चांगलेपणा, वाईटपणा, भलेपणा, बुरेपणा, गोड वागणं/ बोलणं/ असणं, कडू वागणं/ बोलणं/ असणं, जोडण्याची वृत्ती, तोडण्याची वृत्ती; अशा असंख्य गोष्टींचे कप्पे आपण करतो. पण केवळ बाह्य कृती किंवा शब्द, एवढ्यावरूनच असे ठरवता येत नाही हे नीट समजून घ्यायला हवे. एखाद्याला पाणी देणे यासारखी मोठी गोष्ट नाही. कोणाच्याही तोंडचे पाणी हिसकू नये, हे खरेच. मात्र, जलोदर झालेला रोगी, उन्हातून आलेला व्यक्ती, फळे खाल्ल्यावर पाण्याला तोंड लावणारा, अशुद्ध पाणी तोंडाला लावणारा; यांच्या तोंडचे पाणी काढून घेणे हेच योग्य, पुण्याचे आणि धर्माचे काम असते. जहाज बांधणीच्या व्यवसायाप्रमाणे जहाज तोडणीचा व्यवसाय सुद्धा आवश्यक असतो. जुन्या घराच्या जागी नवीन घर बांधताना जुन्याला नेस्तनाबूत करावेच लागते. लहान मूल वीजेशी, स्वयंपाकाच्या गॅसशी, अन्य विस्तवाशी, किंवा अशा प्रकारांशी चाळे करीत असेल तेव्हा त्याचे कान उपटावेच लागतात, मुलांना किंवा विद्यार्थ्यांना ताडन आवश्यकच असते. परंतु हे सगळे वेळ, परिस्थिती, प्रमाण, अन्य प्रयत्न यानुसार केले पाहिजे आणि त्याच संदर्भाने तपासले पाहिजे. नवीन घर वा जहाज तोडून टाकणे किंवा काहीही कारण नसताना तोंडचे पाणी हिसकून घेणे योग्य नसतेच आणि कारण असूनही तसे न करणेही योग्य अन इष्ट नसतेच.
- श्रीपाद कोठे
१९ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा