उदगीर साहित्य संमेलनातील अध्यक्षांच्या भाषणाची बरीच चर्चा सुरू आहे. त्या भाषणाचे विश्लेषण करणारी एक चर्चा नागपुरात आयोजित करण्यात आली होती. त्या चर्चेत अध्यक्षांच्या भाषणावर घणाघाती टीका झाली. स्वाभाविकच त्याची प्रतिक्रिया उमटली. वेगळ्या वैचारिक वर्तुळातील एका वृत्तपत्राने नागपुरात झालेल्या चर्चेवर अधिक घणाघाती टीका करणाऱ्या प्रतिक्रिया संकलित करून प्रसिद्ध केल्या. त्यातील राजकारणाचा भाग असेल तो असो. पण नागपुरातील चर्चेवर टीका करणाऱ्या ज्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यात व्यक्त झालेले निखळ वैचारिक मुद्दे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. एक एक मुद्दा घेऊन काही मी लिहिणार नाही. कारण ते मग पोरकट भांडणाच्या दिशेने जाते. त्याऐवजी त्या प्रतिक्रियांच्या लघुत्तम साधारण विभाजकावर मी लिहिणार आहे.
लेखकाने व्यवस्थेला आरसा दाखवायला हवा असा एक मुद्दा त्यात प्रामुख्याने आला आहे. चांगलं आहे. पण फक्त व्यवस्थेला का? व्यवस्था ज्या विचारांवर उभी असते, ज्या विचारांच्या आधारे विकसित होते आणि चालते; त्या विचारांना आणि विचारपद्धतींनाही लेखकाने आरसा दाखवायला हवा की नको; याचेही उत्तर द्यावेच लागेल.
गेल्या दीडेकशे वर्षात व्यवस्था हीच गोष्ट मानवाच्या समस्त गोष्टींसाठी जबाबदार असते असा एक विचार रुजला, रुजवला गेला आहे. हा योग्य आहे का? याचे चिंतन लेखकांनी का करू नये? मानवी जीवन अतिशय गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र असते. त्यात व्यवस्था हा एक घटक जसा असतो तसेच अन्यही पुष्कळ घटक असतात. मात्र व्यवस्था व्यवस्था करत सतत उरबडवेपणा करण्याने काय साध्य होणार? दुसरी बाब - मानवी जीवनात व्यवस्थेची भूमिका असते तसेच व्यवस्था ज्या गृहितकांवर उभ्या होतात त्यांचीही भूमिका असते. मानवी बुद्धीचे स्वयंपूर्णत्व, त्या बुद्धीला आकलन होणाऱ्या विज्ञानाची सर्वोच्चता, मानवी बुद्धीच्या आकलनातील व्यवस्थापन आणि नियोजन, मानवी बुद्धीला गम्य नसणाऱ्या बाबींचे अस्तित्व नाकारणे, यातून पुढे आलेले - स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, न्याय इत्यादी; या सगळ्याच गोष्टी आज प्रश्नांकित झालेल्या आहेत. केवळ भारतात नाही तर जगभरात. या सगळ्या धारणांनी आणि गृहितकांनी जगाला आज कुठे आणून ठेवले हे सध्याच्या रशिया - युक्रेन युद्धाच्या एका उदाहरणावरून सुद्धा स्पष्ट होते. बरे, जगाचं थोडा वेळ बाजूला ठेवू. भारताची चर्चा करू. अध्यक्षांना जी मूल्ये खूप महत्त्वाची वाटतात किंवा प्रतिक्रिया देणाऱ्यांची ज्या मूल्यांशी बांधिलकी आहे; ती मूल्ये शिरोधार्य मानणारी व्यवस्था साठ वर्षे भारतात होती. या साठ वर्षात भारताच्या सगळ्या समस्या सुटून भारताचे नंदनवन का झाले नाही? वर्तमान व्यवस्थेला आरसा दाखवायला काहीच हरकत नाही पण साठ वर्षे जी व्यवस्था होती तिच्यासमोरही आरसा धरावा लागेलच ना?
मुळात सगळ्या वादाची मेख इथे आहे. आरसा दाखवताना जी वेचक वृत्ती दाखवली जाते ती मोठ्या असंतोषाला जन्म देते. अमक्याला आरसा दाखवला तर ठीक, तमक्याला मात्र नाही दाखवायचा. अगदी उदाहरणे घेऊन याचा विचार करता येईल. एक उदाहरण तर माझ्याशी संबंधीतच आहे. तीन चार वर्षांपूर्वीची घटना. प्रतिक्रिया देणाऱ्यांमधील एक व्यक्ती आणि मी एका कार्यक्रमात एका मंचावर येणार होतो. त्या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी मी एका घटनेवरून एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्यात आरसा दाखवला होता. काय विचारता... तो कार्यक्रमच रद्द झाला. आपली पारदर्शिता जर अशी असेल तर मोठमोठ्या गप्पांना अर्थ राहत नाही. अन लोक आपल्याला बेदखल करत जातात. भारत सासणे यांच्या भाषणाची कड घेणाऱ्यांची ही पंचाईत आहे.
आणखीनही उदाहरणे वानगीदाखल... मी एकदा 'साधना' मासिकाच्या संपादकांना (पूर्वीच्या) म्हटले होते - तुम्ही अनेक गोष्टींवर टीका करत असता. हरकत नाही. पण त्यातील काही गोष्टींची वेगळी बाजू मांडणारे माझे दोन चार लेख प्रसिद्ध करा. त्यांचा स्पष्ट नकार होता. ही वृत्ती असेल तर खूप भव्य दिव्य वगैरे गप्पा निरर्थकच ठरणार.
पुन्हा एकदा विचार पद्धतीवरून मूळ वैचारिक भूमिकेकडे येऊ. भारतात सगळं निरर्थकच होतं. हा भारत जो काही होता तो बुडवून नष्ट करण्याचा लायकीचाच होता असं वाटणारे खूप आहेत. त्यात एक विषय असतो शिक्षण. प्राचीन भारतातील शिक्षणासंबंधीचे गैरसमज प्रो. धर्मपाल त्यांनी साधार खोडून काढले आहेत. धर्मपाल हे शुद्ध गांधीवादी होते. आजच्या व्यवस्थेशी संबंधित नव्हते. इतकंच नाही तर त्यांच्या संशोधन इत्यादीसाठी आजच्या व्यवस्थेने पैसा, सवलती दिल्या नव्हत्या. पण प्राचीन भारतीय शिक्षणाविषयीचे गैरसमज टाकून देण्याची तयारी का नसते? कारण तसे केल्यास कोणावर वा कशावर तरी तोंडसुख घेता येत नाही.
मूळ वैचारिक धारणा, विचारांची पद्धत, विश्लेषणातील वेचकपणा; अशा सगळ्याच बाबतीत आज अनेकांची पंचाईत झालेली आहे. भारत सासणे वा त्यांचे पाठीराखे किंवा त्या मंदियाळीतील असंख्य लेखक, वाचक वा सामान्य जन; यांनी कोणाकोणाला आरसे दाखवायचे ते दाखवावेत. पण तेच आरसे आपल्या स्वतःकडे पण वळवावेत. अन त्यावेळी दिसणारे सत्य नाकारू नये. व्यक्तिगत वा वैचारिक कोणत्याही सत्याला सामोरे जाण्यात संकोच करू नये.
- श्रीपाद कोठे
शनिवार, २१ मे २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा