जन्म, ज्ञान आणि निर्वाण एकाच दिवशी झालेल्या गौतम बुद्धांचा आजचा दिवस. अन्य गोष्टींबरोबरच त्यांच्या अहिंसा तत्वाची चर्चाही अपरिहार्यच. मुळात हिंसा अहिंसा चर्चा करताना; अहिंसेचे पक्षधर आणि अहिंसेचे आलोचक दोघेही; हिंसा अहिंसा यांचा संबंध शस्त्र या बाबीशी जोडतात. त्यातून न संपणारी आणि अर्थहीन वादावादी सुरू होते. मुळात हिंसा अहिंसा यांचा शस्त्र या बाबीशी संबंधच नाही. हिंसा अहिंसा या मनाच्या वृत्ती आहेत. त्या नीट समजून घेतल्या की वादाचे कारण उरत नाही. मानवी जीवनात अहिंसा हीच स्वीकारणीय बाब आहे आणि हिंसा ही पूर्णपणे त्याज्य बाब आहे. हिंसा ही अपरिहार्य वगैरे नसतेच. तशी ती असूच शकत नाही. शस्त्र धारण करणाराच नव्हे तर शस्त्र वापरणारा सैनिक हा हिंसक नसतोच आणि शस्त्र वापरणारा अतिरेकी आणि शाळकरी मुलगा देखील हिंसक असतो. फरक कोणता आहे? फरक आहे मनोवृत्तीत. स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू; म्हणजे हिंसा. हिंसा ही हाती शस्त्र घेऊनच होते असे नाही. शस्त्राला हात न लावताही हिंसा होते, होऊ शकते. हिंसेचे उघड समर्थक किंवा हिंसा अपरिहार्य असते असं म्हणणारे; अप्रत्यक्षपणे स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू यांचेच समर्थन करत असतात. त्यांना म्हणायचे असते शस्त्र अपरिहार्य असतं पण ते म्हणतात हिंसा अपरिहार्य असते. मात्र ते योग्य नाही. शस्त्र अपरिहार्य असू शकतं पण हिंसा अपरिहार्य नसतेच. ती त्याज्यच असते. शस्त्राला आत्यंतिक विरोध करणारेही असाच घोळ करतात. ते शस्त्राला विरोध करतात पण हिंसेचे समर्थन करतात. शस्त्र न धरता स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू त्यांना चालतात वा दुर्लक्षणीय वाटतात. याचे कारण हिंसा अहिंसा या बाबी नीट समजून न घेणे.
भगवान बुद्ध वा महात्मा गांधी यांच्यावर अहिंसेसाठी होणारी टीकाही यासाठीच पोरकट असते. त्या दोघांचेही कार्य माणसाच्या मनातील हिंसा (स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू ) काढून टाकण्याचे होते. त्यात आक्षेप घेण्यासारखे वा टीका करण्यासारखे काहीच असू शकत नाही. याचा प्रतिवाद करण्यासाठी लगेच गांधींची काही वचने वगैरे उद्धृत केली जाऊ शकतील. विनंती एकच की, आधी हिंसा अहिंसा याबाबत गांधींचा मुळातून आणि पूर्ण अभ्यास करावा. त्यांची चार दोन वाक्ये वा टीकाकारांची मते यावर न जाता स्वतंत्र अभ्यास करावा.
दुसरे म्हणजे, आपल्याला मान्य होते की नाही याचा काहीही विचार न करता, नियती मानवजातीला पुढे घेऊन जात असते आणि त्यासाठी युगपुरुष जन्माला घालत असते. त्यांचे कार्य मानवजातीच्या शतकांच्या किंवा सहस्रकांच्या घडणीचे असते. अनेकदा ते त्या युगपुरुषांनाही ठाऊक नसते. त्यांना माध्यम करून नियती डाव मांडत आणि मोडत असते. आपल्या छोट्याशा बुद्धीला त्याचे आकलन होईलच असे नसते. भ. बुद्ध आणि गांधीजी हे असे युगपुरुष होते.
उरला शस्त्रांचा वापर. तर जोवर बहुसंख्य मानवी मनांमध्ये हिंसा (स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू ) ठाण मांडून आहे तोवर ती थोपवण्यासाठी शस्त्रांचा कमीअधिक वापर होतच राहील. व्हावा लागेल. परंतु शस्त्र वापरणारा सुद्धा अहिंसक असावा लागेल. तो अहिंसक नसेल तर त्यातून अतिरेकी आणि दहशतवादी तयार होत राहतील. रशिया, अमेरिका, चीन, जपान, युरोप, मध्य आशिया आदी हिंसक आहेत आणि शस्त्रांचा वापर करतात म्हणून जगासमोर संकट निर्माण होते. भारत अहिंसक आहे आणि शस्त्र वापरतो तरीही जगासमोर संकट उत्पन्न होत नाही.
अहिंसेचे पक्षधर - ज्यांना शस्त्रे नकोत आणि हिंसेचे समर्थक - ज्यांना दहशतवाद नको; या दोघांच्याही मनातील चित्र साकार होण्यासाठी मानवी मनातील हिंसा निपटून काढली जायला हवी. मानवी मनात अहिंसा रुजायला हवी. भगवान बुद्धांना प्रणाम. 🙏
- श्रीपाद कोठे
शुक्रवार, ५ मे २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा