बुधवार, १ जून, २०२२

मनोगत

मृत्यू ! जीवनाचं एकमेव शाश्वत सत्य !! जीवनाची शाश्वती देता येत नाही, मृत्यूची शाश्वती देण्याचीही गरज पडत नाही. जीवनाला मृत्यू अवश्य आहे... आहेच. मृत्युनंतरच्या जीवनाबद्दल मात्र असं ठामपणे म्हणता येत नाही. या पृथ्वीच्या पाठीवर पहिला मृत्यू कधी झाला असेल कोणीच सांगू शकत नाही. परंतु एक नक्की की, तेव्हापासूनच मृत्यूबद्दलचे कुतूहल; त्याबद्दल जाणून घेण्याची धडपड; त्याबद्दलचा विचार; माणसाचा स्थायी भाव झाला आहे. अपवादाने सुद्धा असा माणूस नसेल ज्याच्या जीवनात कधी ना कधी मृत्यूचा विचार येत नाही. माणूस तो विचार टाळण्याचा प्रयत्न करतो, त्याची चर्चा सुद्धा अमंगळ मानली जाते. मृत्यूचे दु:ख, वेदना हा तर अवघ्या मनुष्यजातीचा दैनंदिन अनुभवाचा भाग. मृत्यूच्या गुढाने, मृत्यूच्या अपरिहार्यतेने सामान्यापासून असामान्यापर्यंत सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडले आहे. धर्म, समाजव्यवस्था, साहित्य, कला या साऱ्यांनी वारंवार मृत्यूचे चिंतन केले आहे. भारताचा विचार करायचा तर वेद, उपनिषदांपासून, रामायण, महाभारत, जैन व बौद्ध वाङ्ग्मय, भगवद्गीता, दासबोध सगळ्यांनी मानवी जीवनाचा विचार करताना अपरिहार्य अशा मृत्यूचा विचार केलेला आहे. मृत्यू संबंधीची मानवी मनातील स्पंदने, तरंग, जाणीवा, धारणा; त्याच्या एकूण जीवनाला आणि जीवनदृष्टीला प्रभावित करीत असतात. घडवीत असतात. इतिहासापासून अर्थकारणापर्यंत; मानसिकतेपासून तर न्यायादी कल्पनांपर्यंत; मृत्यूचा हा विचार जीवनाला प्रभावित करीत असतो. आज जगभर जीवनाचे जे जे संघर्ष आणि समस्या आहेत त्यांच्या मुळाशी जायचे असेल तर मृत्यूचा निर्भीड विचार आवश्यक ठरतो. मानवी जीवनाच्या संघर्षांना आणि समस्यांना उत्तरे देण्याचे जे प्रयत्न होतात ते साधारणपणे पौर्वात्य (मुख्यत: भारतीय) आणि पाश्चात्य या दोन वर्गात मोडतात. या दोहोतील भेद, फरक, भिन्नता समजून घ्यायचे असेल तर त्यातील मृत्यूविषयक चिंतन आधी समजून घ्यावे लागते. त्याशिवाय त्यातील भिन्नता लक्षातच येणे अशक्य. मानवापुढे आज उभा असलेला रिक्ततेचा मोठा प्रश्नसुद्धा मृत्यू चिंतनापाशी येऊन थांबतो. रोजच्या जीवन व्यवहारातील मृत्यूचे दर्शन, मृत्यूचे रंग, मृत्यूची अपरिहार्यता हे तर आहेतच. शिवाय मृत्यूचे मानवी देहाच्या मृत्यूव्यतिरिक्त जे अन्य पैलू आहेत तेही लक्षणीय आहेत. मानवी भावविश्वाला, विचारविश्वाला, जीवनाला व्यापून राहणाऱ्या या मृत्यूचे दर्शन घडवण्याचा हा अल्पसा प्रयत्न. तो जसा दिसला, जसा समजला, जसा पोहोचला, जसा कळला; तसा या मृत्यू संवादातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू हाच मध्यवर्ती विषय असणाऱ्या माझ्या एकूण ६७ कविता यात आहेत. यातील एकही यापूर्वी कुठेही प्रसिद्ध झालेली नाही. अगदी समाज माध्यमात सुद्धा. मृत्यू या विषयावरील माझ्या आणखीनही काही कविता आहेत. त्या या संग्रहात समाविष्ट नाहीत. शिवाय या संग्रहाचे संपादन केल्यानंतर वाटू लागले की, खूप काही राहून गेले आहे. खूप काही अजून आहे जे खुणावते आहे. मुळात या विषयाची व्याप्तीच फार मोठी आहे. राहिलेले सारे पुढे जे आणि जसे होईल ते होईल. तूर्तास मानवी जीवनप्रवासातील या सहप्रवाशाशी साधलेला संवाद आपणाला सादर करतो आहे.

आपण त्याचे स्वागत कराल या विश्वासासह.

- श्रीपाद कोठे

नागपूर

(महाराष्ट्र, भारत)

shripad.kothe@gmail.com

२ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा