सत्याच्या मार्गावर जपून ठेवावं लागतं पाऊल. पहिल्याच पावलाला नियती उज्वल कोरडेपणा ओटीत घालते. हे अम्लान कोरडेपण वागवावं लागतं अखेरपर्यंत. एखाद्या सम्राज्ञीच्या उन्मत्त डौलाने. समर्थनाच्या चिता पेटवून समर्पणाची धुनी जागवावी लागते प्रत्येक पावलावर. नेत्रांची प्रखर दीप्तीची सवय मोडून काढावी लागते अन करावा लागतो सराव अंधुक प्रकाशातही पाऊल योग्य त्याच ठिकाणी ठेवण्याचा. असमर्थ खांद्यांनी पेलावे लागते सत्याचे जडशीळ ओझे. स्वतःच्या अस्तित्वभारासकट. मेघांची अल्लडता नाही बांधता येत पदरात. मृगजळानेच भागवावी लागते तहान अगणित काळ पिच्छा पुरवणारी. आपल्याच सावलीलाही व्हावे लागते पारखे. विश्रांतीला द्यावी लागते तिलांजली आत्मरक्तात भिजवून. गाडून टाकावी लागते समजूत, आपल्याला कंठ असण्याची. प्रश्नांचे उमाळे दाबून टाकावे लागतात स्वीकाराच्या मृण्मय मृत्तिकेने. त्यातूनच फुटतात कोंब इवलाले सत्याच्या बिजाला. अन पोळलेल्या पावलांना शीतलता देण्यासाठी वाढू लागतो त्याचा वृक्ष. तोवर धरावा लागतो दम. म्हणूनच जपून ठेवावं लागतं पाऊल सत्याच्या मार्गावर.
- श्रीपाद कोठे
शुक्रवार, ३ जून २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा