शुक्रवार, १० जून, २०२२

माणसा तू दिव्य हो...

दिल्लीच्या तीन महानगरपालिकांच्या प्रतिनिधींनी आज एक पत्रकार परिषद घेऊन असा दावा केला की, दिल्लीत कोरोनाने आतापर्यंत दोन हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. दुसरीकडे दिल्लीच्या सरकारचे म्हणणे मात्र असे की, कोरोनाबळींची संख्या ९८० आहे. दोन्ही अधिकृत दावे. कोणता खरा मानायचा? दोन्ही बाजूचे समर्थक बाह्या सरसावून उभे राहतील आणि आरोप प्रत्यारोप करतील. तरीही मूळ प्रश्न उरतोच - खरं काय? दुसरा मुद्दा येतो की - कोणीतरी खोटा दावा करीत आहे. तो का? त्याचे तथ्य काय? तक्रारी होतील, गुन्हे होतील, खटले होतील आणि जगरहाटी चालू राहील. बळी जाणारे जातील, आपापले हिशेब करणारे करून घेतील, सामान्य माणसे वादावादी करत आपल्या कॅलरीज जाळतील. पुन्हा पुन्हा असं घडत राहील.

प्रश्न आहे असंच घडत राहावं का? ज्यांना वाटतं असंच घडत राहू नये, त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी एकच मंत्र जपत राहावा - 'माणसा तू मोठा हो. माणसा तू माणूस हो. माणसा तू ईश्वर हो. माणसा तू सच्चा हो. माणसा तू व्यापक हो. माणसा तू शुद्ध हो. माणसा तू अंतर्बाह्य स्वच्छ हो. माणसा तू दिव्य हो.' अरे तिकडे माणसे मरताहेत, व्यवस्था अपयशी होत आहेत; अन तुम्ही काय आदर्शवाद सांगता आहात; हा प्रश्न विचारणाऱ्यांनाही एकच उत्तर - 'हो, मी आदर्शवाद सांगतो. व्यवस्था वाहून गेल्या तरी चालतील, जबाबदारीची भांडणं वाट्टेल तेवढी होऊ द्यात; पण माणसाच्या दिव्यत्वाचा मंत्र घुमवत राहणे हाच एकमात्र पर्याय आहे. व्यवस्थांच्या अन जबाबदाऱ्यांच्या चर्चा अन भांडणे करून काहीही होणार नाही. झालेले नाही. एक मात्र निश्चित की, आमच्याच बेजबाबदारपणातून होणाऱ्या राखरांगोळीतून पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याची शक्ती 'माणसा दिव्य हो' या मंत्रातूनच मिळू शकते. अन्य कोणत्याही मार्गाने नाही.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ११ जून २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा