शनिवार, २० मे, २०२३

मैत्रीण

सध्या एक नवीन मैत्रीण आयुष्यात आली आहे. घरच्या मोगऱ्याच्या वेलाची तिला खूप ओढ आहे. अन त्या ओढीमुळेच ती यायला लागली अन रोज येते आहे. एक वेगळंच छान feeling सध्या आनंद देतं आहे. मोठी गोड आहे ही मैत्रीण. अबोल आहे. भिरभिर नजरेने पाहत असते माझ्याकडे.

ती आहे एक पक्षीण. पंख पसरून भराऱ्या घेणारी. स्वच्छंदी... स्वैर नाही. तिला स्वतःचा छंद आहे. त्यातच रमलेली असते सतत. काहीच दिवसांपूर्वी ती मोगऱ्याच्या वेलीवर आली. वेलीच्या आडव्यातिडव्या फांद्यांमध्ये एक जागा शोधली. अन तिथे वाळल्या गवताच्या काड्यांचा एक बिछाना तयार केला सुंदरसा. नाजुकसा. एक दिवस त्या बिछान्यावर एक मोगऱ्याचं टपोर फूल दिसलं. म्हणून हात पुढे केला तर ते फूल नव्हतं, ते होतं त्या पक्षिणीचं छोटंसं अंडं. पांढरं शुभ्र. पुढे केलेला हात लगेच मागे घेतला.

माझी मैत्रीण ते अंडं उबवायला तिथे रोज येते. खरं तर तिथेच असते. फुलं तोडायला गेलं की नजर रोखून फांद्यांच्या फटीमधून पाहते एकटक. आपणं फुलं तोडावी. ती शांत बसलेली असते त्या अंड्यावर. तिच्या हक्काच्या जागेजवळ फुल असेल तर हात तिकडे जातो. तेव्हा भर्रकन उडते पंख पसरून आणि जाऊन बसते समोरच्या तारेवर. तिला वाटत असेल आपल्याला धरतो की काय? पण तिला ठाऊक नाही की, याने आजवर कोणत्याही मैत्रिणीला धरलेलं नाही. हो, धरतो की काय असेच वाटत असेल. अंड्याची काळजी नसणार. कारण अंडं तिथेच असतं. ती अंडं घेऊन जात नाही. कदाचित अंडं घेऊन जाता येत नाही हेही कारण असावं. कोणास ठाऊक. अजून मैत्रिणीच्या मनात तेवढं जाता आलेलं नाही.

संध्याकाळी गच्चीवर फिरायला जातो तेव्हाही ती असतेच अंड्यावर बसलेली. कितीही वेळ फिरत राहा बाजूला. किंवा नुसतं जवळ उभं राहून पाहात राहा, तिच्याकडे किंवा इकडेतिकडे. ती कसलीही हालचाल करत नाही. बसली राहते गपगुमान. हा काळ किती दिवसांचा ठाऊक नाही. कधीतरी तिचं हे काम संपेल. छोटंसं तिच्यासारखंच पिल्लू अंड्याचं पांढरं कवच फोडून बाहेर येईल. मिचमीचे डोळे उघडेल. अंडं उबवणारी मैत्रीण त्या प्रतिकृतीला काही दिवस आपल्या चोचीने घास भरवेल. पंख हलवण्याचा प्रयत्न करता करता एक दिवस त्या पिल्लाचे पंख उघडतील. अन ते जाईल उडून. देशविदेश फिरायला. आकाश कवेत घ्यायला. असंच होत असतं. अन असंच होवो.

एक मैत्रीण लाभली. तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या काळाचा साक्षीदार होता आलं. आनंद आणखीन काय असतो?

- श्रीपाद कोठे

शनिवार, २१ मे २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा