सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

रॉकेलची गाडी

कुठल्या तरी वाहिनीवर कुठला तरी चित्रपट गळत होता. वाहिन्या बदलता बदलता एकदम थांबलो. पडद्यावर रॉकेलची गाडी दिसली. मन एकदम चाळीसेक वर्षे मागे गेलं. कदाचित त्याहूनही थोडं जास्तच. वडिलांनी घर बांधल्यानंतर दोन तीन वर्षे घरी वीज नव्हती. कंदील, चिमणी, स्टॅण्ड हे अंधारानंतरचे सोबती. रोज संध्याकाळी रांगोळीने काचा पुसणे आणि त्यात रॉकेल भरणे हे काम असे. शिवाय स्वयंपाकासाठी असलेल्या स्टोव्हमध्येही रॉकेल लागतच असे. आठवड्यातून एकदोनदा रॉकेलची गाडी येत असे. एक बैल जुंपलेली ती गाडी. बैलामागे बसलेला विक्रेता मालक. त्याच्या मागे उतरता मोठा लोखंडी पिंप. रॉकेल भरलेला. त्या पिंपाला खालच्या म्हणजेच गाडीच्या मागच्या बाजूला अडकवलेली; अर्धा लिटर, एक लिटरची मापे. अन दुरून येणारा विक्रेत्याचा ते लोखंडी पिंप वाजवण्याचा आवाज. तो विशिष्ट आवाज आला की समजायचे रॉकेलची गाडी आली. घरच्या टिनाच्या डब्यातील रॉकेल तळाशी गेले असेल तर मायबाई सांगे, रॉकेलवाल्याला थांबव बरं. मग कोणीतरी बाहेर जाऊन वाट पाही आणि तो घरापुढे आला की थांबवत असे. मग जेवढे हवे असेल तेवढे रॉकेल तो त्याच्या मापाने मोजून आपल्या डब्यात देत असे. रॉकेलवाल्याने त्याचे माप पिंपाच्या खालच्या नळाच्या तोटीला लावले की सगळे लक्ष त्याकडे. त्याने कंची मारू नये म्हणून. पण रॉकेलवालाही चांगला होता. माप भरलं की नळ बंद करी. मग क्षणभर थांबे. मापाच्या तोंडाशी जमलेला फेस निवळायचा. मग पुन्हा किंचित नळ सोडायचा आणि ते माप आपल्या डब्यात रीतं व्हायचं. मग पैशाची देवाणघेवाण. हळूहळू वीज, गॅस आले. रॉकेलचा वापर कमी झाला, पण संपला नाही. एक तर वीज गेल्यावर पर्याय तयार असो म्हणून रॉकेल राहत असे. शिवाय आजी सोवळ्याचा स्वतःचा वेगळा स्वयंपाक करायची स्टोव्हवर. त्यालाही लागत असे. त्यामुळे अधूनमधून रॉकेलची खरेदी होई. काही वर्षांनी अशा प्रकारे रॉकेल विकणेच बंद झाले. रॉकेल रेशनच्या दुकानातून मिळायला लागले. गाडीवाला रेशनच्या दुकानाबाहेर उभा राहायचा. हळूहळू तेही बंद झाले. वापर आधीच बंद झाला होता. नंतर विक्री आणि गाडीही बंद झाली. रॉकेलसाठी मातीचे तेल किंवा घासलेट हेही शब्द वापरात होते. धोतर कुडता घालणारा, खांद्यावर शबनमसारखी पैशाची पिशवी आडवी लावणारा, थांबल्यावर टुणकन उडी मारून गाडीवरून उतरणारा, ठेंगणासा रॉकेल गाडीवाला अजूनही आठवतो. रॉकेल विकणारी व्यक्ती तशीच असायला हवी असं मन म्हणतं. त्यामुळे छोट्या पडद्यावर रॉकेलची गाडी पाहून जुने दिवस आठवले तरी, रॉकेलवाला म्हणून बच्चन काही जमला नाही बॉ.

- श्रीपाद कोठे

रविवार, ११ ऑक्टोबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा