सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (५)

शक्तीच्या सर्वमंगल आविष्कारासाठी संतुलनशक्तीची सर्वाधिक गरज असते. या संतुलनशक्तीसाठी संयम, समजुतदारी, सात्विकता, सद्भाव अशा अनेक गुणांची गरज असते. पण या गुणांच्या संदर्भात दोन अडचणी असतात. एक म्हणजे, केवळ इच्छा केल्याने वा सांगितल्याने, बोलल्याने हे गुण निर्माण होत नाहीत. अन दुसरी अडचण म्हणजे, या गुणांची कठोर परीक्षा पाहणारी परिस्थितीही वेळोवेळी उत्पन्न होत असते.

यातील पहिली अडचण जी ही गुणसंपदा निर्माण होण्याची; त्यासाठी सातत्याने खूप प्रयत्न करावे लागतात. संस्कार, घरापासून समाजापर्यंत सर्वत्र विशिष्ट वातावरण, स्पृहणीय गुणांना अनुसरून अधिकाधिक व्यवहार करणारी भरपूर माणसे, या गुणांबद्दल सार्वत्रिक आस्था आणि आदर, या गुणांच्या बळाचं आणि मर्यादांचं भान असणारे सर्व क्षेत्रातील नेतृत्व, ही गुणसंपदा वृद्धिंगत व्हावी आणि जोपासली जावी याचा प्रयत्न करणारा बुद्धिजीवी वर्ग; अशा अनेक गोष्टी असाव्या लागतात. त्याही सतत. आज आहेत आणि उद्या नाहीत असे चालत नाही. हे सगळे असावे यासाठी किंमत चुकवावी लागते. ही किंमत आर्थिक असते, नावलौकिकाची असते, पदप्रतिष्ठेची असते, लोकमान्यतेची असते, जीवनाची असते, सन्मानाची असते, सहकार्याची असते, सोबतीची असते. आणखीनही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. ही किंमत चुकवल्याशिवाय गुणसंपदेची निर्मिती शक्य नसते. अशी गुणसंपदा भरपूर प्रमाणात निर्माण होते तेव्हाच लोकांची आंतरिक शक्ती वाढते. अन ही आंतरिक शक्ती आणि परिपक्वता वाढली की त्यातूनच संतुलनशक्ती विकसित होते. आदेश देऊन, कायदे करून, जबरदस्तीने, बलपूर्वक संतुलनशक्ती निर्माण करता येत नाही.

यासोबतच या गुणांची कठोर परीक्षा पाहणाऱ्या, दुसऱ्या अडचणीचाही विचार करावाच लागतो.

- श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०२१

रॉकेलची गाडी

कुठल्या तरी वाहिनीवर कुठला तरी चित्रपट गळत होता. वाहिन्या बदलता बदलता एकदम थांबलो. पडद्यावर रॉकेलची गाडी दिसली. मन एकदम चाळीसेक वर्षे मागे गेलं. कदाचित त्याहूनही थोडं जास्तच. वडिलांनी घर बांधल्यानंतर दोन तीन वर्षे घरी वीज नव्हती. कंदील, चिमणी, स्टॅण्ड हे अंधारानंतरचे सोबती. रोज संध्याकाळी रांगोळीने काचा पुसणे आणि त्यात रॉकेल भरणे हे काम असे. शिवाय स्वयंपाकासाठी असलेल्या स्टोव्हमध्येही रॉकेल लागतच असे. आठवड्यातून एकदोनदा रॉकेलची गाडी येत असे. एक बैल जुंपलेली ती गाडी. बैलामागे बसलेला विक्रेता मालक. त्याच्या मागे उतरता मोठा लोखंडी पिंप. रॉकेल भरलेला. त्या पिंपाला खालच्या म्हणजेच गाडीच्या मागच्या बाजूला अडकवलेली; अर्धा लिटर, एक लिटरची मापे. अन दुरून येणारा विक्रेत्याचा ते लोखंडी पिंप वाजवण्याचा आवाज. तो विशिष्ट आवाज आला की समजायचे रॉकेलची गाडी आली. घरच्या टिनाच्या डब्यातील रॉकेल तळाशी गेले असेल तर मायबाई सांगे, रॉकेलवाल्याला थांबव बरं. मग कोणीतरी बाहेर जाऊन वाट पाही आणि तो घरापुढे आला की थांबवत असे. मग जेवढे हवे असेल तेवढे रॉकेल तो त्याच्या मापाने मोजून आपल्या डब्यात देत असे. रॉकेलवाल्याने त्याचे माप पिंपाच्या खालच्या नळाच्या तोटीला लावले की सगळे लक्ष त्याकडे. त्याने कंची मारू नये म्हणून. पण रॉकेलवालाही चांगला होता. माप भरलं की नळ बंद करी. मग क्षणभर थांबे. मापाच्या तोंडाशी जमलेला फेस निवळायचा. मग पुन्हा किंचित नळ सोडायचा आणि ते माप आपल्या डब्यात रीतं व्हायचं. मग पैशाची देवाणघेवाण. हळूहळू वीज, गॅस आले. रॉकेलचा वापर कमी झाला, पण संपला नाही. एक तर वीज गेल्यावर पर्याय तयार असो म्हणून रॉकेल राहत असे. शिवाय आजी सोवळ्याचा स्वतःचा वेगळा स्वयंपाक करायची स्टोव्हवर. त्यालाही लागत असे. त्यामुळे अधूनमधून रॉकेलची खरेदी होई. काही वर्षांनी अशा प्रकारे रॉकेल विकणेच बंद झाले. रॉकेल रेशनच्या दुकानातून मिळायला लागले. गाडीवाला रेशनच्या दुकानाबाहेर उभा राहायचा. हळूहळू तेही बंद झाले. वापर आधीच बंद झाला होता. नंतर विक्री आणि गाडीही बंद झाली. रॉकेलसाठी मातीचे तेल किंवा घासलेट हेही शब्द वापरात होते. धोतर कुडता घालणारा, खांद्यावर शबनमसारखी पैशाची पिशवी आडवी लावणारा, थांबल्यावर टुणकन उडी मारून गाडीवरून उतरणारा, ठेंगणासा रॉकेल गाडीवाला अजूनही आठवतो. रॉकेल विकणारी व्यक्ती तशीच असायला हवी असं मन म्हणतं. त्यामुळे छोट्या पडद्यावर रॉकेलची गाडी पाहून जुने दिवस आठवले तरी, रॉकेलवाला म्हणून बच्चन काही जमला नाही बॉ.

- श्रीपाद कोठे

रविवार, ११ ऑक्टोबर २०२०

भस्म्या

चीनमध्ये १ ते ६ ऑक्टोबर साजऱ्या होणाऱ्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ५० पदरी महामार्गावर २० किमी लांबीचा जाम लागला. सगळी वाहतूक ठप्प झाली होती. ५० पदरांचा हा मार्ग त्यावेळी काही तांत्रिक कारणांनी २० मार्गांचा करण्यात आला होता. म्हणजे वाहतुकीसाठी ५० पैकी २० मार्गच उपलब्ध होते. त्यामुळे ही अडचण निर्माण झाली, असे त्याचे स्पष्टीकरण आहे.

एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला की त्याला जाणीवा राहत नाहीत म्हणतात. लागलं, खुपलं, रक्त आलं, चिरलं, खरचटलं, मारलं... काहीही नाही. आजच्या मानवाला जणू असाच कुष्ठरोग झाला आहे का? त्याला काही जाणवतच नाही. उलट, `अडचणींवर मात करणे म्हणजे पुरुषार्थ' या तत्वाचं महाविडंबन करण्याचा सपाटा जणू मानवाने लावला आहे. स्वत:च्या मनाचं अन बुद्धीचं इतकं स्तोम मानवाने सध्या माजवलं आहे की त्याला तोड नाही. यातूनच `मन:पूतं समाचरेत' (मन म्हणेल तसं करत सुटायचं) सुरु झालं आहे.

अतिशय निरर्थक गोष्टी करायच्या, त्यांची गौरवगीतं गायची, नवे घोळ- नवे गोंधळ निर्माण करायचे, कशाचीही काहीही पर्वा करायची नाही, जीवन आपल्याला जेवढं निरर्थक वाटतं तेवढंच इतरांनाही वाटायला हवं असा आग्रह धरायचा, तसं न वाटणाऱ्यांना हिणवत राहायचं, जीवनातील गांभीर्य- सकसता- सार्थकता- खोली- व्यापकता- यांचं अवमूल्यन करायचं, अन कोणत्यातरी अज्ञात उन्मादात चित्कारत राहायचं; हीच आधुनिकता, हीच जीवनशैली, हेच जगणं.

त्यामुळे एक पदरीचे अनेक पदरी रस्ते झाले, रस्त्यांवर उड्डाणपूल आले, उड्डाणपुलांचे मजले वाढले; आम्हाला झालेला भस्म्या रोग संपायला मात्र तयार नाही. एखाद्याला झालेला भस्म्या रोग त्याच्या मृत्यूनेच संपतो म्हणतात, माणसाला जडलेला हा भस्म्या रोग मानवजातीच्या अंताशिवाय संपणार नाही, कदाचित.

- श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०१५

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

हिंदुत्व म्हणजे व्यापक होत जाणे

हिंदुत्व म्हणजे आहे तिथून व्यापक होत जाणे. म्हणूनच-

- दिवाळीला फटाके फोडणे थांबवणे.

- लग्नाच्या वराती, निवडणूक मिरवणुका यातील फटाके थांबवणे.

- नाताळ वा नववर्ष स्वागताला फटाके न फोडणे.

- जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा धार्मिक रीतीरिवाज म्हणून पशुहत्या न करणे.

- गाड्यांचा वापर कमी करणे.

- गाण्यांचे आवाज कमी करणे.

- वापराच्या प्रमाणात अधिक झाडे लावणे.

- महिलांना त्यांचा अवकाश मिळू देणे.

- बालकांना बालपण मिळू देणे.

- भौतिक उन्नतीसोबतच मानसिक, बौद्धिक, आत्मिक विकासाचा प्रयत्न करणे.

- माझ्या मार्गाने येणारेच स्वर्गाचे अधिकारी, हा आग्रह सोडणे.

- जिहाद चा त्याग करणे.

- सगळेच उपासना मार्ग सत्य आणि योग्य आहेत याला मान्यता देणे.

- कोणी संकुचितपणा करतात म्हणून आपण संकुचितपणा न करणे.

- संकुचितपणा करणाऱ्यांना स्पष्टपणे तसे सांगण्याचा संकोच न करणे किंवा त्यांना तसे सांगताना भय न बाळगणे.

- व्यापकतेच्या नावाने एकांगीपणा करून ढोंगबाजी न करणे.

- अशा ढोंगी लोकांना परखडपणे ते जाणवून देणे.

हे सगळंच हिंदुत्व. संकुचित होणे कोणाच्याच हिताचे नाही. व्यापक होणे सगळ्यांच्याच हिताचे. त्यामुळे सगळ्या जगाने हिंदुत्व स्वीकारायला हवे.

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१७

जोगवा

नेहमीप्रमाणे आजही, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती आली. तिचे नाव गाव माहिती नाही. पण चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र अशा दोन्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती येते. जोगवा मागायला. बरीच वर्षे झाली. नेम चुकलेला नाही. आई येथे असताना त्या दोघींच्या गप्पाही होत. आई येथे नसल्याला तीन वर्षे झाली. तरीही ती येते. कारण ती जोगवा मागायला आल्यानंतर तिला शिधा, दक्षिणा देण्याचे मी सुरूच ठेवले आहे. आजही ती येऊन गेली. शिधा, दक्षिणा घेऊन गेली. हा काही तिचा व्यवसाय नाही. अन दोन नवरात्रीत जोगवा मागून वर्षभर उदरनिर्वाह चालतही नाही. हे तिचे व्रत आहे आणि ती ते निष्ठेने करते आहे. भारतीय समाजजीवनाचा एक चिवट धागा मला यात दिसतो. दान मागणे आणि दान देणे या दोन्हीत चुकीचे आणि ओशाळवाणे काही नाही. भारतात तसे कधी समजले गेले नाही. आज तसे समजले जाते याचे कारण आपण भारतीय ethos चा त्याग केलेला आहे. भारतीय संदर्भात `भिक्षा' ही खूप वेगळी कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीचे महत्व, मूल्य, किंमत, उपलब्धता सारखी असू शकत नाही; प्रत्येक व्यक्तीची क्षमता, कल आणि गुण समान असू शकत नाही; तरीही प्रत्येकाला चांगले जगण्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाच्या वेगळेपणाची समाजाला व सृष्टीला गरज आहे; या सगळ्याचा मेळ घालणे; आणि या प्रयत्नातून मानवी जीवन अंतरंगसमृद्ध करणे; याचं जे एक web designing भारताने केलेलं आहे ते लक्षणीय आहे. त्यामुळेच बारकाईने पाहिलं तर `दान' हा व्यक्तीजीवनाचा, समाजजीवनाचा, विश्वजीवनाचा, धार्मिक जीवनाचा, आध्यात्मिक जीवनाचा पाया आणि आधार आहे. वर्तमान आर्थिक, सामाजिक समस्यांच्या दाहक वास्तवाचा विचार करताना वास्तविक भारताच्या या पैलूचा अधिक आणि सर्वंकष विचार व्हायला हवा, समोर मांडला जायला हवा. मात्र, कालमहिमा असा आहे की आमच्यावर भारतेतर विचार, भावभावना वरचढ आहेत आणि `मी' हा कमालीचा मोठा झाला आहे. अर्थात काळ कूस पालटत असतो, हेही खरे.

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१८

भारतीय व्यक्तिवाद

भारतीय चिंतन हे मूलतः व्यक्तिवादी चिंतन आहे. व्यक्तिवाद भारताला नवीन नाही. किंबहुना भारतीय विचार प्रचलित व्यक्तिवादाहून अधिक व्यक्तिवादी आहे. परंतु या दोन व्यक्तिवादात दोन फरक आहेत.

१) प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे भौतिकता, ऐहिकता, जडवाद, भोगवाद, वर्चस्ववाद हे भारतीय व्यक्तिवादाचे आधार नाहीत.

२) भारतीय व्यक्तिवादाने त्याची जबाबदारी व्यक्तीवर टाकलेली आहे. प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे समाजावर नाही. आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगता आले पाहिजे हे दोघांनाही मान्य असले तरीही; त्यातील यश, अपयश, त्रास, संघर्ष, मान्यता, अमान्यता, कौतुक, हेटाळणी यांची जबाबदारी समाजाची; असे प्रचलित व्यक्तिवाद म्हणतो. आम्हाला काय वाटावे किंवा आम्ही काय करावे यात समाजाला say असता कामा नये, पण परिणामांची जबाबदारी आणि आपल्या मतानुसार वागण्यासाठी अनुकूल स्थिती देण्याची जबाबदारी मात्र समाजाची; हा प्रचलित व्यक्तिवादी विचार आहे. तो समाजाला व्यक्तीचा नोकर अशा स्वरूपात पाहतो. तो समाजाला गृहित धरतो. याउलट भारतीय व्यक्तिवाद पूर्ण स्वातंत्र्यासोबत पूर्ण जबाबदारी घ्यायला सांगतो आणि समाज आणि व्यक्तीचे संबंध mutual आहेत असे मानतो.

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१८

महापुरुष ही प्रेरणा

एका पोस्टवर दिलेली प्रतिक्रिया-

मुळात महापुरुष ही फक्त एक प्रेरणा असते. त्याऐवजी त्यांना icon समजणे हे फसवं असतं. अनंतवार हा प्रश्न त्यामुळेच उत्पन्न होतो. महापुरुषांचं अनुकरण, त्यांचे विचार आचरणात आणणं, त्यांच्या मार्गावर चालणं, त्यांचे सल्ले मानणं; असं काहीच नसतं. मुख्य म्हणजे असू शकत नाही. का असू शकत नाही हा स्वतंत्र विषय आहे. सामान्य माणसाच्या मनात महान होण्याची ठिणगी पेटवणं एवढंच फक्त त्यांच्या जीवनाचं प्रयोजन असतं. ही ठिणगी पेटून तिचा वणवा होणं ही पुन्हा वेगळी बाब. अशा ज्या ठिणग्या पेटल्या त्यांचाच परिणाम म्हणजे आजची मानवी सभ्यता. हीच प्रक्रिया सुरू राहील आणि त्यालाच आपण परिवर्तन म्हणतो. परिवर्तन हा उद्देश नसतो अन ते घडवताही येत नाही. परिवर्तन हा प्रेरणेचा परिणाम तेवढा असतो.

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१९