकांचा गराडा होता. धृपद मधील अनेक बारकावे ते उदाहरणांसह दाखवत होते. बोलणंही सुरू होतं. विषय त्यांच्या शिवभक्तीवर आला. तेव्हा त्यांनी शिवाच्या गाभाऱ्यातील ओंकार, रुद्र आणि धृपद यांच्यातील साम्य वगैरे उदाहरणांसह स्पष्ट केले.

अशी अनेक उदाहरणे आहेत. हिंदी चित्रपटातील अनेक भजने मुस्लिम शायरांनी लिहिली आहेत.

राजकारण तोडतं.

संस्कृती जोडते.

हिंदुत्व ही संस्कृती आहे.

- श्रीपाद कोठे

१४ मे २०२२

शुक्रवार, ५ मे, २०२३

बुद्ध दिनानिमित्त

जन्म, ज्ञान आणि निर्वाण एकाच दिवशी झालेल्या गौतम बुद्धांचा आजचा दिवस. अन्य गोष्टींबरोबरच त्यांच्या अहिंसा तत्वाची चर्चाही अपरिहार्यच. मुळात हिंसा अहिंसा चर्चा करताना; अहिंसेचे पक्षधर आणि अहिंसेचे आलोचक दोघेही; हिंसा अहिंसा यांचा संबंध शस्त्र या बाबीशी जोडतात. त्यातून न संपणारी आणि अर्थहीन वादावादी सुरू होते. मुळात हिंसा अहिंसा यांचा शस्त्र या बाबीशी संबंधच नाही. हिंसा अहिंसा या मनाच्या वृत्ती आहेत. त्या नीट समजून घेतल्या की वादाचे कारण उरत नाही. मानवी जीवनात अहिंसा हीच स्वीकारणीय बाब आहे आणि हिंसा ही पूर्णपणे त्याज्य बाब आहे. हिंसा ही अपरिहार्य वगैरे नसतेच. तशी ती असूच शकत नाही. शस्त्र धारण करणाराच नव्हे तर शस्त्र वापरणारा सैनिक हा हिंसक नसतोच आणि शस्त्र वापरणारा अतिरेकी आणि शाळकरी मुलगा देखील हिंसक असतो. फरक कोणता आहे? फरक आहे मनोवृत्तीत. स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू; म्हणजे हिंसा. हिंसा ही हाती शस्त्र घेऊनच होते असे नाही. शस्त्राला हात न लावताही हिंसा होते, होऊ शकते. हिंसेचे उघड समर्थक किंवा हिंसा अपरिहार्य असते असं म्हणणारे; अप्रत्यक्षपणे स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू यांचेच समर्थन करत असतात. त्यांना म्हणायचे असते शस्त्र अपरिहार्य असतं पण ते म्हणतात हिंसा अपरिहार्य असते. मात्र ते योग्य नाही. शस्त्र अपरिहार्य असू शकतं पण हिंसा अपरिहार्य नसतेच. ती त्याज्यच असते. शस्त्राला आत्यंतिक विरोध करणारेही असाच घोळ करतात. ते शस्त्राला विरोध करतात पण हिंसेचे समर्थन करतात. शस्त्र न धरता स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू त्यांना चालतात वा दुर्लक्षणीय वाटतात. याचे कारण हिंसा अहिंसा या बाबी नीट समजून न घेणे.

भगवान बुद्ध वा महात्मा गांधी यांच्यावर अहिंसेसाठी होणारी टीकाही यासाठीच पोरकट असते. त्या दोघांचेही कार्य माणसाच्या मनातील हिंसा (स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू ) काढून टाकण्याचे होते. त्यात आक्षेप घेण्यासारखे वा टीका करण्यासारखे काहीच असू शकत नाही. याचा प्रतिवाद करण्यासाठी लगेच गांधींची काही वचने वगैरे उद्धृत केली जाऊ शकतील. विनंती एकच की, आधी हिंसा अहिंसा याबाबत गांधींचा मुळातून आणि पूर्ण अभ्यास करावा. त्यांची चार दोन वाक्ये वा टीकाकारांची मते यावर न जाता स्वतंत्र अभ्यास करावा.

दुसरे म्हणजे, आपल्याला मान्य होते की नाही याचा काहीही विचार न करता, नियती मानवजातीला पुढे घेऊन जात असते आणि त्यासाठी युगपुरुष जन्माला घालत असते. त्यांचे कार्य मानवजातीच्या शतकांच्या किंवा सहस्रकांच्या घडणीचे असते. अनेकदा ते त्या युगपुरुषांनाही ठाऊक नसते. त्यांना माध्यम करून नियती डाव मांडत आणि मोडत असते. आपल्या छोट्याशा बुद्धीला त्याचे आकलन होईलच असे नसते. भ. बुद्ध आणि गांधीजी हे असे युगपुरुष होते.

उरला शस्त्रांचा वापर. तर जोवर बहुसंख्य मानवी मनांमध्ये हिंसा (स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू ) ठाण मांडून आहे तोवर ती थोपवण्यासाठी शस्त्रांचा कमीअधिक वापर होतच राहील. व्हावा लागेल. परंतु शस्त्र वापरणारा सुद्धा अहिंसक असावा लागेल. तो अहिंसक नसेल तर त्यातून अतिरेकी आणि दहशतवादी तयार होत राहतील. रशिया, अमेरिका, चीन, जपान, युरोप, मध्य आशिया आदी हिंसक आहेत आणि शस्त्रांचा वापर करतात म्हणून जगासमोर संकट निर्माण होते. भारत अहिंसक आहे आणि शस्त्र वापरतो तरीही जगासमोर संकट उत्पन्न होत नाही.

अहिंसेचे पक्षधर - ज्यांना शस्त्रे नकोत आणि हिंसेचे समर्थक - ज्यांना दहशतवाद नको; या दोघांच्याही मनातील चित्र साकार होण्यासाठी मानवी मनातील हिंसा निपटून काढली जायला हवी. मानवी मनात अहिंसा रुजायला हवी. भगवान बुद्धांना प्रणाम. 🙏

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, ५ मे २०२३

बुधवार, ३ मे, २०२३

इतस्ततः

 - चूक बरोबर करून सहजीवन आकाराला येत नाही.

- तू वाईट हे सिद्ध करून मी चांगला हे सिद्ध होत नाही.

- आदर, विश्वास मागून मिळत नाही. कमवावे लागतात.

- कायदे, नियम आततायीपणा थांबवण्यापुरते उपयोगाचे असतात.

- कायदे आणि नियमांनी सद्गुण, सदाचरण, सद्विचार निर्माण होत नाहीत.

महागाई आणि मुजोरी

काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी out of the way जाऊन पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले होते. अन आज रिझर्व्ह बँकेने महागाईच्या चिंतेने Monetary policy ला वेळ असताना मधेच कर्जावरील व्याजदर वाढवले. मला पडलेला एकच प्रश्न - जे पंतप्रधानांना वाटतं, जे रिझर्व्ह बँकेला वाटतं; ते भाजप समर्थकांना वाटतं का? वाटेल का? किमान महागाई आणि अर्थकारण याबाबत फक्त राजकीय मुजोरी करणं बंद होईल का? त्या मुजोरीने आपण केवळ हास्यास्पद आणि अविश्वसनीय ठरतो हे समर्थकांना कळेल तो सुदिन. कोण जबाबदार वगैरे प्रश्न नंतरचे असतात. पहिले वास्तव स्वीकारणे महत्त्वाचे असते. अन वास्तव स्वीकारणे हा मनाचा उमदेपणाही असतो.

- महागाई, inflation, stagnation, stagflation इत्यादी इत्यादी इत्यादी दोन जागतिक महायुद्धांनंतरचा अर्थकारणाचा स्वभाव झाला आहे. तेच तेच उपाय, त्याच त्याच चर्चा यांचे दळण उबग येईपर्यंत दळले जाते. होत काहीच नाही. तातडीची आणि मूलभूत गरज आहे ती 'शास्त्रीय'च्या बाहेर पडण्याची. कोणतंही शास्त्र, अगदी कोणतंही शास्त्र अंतिम नसतं, पूर्ण नसतं. जीवनाचा परीघ शास्त्रापेक्षा खूप मोठा असतो. त्यामुळे शास्त्राला जीवनाशी जोडणं, जीवनाप्रमाणे नवीन घाट देणं आवश्यक असतं. अर्थशास्त्र जीवनाशी जोडण्याची गरज फार कोणाला वाटत नाही हे दुर्दैव आहे.

- श्रीपाद कोठे

४ मे २०२२

मंगळवार, २ मे, २०२३

अयोग्य

बुलढाणा जिल्ह्यात हिंदू बांधवांनी मुस्लिमांना भोंगा भेट दिल्याची एक बातमी पाहिली. Gesture वगैरे ठीक पण तद्दन अविचारी कृती. राजकारणाने हा प्रश्न हिंदू विरुद्ध मुसलमान असा केला. पण समाजाने अक्कल गहाण ठेवावी का? मोठमोठ्या आवाजात भोंगे वाजवणे, रस्त्यावर किंवा कुठेही सामान्य व्यवहारात अडथळे येतील अशा कृती; हे चांगले की वाईट? हे योग्य की अयोग्य? मग जे चांगले, जे योग्य त्यासाठी सगळ्यांना तयार करायला हवे की नको? राजकारणी राजकारणच करणार. त्यांना तेच करायचे असते. त्यासाठी विधिनिषेध नसतात. तुमची आमची काय मजबुरी आहे? आपली आपल्याला लाज वाटणं पुन्हा सुरू व्हायला हवं आहे.

- श्रीपाद कोठे

३ मे २०२२