गुरुवार, ३० जून, २०२२

मूर्ख शिरोमणी

अनेकांना हे जग त्यांना हवं तसं पाहिजे असतं. त्यासाठी खूप आटापिटाही चालतो त्यांचा. फक्त एक गोष्ट त्यांना लक्षात येत नाही की, हे जग आपण बनवलेलं नाही. ज्या कोणी हे बनवलं असेल (जर बनवलं असेल तर) तो काही त्यांचा बांधील नाही. या जगाचं सोफ्टवेअर, हार्डवेअर, प्रोग्रामिंग त्यानं त्याला हवं तसं केलं. ते मान्य नाही असं हे लोक म्हणू शकतील. पण त्यामुळे काहीच फरक पडत नाही. मग अशा लोकांची चिडचिड सुरु होते. आक्रस्ताळेपणा सुरु होतो. शिवराळपणा सुरु होतो. याच्यात्याच्यावर खापर फोडणे सुरु होते. सगळ्यात गंमत केव्हा येते? अनेक जण असतात जे म्हणतात, हे जग काही माझं नाही. ते जसं आहे त्यात जुळवून घेवून चालावं. जग आपल्यानुसार चाललं पाहिजे असं म्हणणारे यांच्यावर जाम भडकतात. तुमच्यामुळेच जग असं आहे असा आरोप करतात. सगळ्यांनी आपल्यासारखंच वागलं, बोललं पाहिजे, तशीच स्वप्न पाहिली पाहिजेत, तसाच विचार केला पाहिजे; असा यांचा आग्रह. आमच्यासारखे नसतील ते चूक, अयोग्य, भरकटलेले, जगातील सगळ्या शिव्या वाहाव्या असे; असेच त्यांना वाटते. मुख्य म्हणजे यांना सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण हवे असते. म्हणजे, नियम, गृहितकं, चूक- बरोबर हेच ठरवणार (ते जगाशी मेळ खाणारे नसले तरीही) आणि स्पष्टीकरण बाकीच्यांनी द्यायचे.

काय म्हणावे अशांना?

मूर्ख शिरोमणी गडे

मूर्ख शिरोमणी...

बाकीच्यांनी काय म्हणायचे, ते त्यांचे त्यांनी ठरवायचे.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०१४

काही लाडके भ्रम-

१) या जगातलं सगळं वाईट संपून सगळं चांगलं तेवढंच उरणार आहे.

२) ते माझ्यामुळेच होणार आहे.

३) सगळे समान आहेत. (प्रमोशन किंवा तत्सम वेळेला हा भ्रम दूर ठेवायचा असतो.)

४) मला सत्य वाटतं तेच सत्य. मला समजतं तेवढंच जग.

५) मला पटत नाही/ समजत नाही/ आवडत नाही... ते सारं असत्य/ निरर्थक.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०१४

आपला मार्ग

एक ज्येष्ठ, अनुभवी, विचारी व्यक्ती एका रुग्णाला भेटायला दवाखान्यात गेली. रुग्णाला भेटून, विचारपूस करून ती बाहेर पडली. बाहेर रुग्णाची पत्नी होती. तिच्याशी ती व्यक्ती दोन मिनिटे बोलली. अन रुग्णाच्या पत्नीला ते गृहस्थ म्हणाले- `तुमचे पती ठीक होतील असे काही मला वाटत नाही.' पत्नीला वाईट वाटलं अन धक्काही बसला. तिने विचारलं, का? ते गृहस्थ म्हणाले- `अहो, मी त्यांच्याशी अर्धा तास बोललो. सगळ्या बाबतीत त्यांचं एकच पालुपद होतं. डॉक्टर असं म्हणतात, डॉक्टर तसं म्हणतात, डॉक्टरांनी हे खायला सांगितलं, डॉक्टरांनी ते पथ्य सांगितलं, डॉक्टरांनी अमुक व्यायाम सांगितला... इत्यादी. मला माझ्या प्रकृतीसाठी अमुक करायचं आहे, असं वाक्य काही त्यांच्या तोंडून आलं नाही. डॉक्टरांना, तुम्हाला, मला वा अन्य कोणाला काही वाटून, आपण काही म्हणून सांगून काय होईल? ज्याची प्रकृती बरी नाही त्याला जेव्हा मनापासून वाटेल अन तो स्वत: ठरवले म्हणून प्रयत्न करेल; तेव्हाच तब्येत बरी होईल.' एवढं ऐकल्यावर पत्नीचा चेहरा जरा सामान्य झाला.

आज आपलीही समस्या हीच आहे. स्वच्छतेचा आग्रह, वेळेचा आग्रह, नीटनेटकेपणा, सौजन्य, विचारशीलता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार न करणे, शिकणे किंवा शिकवणे, कामे हातावेगळी करणे, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे, वाहतुकीचे नियम पाळणे, फुकट काही मिळण्याची वृत्ती टाकून देणे, जात- पंथ- भाषा- प्रांत- लिंग- किंवा अन्य बाबींवरून कोणाचाही तिरस्कार वा द्वेष न करणे, परस्परात हा अमक्या पक्षाचा- तमक्या पक्षाचा असे न करणे, खुल्या मनाने- खुल्या बुद्धीने सगळ्या गोष्टींकडे पाहणे, एखादी गोष्ट पटत नसेल तरी तिचा आदर करणे, होता होईल तेवढा मदतीचा हात पुढे करणे, आपला कचरा वा सांडपाणी दुसऱ्याच्या हद्दीत जाऊ न देणे, दुसऱ्याला त्रास होईल एवढ्या आवाजात गाणी न ऐकणे, चौकस राहणे, अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे- आल्यागेल्याकडे आस्थेने लक्ष देणे... अशासारख्या असंख्य गोष्टी तुम्हाला- मला, सगळ्यांना, प्रत्येकाला वाटत नाही तोवर नुसती बोटे दाखवून, चर्चा करून, आरोप प्रत्यारोप करून काय होणार? रुग्णाला बरे व्हायचे असेल तर त्याचे त्यालाच वाटले पाहिजे अन कोण काय म्हणतो, सांगतो याकडे वाजवी लक्ष देऊन त्याने आपला मार्ग चालला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०१८

आक्रोश

आक्रोश, आक्रस्ताळेपणा, कर्कशपणा केव्हा येतो?

लहान मूल आकांत का मांडतं?

खूप अधिक दुर्लक्ष, लक्ष देण्यास नकार, जाणीवपूर्वक टाळणे, स्वतःत मश्गुल राहणे, बेफिकिरी... यांच्यामुळे हे सारे घडते. कर्कश होणाऱ्याकडून संयमाची अपेक्षा करणे हे क्रौर्य असते अनेकदा. जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात, सामाजिक प्रवाहात, परंपरांमध्ये; सर्वत्र हे लागू होते. साधं ऐकून घेण्यास नकार ही देखील क्रूरताच. खूप गोड, नाजूक, कोमल वाटणारी माणसेही अत्यंत क्रूर असू शकतात.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०१८

आषाढी

आषाढी एकादशीचे महत्व आणि उल्हास महाराष्ट्रासाठी विशेष असतातच. पण देशभरातच देवशयनी एकादशी म्हणून आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आहेत. यावर्षी कोरोनामुळे त्या सगळ्यालाच अडथळा आला आहे. अडथळा हे वळणही असू शकते या तर्काने, कोरोनाने आणलेला अडथळा सुद्धा वळण ठरू शकतो. तो तसा ठरावा आणि दैवतांचे मानुषीकरण अन माणसांचे दैवतीकरण यातून भक्तीमार्गाने पुढे सरकावे. अर्थात भारतीय परंपरेप्रमाणे प्रतिमाभंजन न करता. विश्वशक्तीचीही कदाचित तशीच योजना असावी.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०२१

मंगळवार, २८ जून, २०२२

पंचाईत राजकारण्यांची

योग्य, खरं, श्रेयस्कर बोलू न शकणे; ही सगळ्याच राजकारण्यांची आणि राज्यकर्त्यांची पंचाईत असते. अन वर्तमानात विचार आणि शहाणपण राजकारणाच्या दावणीला बांधल्यामुळे; योग्य, खरं आणि श्रेयस्कर यांची समाजातून उचलबांगडी झाली आहे. (संदर्भ - मुंबईत तीन दिवसात लोकलमधून पडून १७ जणांनी प्राण गमावले. जबाबदारीचा आणि उपायांचा अमाप उहापोह होईल, पण शहरांचा अन जीवनाचा 'मुंबई' pattern चूक आहे अन तो बदललाच पाहिजे हे कोणी चुकूनही म्हणणार नाही.)

जय हो.

- श्रीपाद कोठे

२९ जून २०१९

गोरी गोरी पान

फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीवरून खूप भवती न भवती सुरू आहे. वास्तविक गंमत म्हणून पाहावं असाच सगळा प्रकार. पण याचे दीर्घकालीन परिणाम होतात त्यामुळे त्याबद्दल लिहावे बोलावे लागते. सध्याचे लिखाण पाहून असे वाटते की, आता गोऱ्या रंगाबद्दल नकारात्मकता निर्माण केल्याशिवाय काही आम्ही स्वस्थ बसणार नाही. हो, हे खरे आहे की काळ्या रंगावरून बऱ्याच जणांना त्रासही सोसावा लागला आणि लागतो. पण म्हणून गोरा रंग आवडणे आणि 'गोरी गोरी पान...' सारखं गाणं लिहिणे; हे दोषार्ह कसे काय होऊ शकते? काळ्या मुला मुलींना स्वीकारणारे, काळा गोरा असा विचार न करणारे असेही लोक असतातच. शिवाय काळ्या रंगाबद्दल बोलताना, मस्करी करताना; ते सगळेच दुष्टपणाचे असते का? छळ या सदरात मोडणारे प्रकार असूच शकतात पण अशी दहा वीस उदाहरणे म्हणजे समाज का? आजकाल अशी उदाहरणे समोर ठेवून समाजाचं विश्लेषण करणं फारच बोकाळलं आहे. सगळ्यात मुख्य मुद्दा असा की, कोणाला आवड निवड नसावी असं कसं म्हणता येईल आणि या गोष्टींचा genuine त्रास दूर कसा होईल? यातील आवडनिवड असू नये असं कदाचित कोणी म्हणणार नाही. उरला त्रास दूर करण्याचा विषय. त्यावर उपाय माणसाच्या मनातली दुष्टता कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि माणसाच्या मनाला कणखर बनवणे, हाच असू शकतो. या ऐवजी अमुक शब्द वापरावा किंवा वापरू नये, अमुक असं लिहू नये; इत्यादी जरा गमतीशीरच वाटतं.

- श्रीपाद कोठे

सोमवार, २९ जून २०२०