संध्याकाळच्या एकाग्र सखीवेळेला फक्त संगीताचा आधार असतो. त्यामुळे गुगल शोधलं- संवादिनीवादन, वीणावादन अशी चित्र. पार निराशा झाली. मग शोधलं- musical ecstasy. तिथे तर त्याहून घोर निराशा. डिस्कोमध्ये धिंगाणा करणारी तरुणाई. त्याला musical ecstasy म्हणताना जीभही रेटत नाही, अन लोक सर्रास छापे मारून मोकळे. बरे एवीतेवी त्या आंग्ल लोकांना संगीतातील ecstasy नाही कळणार. पण संवादिनी, वीणा यांचे वादन करतानाची चांगली चित्रं नसावीत. त्यातील एकाग्रता, सौंदर्य, विलीन होणं, पूर्णत्वाचा प्रवास, त्याचं अंतर्बाह्य नेटकेपण काहीही कोणाही छायाचित्रकाराला जाणवलं नसावं, त्याने ते टिपलं नसावं; कोणत्याही चित्रकाराला त्यातील भाव, भावसौंदर्य कधी दिसलं नसेल? कलेच्या क्षेत्रातील आपली अतिप्रचंड श्रीमंती खरंच किती अलक्षित असावी? अक्षरश: एक संगीत हा विषय घेतला तरीही त्याची लक्षावधी भावचित्रे, लक्षावधी सौंदर्यचित्रे होऊ शकतील. अर्थात त्यासाठी बोटात चित्रकौशल्य, संगीताचा कान- व्यासंग- समज- दोन्ही हवे. भावसौंदर्य उलगडणारे गायक-गायिका हव्यात अन ते समजणारे चित्रकार हवेत. असा आस्वाद घेणे अन असा व्यासंग आजच्या युगात शक्य आहे का हाही एक प्रश्नच. संगीत असो, चित्रकला असो किंवा अन्य कोणतीही कला त्याकडे खरंच गांभीर्याने पाहिलं जातं का? तबल्याचे शिक्षक असावेत की नसावेत हे आम्ही ठरवू शकत नाही अशी स्थिती आहे. विविध कलाशाखांचे एकीकरण वगैरे दूरच. संगीत व चित्र ही केवळ चर्चेसाठीची उदाहरणे. बाकी साहित्य काय किंवा शिल्प काय तीच स्थिती. किती लेखक, लेखिका संगीत, चित्र, नृत्य, नाट्य यांची जुजबी तरी माहिती असावी असा विचार करतात. कला ही बुडवून घेण्याची, साधनेची चीज आहे. त्यातून सौदर्य, आनंद, शिवत्व गवसतं. सायंकालीन धुपासारखं वितळून जावं लागतं. पण हे होतं कसं? याचे शिकवणीवर्ग नसतात, याच्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे नसतात; अन जी विद्यापीठे असतात ती तुमच्या आमच्या विद्यापीठाच्या व्याख्येत न बसणारी. प्रभा अत्रेंचा यमन ऐकताना, एखादी स्त्री एकाग्रतेने क्रोशाचे टाके घालते तशी होणारी सुरांची गुंफण दिसायला काय करायचं असतं, हे शिकवता येईल? हे सगळं व्हायला हवं, पण कसं होईल?
करेल ते नादब्रम्ह काहीतरी... निश्चित करेल...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १८ जून २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा