एक ज्येष्ठ, अनुभवी, विचारी व्यक्ती एका रुग्णाला भेटायला दवाखान्यात गेली. रुग्णाला भेटून, विचारपूस करून ती बाहेर पडली. बाहेर रुग्णाची पत्नी होती. तिच्याशी ती व्यक्ती दोन मिनिटे बोलली. अन रुग्णाच्या पत्नीला ते गृहस्थ म्हणाले- `तुमचे पती ठीक होतील असे काही मला वाटत नाही.' पत्नीला वाईट वाटलं अन धक्काही बसला. तिने विचारलं, का? ते गृहस्थ म्हणाले- `अहो, मी त्यांच्याशी अर्धा तास बोललो. सगळ्या बाबतीत त्यांचं एकच पालुपद होतं. डॉक्टर असं म्हणतात, डॉक्टर तसं म्हणतात, डॉक्टरांनी हे खायला सांगितलं, डॉक्टरांनी ते पथ्य सांगितलं, डॉक्टरांनी अमुक व्यायाम सांगितला... इत्यादी. मला माझ्या प्रकृतीसाठी अमुक करायचं आहे, असं वाक्य काही त्यांच्या तोंडून आलं नाही. डॉक्टरांना, तुम्हाला, मला वा अन्य कोणाला काही वाटून, आपण काही म्हणून सांगून काय होईल? ज्याची प्रकृती बरी नाही त्याला जेव्हा मनापासून वाटेल अन तो स्वत: ठरवले म्हणून प्रयत्न करेल; तेव्हाच तब्येत बरी होईल.' एवढं ऐकल्यावर पत्नीचा चेहरा जरा सामान्य झाला.
आज आपलीही समस्या हीच आहे. स्वच्छतेचा आग्रह, वेळेचा आग्रह, नीटनेटकेपणा, सौजन्य, विचारशीलता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार न करणे, शिकणे किंवा शिकवणे, कामे हातावेगळी करणे, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे, वाहतुकीचे नियम पाळणे, फुकट काही मिळण्याची वृत्ती टाकून देणे, जात- पंथ- भाषा- प्रांत- लिंग- किंवा अन्य बाबींवरून कोणाचाही तिरस्कार वा द्वेष न करणे, परस्परात हा अमक्या पक्षाचा- तमक्या पक्षाचा असे न करणे, खुल्या मनाने- खुल्या बुद्धीने सगळ्या गोष्टींकडे पाहणे, एखादी गोष्ट पटत नसेल तरी तिचा आदर करणे, होता होईल तेवढा मदतीचा हात पुढे करणे, आपला कचरा वा सांडपाणी दुसऱ्याच्या हद्दीत जाऊ न देणे, दुसऱ्याला त्रास होईल एवढ्या आवाजात गाणी न ऐकणे, चौकस राहणे, अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे- आल्यागेल्याकडे आस्थेने लक्ष देणे... अशासारख्या असंख्य गोष्टी तुम्हाला- मला, सगळ्यांना, प्रत्येकाला वाटत नाही तोवर नुसती बोटे दाखवून, चर्चा करून, आरोप प्रत्यारोप करून काय होणार? रुग्णाला बरे व्हायचे असेल तर त्याचे त्यालाच वाटले पाहिजे अन कोण काय म्हणतो, सांगतो याकडे वाजवी लक्ष देऊन त्याने आपला मार्ग चालला पाहिजे.
- श्रीपाद कोठे
१ जुलै २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा