शनिवार, २७ मे, २०२३

विचारवंताचे नैराश्य

काल पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा स्मृतीदिवस होता. त्यानिमित्ताने काही लेख समाज माध्यमात दिसले. राजू परुळेकर यांचाही 'नेहरू नावाचा हिमालय आणि खुजी आरएसएस' हा लेख दिसला. मी तो पूर्ण वाचला. नेहरूंची मांडणी चांगली केली आहे. काही मुद्दे, काही घटना यावर वेगळी मते, वेगळं आकलन असूच शकतं; पण नेहरू व्यवस्थित मांडले आहेत. मात्र लेख वाचल्यावर मला प्रश्न पडला की, लेख आणि लेखाचं शीर्षक यांचा काय संबंध? नेहरू नावाचा हिमालय असं म्हणताना परुळेकर यांनी तो हिमालय दाखवला आहे. कोणाला तो सातपुडा, कोणाला सह्याद्री वगैरे वाटू शकेल पण त्यांनी तो हिमालय दाखवला. परंतु खुजी आरएसएस म्हणताना हे खुजेपण मात्र दाखवलेलं नाही. मोठ्ठ्या लेखात दोन ठिकाणी संघाचा उल्लेख आहे पण त्यावर हिणकस शेरेबाजी करण्यापुरता. संघाची धोरणे, संघाची वक्तव्ये, संघ नेत्यांच्या प्रतिक्रिया, घटना; असं काही तरी आधाराला घेऊन; त्याचं विवेचन करून संघ खुजा आहे हे दाखवलं असतं तर त्याला किमान वैचारिक मांडणी म्हणता आलं असतं. तसं काहीही न करता नेहरू मांडण्यासाठी किंवा नेहरू मांडताना संघाला खुजे म्हणणे हा फक्त आणि फक्त संघ विरोधाचा कंडू शमवून घेण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल.

आधीही लिहिले आहे पण परुळेकर यांच्यासाठी पुन्हा सांगतो; १९८८ साली आकाशवाणीवर पंडित नेहरू जन्मशताब्दी निमित्त मी केलेल्या भाषणाचं संपूर्ण मार्गदर्शन श्री. दत्तोपंत ठेंगडी या संघ प्रचारकांनी रेशीमबागेच्या भूमीतच मला केलं होतं. सडकछाप पोरकट चर्चा करणाऱ्यांच्या मतांवरून किंवा वागण्या बोलण्यावरून; एखादा विचार, एखादी संघटना याविषयी मूल्यांकन करायचे नसते; हे विद्वान आणि विचारवंत समजल्या जाणाऱ्यांना कळू नये हे दुर्दैव आहे.

या अनुषंगाने नेहरू आणि संघ संदर्भात फक्त काही प्रश्न परुळेकर यांच्यासाठी -

१) तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यावर लावलेले ३०२ कलम तेव्हाच्या केंद्र सरकारने दोन दिवसातच मागे घेतले की नाही? आणि कोणतेही ठोस आरोप नसताना गुरुजींना प्रथम सहा महिने तुरुंगात ठेवले की नाही?

२) दुसऱ्यांदा त्यांना दिल्लीतून अटक करून पुन्हा तुरुंगात टाकताना सरकार कोणतेही आरोप सुद्धा लावू शकले नव्हते हे खरे नाही का?

३) संघावर बंदी घालताना कुठेही चर्चेत नसणारा वा आक्षेप नसणारा संघाच्या घटनेचा विषय, बंदी घातल्यानंतर दीड वर्षाने तयार करून; सूड घेण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारने केला की नाही?

४) गांधीहत्येच्या खटल्याचा निकाल लागून दोषींना शिक्षा होऊन गेली तरी गुरुजींना कारागृहात का ठेवले होते? संघावरची बंदी का उठवली नव्हती?

५) या सगळ्या बाबी न्यायाला धरून होत्या का? संवैधानिक होत्या का? तुमचा हिमालय इतका खुजा का वागला?

६) नेहरूंची कर्तबगारी सांगून त्यांच्या संघद्वेषावर पांघरूण घालता येईल का?

७) संघाने नेहरूंचा द्वेष केला वा त्यांना अडचणीत आणले याचे उदाहरण आहे का?

श्री. परुळेकर, आपण या लेखात नेहरूंनी इंदिरेला लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख केला आहे. ज्याचा आशय आहे - 'सगळं काही माणसाच्या हाती नसतं.' हे नेहरूंचंच मत त्यांना लागू होत नाही का? कोणत्याही लहान वा मोठ्या व्यक्तीचं उत्थान व पतन हे त्याच्या त्याच्या हाती पूर्णांशाने नसतं. 'काळ' नावाची गोष्ट हे घडवते. प्रत्येक गोष्टीच्या उत्थान आणि पतनाची बीजे त्या गोष्टीतच एकाच पुरचुंडीत बांधून ठेवलेली असतात. त्याच न्यायाने आजचा काळ  नेहरुंना उचलून धरत नसेल तर त्याचं नैराश्य काढण्यासाठी अन्य कोणाला नावे का ठेवायची? हे यच्चयावत सगळ्या मोठ्या माणसांना लागू होतं. त्यामुळे अभिनिवेश, आवेश, आक्रोश वा आक्रस्ताळेपणा करण्याला काही अर्थ नाही. नेहरू त्यांच्या महानतेसह आणि लहानतेसह इतिहासात कोरले गेले आहेत. आज त्यांचा उदोउदो होत नाही याचं दु:ख तुम्हाला असू शकेल. पण त्यासाठी वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची काय गरज?

- श्रीपाद कोठे

शनिवार, २८ मे २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा