शुक्रवार, २४ जून, २०२२

आठवण

एखादा अवांछनीय प्रसंग सुद्धा कायम लक्षात राहू शकतो आणि आनंद देऊ शकतो. श्रद्धेय सत्यमित्रानंद जी गिरी यांनी या जगाचा निरोप घेतल्याची बातमी पाहिली आणि असा एक प्रसंग आठवला. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी निमित्त आजी माजी प्रचारकांचे शिबिर झाले होते. त्याची सुरुवात एका मोठ्या जाहीर कार्यक्रमाने झाली होती. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीचा अखिल भारतीय उदघाटन कार्यक्रम. प्रमुख अतिथी होते श्रद्धेय सत्यमित्रानंद जी गिरी. संध्याकाळी कार्यक्रमाची वेळ होत आलेली. ओम भवनाचा मंच तयार होता. सगळे मैदान गच्च भरले होते. काही तरी आणायला की ठेवायला पांडुरंग भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर गेलो होतो. पाच मिनिटे उरली होती. धावत जिना उतरत होतो. पहिल्या मजल्यावर पोहोचलो. समोर स्व. विनायकराव फाटक. 'पू. बाळासाहेब आणि श्रद्धेय सत्यमित्रानंद जी कोणत्याही क्षणी पोहोचतील. आता कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत जिन्याने जाणेयेणे बंद.' विनायकरावांनी एखादी गोष्ट म्हटल्यावर ती अंतिम असणे स्वाभाविकच. बरं, कार्यक्रम संपेपर्यंत दुसरे काही कामही नव्हते. पण आता जाऊ कुठे? मी काही मंचावर थांबू शकणार नव्हतो. मग पांडुरंग भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन व्हरांड्यात उभा राहिलो. मान्यवर आले, सगळा कार्यक्रम पार पडला, अगदी काही फुटांवरून श्रद्धेय सत्यमित्रानंदजींना पाहता आले, पूर्ण कार्यक्रम अतिशय जवळून स्पष्ट पाहता/ ऐकता/ अनुभवता आला. कार्यक्रमाला जमलेल्या लोकांना birds eyeview ने पाहता आले. खाली असतो तर हे शक्य झाले नसते. कारण १९८८ मध्ये cctv वगैरे काही नव्हते. त्या कार्यक्रमात श्रद्धेय सत्यमित्रानंदजींनी स्व. बाळासाहेब देवरस यांना 'यतीसम्राट' संबोधले होते.

श्रद्धेय सत्यमित्रानंदजींना विनम्र नमस्कार.

- श्रीपाद कोठे

२५ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा