शुक्रवार, १७ जून, २०२२

साहित्यिक

अनेक साहित्यिक संस्था आहेत. काही सक्रिय, काही निष्क्रिय. सक्रिय संस्था वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. या कार्यक्रमांचेही अनेक प्रकार आहेत. परंतु एक गोष्ट पुष्कळदा मनात येते. साहित्याच्या माध्यमातून समाजाचं आणि साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचं भावपोषण, विचारपोषण करणारे कार्यक्रम, उपक्रम कमी असतात का? असे भावपोषण, विचारपोषण करण्याचे प्रयत्न का नसावेत? मनात उठणारे बरेवाईट तरंग शब्दात बांधणे म्हणजेच का साहित्य? भावनांचे आवेग वा कढ म्हणजेच का साहित्य? शिक्षण, संस्कार, वृत्ती, वातावरण यांच्या परिघात कदमताल करत राहणे म्हणजेच का साहित्य? शब्दप्रभूंनी आपले विचार, भाव, भावना यांचे सतत परिशीलन आणि परिष्करण करत राहायला नको का? आपल्याच मर्यादेत रडण्याचे कढ आणि हसण्याच्या उर्मी जोजवत राहण्यात धन्यता मानायची का? विचारसमृद्धी आणि भावसमृद्धी एकसुरी, एकदिशी, एकरेषीय असावी का? या समृद्धीसाठी आवश्यक अशी जीवनाची विविधांगी माहिती, जीवनाची ओळख, अनेक असाहित्यिक विषयांचा परिचय, घडामोडी, प्रवाह, चिंतन; हे सारे साहित्याचे आणि साहित्यिकांचे विषय का असू नयेत? त्यासाठीची आयोजने का नसावीत? उदाहरणार्थ, साहित्यिकांची अर्थविषयक जाण फक्त गरिबी आणि दारिद्र्य यांची करुण वर्णने करण्यापुरती किंवा त्यासाठी कोणाला तरी जाब विचारण्यापुरती का राहावीत? साहित्यिकांची वैज्ञानिक समज फक्त तांत्रिक विकासाने दिपून जाण्यापुरतीच का राहावी? शब्दप्रभूंना जीवनाच्या अधीकाधिक मितींनी आणि कक्षांनी खुणावायला हवे अन त्यासाठी प्रयत्नही हवेत, असं नम्रपणे वाटतं.

- श्रीपाद कोठे

१८ जून २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा