बुधवार, १ जून, २०२२

आशावाद

`लळा जिव्हाळा शब्दच खोटे...' बाबुजींचं गाणं गुणगुणत होतो. तेवढ्यात मागून तो आला. म्हणाला- एवढा नकारात्मक विचार का करतो तू? मी प्रतिप्रश्न केला- `का? तुला असा अनुभव नाही? किंवा असा अनुभव असलेल्या कुणाला तू ओळखत नाही?' तो म्हणाला- `नाही रे. तसं नाही. पण नेहमी सकारात्मक बाजूकडे पहावं. पेला अर्धा भरला आहे असा विचार करावा. नकारात्मक बाजूकडे लक्षच देऊ नये. नेहमी आशावादी राहावं.'

संवाद संपला, पण प्रश्न मनात राहिला- आशावाद म्हणजे काय? तर आपल्याला जे हवंय, जे वाटतंय तसं होईल, किंबहुना होईलच असं स्वत:ला बजावत राहणे म्हणजे आशावाद. याकडे अनेक अंगांनी बघता येईल. एक म्हणजे, हा आशावाद मुळातच भ्रामक असतो. त्याला भक्कम असा काहीही आधार नसतो. दुसरे म्हणजे- असा आशावाद बाळगताना मनात एक सुप्त वा उघड भीती असते, भय असतं. आपल्याला हवं ते नाही घडलं, हवं ते नाही मिळालं तर काय होईल याची. नकार, अभाव स्वीकारण्याची मनाची तयारी नसते. परिणामी आपण नकारात्मक बाजू टाळतो. त्याकडे दुर्लक्ष करायला मनाला शिकवतो. याने एक प्रकारचं मानसिक दुबळेपण येतं. घाबरटपणा येतो. जेव्हा विपरीत गोष्ट घडते तेव्हा येणारी निराशा अधिक असते. त्यातून सावरायला अधिक कष्ट पडतात अन वेळ लागतो. विपरीत गोष्टींचा विचार  टाळायला लावणारा आशावाद माणसाला दुबळं बनवतो.

त्यापेक्षा सत्याला निर्भिडपणे सामोरे जाण्याचा प्रयत्न चांगला. अपेक्षित गोष्टींची इच्छा धरावी, प्रयत्न करावे; पण मनाला बजावत राहावे की- परिणाम काहीही होऊ शकतो. फळ अनुकूलच मिळेल असे नाही, तर प्रतिकूलसुद्धा मिळू शकेल. अन जगाचा, हजारो पिढ्यांचा माणसाचा; हाच अनुभव आहे. भगवद्गीता तर सिद्धांतच सांगते- `कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'. कारण फळावर कोणाचं नियंत्रण नसतं. हे प्रयत्नांच्या बाबतीत झालं. बाकी प्रत्येकाच्या वाट्याला सहजपणे- स्वभाव, नियती, भोग इत्यादींच्या रूपाने जे चांगले वा वाईट येते; त्याबद्दल तर वेगळं बोलण्याची गरजच नाही.

एखाद्याच्या वाट्याला नकार, अभाव, निराशा, अपयश, विपरीत परिस्थिती अशा नकारात्मक गोष्टींची अगदी रेलचेल असते. नव्हे तोच त्याच्या आयुष्याचा नियम असतो. चांगले, शुभ हा अपघात म्हणावा असे आयुष्य असते. तर अन्य एखाद्याच्या बाबतीत नेमके याच्या उलट. अशा दोन्ही बाबतीत प्रयत्न, सकारात्मक विचार वगैरे वगैरे सगळं गुंडाळून ठेवावं लागतं. बाहेरून पाहणारा माणूस सरळ एखादा निष्कर्ष काढून त्याला उपदेशाचे घोट पाजू शकतो. पण आयुष्याची चांगली ओळख असलेली व्यक्ती हे समजू शकते. अशा वेळी फसवा आशावाद उराशी बाळगून स्वप्नात रमण्यापेक्षा, या जगातील आशा-निराशा, अंधार-उजेड यांचा निर्भिड विचार करणारा सत्यमार्गच अधिक मोलाचा असतो.

- श्रीपाद कोठे

२ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा