२५ मार्च १८९६ रोजी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या `ग्रॅज्युएट फिलोसोफिकल सोसायटी’त स्वामी विवेकानंदांचे `वेदांत दर्शन’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या व्याख्यानानंतर त्यांना जवळपास ३३ विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक प्रश्न होता- `सभ्यतेसंबंधी वेदांताची काय कल्पना आहे?’ त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले- `तुम्ही सगळे तत्वज्ञानी लोक आहात. माणसामाणसामध्ये केवळ पैशामुळे फरक पडत नाही हे तुम्ही जाणता. या सगळ्या यंत्रांचे आणि भौतिक विज्ञानाचे काय मूल्य आहे? त्या सर्वांपासून लाभ हाच की, त्यांच्यामुळे ज्ञानाचा प्रसार होतो. मनुष्याच्या गरजा पुरविण्याची समस्या तर तुम्ही सोडवलीच नाही, पण उलट तुम्ही त्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत. दारिद्र्याचा प्रश्न यंत्रे सोडवीत नाहीत. यंत्रांमुळे माणसे अधिक संघर्ष करू लागतात. स्पर्धा उग्र रूप धारण करते. निसर्गाचे स्वत:चे असे मूल्य काय आहे? तारेतून वीज प्रवाहित करणाऱ्या माणसाचे तुम्ही का बरे स्मारक उभारता? निसर्ग ते कार्य लक्षलक्ष वेळा करीत नाही काय? या सर्व गोष्टी निसर्गात आधीच विद्यमान नाहीत का? मानवाने त्या प्राप्त करण्यापासून काय लाभ? त्या तर आधीपासून आहेतच. त्यांच्यापासून आपला विकास होतो हेच त्यांचे मूल्य आहे. हे विश्व म्हणजे केवळ एक व्यायामशाळा आहे. येथे जीवात्मा व्यायाम घेतो. या व्यायामाने आपल्याला देवत्व प्राप्त होते. म्हणून कोणत्याही गोष्टीत ईश्वरत्वाचा कितपत आविष्कार झाला आहे यावरून तिचे मूल्य ठरविले गेले पाहिजे. मानवातील देवत्वाचे प्रकटीकरण म्हणजेच सभ्यता होय.’
- श्रीपाद कोठे
२५ जून २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा